१४ एप्रिल, २०१६

“ द माइंडगेम ” (भाग २)



“ द माइंडगेम ” (भाग २)


दुसऱ्या दिवशी मेरी सकाळी लवकर उठली. काल रात्रीचा प्रसंग अजूनही तिला आठवत होता, रात्री आपल्या खोलीबाहेर घुटमळनाऱ्या पावलांच्या आवाजाने तिची झालेली भयप्रद अवस्था आठवून तिला सकाळीसुद्धा घाबरल्यासारख झालं. रुबेलाला याबाबत विचारावं का? असं मेरीला वाटू लागलं.

रुबेलाला काय वाटेल याचा विचार न करता शाहनिशा करावी म्हणून तिने रुबेलाला एकदाच विचारलंच “ मॉम काल तू किती वाजता घरी आली होतीस गं”
 मेरीच्या या प्रश्नावर रुबेलाने काहीसं तिरकसपणे मेरीकडे पाहिलं. “काल मी जरा लवकरच आले गं “  मेरीकडे पाहत रुबेला म्हणाली.

“हो पण किती वाजता “ मेरीने अधिरतेने विचारलं.


“ साधारण अकरा साडेअकरा वाजले असतील” “पण का गं?“ रुबेलाने साशंकतेने विचारलं.

रुबेलाला मेरीचं असं प्रश्न विचारणे खचितच रुचलं नाही. मेरीने असे प्रश्न याआधी कधीही विचारले न्हवते किंबहुना मेरी रुबेलाशी फारसा संवाद साधत नसे.

त्यामुळे रुबेलाची ती संशयी नजर मेरीला लगेच जाणवली, 

“ काही नाही, तुझासाठी पेस्ट्री बनवणार होते पण तू उशिरा येशील म्हणून नाही बनवली” मेरीने कशीबशी वेळ मारून नेली. 

रुबेलासुद्धा काहीही न बोलता घरातील इतर कामांकडे वळाली. पण मेरीचं विचारचक्र काही थांबेना. रात्री तिला जी चाहूल आपल्या खोलीबाहेर जाणवली ती कोणा व्यक्तीची होती कि तिला झालेला भास होता. कि रुबेलाच आपल्या खोलीबाहेर उभी होती आणि खोटं बोलत होती. मेरीच मन आता शंकाकुशंकानी भरून गेलं होता. घराबाहेर रात्री कोणीतरी सिगारेट ओढत थांबत काय आणि अशाच एका अपरात्री आपल्याला खोलीबाहेर कोणाचीतरी चाहूल जाणवते काय सारच अगम्य होतं. त्यात अजून रुबेलाच्या पिस्तुलाच गौडबंगाल तसच होतंच, मेरीने त्याबाबत रुबेलाला अजूनही काहीच विचारलेलं न्हवत उलट मेरीने स्वतःच्या मनाची समजूत घातली होती कि ते पिस्तुल रुबेला स्वसंरक्षणसाठी बाळगत असेल. पण आता तिचं मन काहीसं साशंक झालेलं होतं. कसल्यातरी विचित्र घटनांची हि चाहूल तर नसावी ना असं उगाचच वाटून मेरीच्या अंगावर शहारा आला.

त्या रात्री रुबेला लवकरच घरी आली, मेरी जागीच होती म्हणून दोघींनी जेवण एकत्रच केलं. जेवण करून रुबेला लगेचंच झोपायला गेली, ती झोपायला गेली कि नाही याची खात्री करूनच मग मेरी आपल्या खोलीत झोपायला आली.   

खोलीमधे येऊन बेडवर अंग टाकताच मेरी झोपून गेली. मध्यरात्री हलकासाच कडकड असा आवाज झाला. पण रात्रीच्या त्या भयाण शांततेत तो आवाज चांगलाच उमटलाच होता. मेरी अर्धवट जागी झाली, कोणीतरी खोलीच्या बाहेरून कि होलमध्ये चावी फिरवत असल्यासारखा आवाज होता तो. मेरीने दार तर व्यवस्थित लॉक केलेल होतं. पण आवाजासरशी मेरी धडपडत जागी झाली. आपल्याला स्वप्न पडलं कि काय असं मेरीला क्षणभर वाटलं. त्यामुळे मेरीने स्वतःला चिमटा घेऊन पाहिलं. पण नाही हे स्वप्न न्हवत कोणीतरी आपल्या खोलीचं बाहेरून लॉक उघडतंय हे मेरीला समजायला काही क्षणच लागले. ती बिछान्यावर अर्धवट उठून बसली होती, खोलीतील दिवे बंदच होते खोलीमध्ये जास्त प्रकाश न्हवता. मेरीचा चेहरा घामाने डबडबला होता. 

अगदी निश्चितपणे कोणीतरी खोलीमधे यायला पाहत होतं, ते नक्कीच स्वप्न न्हवत. मेरी आता खडबडून जागी झाली. मेरीला काय करावे ते सुचेना. चावी फिरवण्याचा आणि दार ढकलण्यासाठी असणाऱ्या मुठेचा कर्रकर्र असा आवाज येत होता. बाजूच्याच टेबलावरचा फ्लॉवरपॉट मेरीने चटकन हातात धरला. बाहेर जे कोणी असेल ते आत येत क्षणी त्याचा डोक्यात तो घालायचा हा विचार तिने पक्का केला. लॉकच्या होलमधील चावीची धडपड थांबली. त्या व्यक्तीला लॉक उघडण्यात यश मिळाल होतं. मेरीने फ्लॉवरपॉट वरची पकड घट्ट केली. दरवाजा उघडला गेला आणि ..

“मेरी घाबरू नकोस मी तुला कसलीही इजा करणार नाही, उलट मला तु तुझा हितचिंतकच समज” आत येण्याआधीच त्या व्यक्तीचा घोगरा आवाज खोलीभर घुमला होता. शांत पण धीरगंभीर असा तो आवाज एका बेडर व्यक्तिचा वाटला. आवाजावरून ती व्यक्ती पुरुष असावी असं वाटत होता. मेरी जागच्या जागी गोठली होती, रुबेला जागी असेल का? कि मोठ्याने किंचाळून तिला जागे करावं असा तिला वाटून गेलं. पण एवढ्यात त्या व्यक्तीने भिंतीवरील दिव्याचं बटन चालू केलं. आणि संपूर्ण खोली प्रकाशाने उजळून गेली. मेरी जराशी दचकली तिने फ्लॉवरपॉट उचलून धरला. अगदी मध्यम वयाचा दिसणारा साधारण चाळीशी पंचेचाळीशीचा माणूस तिच्यासमोर उभा होता, अंगात कोट खाली बूट, रुंद खांदे, काळेभोर खोलवर गेलेले डोळे, जरासे पिंगट केस. चांगला सहा साडेसहा फुट उंच असा एकूण त्याचा वेश होता.

“मेरी फ्लॉवर पॉट खाली ठेव , मी तुला काहीही इजा करण्यासाठी आलेलो नाहीये.” ती व्यक्ती शांतपणे म्हणाली आणि आपले रिकामे हात दाखवत नंतर घडी घालून एकमेकांवर ठेवत तो मेरीकडे थंड दृष्टिने पाहू लागला. तो अजूनही दारामध्येच उभा होता. मेरीकडे येण्यासाठी कसलीही चपळाई किंवा धडपड त्याने केलेली न्हवती. म्हणूनच मेरीने फ्लावर पॉट उगारण्यासाठी वर घेतलेला हात खाली केला पण फ्लॉवरपॉट हातातून सोडला नाही.

“ कोण आहात आपण, अशा वेळी चोरासारखं दुसऱ्याचा घरात तुम्ही कसं काय घुसू शकता, याबद्दल मी तुम्हाला पोलिसांच्या स्वाधीन करू शकते.” मेरी न थांबता पटापट बोलली. बोलताना तिच्या छातीतील धडधड अजून वाढलेली होती. तरीही धाडसाने ती बोलली.

“ तू असं काही करणार नाहीस, कारण तू अस केलंस तर त्यात तुझंच नुकसान असेलं” तो माणूस शांतपणे म्हणाला. तो अजून दारामध्येच जागच्या जागीच हातावर हात ठेवून उभा होता.

मेरीला समजेचना या माणसाला पोलिसांच्या हवाली करण्यात आपलं काय नुकसान होईल. कपाळावरील घाम दुसऱ्या हाताने पुसत मेरी पुढे बोलली “ कोण आहात आपण” इथे अपरात्री चोरासारखं घुसण्याच काय कारण आहे ?

“ माझा नाव सायमन, मी तुझा वडिलांसोबत काम करत होतो, एका महत्वाचा गोष्टीबाबतीत मी तुला सावध करायला आलोय, असं बोलून त्या माणसाने कोटाच्या खिशातून एक फोटो काढून तो मेरीच्या पुढे बिछान्यात फेकला. मेरीने त्या माणसाकडे असलेली नजर न वळवता तो घेतला, तो फोटो तिच्या वडिलांचा आणि स्वतःला सायमन म्हणवणाऱ्या या माणसाचा एकत्रित फोटो होता.

“मेरी आपण दिवे घालवून अंधारात बोलू कारण रुबेला जागी होण्याची शक्यता आहे.”  असं बोलून त्याने बाजूची खुर्ची हळूच जवळ ओढून मेरीच्या होकाराची वाट पाहत बसला. मेरीने शांतपणे विचार केला आणि सायमनला दिवे विझवायला होकार दिला. सायमनने दिवे विझवले, आणि बाजूच्या खुर्चीत तो बसला. अंधारात मेरीला तो अंधुकसा दिसत होता, मेरीने फ्लॉवरपॉट आपल्या बाजूला ठेवला. मेरी आता जराशी स्वस्थ झाली होती.

“कोणत्या कारणासाठी तुम्ही इथे आलाय” मेरीने प्रश्न केला.
सायमनने आपल्या कोटाच्या खिशातून एक सिगरेट काढली आणि ती पेटवली आणि बोलायला सुरुवात केली

“ विल्यमच्या ट्रान्सपोर्ट कंपनी मध्ये मी विल्यामचा सहकारी म्हणूनच काम करत होतो, युरोप मध्ये आम्ही एकत्रच काम केलं, खूप सारी कामे आम्हाला मिळाली होती. सिझन मधल्या फळांची देवाणघेवाण हे आमचं सर्वात बहुमूल्य काम असे. त्यातून विल्यमला बक्कळ पैसा मिळालेला होता. अर्थात त्याच्या सगळ्याच सहकाऱ्यांना नफा मिळाला. मागच्या सिझनमध्ये सगळ्या उत्पादनांची देवाणघेवाण आमच्याच कंपनीमार्फत झाली म्हणूनच आम्ही खूप नफा कमावला. त्या रात्री मी आणि विल्यामने आनंदामध्ये खूप दारू ढोसली. दारूच्या नशेत विल्यम खूप हळवा झाला होता. आपली मुलगी मेरी किती गोड आहे आपण तिच्यापासून कसे दूर आहोत याबद्दल भरभरून बोलत होता. आपली पत्नी रुबेला हि कशी पैशाची भुकेली बायको आहे हे देखील सांगत होता. याचाच फायदा घेत मी विल्यमला अधिक दारूचा आग्रह करून त्याचा एकूणच मिळकतीबद्दल विचारलं. तेव्हा तो म्हणाला कि त्याचा मागे त्याने कमावलेले जवळपास ९ मिलिअन डॉलर त्याने सुरक्षितपणे ठेवलेले होते आणि ते मेरीला मिळतील अशी व्यवस्था देखील त्याने केलेली आहे.

मेरी शांतपणे त्याच बोलण ऐकत होती.

“ पुढे विल्यम मृत्यू झाला, त्याने आजपर्यंत मिळवलेली संपत्तीपैकी जवळपास आठ मिलिअन डॉलर तुला मिळेल आणि राहिलेली एक मिलिअन डॉलर रुबेलाला, कारण व्यावहारिक दृष्टिने का होईना रुबेलाने आपल्यामागे मेरीची काळजी घेतलेली होती आणि हे वाटप असंच व्हावं अशीच व्यवस्था विल्यमने केली होती... थोडंस थांबून सायमन पुढे बोलला.
तर माझी इच्छा अशी आहे कि... असं म्हणून सायमनने जरासं दीर्घ श्वास घेतला. 

" काय इच्छा आहे " मेरीने विचारणा केली.
'' त्या ८ मिलिअन डॉलर मधले निम्मे म्हणजे चार मिलिअन डॉलर मला मिळावेत एवढंच." सायमनने आपलं पुढचं वाक्य पूर्ण केलं आणि सिगरेटचा एक दीर्घ झुरका घेतला. तसं खोलीच्या अंधारात त्याचा सिगारेटच लालबुंद टोक स्पष्ट दिसलं.

काही क्षण शांततेत गेले. मेरी ऐकून सुन्नच झाली. “पण मी तुला का पैसे द्यावेत.” मेरीने  विचारले.
यावर मात्र सायमनने काहीच उत्तरं दिलं नाही थोड्या वेळाने तो आणि म्हणाला.

“ चांगला प्रश्न विचारलास, त्याचं असं आहे कि मेरी, तुझा सावत्र आईच्या वाट्याला फक्त एक मिलिअन डॉलर आले आहेत, त्या अधाशी महिलेला पैशाची किती चटक आहे हे तुला माहितच आहे ते मी सांगायला नको. आणि तुला मिळणार ८ मिलिअन, हे समजल्यामुळे तिने तुला ठार मारण्याचा डाव रचला आहे, ती पाताळयंत्री बया पैशासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते. तुला मारल्यानंतर तुझे बाकीचे पैसे विल्यमची पत्नी म्हणून सुद्धा तिलाच मिळतील आलं लक्षात. तर गोष्ट अशी आहे कि तुझा जीव धोक्यात आहे  आणि तू तुझं रक्षण करण्याइतकी सक्षम नाहीयेस, पण मी तुला वाचवू शकतो, रुबेला तुझ्या केसालासुद्धा धक्का लावू शकणार नाही. फक्त त्याबदल्यात मला तू चार मिलिअन द्यावेस. रुबेलाच काय करायचं ते मी पाहीन. ती तुला काहीही त्रास देऊ शकणार नाही उलट तिच्या वाट्याचे एक मिलियन सुद्धा आपल्याला म्हणजे तुलाच मिळतील म्हणजेच तुझाकडे सगळे ९ मिलियन असतील, म्हणजेच तुला ५ आणि मला ४ मिलिअन मिळतील. मग बोल काय वाटतंय तुला.”

एवढ बोलून सायमन परत शांत बसला. मेरीला काय खर काय खोटं हेच समजेना. खरंच रुबेला आपल्याला मारू शकते यावर तिला काहीच सुचेना, रुबेला तिच्या पर्समधे पिस्तूल याच कारणासाठी तर ती ठेवत नसेल ना कि कधीतरी आपला काटा तिला काढता येईल. मेरीला क्षणभर भणभणल्यासारख झालं.

" पण हीच ऑफर तू रुबेलाला सुद्धा देऊ शकतोस म्हणजे रुबेलासोबत मिळून तू माझा काटा काढू शकतोस, तसं करूनसुद्धा तुला पैसे मिळू शकतात. मेरीने उलट प्रश्न केला.

" अहं... तिच्यासोबत मिळून तुला मारलं तर सगळे पैसे रुबेलाला मिळतील. आणि ती पैशाला वखवखलेली बाई आपलं शब्द पाळेल कि नाही यात शंकाच आहे, तुझा काटा काढल्यावर ती बाई सरळ हात वर करेल आणि मला पैसे द्यायला नकार देईल. आईवडिलांविना एकटी पडलेली तू मला असं काही करू शकणार नाहीस, त्यामूळेच हि ऑफर तुला देण मला योग्य वाटत' सायमन सिगरेटच्या धुराची वलये हवेत सोडत म्हणाला.

हा कोण कुठला सायमन रुबेलाला किंवा आपल्याला खरंच मारू शकतो काय. आपण खरोखरच दुर्बल आहोत म्हणूनच मनात कणव उत्पन्न होऊन तो हि ऑफर आपल्याला देतोय असं मेरीला वाटलं. रुबेला खरंच आपला काटा काढू शकते आणि त्यात तिला यत्किंचितही वावगं वाटणार नाही याची मेरीला खात्री वाटत होती. वडील गेल्यानंतर देखील तिने मेरीला आधार दिलेला न्हवता कि मायेने आपुलकीने धीर दिलं नाही. त्यामुळे सायमन म्हणतोय तसं रुबेला आपल्याला मारण्याचा डाव आखेपर्यंत खालच्या पातळीला जाऊ शकते. 

 “रुबेलाला तू कसं हाताळणार “ मेरीने विचारले.

“वेल ..तू त्याची काळजी करू नकोस मी तिची व्यवस्थित विल्हेवाट लावीन.” सायमन अगदी सहजंच रोजच काम असल्यासारखं बोलला.

" आणि रुबेला मला मारायचा डाव रचते आहे हे तू एवढं खात्रीपूर्वक कस की सांगू शकतो" मेरीने सायमनला साशंकतेने विचारलं.

" इथे या शहरात आल्यापासून मी तुमच्या घरावर पाळत ठेवून आहे, तुमच्या घरात कोण येत कोण जातं याची इत्यंभूत माहिती मी मिळवली आहे, काही दिवसांपूर्वीच मी रुबेलाचा पाठलाग करत होतो. रात्रीची वेळ होती, अलेक्स गन शॉप या गन विकणाऱ्या डीलर जवळ रुबेलाने आपली गाडी थांबवली होती. मी आडोशाला थांबून पाहत होतो. काही वेळाने ती त्या दुकानातून निघून गेली, तसं मी दुकानात शिरलो म्हटलं गन शॉप मध्ये हि बया का शिरली याची चौकशी तरी करावी. आत जाऊन मी बंदुकांची चौकशी करू लागलो व ते करता करता मी मगाशी आलेली महिला काय घेऊन गेली याची त्या दुकानदाराला संशय न येता चौकशी केली, तर हि बया लहानशी पिस्तून विकत घेऊन गेली होती असं मला समजलं आणि ती पिस्तुलसारखं शस्त्र जवळ बाळगते म्हणून याबद्दल माझा कयास आहे कि ती काहीतरी डाव रचते आहे" सायमनने सांगितलं.

" कदाचित शहरातल्या वाढत्या चोरांच्या सुळसुळाटामुळे स्वसंराक्षणासाठी तिने पिस्तून घेतलं असेल यात गैर की आहे." मेरीने आपली शंका सायमनला बोलून दाखवली. 

" हम्म मलादेखील तसंच वाटलं आधी. पण पिस्तुल घेतल्याची अधिकृत नोंदणी करू नका यासाठी दुकानदाराला जास्त पैसे तिने का द्यावेत आणि तसदेखील तिच्याकडे पिस्तूल वापरण्याचा परवाना देखील नाहीये, म्हणजे मी तशी चौकशी केली आहे. सायमन अस्फुट हसत म्हणला.

रुबेलाने पिस्तुल घेतलं यावर मेरी आश्चर्यचकित होईल असं सायमनला वाटून तो मेरीच्या बोलण्याची वाट पाहू लागला.

“जर मी तुला पैसे द्यायला नकार दिला आणि पोलिसांकडे गेले तर? “ मेरीने विचारलं.

या अनपेक्षित प्रश्नाने खरंतर सायमन बावचाळला तरीही तो म्हणाला "दोन्हीही पर्याय तुलाच घातक ठरतील कारण जर तू माझी ऑफर जर स्वीकारली नाहीस तर मी रुबेलाल सांगेल कि मेरीने मला तुला मारण्यासाठी पाठवलं आहे. माझा अभिनय पाहून ती बावळट अधाशी बाई लगेचच विश्वास ठेवेल. मग तुला मारण्यासाठी मी तिच्याकडून पैसे घेईन अर्थात ४ मिलिअन पेक्षा ते कमी असतील. पण ती मला रग्गड पैसे देईल यात शंकाच नाही. मला ते पैसे देखील चालतील. राहिला पोलिसांचा प्रश्न. तर मी सध्या या देशात एका वेगळ्याच नावाने वावरत आहे, एक वेगळीच ओळख, आणि ते सिद्ध करणारी भरपूर कागदपत्रे माझाकडे आहेत. त्यामुळे सायमन या व्यक्तीला ते ओळखेपर्यंत तुझा थडग बांधल सुद्धा जाईल. मला रुबेलाकडून पैसेही मिळालेले असतील आणि पोलिसांना कळेपर्यंत मी जगाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात असेन. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये माझा तोटा काहीच नाहीये. त्यामुळे एकतर माझी ऑफर स्वीकार कर अन्यथा मी हि ऑफर रुबेलाला देईन ज्यात मला तुला मारण्यासाठी रुबेला नाही म्हटलं तरी ६०-७० हजार डॉलर्स देईलच ज्यात तुझं थडगे बांधण्याची व्यवस्था देखील असेल.” सायमन खुर्चीतून उठला आणि दाराजवळ उभं राहून मेरीच्या उत्तराची वाट पाहत होता. 

सायमन म्हणतोय त्यात नक्कीच तथ्य होतं त्याला कोणा ना कोणाकडून पैसे मिळणारच होते, फक्त मेरीकडे तो आधी ऑफर घेऊन आला होता कारण मेरीने जर ऑफर स्वीकारली तर त्याला ४ मिलिअन चा फायदा होणार होता इतकंच. 

“ मला विचार करायला वेळ हवाय” मेरी म्हणाली.

सायमनने दीर्घ उसासा टाकला आणि काही क्षण शांततेत उभा राहिला, थोडं थांबून तो बोलला.

“ ओके काही हरकत नाही तुला परवा पर्यंतचा वेळ देतो तोपर्यंत ठरव काय ते, परवा रात्री साडेबाराला तुझ्या खिडकीतुन टॉर्चचा प्रकाश समोरच्या झाडीमध्ये दाखव. मी तेव्हा समोरच्या झाडीतच उभा राहीन आणि झाडीमधून पाहीन. प्रतिसाद म्हणून तुलादेखील माझ्याजवळ असलेल्या टॉर्चचा प्रकाश दाखवून इशारा करेन. तुझा टॉर्चचा प्रकाश पाहून मी समजून जाईन कि तुला ऑफर मान्य आहे म्हणून. आणि नंतर मी टॉर्च दाखवेन. ओके. 

 सायमनच्या बोलण्यावरून तो पूर्ण तयारीत असल्यासारखा वाटत होता. त्या रात्री सायमनच सिगारेट ओढत झाडीत उभं असणार, आता मेरीच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला होता, सायमन त्यांच्या घरावर पाळत ठेवून होता तर. त्या रात्री अचानक खोलीबाहेर जाणवलेली ती चाहूल म्हणजे सायमनच असणार. दुसऱ्याचा घरामध्ये विनासायास तो घुसू शकत होता, आणि पैशासाठी तर कोणाचाही मुडदा पडण्याची तयारी होतीच. जे काही करायचं त्यात जरासुद्धा चूक झाली तर जीवावर बेतणार होतं. 

“ठीक आहे मी परवा रात्रीपर्यंत आपलं निर्णय कळवीन” मेरी म्हणाली.

“ओके, चालेल. परवा रात्री. आता मी निघतो “ अस म्हणून सायमन आल्यापावली सावकाशपणे बाहेर पडला. 

सायमन निघून गेला तरीही पण मेरी अजून बिछान्यात तशीच विचार करत बसून होती....

क्रमशः

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Fell free to share your Feedbacks

"द हार्टफुलनेस वे"

"द हार्टफुलनेस वे" या सुरेख पुस्तकाचा लाभ सगळ्यांनी करावा एवढं सुंदर पुस्तकं आहे ते, कमलेश डी. पटेल (दाजी) हे या पुस्तकाचे लेखक आध...