गुप्तहेर रॉबिन आणी कुटीरोवांचं शस्त्र - भाग ३

 काही वेळातच पोलिसांच्या गाडीमधून रॉबिन देसाई वाड्याच्या जवळ पोहोचला. देसाई वाडा तसा प्रशस्त आणी आकाराने सुद्धा मोठा वाटत होता, वाडा दुमजली होता. मोठ्या दगडाचं बांधकाम जुन्या काळातील होतं. मात्र वाडा अजूनही भक्कम असल्याप्रमाणे उभा होता. आजूबाजूला काही अंतरावर देसाई वाड्यासारखेच काही प्रशस्त वाडे होते. तिथे काही म्हातारी जोडपी राहायची त्यांची मुले इतर ठिकाणी कामाला असल्याने ती दांपत्य इथे एकटेच राहत असत अशी माहिती देशमुखांनी पुरवली. वाड्याच्या मुख्य दरवाजाजवळ एक पाटी होती “ देसाई वाडा “ अशा नावाची. गाडीतून उतरून रॉबिन त्या पाटीजवळ उभा राहून तिला न्याहाळू लागला. मागून इ. देशमुख आणी म्हस्के हवालदार त्याचा जवळ येऊन उभे राहिले आणी रॉबिन नक्की काय पाहतोय हे बघू लागले.

“ खूपच जुना आहे वाटत हा वाडा “ दारावरील पाटीकडे पाहतच रॉबिन म्हणाला.

“ हो खूप जुना आहे, खरंतर मालतीताई यांचा पूर्वजांचा हा वाडा त्यांचा वडिलांच्या पश्चात मालतीताई यांना मिळाला. मग त्या आपल्या नवर्यासोबत इथेच राहत होत्या” देशमुखांनी माहिती पुरवली.

“ चला आत जाऊ “रॉबिन अचानक मुख्य दरवाजाकडे वळला.

रॉबिन आणी देशमुख आतमध्ये आले. देशमुखांनी हवालदार म्हस्के यांना मुख्य दारातच उभे राहायला सांगिलते जेणे करून इतर चौकशीदरम्यान इतर कोणाचा त्रास नको. रॉबिन आणी देशमुख वाड्यात प्रविष्ट झाले. वाड्यात आल्यावर रॉबिन चौफेर पाहू लागला. मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यावर काही पावलांवर तुळशीवृंदावन होतं, तिथे लावलेल्या अगरबत्ती चा सुवास वातावरणात दरवळत होता. तुळशीच्या आसपास मध्ये मोठी मोकळी जागा आणी आजूबाजूला काही खोल्या, वाडा दुमजली असून वरच्या मजल्यावर सुद्धा काही खोल्या होत्या. रॉबिन शांतपणे वाड्याच्या आतला भाग निरखत होता. रॉबिन आणी देशमुख इथे आल्याची कुणकुण बहुतेक आतल्या लोकांना लागलेली नसल्यामुळे बाहेर कोणीच आलेले न्हवते. इ. देशमुखांनी पुढे जाऊन मोठ्याने हाका मारल्या.

“अविनाश, आहेस का घरात ... “ देशमुख इकडे तिकडे पाहू लागले.

तेवढ्यात बाजूच्या खोलीमधून अविनाश नावाचा एक इसम बाहेर आला. तो दिसायला उंचपुरा साधारण पस्तिशीचा आणी शांत चेहऱ्याचा असा होता.

“ अरे इन्स्पेक्टर साहेब तुम्ही ... काहीशा प्रश्नार्थक मुद्रेत अविनाशने देशमुखांना विचारलं.

“ हो, मी टेलिफोन वरून सांगितलं होतं ना कि गुप्तहेर रॉबिनसुद्धा या तपासात सामील होतायत ते हेच.” देशमुखांनी रॉबिन कडे निर्देश करत म्हटलं.

तशी अविनाशची नजर रॉबिनकडे गेली.

रॉबिनने हात जोडून नमस्कार केला. अविनाशने सुद्धा हसून नमस्कार केला.

“ आणी रॉबिन हे अविनाश देसाई. मालती देसाई यांचे ज्येष्ठ सुपुत्र. देशमुख यांनी रॉबिनची ओळख करून दिली. आणि ते पुढे अविनाश कडे पाहत बोलू लागले.

“आमच्या खात्यातील वरिष्ठ लोकांनीच रॉबिनला प्रकरणात लक्ष घालायला सांगितलं आहे, तर घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी करावी म्हणून ते आलेत. तर तुमची हरकत नसेल तर......” एवढ बोलून देशमुख अविनाश च्या प्रतिक्रियेची वाट पाहू लागले.

“ अहो त्यात हरकत कसली, ते तुमची मदत करणार असतील तर माझी काय हरकत असणार” अविनाश हसून देशमुखांना बोलला.

“ बऱ, तुम्ही या बाजूच्या खोलीत बसा मी पाणी घेऊन लगेचच येतो “ एवढ बोलून अविनाश स्वयंपाक घराकडे वळणार इतक्यात रॉबिनने अविनाशला अडवले आणी म्हणाला” तुम्ही जर कुठे बाहेर जाण्याचा तयारीत असाल तर जाऊ शकता पण तत्पूर्वी तुम्हाला काही प्रश्न विचारेन नंतर तुम्ही जाऊ शकता.”

रॉबिनच्या या वाक्यावर अविनाशने देशमुखांकडे आश्चर्याने पहिले आणी म्हणाला” हो मी नेहमीप्रमाणे आबांना म्हणजे माझ्या वडिलांना बाहेरून फिरवून आणायला निघालेलो होतो पण काही हरकत नाही मी थोडावेळ थांबेन तुमचा प्रश्नांची उत्तरं देईन आणी मग आबांना घेऊन जाईन.”

“ ठीक आहे “ एवढ बोलून रॉबिन शांतपणे आजूबाजूला पाहू लागला. अविनाश पाणी आणायला स्वयंपाक घरात वळला

देशमुख आणी रॉबिन अविनाशने सांगितलेल्या खोलीत बसले. ती खोली देसाई कुटुंबीय मिटिंग रूम म्हणून वापरायचे. खोलीत आजूबाजूला २-३ खुर्च्या, एक सोफा, छोटा टेबल आणी त्यामागे एक मोठी खुर्ची. कदाचित मालती बाई यांचा ओळखीतील राजकारणी लोकं त्यांना काही कामानिमित्त भेटायला आल्यावर इथेच बसवत असतील.

“ अविनाश बाहेर कुठेतरी निघालाय हे तू कस ओळखलंस “ देशमुखांनी रॉबिनला विचारलं.

“तुम्ही त्याला मगाशी हाक मारली तेव्हा तो ज्या खोलीतून बाहेर आला त्याच्या दरवाजाबाहेर त्याचे स्पोर्ट्स शूज होते आणी बाजूलाच मोजे पडलेले होते जसे काही कोणीतरी ते पायात घालायला बाहेर काढतो तसे. आणी अविनाश ने जो फुल शर्ट घातला होता गडबडीत त्याने त्याचा शर्ट च्या बाहीची बटने लावलेली न्हवती. त्यावरून एक तर्क काढला बस” रॉबिन ने सांगितलं.

देशमुख पुढे काही बोलणार इतक्यात अविनाश पाणी घेऊन आत आला. रॉबिन आणी देशमुखांनी पाणी घेतल. अविनाश बाजूच्याच खुर्चीत बसला.

“ मिस्टर अविनाश मला खरतर खूप खेद आहे जे तुमचा आईंच्या बाबतीत घडलं त्याचा, पण घडलेल्या गोष्टींची उकल व्हावी एवढाच माझा हेतू आहे आणी त्यासंदर्भातच मी तुम्हाला आणी घरातील इतर सदस्यांना काही प्रश्न विचारू इच्छितो अर्थात तुमच्या परवानगीने’’ रॉबिन पाणी पिऊन झाल्यावर पाण्याचा ग्लास बाजूला ठेवत म्हणाला.

“ माझी काहीही हरकत नाहीये रॉबिन. तुम्ही फक्त तुमचं काम करताय याची कल्पना आहे मला. आमच्याबाजूने आम्ही तुम्हाला पूर्णपणे सहकार्य करू ? अविनाशने अगदी शांतपणे रॉबिनकडे पाहत त्याला सांगितल.  रॉबिनला त्याचा नजरेत एकप्रकारचा ठामपणा दिसला. आईच्या निधनानंतर सुद्धा तो खचून न जाता घरचा भार खंबीरपणे सांभाळत असल्याचे पाहून रॉबिनला त्याचे कौतुक वाटले.

“ अविनाश तुम्ही काय काम करता” रॉबिनने अविनाशला विचारलं.

“ माझी शहराबाहेर बागायती रोपे विकायची नर्सरी आहे” अविनाश म्हणाला

“ अच्छा..अविनाश खरतर तुमचा आईंच्या बाबतीत जी दुर्दैवी घटना झाली त्यानंतर चौकशीत तुम्ही पोलिसांना अगोदरच तुमचा कौटुंबिक तपशील आणी घटनेसंदर्भात सांगितल असेल पण मला तो तपशील तुमच्याकडून ऐकायचा आहे तेव्हा मला सांगा कि तुमचा घरात वा वाड्यात कोण कोण राहत? एवढ बोलून हाताची बोट एकमेकांमध्ये गुंतवून रॉबिन अविनाश च्या उत्तराची वाट पाहू लागला.

रॉबिनच्या प्रश्नानंतर अविनाश खुर्चीत सरळ बसला. आणी म्हणाला ” या वाड्यात माझे बाबा, मी माझी बायको नंदिनी आणी माझा धाकटा भाऊ आशुतोष राहतो.

“ घटना झाली तेव्हा तुम्ही कुठे होतात “रॉबिन पुढचा प्रश्न केलात.

“ घटना घडली तेव्हा मी डॉक्टर पटवर्धन यांचा हॉस्पिटल मध्ये होतो, माझा वडिलांचे उपचार तिथे चालू आहेत त्यासंदर्भातच त्यांना भेटायला गेलो होतो” अविनाश उत्तरला.

अविनाश बोलत असताना रॉबिन ने आपल्या जाकीटच्या आतल्या कप्प्यातून एक छोटी डायरी आणी पेन बाहेर काढले. आणी अविनाशशी बोलतच त्यामध्ये काहीतरी लिहू लागला.

“ अच्छा. काय झालंय तुमचा वडिलांना“ रॉबिनने डोळे बारीक करत डायरीमधून नजर न काढताच विचारले.

“ त्यांना स्मृतीभ्रन्शाचा आजार आहे, मागच्या वर्षी ते एके ठिकाणी त्यांचा मित्रासमवेत फिरायला गेले असताना तिथे त्यांचा एक छोटासा अपघात झाला त्या अपघातात डोक्याला मार लागला. तिथून आल्यावर त्यांना जास्त काहीच आठवेना. आणी ते जास्त बोलत देखील न्हवते. आणी नंतर तर आम्हा घरातल्या लोकांना सुद्धा ओळखेनासे झाले. म्हणूनच मग मागच्या काही महिन्यांपासून त्यांचे शहरातील डॉक्टर पटवर्धन यांचाकडे उपचार चालू आहेत.” अविनाश हे सांगत असताना रॉबिन आपल्या डायरीमध्ये पटापट काही नोंदी घेत होता.

“ बर मग घटना घडली तेव्हा वडील कुठे होते, आणी घरात कोण कोण होते “रॉबिनने विचारलं.

“ घरात आबा हे त्यांचा खोलीत आराम करत होते, आणी माझी बायको आणी आमची कामवाली बाई कमला वाड्याचा मागच्या बाजूला विहिरीतून पाणी काढत होत्या, आमची कामवाली बाई कमला काही तरी आणायला म्हणून मागच्या बाजूने आत वाड्यात मध्ये आली तेव्हा आईच्या खोलीसमोरून जाताना तिला दिसलं कि आई जमिनीवर पडली होती, कमला ला वाटलं कि आई बेशुद्ध वगेरे पडली कि काय म्हणून तिने आईला हाका मारल्या. पण तरीही ती काही हालचाल करेना. मग तिनेच आरडाओरड करून सगळ्यांना गोळा केलं.” अविनाश म्हणाला.

“ ओह्ह म्हणजे मालतीताई यांना जमिनीवर पडलेलं तुमची कामवाली बाई कमला हिने आधी पाहिलं तर ..बर तुमचे वडील म्हणजेच आबा कुठे होते तेव्हा..” रॉबिनने ओठ मुडपत विचारलं. बाजूलाच बसलेले इ. देशमुख लक्षपूर्वक दोघांची प्रश्नोत्तरे ऐकत होते.

“ आबा त्यांचा खोलीतच होते, त्यांना काही ऐकू आलं असेलं असं वाटत नाही. तसंही ते बाहेर आलेच नाही कारण त्यांना चटकन हलता येत नाही. आणी त्यांचा खोलीला आम्ही बाहेरून कडी लावत असतो कारण आमच्या अपरोक्ष ते चुकून वाड्याचा बाहेर जाऊ नये म्हणून.” अविनाश ने माहिती दिली.

“ ह्म्म्म तर एकंदरीत अशी घटना घडली. मग त्यानंतर तुम्ही हॉस्पिटल मधून माघारी आलात. मग तुमचा जवळच राहणाऱ्या पाटील डॉक्टरांना कोणी बोलावलं “रॉबिन ने हातातील छोटं पेन हनुवटीला टेकवत विचारलं.

“ कमला चा आरडाओरडा ऐकून शेजारचे काही लोक बाहेर जमा झाले होते, त्या गर्दीमधीलच कोणीतरी डॉक्टरांना झालेल्या घटनेची खबर दिली आणी ती मिळताच ते तडक आले होते. तसे ते आमचे फ्यामिली डॉक्टर पण आहेत आणी आमचे त्यांचे घरगुती संबंध पण आहेत. त्यांनीच आमचा आईला तपासलं. आईची नाडी लागत न्हवती म्हणून त्यांनी हॉस्पिटल मध्ये हलवायला सांगितलं. आणी पोलिसांना पण फोन करून सांगितलं त्यानंतर मी घरी आल्यावर डॉक्टर पाटलांनी मला हि माहिती दिली” अविनाश ने सांगितलं.

“ मालतीताई यांचा कोणी घातपात केलाय असा संशय कोणाला आला होता का? म्हणजे त्या अचानक अशा त्यांचा खोलीत कशा काय पडल्या. कोणती शारीरिक व्याधि होती का मालतीताईना? “रॉबिन ने प्रश्न केला.

“ नाही हो कोणती व्याधि अशी न्हवती, अगदी ठणठनित होती तिची प्रकृती. म्हणूनच तर आम्हाला कळेना कि ती अचानक अशी कशी काय जमिनीवर पडली. घातपात झाल्यासारखं काही वाटत न्हवत. प्रथम आम्हाला संशय आला काय हुदयविकाराचा झटका वगेरे आला कि काय. पण हॉस्पिटल मध्ये आईला नेल्यानंतर त्यांनी आईचा मृत्यू झाल्याचं सांगितल आणी असं पण सांगितलं कि मृत्यूचं कारण स्पष्ट होत नाहीये तर पोस्टमार्टेम करावं लागेल.” अविनाशला हे सगळं सांगताना खरंतर भरून आलं होतं.

रॉबिनने त्याचे प्रश्न थोडेसे थांबवले आणी देशमुखांकडे सूचक नजरेने पहिले तसं इ. देशमुखांनी अविनाश च्या खांद्याला स्पर्श करत बाजूचा पाण्याचा भरलेला ग्लास अविनाशला देऊ केला. अविनाशने देशमुखांच्या हातातून पाण्याचा ग्लास घेतला आणी तो पाणी पिऊ लागला. तोपर्यंत रॉबिनने आपल्या छोट्या डायरीमध्ये लिहिलेल्या नोंदी परत न्याहाळल्या. अविनाश पाणी पिऊन जरासा स्थिर झाल्यावर रॉबिन ने विचारलं “ अविनाश तुम्हाला शेवटचा एकंच प्रश्न विचारतो, मालतीताई यांचा कोणी शत्रू होता काय ज्याने त्यांचा असा घातपात घडवून आणला. साहजिकच कोणाला मागमूस न लागता तो वाड्यात शिरला आणी आपलं काम उरकून निघून गेला असेल?

रॉबिनच्या या प्रश्नाने अविनाश विचारात पडला. त्याचा कपाळावर किंचित आठ्यांच जाळ आला आणी त्याची नजर जमिनीकडे वळली. रॉबिन अविनाश कडेच निरखून पाहत होता त्याचाही नजरेतून अविनाश चे हे बदल सुटले नाहीत.

“ नाही तसं शत्रू वगेरे कोणी असेल असं मला वाटत नाही. राजकारणातील काही व्यक्तीशी तिचे राजकीय मतभेद जरूर होते. पण ज्यावेळी ती राजकारणात सक्रीय होती तेव्हाची गोष्ट, सध्या आई राजकारणात तितकी सक्रीय नसायची तेव्हा मला काही निश्चित सांगता येणार नाही. अविनाश जे जरा अवघडूनच उत्तर दिल. मुळात त्याला रॉबिन चा प्रश्न तितकासा रुचला न्हवता. रॉबिनने देखील हे ओळखून त्यावर जास्त काही विचारलं नाही.

“ ठीक आहे अविनाश आम्हाला तुमचा आईची खोली दाखवा जिथे हा सगळा प्रकार घडला आणी त्यानंतर मी तुमचा कुटुंबातील इतर सदस्यांची ओळख करून घेतो” आपल्या जागेवरून उठत रॉबिन म्हणाला.

“ हो हो चला “ असं म्हणून अविनाश उठून खोलीच्या बाहेर पडला मागोमाग रॉबिन आणी देशमुख चालू लागले.

खोलीबाहेर पडताच त्या वाड्याचा दुसर्या टोकाला एक खोली होती अविनाश तिकडे जाऊ लागला.

वाडा आतून दिसायला  “C”  या इंग्रजी अक्षराप्रमाणे होता वाड्याच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला पहिली खोली जिथून आत्ताच रॉबिन आणी देशमुख निघाले होते. तिथून पुढच्या दोन खोल्या या घरगुती सामानानी आणी भरलेल्या होत्या. पुढे वर जाण्यासाठी जिना आणी त्याचाच बाजूला थोडा व्हरांडा जेथून वाड्याचा मागच्या बाजूला सुद्धा जाता येत होतं. मुख्य दरवाजापासून डाव्या बाजूला प्रथम स्वयंपाकघर, नंतरची खोली अविनाश चे वडील आबा यांची आणी नंतर तिसरी खोली मालतीताई यांची वेगळी खोली होती. त्याचा बाजूलाच जरा आतमध्ये न्हाणीघर होतं. अविनाश रॉबिन आणी देशमुख यांना घेऊन मालतीताई च्या खोलीबाहेर आला. आणी खोलीचं दार उघडून दिलं. आणी रॉबिन आणी देशमुख यांनी आतमध्ये प्रवेश केला.

मालतीताई यांची खोली जराच मोठी होती साधारण दोन माणसांना पुरेल एवढी होती. खोलीत प्रवेश केल्याकेल्या डाव्या एका बाजूला बेड, मोठं कपाट, पुढच्या भिंतीवर एक मोठा आरसा आणी त्याचा बाजूला बंद खिडकी. तिच्या अगदी बाजूला एक टेबल ज्यावर एक रात्री कामाला येईल असा दिवा आणी काही लिखापडीची साहित्य पडलेली होती. जमिनीवर जिथे मालतीताई गतप्राण झालेल्या होत्या त्या जागी पोलिसांनी पांढऱ्या रंगाने रेखांकन केलं होतं ज्याने करून बॉडी जमिनीवर कशी पडलेली होती हे समजायला मदत होत होती. रॉबिन ने आतमध्ये सगळ्या गोष्टी बारकाईने पाहायला सुरुवात केली. भिंतींना रंग नवीन पद्धतीने दिलेला असला तरी खिडकी आणी दरवाजाची लाडकी कलाकुसरीची कामे जुन्या पद्धतीची होती. रॉबिन ने खिडकी जी बंद होती तिची खुंटी काढली आणी उघडली. खिडकीला गज न्हवते ती पूर्ण उघडी झाली. रॉबिनने बाहेर पाहिलं तर बाहेर ऊन उतरून बर्यापैकी संध्याकाळ झालेली होता. मालतीताई यांचा या खोलीबाहेरून वाड्याचा बाहेरचा डावा भाग दिसत होता. थोडीशी जागा सोडली कि पुढे पुरुषभर उंचीचं वाड्याच दगडी कम्पौंड होतं. त्यांचा शेजारी कोणी राहत न्हवत पण थोडी जागा सोडून पलीकडे जरा लांब देसाई यांचा वाड्यासारखाच एक वाडा होता, जिथे एक वृद्ध दाम्पत्य राहायचे अशी माहिती देशमुखांनी मगाशी दिलेली होती. रॉबिन ने बाहेरच सगळं निरीक्षण करून खिडकी परत लावली. आणी खिडकीच्या शेजारच्या भिंतीवरील लावलेल्या आरशाकडे पाहू लागला आरसा चांगलाच मोठा होता. तिथून त्याने खिडकीकडे कटाक्ष टाकला तर ते अंतर जास्त न्हवत. काहीसा विचार करत त्याने खाली वाकून इकडे तिकडे पाहिलं. परत उठला आणी दरवाजाकडे पाहिलं. देशमुख आणी अविनाश फक्त त्याचा हालचाली पाहत उभे होते. रॉबिनने खिशातून परत आपली डायरी काढून त्यात काही नोंदी केल्या आणि परत ठेऊन दिली. थोडा वेळ सगळ्या खोलीचं निरीक्षण करून रॉबिन म्हणाला “ चला आता तुमचा वडिलांच्या खोलीमध्ये जाऊन पाहूयात“

अविनाश शांतपणे मालतीताई च्या खोलीतून बाहेर पडला आणी बाजूच्या खोलीत असलेल्या त्याचा वडिलांचा खोलीकडे निघाला मागोमाग रॉबिन आणी देशमुख होतेच. खोलीला बाहेरून कडी होती. अविनाशनी ती उघडली आणी सगळे आतमध्ये गेले. आबांची हि खोली मालतीताई च्या खोलीपेक्षा लहान होती आतमध्ये एका कोपर्यात एक बेड होता आणी त्यावर चादर पांघरून आबा पाठमोरे झोपलेले दिसत होते. अविनाश आबांच्या बेडकडे जाऊन त्यांना उठवणार पण रॉबिनने अविनाशला हातानेच खुण करून त्यांना न उठवण्याविषयी खुणावलं. तसं अविनाश जागीच थांबला. बाजूला कपाट आणी टेबल आणी त्यावर बरीचशी पुस्तकं होती. बेडच्या विरुद्ध बाजूला एक खिडकी उघडी होती. रॉबिन खिडकीपाशी आला आणी बाहेर पाहू लागला खिडकीला गज न्ह्व्तेच त्यामुळे बाहेर डोकावून पाहता आलं. बाहेरचं जास्त असं काही न्हाव्तच फक्त वाड्याच कम्पौंड. दिवसाउजेडी वाड्याचा बाहेरचा भाग परत एकदा पाहावा असं रॉबिनला वाटलं आणी त्याने खिडकी लाऊन टाकली. खिडकीतून रॉबिन बाजूच्या टेबलाकडे वळला. टेबलावर वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं होती. त्यातली काही पुस्तकं घेऊन रॉबिन चाळू लागला. विविध प्रकारची प्रवासवर्णन असलेली ती पुस्तके होती. पुस्तकं आलटून पालटून पाहत रॉबिन ने परत ती टेबलावर खाली ठेवली पण ती खाली ठेवत असताना त्यांचा आवाज झाला आणि त्या आवाजासरशी बेडवर झोपलेल्या आबांनी चळवळ केली. त्यांची कदाचित झोपमोड झाली असावी. रॉबिन जागीच थांबला आणी त्यांचा बेडकडे पाहू लागला. अंगावरची चादर दूर करून आबा पुढच्या कुशीवर वळले आणी किलकिल्या नजरेने पाहू लागले. आपल्या खोली एवढी माणसं पाहताच ते तसेच किलकिले डोळे करत बेडवर उठून बसले. तसा अविनाश त्यांचा जवळ गेला. आबा उठून एकदा रॉबिन आणी देशमुख यांचाकडे पाहू लागले. अविनाश ने बाजूच्या टेबलावरील पाण्याचा तांब्या घेऊन त्यातून पाणी काढून आबांना दिले. पण आबांचं लक्षच कुठे होतं त्याचाकडे ते आपले एकसारखे रॉबिन आणी देशमुखांकडे पाहत होते.

“ आबा अहो पोलीस आहेत. तपास करायला आलेत,” त्यांना चटकन गोष्टी लक्षात येत नाहीत असं अविनाश रॉबिन कडे वळून पाहत म्हणाला.

आबा आता अविनाशने पुढे केलेल्या फुलपात्राकडे पाहू लागले आणी नंतर अविनाशकडे पण बोलले काहीच नाहीत. रॉबिन ने सगळी खोली व्यवस्थित न्याहाळली. खोलीत सामान असे काहीच न्हवते आबांची तब्येत व्यवथित नसते म्हणून त्यांना हि स्वतंत्र खोली राहायला केली होती. त्यामुळे जास्त समान असे काहीच न्हवते.

“ आबांना कधी बऱ वाटेल असं त्यांचे डॉक्टर म्हणाले. म्हणजे त्यांची स्मृती कधी परत येईल असं बोलले “ रॉबिन भिंतीला टेकून उभं राहत आबा आणी अविनाशकडे पाहत म्हणाला.

अविनाश ने दिलेलं पाणी आबांनी संपवून ते रॉबिनकडे एकटक पण निर्विकार चेहऱ्याने पाहू लागले. अविनाश ते आबांच्या हातातून फुलपात्र घेऊन ते टेबलावर ठेवलं आणी म्हणाला “डॉक्टरांचे औषधउपचार चालू आहेत त्याचं म्हणण आहे काही वेळ लागेल पण लवकरच त्यांना सगळं आठवू लागेल. आणी गोष्टींच आकलन सुद्धा होऊ लागेल. तोपर्यंत त्यांना विश्रांती घेत राहू देत आणी रोज बाहेर फिरवून आणत जावा”

“ अच्छा. अविनाश आता तुम्ही घरातल्या इतर सदस्यांना बोलावून घ्या त्यांची पण ओळख करून घेतो आणी तुम्हाला जास्त तसदी देत नाही, तुम्ही असंही आबांना बाहेर घेऊन जाणार होतात त्यात व्यत्यय नको” असं बोलून रॉबिन आबांच्या खोलीबाहेर आला. आबांना काही विचारण्यात अर्थच न्हवता. एकतर त्यांची स्मृती गेलेली होती आणी त्यांना काही नीट बोलता येईल असं वाटत पण न्हवते. देशमुखसुद्धा रॉबिन च्या शेजारी उभे राहिले. अविनाश थोड्या वेळाने बाहेर आला आणी व्हरांड्यातून सरळ गेला मधला भाग ओलांडून तो आता विरुद्ध बाजूला असलेल्या जिन्याकडे गेला. अविनाश वरच्या खोल्यांकडे इतर लोकांना बोलायला गेला हे पाहून देशमुख रॉबिन च्या कानाजवळ येऊन म्हणाले “ रॉबिन काही सुगावा मिळाला का तुला?

“ अं .. सध्या तरी नाही उलट बरेच नवीन प्रश्न मला पडलेत” रॉबिन हात मागे बांधून दरवाजाबाहेर समोर दिसणाऱ्या तुळशी वृन्दावनाकडे पाहत म्हणाला.

“ म्हणजे नक्की म्हणायचं काय तुला “ देशमुखांनी न समजून विचारलं.

“ म्हणजे वाड्याच्या आसपास जास्त कोणाचीच घर नाहीयेत. मुख्य रस्त्यापासून हि जागा जरा आतमध्ये आहे. ज्या कोणी व्यक्तीने मालतीताईचा खून केला असेल. त्याला व्यक्तीला कोणी पाहिलं असेल याची शक्यता खूप कमी वाटतेय मला आणी दुसरा असं कि ... “रॉबिन पुढे काही बोलायचा आधीच जीन्याकडून पावलांचा आवाज आला. रॉबिन आणी देशमुखांची मान तिकडे वळली.

अविनाश त्याची बायको नंदिनी, एक चष्मा घातलेला मुलगा आणी मागे एक कोणीतरी काष्टा घातलेली बाई येत होती. रॉबिन आणी इ. देशमुखांचा संवाद तिथेच थांबला. अविनाश त्यांना घेऊन रॉबिन जवळ आला.

“हि माझी बायको नंदिनी ती घरीच असते, माझा भाऊ आशुतोष पदवीच शिक्षण घेतोय आणी ह्या आमच्या कामवाल्या काकू कमलाबाई” अविनाश ने सगळ्यांची ओळख करून दिली. तसे रॉबिन ने हात जोडून सगळ्यांना नमस्कार केला.

अविनाशच्या शेजारी त्याचा भाऊ उभा होता वयाने तसा तरुण दिसत होता त्याचा चेहऱ्यावर चष्मा होता. अविनाश आणी त्याचा भावाच्या वयात बरेच अंतर असल्याची जाणीव रॉबिनला झाली. त्यांचा मागेच अविनाश ची बायको नंदिनी उभी होती अविनाश च्या मागे उभी होती, ती दिसायला विलक्षण सुंदर दिसत होती क्षणभर रॉबिन ची नजर अनावधानाने तीचावरच खिळली. रॉबिनशी तिची नजरानजर होताच तिने पटकन जमिनीकडे पहिले. नंदिनी मध्यम बांध्याची असून तिने एक साधी साडी घातलेली होती. कपाळावर बारीक टिकली आणी गळ्यात मंगळसूत्र. स्वभावाने शांत असावी अशी दिसत होती. नंदिनी शेजारी जवळच एक खेडूत दिसणारी एक बाई जिने पदर डोक्यावरून घेतला होता ती देसाई यांची घरची कामवाली कमला होती आणी जवळपास नजर रोखूनच रॉबिन कडे पाहत उभी होती.

“ मी या वाड्याचा मालकीण मालतीताई यांचा खुनाच्या संदर्भात तपास करणार आहोत आणी पोलिसांची मदत करणार आहे. तर तुम्हा सगळ्यांची ओळख करून घायला आज आलो आहे आणी तपासकार्यात तुमचं सहकार्य मिळाव अशी अपेक्षा आहे जेणेकरून लवकरच खुन्यापर्यंत आम्हाला पोहोचता येईल.” रॉबिन ने असं बोलल्यावर कोणीच काही बोललं नाही. 

“ तुम्हाला आमचे पूर्ण सहकार्य राहिलं आणी चौकशीसाठी तुम्ही कधीही वाड्यात येऊ शकता “ अविनाश सगळ्यांचा वतीने बोलला.

तेवढ्यात दारावर उभा असलेला हवालदार म्हस्के आत आला आणी देशमुखांकडे पाहत म्हणाला “ साहेब बाहेर पाटील डॉक्टर आले आहेत. आत यायचं म्हणत आहेत आबांची तब्बेत बघायला आलोय असं म्हणत आहेत “

“ ठीक आहे सोड त्यांन आत आणि तुम्ही बाहेरच थांबा “ देशमुखांनी म्हस्के हवालदाराला सांगितलं.

पाटील डॉक्टर यावेळी वाड्यावर येण्यामागे काहीतरी कारण नक्कीच असणार असं रॉबिन वाटलं. रॉबिन ने अविनाशला सगळ्यांना घेऊन परत वर जायला सांगितलं कारण सगळ्यांची ओळख झालेली होती. आणी तो अविनाश सोबत वरील मजल्यावर खोल्या पाहायला त्याचा मागे जाऊ लागला. सगळ्यात पुढे आशुतोष घाईघाईत गेला.

अविनाशने कमलाला घरी जायला सांगितलं कारण रॉबिन आल्यामुळे त्याने तिला चौकशीसाठी तिला थांबवलं होतं पण आता ओळख झाल्यानंतर तिला तिचा घरी जायला सांगितलं. अविनाशच ऐकून कमला लगबगीने वाड्याचा बाहेर गेली. रॉबिनने देशमुखांना खालीच उभा राहून डॉक्टर पाटील यांचासोबत बोलायला सांगितल जेणेकरून ते नक्की कशासाठी आले आहेत हे समजेल. बाकीचे सगळे म्हणजे रॉबिन, अविनाश आणी इतर जिन्याने वर जाऊ लागले. जिन्याने वर गेल्यावर समोर एक व्हरांडा होता. डावीकडेच अविनाश आणि नंदिनी यांची झोपण्याची खोली होती. त्याचा पुढे एक बंद खोली होती आणि त्यानंतर पुढे आशुतोष ची खोली जी खालच्या गेस्ट रूम च्या बरोबर वर होती. सगळ्यात आधी वर जाऊन आशुतोष लगबगीने खोलीत गेला आणि दाराची कडी लावली. नंदिनी तिच्या खोलीत जाऊ लागली. रॉबिन अविनाशला वर खोल्या किती आहेत वगेरे अविनाश ला विचारत होता आणी अविनाश त्याला ते सांगत असतानाच रॉबिनची नजर खोलीमध्ये जात असणार्या पाठमोर्या नंदिनी वर गेली. आणि नंदिनी हि खरोखरच एक सुंदर स्त्री असल्याच त्याचा लक्षात आला. तिचा बांधा कमनीय असून तिची चाल सुद्धा मोहक होती. त्यामुळेच ती खोलीत जाऊन दार लावत असताना तिचाकडे ओझरती नजर टाकायचा क्षणभर मोह रॉबिनला आवरला नाही. रॉबिनने सुंदर स्त्रिया कधी पहिल्या नाही अशातला भाग न्हवता पण नंदिनीच सौंदर्य काही वेगळेच होते. साधी राहणी असून पण दिसायला मोहक अशी भासत होती. अविनाश पुढे चालत होता आणी चालता चालता अविनाश एका खोलिपाशी येऊन थबकला

“इथे अडगळीच सामान ठेवतो आम्ही असं म्हणून तो रॉबिनकडे पाहू लागला. त्याचा आवाजासरशी रॉबिन ची तंद्री भंग पावली आणि ओशाळत तो म्हणाला “ अं ..काय सॉरी मी जरा विचारांमध्ये होतो. काय म्हणत होतात तुम्ही.“

“ मी म्हणलो कि हि अडगळीच सामान ठेवायची खोली. माझा खोलीच्या पुढे आणी आशुतोष च्या खोलीच्या आधीची” हाताने निर्देश करत अविनाश म्हणाला.

“ अच्छा ... आणि तिकडे विरुद्ध बाजूला ज्या खोल्या आहेत तिथे काय आहे. रॉबिनने विचारलं.

“चला तिकडे” असं म्हणून अविनाश पुढे होऊन आता विरुद्ध बाजूच्या खोल्यांकडे जाऊ लागला आणी रॉबिन त्याचामागोमागे चालू लागला. आणी दुसर्या बाजूला जाऊन पोहोचले.

“ हि खोली माझा कामाची आहे म्हणजेच विविध प्रकारची माती या पोत्यांमध्ये आणी नर्सरीच काही किरकोळ सामान या खोलीत ठेवत असतो” अविनाश ने असं सांगितलं आणी खोलीचं दार उघडल. रॉबिनने आतमध्ये बाहेरूनच डोकावून पाहिलं तर आतमध्ये मातीची बरीच पोती एकमेकांवर ठेवलेली दिसत होती. बाजूला काठ्यांचे जुडगे जे कुंपण करायला लागतात ते ठेवलेले होते. त्याला बांधायची रस्सी बाजूला पडलेली होती, आणी इतर काही बांधकामाचे किरकोळ साहित्य. रॉबिनने आत न जाताच बाहेरूनच निरीक्षण केलं.

“ आणी हि बाजूची खोली” समोर निर्देश करत रॉबिन बोलला. आणी त्या खोलीच्या पुढे जाऊन उभा राहिला.

“ ती माझी अभ्यासाची खोली आहे असं म्हणू शकता कामाच्या सामानाची यादी वगेरे करण्यासाठी, किंवा नंदिनी सोबत जरा निवांत गप्पा मारत बसण्यासाठी मी ती वापरत असतो.” अविनाश रॉबिनच्या जवळ येत म्हणाला.

नंदिनीच नाव ऐकताच रॉबिन च्या नजरेपुढे नंदिनीचा चेहरा आला आणी नंतर तिचा कमनीय बांधा. पण डोक्यातले ते विचार झटकून रॉबिन म्हणाला ” हि तुमची अभ्यासाची जी खोली बरोबर आबांच्या खोलीच्या वर आहे नाही का आणी ती पलीकडली मातीची पोती आणी इतर समान ठेवलेली खोली हि मालतीताईच्या खोलीच्या वर आहे. “

“ हो. अगदी बरोबर “ अविनाश असं म्हणून शांत बसला.

रॉबिनने तो व्हरांडा पूर्ण इकडून तिकडे न्याहाळला. व्हरांड्याच्या कठड्यावरून वरून त्याने खाली डोकावून पाहिलं. त्याला खालच तुळशी वृंदावन दिसत होतं. खालचा भाग पूर्णपणे दिसत न्हवता कारण या वरच्या व्हरांड्याच्या पुढे मधल्या भागामध्ये छत थोडे पुढे काढलेले होते त्यामुळे खालचा जास्त भाग दिसत न्हवता. त्यातला त्यात तुळशी वृंदावन दिसत होते. खाली देशमुख आणी पाटील डॉक्टर बोलत असल्याचा आवाज देखील त्याला ऐकू आला.

“ ठीक आहे, बस आता आणखी काही बघायची गरज आहे असं मला वाटत नाही. आपण आता खाली जाऊयात. वाड्यामधील ज्या गोष्टी पाहण्याची आवश्यकता मला वाटत होती तेवढ पाहून झालंय. नंतर गरज पडलीच तर इतर गोष्टींची छाननी करेनच. पण सध्या तरी मला वाटत मी खूपच जास्त वेळ घेतला तुमचा. माझामुळे तुम्हाला आबांना आज फिरायला सुद्धा घेऊन जाता आलं नाही“ रॉबिन हलकेच स्मित करत बाजूच्या भिंतींकडे पाहत म्हणाला.

“ नाही ठीक मी त्यांना उद्या घेऊन जाईनच. “ अविनाश सुद्धा स्मितहास्य करत म्हणाला.

“ ओके चला आता खाली जाऊयात आम्ही पण निघतो आता बराच उशीर झालाय”. असं म्हणून रॉबिन खाली जाण्यासाठी वळला. काही वेळात जिना उतरून रॉबिन आणी अविनाश खाली आले. खाली येताच व्हरांड्यात आबांच्या खोलीपुढे त्यांना इ. देशमुख आणी डॉक्टर पाटील बोलत उभे असलेले दिसले. रॉबिन आणी अविनाश त्यांचाकडे येताच आपलं बोलणं थांबवून त्यांनी त्यांचा माना रॉबिनकडे वळल्या.

“ काय देशमुख साहेब काय गप्पा मारत आहात “ रॉबिन देशमुखांच्या जवळ जात पाटील डॉक्टरांकडे पाहत म्हणाला.

“ हे डॉक्टर पाटील आहेत. तपास कसा चालू आहे विचारत होते “ डॉक्टर पाटलांकडे इशारा करत हलकेच गालात हसत देशमुख म्हणाले. कारण सकाळीच वेषांतर करून रॉबिनने डॉक्टर पाटलांची भेट घेतल्याचं त्यांना आठवलं.

“मी डॉक्टर पाटील, आत्ताच तुमच्याबद्दल इ. देशमुखांकडून कळल कि गुप्तहेर साहेब पण आले आहेत चौकशीसाठी” अगदीच फोर्मल पद्धतीने पाटलांनी आपली ओळख सांगत हस्तांदोलन करण्यासाठी रॉबिनपुढे हात केला” त्यासरशी रॉबिनने हसून त्यांचा हात हातात घेऊन हस्तांदोलन केलं.

त्यामुळे एक गोष्ट तरी इ. देशमुखांना स्पष्ट झाली कि डॉक्टर पाटलांना आज सकाळी भेटलेला अतरंगी म्हातारा हा वेषांतर केलेला रॉबिनच होता हे कळालेला न्हवता आणी तसंही रॉबिनने वेषांतर सुद्धा अगदी चोख केलं असल्याने पाटलांना रॉबिन हाच सकाळचा म्हातारा होता हे ओळखणे अशक्य होतं.

“ काय मग डॉक्टर भेटलात का आबांना आतमध्ये जाऊन, कशी आहे त्यांची तब्बेत आता” रॉबिनने स्पष्टच विचारलं.

“ हो आतमध्ये गेलो होतो पण ते झोपी गेलेत बहुधा मग त्यांना त्रास न देता तसाच बाहेर येऊन इ. देशमुखांशी बोलत उभा राहिलो.” शाळकरी मुलासारखं पाटील पटापट बोलून गेलो.

“ ओह्ह अस्स ... “ एवढचं रॉबिन बोलला. आणी अविनाशकडे पाहून “ चला मिस्टर अविनाश आता आम्ही तुमच रजा घेतो, तसदी दिल्याबद्दल क्षमस्व “रॉबिन हात जोडून अविनाश ला म्हणाला तसं अविनाश ने देखील हात जोडले. रॉबिन मग डॉक्टर पाटलांकडे वळून “चला डॉक्टर साहेब आपण बाहेर बोलूयात असं म्हणून वाड्याचा मुख्य प्रवेशद्वाराकडे चालायला सुरुवात केली.

वाड्याच्या बाहेर आल्यावर रॉबिन इ, देशमुख, डॉक्टर पाटील आणी हवालदार म्हस्के पोलिसांच्या गाडीपाशी उभे होते.

“ डॉक्टर पाटील तुम्ही इथे जवळच राहत असाल ना?” रॉबिनने समोरच्या रस्त्याकडे नजर टाकत विचारल.

“ हो ते काय ते समोरचे १-२ बंगले दिसतायत ना ते सोडले कि पुढे थोड्या अंतरावर माझं घर आहे “ पाटलांनी हात करत सांगितलं.

“ चला मग तुम्हाला घरापाशी सोडतो आणी तुम्हाला काही प्रश्न पण विचारयचे आहेत.? रॉबिन असं म्हणत पाटलांच्या उत्तराची वाटही न पाहता गाडीत बसला. रॉबिनने असं केल्याने पाटलांना गाडीत बसण्यावाचून दुसरं गत्यंतरच उरलं नाही. रॉबिन बसल्यानंतर बाकीचे सगळे गाडीत बसले आणी हवालदारांनी गाडी चालू केली.

बाहेर चांगलाच अंधार पडलेला होता, हलकी थंड अशी वाऱ्याची झुळुक सुद्धा वाहत होती. गाडीत देशमुख पुढच्या बाजूला हवालदारांच्या सोबत बसले होते, रॉबिन आणी डॉक्टर पाटील मागच्या बाजूला. रस्त्यावर जास्त पक्का न्हवता त्यामुळे हवालदार म्हस्के गाडी सावकाश पुढे नेत होते.

“ वाड्यावर चौकशी केल्यावर असं समजलं कि मालतीताई जेव्हा जमिनीवर कोसळल्या तेव्हा तुम्हाला वाड्यावर बोलावलं होतं “ रॉबिनने समोर रस्त्याकडे पाहतच पाटलांना प्रश्न विचारायला सुरुवात केली.

“ अं .. हो ... “रॉबिनकडे हलकेच पाहत पाटलांनी उत्तरं दिलं. पोलिसांच्या गाडीत बसायची पाटलांची कदाचित पहिलीच वेळ असावी, रॉबिन अशी प्रश्नोत्तरे करतोय म्हणून त्यांना थोडासा दडपण आलेलं होतं. त्यामुळे आपला चष्मा सावरत अंग चोरून पाटील बसले होते.  

“ डॉक्टर साहेब जेव्हा तुम्ही मालतीबाईंच्या वाड्यावर त्या कोसळल्या म्हणून तपासायला गेल्या तेव्हा काय काय पाहिलंत तुम्ही हे जरा सविस्तर सांगू शकाल का? रॉबिनने मागे टेकत आणी नजर समोर रस्त्यावर ठेवूनच पाटलांना विचारलं.

रॉबिनच्या या प्रश्नानंतर पुढे बसलेल इ. देशमुख थोडेसे सरकून गाडी चालवणाऱ्या हवालदाराकडे तोंड करून कान मागच्या सीटकडे बाजूला करून बसले जेणेकरून पाटील काय म्हणतायत हे स्पष्टपणे ऐकू यावं. थोडं थांबून पाटलांनी सांगायला सुरुवात केली.

“ त्या दिवशी जवळपास संध्याकाळच्या सुमारास एक जवळपासचा स्थानिक माणूस माझा क्लिनिक मध्ये जे कि घराला लागुनच आहे तिथे धावत पळत आला आणी देसाई वाड्यावर मालतीताई जमिनीवर पडल्यात असं सांगत आला. मी तत्क्षणी माझा क्लिनिक मधून पळत वाड्याकडे निघालो. तिथे पोचतो तर मुख्य दरवाजाजवळ काही लोकं थांबलेली पहिली. त्यांना बाजूला करून आतमध्ये गेलो. मालतीताई यांचा खोलीबाहेर कमला आणी त्यांची सून नंदिनी घाबरून उभ्या होत्या. मला कमला ने सांगितलं कि मालतीताई येथे पडलेल्या तिने पहिल्या आणी हाका मारली तरी उठेनात. मी पुढे जाऊन त्यांचा खोलीत पाहिलं तर मालतीताई जमिनीवर काहीशा उताण्या अवस्थेत पडल्या होत्या. मी त्यांना जोरजोराने हाका मारल्या तरी मला त्यांचाकडून काही रिस्पोंस येईना. मग मी त्यांचा जवळ जाऊन त्यांना खांद्यला स्पर्श करून हलवलं. तरीही त्या उठेनात. मग मी त्यांचा हात पकडून नाडी पहिली तर मला ती जाणवलीच नाही तसा मी घाबरलो. “ एवढं बोलून डॉक्टर पाटील थांबले.

“ अच्छा म्हणजे मालतीताई मेल्या आहेत असं तुम्हाला वाटलं तर “रॉबिनने हाताची घडी घालत विचारलं.

“ शंका आली होती मला पण नाडी लागली नाही म्हणून मी गळ्याचा इथे नाडी लागते का ते पाहण्याचा प्रयत्न करू लागलो तर मला मालतीताई यांचा मानेजवळ एक छोटासा रक्ताचा थेंब दिसला दिसला आणी मला जरा वेगळाच संशय आला, म्हणून मग मी कर्तव्यदक्षपणे पोलिसांना फोन लावला.” पाटील सभ्यपणाने बोलत म्हणाले.

“ बर मग पुढे “ रॉबिन शांतपणे म्हणाला.

“ पुढे काय... पोलिसांनी म्हणजेच या देशमुख साहेबांनी त्यांची कारवाई उरकली, समोर बसलेल्या इ. देशमुखांकडे हात करत पाटील म्हणाले. नंतर मालतीताईना हॉस्पिटल मध्ये नेलं. हॉस्पिटल मधून फोन आला कि मालतीताई यांचा मृत्यू झालाय, त्यांना मृत्यू काहीसा संशयास्पद वाटल्याने पोस्टमार्टेम करावं लागेल असं त्यांनी सांगितलं. मग मी अविनाशशी चर्चा करून सांगितलं कि हॉस्पिटल मधले डॉक्टर्स पोस्टमार्टेम करायचं म्हणत आहेत. त्याने सुरुवातीला याची काय आवश्यकता आहे म्हणून विरोध केला पण हॉस्पिटलची हि प्रोसिजर असते असं मी त्याला सांगितलं मग तो तयार झाला. एवढ बोलून पाटील शांत बसले.

“ तुमचं काय मत आहे डॉक्टर कशामुळे मृत्यू झाला असेल मालातीताई यांचा” पाटलांकडे पाहत रॉबिन म्हणाला. आणी त्याची नजर पाटलांच्या प्रत्येक हालचालींकडे होती. कपाळावर आलेला घाम पाटलांनी हातानेच पुसला. आणी “ मला काही सांगता येणार नाही” असं बोलले.

तेवढ्यात गाडी पाटील राहतात तिथे येऊन पोचली, घराजवळ गाडी येताच इथे थांबा असं म्हणाले. त्यांचा सांगण्यासरशी हवालदार म्हस्केंनी गाडी बाजूला उभी केली तसं पाटील लगबगीने गाडीतून उतरले, उतरताच त्यांना जरा बऱ वाटला कारण रॉबिन च्या प्रश्नोत्तरांनी त्यांना घाम फोडला होता. डॉक्टर पाटील यांचा मागोमाग रॉबिन पण उतरला आणी पाटलांच्या मागोमाग त्यांचा घराच्या दाराजवळ आला. त्याने उतरताना देशमुखांना गाडीच्या आतमधेच बसायला सांगितलं.

“ अच्छा इथे राहता तर तुम्ही ..” समोरील घराकडे पाहत रॉबिन म्हणाला.

रॉबिन असा अचानक त्यांचामागून गाडीतून उतरलेला त्यांना कळाल नाही त्यामुळे मागे वळून आणी बिचकून पाटील “ अं..हो..हो “ एवढचं म्हणाले. रॉबिन असा अचानक खाली उतरल्यामुळे पाटलांना काय बोलावे ते सुचेना. समोर पाटलांचे घर होते आणी ते घरात एकटेच राहत असावे कारण घरातून कोणी बाहेर आलं नाही. रॉबिन डॉक्टर पाटील यांचा नजीक उभा राहिला आणी बोलू लागला“ हे बघा डॉक्टर, मालतीताई यांचा मृत्यू एका ठराविक विषसदृश रासायनिक पदार्थामुळे झालेला आहे. तो पदार्थ कोणता असेल याचा पत्ता फोरेन्सिक खात्याला सुद्धा लागलेला नाहीये, तुम्ही देसाई कुटुंबियांचा बरेच जवळ आहात तेव्हा तुम्हाला त्यांचा घरची इत्यंभूत माहिती असेल. तसचं अशी कोणती माहिती जी या खुनासंदर्भात तुम्हाला असल्यास मला नक्की सांगावी जेणेकरून तपासकार्यात मला मदत मिळेल. आणी कोणतीही माहिती तुम्ही न लपवता मला सांगावी असं मला वाटत, माझी मदत हवी असेल मला तसं सांगा पोलिसांना मध्ये न घेता ती माहिती आपल्या दोघात राहील याची खात्री मी तुम्हाला देतो. कारण पुढे जाऊन जर हि माहिती पोलिसांना मिळाली आणी त्यात संशयाची सुई तुमचाकडे वळली तर... थोडं थांबून पोलिसांच्या गाडीकडे पाहून आणी परत पाटलांकडे वळत रॉबिन म्हणाला. पोलिसांची तपासाची पद्धत आणी संशयितांना हाताळण्याची पद्धत तुम्हाला माहित असेलच. त्यामुळे काही सांगायचं असेल तर हीच वेळ आहे.” रॉबिन दोन्ही हात मागे बांधून पाटलांकडे निरखत उभा राहिला. डॉक्टर पाटील पूर्ण घामाने भिजलेले होते त्यांचा तोंडातून शब्दहि फुटला नाही. रॉबिन दिलेल्या इशाऱ्यामुळे तर त्यांची पूर्ण भंबेरीच उडालेली होती.

“ अं...म..मी..म.. मला जे माहिती ते सगळं सांगितलं आहे रॉबिन साहेब, “ अतिशय चाचरत पाटील म्हणाले.

“ तसं असेल तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाहीये, आणी कोणती माहिती तुम्हाला द्यावी वाटली तर सरळ माझाकडे येऊ शकता किंवा मला सांगू शकता” असं बोलून रॉबिनने पाटलांना आपला घरचा फोनक्रमांक दिला आणी त्यांना जायला सांगितलं. शांतपणे काहीही न बोलता पाटील घराकडे वळले. रॉबिन गाडीमध्ये येऊन बसताच त्याने गाडी सुरु करायला सांगितली. लगेचच हवालदारांनी गाडी सुरु केली.

“ काय झालं रॉबिन पाटलांशी काय बोलत होतास तू..” गाडी चालू होताच इ. देशमुखांनी विचारलं.

“ काही विशेष नाही देशमुख साहेब बस्स डॉक्टर पाटलांना गुन्ह्याचं गांभीर्य सांगितल आणी काही माहित असेल तर पोलिसांना मदत करा असं म्हणालो” पाठीमागे रेलत आणी शरीराला झटके देत रॉबिन म्हणाला.

“ ओह्ह तुला काय वाटत पाटलांना काही विशेष माहिती असेल का या प्रकरणात” देशमुखांनी रॉबिनकडे पाहत विचारलं.

“ शक्यता नाकारता येत नाही, तसंपण अंधारात तीर मारला आहे मी.. बघू काय होतंय ते “ रॉबिन हलकेच स्मित करत म्हणाला आणी गाडीच्या बाहेर पाहू लागला. बाहेर चांगलाच अंधार पडलेला दिसत होता. गाडी मुख्य रस्त्यावर आली होती आणी रस्त्यवरचे दिवे लक्ख प्रकाशात उभे होते. रॉबिन विचारमग्न झालेला असल्याने देशमुखांनी त्याला जास्त काही विचारले नाही. थोड्या वेळाने गाडी रॉबिन च्या घरापुढे आली. रॉबिन गाडीतून खाली उतरला आणी देशमुख बसले होते तिथे दरवाजाजवळ गेला.

“ प्रकरण वाटत तितके सोपे नाहीये देशमुख साहेब, बराच काथ्याकुट करावा लागणार असं दिसतंय” दरवाजावर हात ठेवत रॉबिन म्हणाला.

“ हम्म.. तू म्हणतोयस त्याची कल्पना आलीय मला” देशमुख गाडीमध्ये बसूनच म्हणाले.

“ आपल्याला दोन गोष्टी समजल्या म्हणजे या खुनाचा सूत्रधार कोण आहे समजू शकेल देशमुख” रॉबिन म्हणाला.

“ त्या कोणत्या ..कपाळावर आठ्यांच जाळ आणत देशमुख म्हणाले.   

“ एक म्हजे ज्या कोणत्या शस्त्राने खून केला गेलाय ते शस्त्र आणी खुन करण्यामागच मागचं कारण” रॉबिन म्हणाला.

“हुश्श असं करत देशमुख म्हणाले- त्या दोन्ही गोष्टी सध्यातरी आपल्याकडे नाहीत. रॉबिन लवकरच आपल्याला या दोन्ही गोष्टी मिळवाव्या लागतील.

“ लवकरच मिळतील त्या आपल्याला देशमुख साहेब, तुम्ही फक्त तुमचा तपास चालू ठेवा. कारण संशय हा सगळ्यांवर आहे. मालतीताई यांना मारून बऱ्याच जणांना बदला घायचा असेल. कोणालासुद्धा संशयातून सूट देता कामा नये “ हात झटकत रॉबिन म्हणाला.

“ ठीक आहे रॉबिन मी मालतीताई यांचा राजकीय वर्तुळात जरा चौकशी करतो त्यांचा कामाबद्दल थोडी माहिती घेतो, त्यांचे कोणी विरोधक होते का असल्यास कितपत विरोध करणारे होते. देशमुख म्हणाले.

“ हम्म..राजकीय व्यक्ती कोणच्यातरी खांद्यावर बंदूक ठेवून असा घातपात करू शकतात. पण खून घरात झालेला असल्याने कोणाची तरी मदत घेऊन हे कृत्य करता येऊ शकते. सर्व शक्यता पडताळून घ्यायला काहीच हरकत नाहीये.” रॉबिन हनुवटीवर हात ठेवून म्हणाला.

“ बर चला आता उशीर झालाय, उद्या बोलूयात असं म्हणून इ. देशमुखांनी रॉबिनचा निरोप घेतला. आणी रॉबिनसुद्धा आपल्या घराकडे जायला वळला.

क्रमशः

No comments:

Post a Comment

गुप्तहेर रॉबिन आणी कुटीरोवांचं शस्त्र - भाग ७

  हॉस्पिटलमध्ये स्पिरिटचा आणी औषधांचा वास जास्तच दरवळत होता. नर्सेसची येण्याजाण्याची लगबग चालू होती. त्या त्या स्पेश्यालीटीचे डॉक्टर्स आपापल...