१४ एप्रिल, २०२४

गुप्तहेर रॉबिन आणी कुटीरोवांचं शस्त्र - वेषांतर


2.वेषांतर

उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवू लागला होता. रस्त्यावरून चाकरमान्यांची कामाच्या ठिकाणी जायची लगबग चालू होती. सकाळी अगदी नऊच्या सुमारास या बागेमध्ये लहान मुले आणि बिनकामाचे म्हातारेकोतारे लोक फेरफटका मारायला येत. त्यातले काही आपापल्या नातवांना घेऊन येत तर काही म्हातारे पाय मोकळे करायच्या नावाखाली मुलांच्या किंवा मुलींच्या संसारातील कागाळ्या एकमेकांना सांगायला येत असत. बाग तशी खूप मोठी होती. दुपारी १-४ बंद असायची. आजसुद्धा बागेमध्ये बऱ्यापैकी लहान मुले आणि म्हातारी माणसे यांची गर्दी होती. सकाळचे कोवळे उन जाऊन आता त्याची जागा कडक उन्हाने घेतली होती. बागेमध्ये फिरणारे वयोवृद्ध आता फिरायचे सोडून झाडाखालच्या बाकांकडे जाऊन विसावू लागले होते. अशाच एका बाकावर डॉक्टर पाटील हाताच्या बोटांचा चाळा करत समोरच्या घसरगुंडीवर खेळत असलेल्या लहान मुलांकडे बघत बसलेले होते. त्याचं वय साधारण ४० असावे. डोळ्यावरचा चष्मा सारखा करत डॉक्टर पाटील समोर पाहत कसल्यातरी विचारात गढलेले दिसत होते.

तेवढ्यात खाकखाख असं खाकरत एक वयोवृद्ध झालेला म्हातारा पाटील डॉक्टरांच्या जवळ येऊन उभा राहिला. पाटील अजूनही समोरच्या लहान मुलांकडे एकटक पाहत बसलेले होते.

इथे कोणी बसलं आहे काय बाळा...? घसा खाकरत तो म्हातारा पाटलांच्या शेजारील रिकाम्या जागेकडे निर्देश करत म्हणाला.

त्या वाक्यासारखी पाटील डॉक्टर भानावर आले.

अं...क.. काय म्हणालात आजोबा..काही न कळून भानावर येत पाटील त्या म्हाताऱ्याकडे पाहत म्हणाले.

चेहऱ्यावर सुरकुत्या, डोक्यावर पिकलेले केस, अंगात एक पांढरा सदरा आणि खाली एक कळकट्ट धोतरं अशा वेशातील त्या म्हाताऱ्याकडे पाहून पाटलांनी आपल्या चेहऱ्यावरचा चष्मा सारखा करत एक कटाक्ष टाकला.

अरे तुझ्या बाजूला कोणी बसलं आहे का? हे विचारत होतो मीअसं म्हणत आणि पाटलांच्या उत्तराची वाटही न पाहता तो म्हातारा पाटलांच्या शेजारी जाऊन बसला. पाटील काही बोलणार एवढ्यात त्या म्हाताऱ्याने एक पाय खाली सोडून आणि दुसरा पाय दुमडून घेऊन त्या बाकावर बस्तान मांडले.

सदरा थोडा वर करून आतल्या चोर कप्प्यातून कसलीतरी मळकट पुडी बाहेर काढून त्यातली तंबाखू हातावर घेत नंतर डबीतून चुना काढत त्या म्हाताऱ्याने तंबाखू मळायला सुरुवात केली. डॉक्टर पाटील त्या म्हाताऱ्याकडे पाहतच राहिले. असं अगदी शेजारी बसून तंबाखू मळत बसलेल्या म्हाताऱ्याला पाहून त्यांना जरा चिडच आली पण त्या म्हाताऱ्याचं वयं पाहता पाटलांनी शांतपणे नाकावर येणारा चष्मा सरळ करत विचारलं अहो आजोबा शेजारी कोणी बसलं आहे कि नाही हे मी नं सांगताच बसला तुम्ही

असुदे रे कोणी न्हवत बसलं इथे, मी पायल होतं दुरून. मी आपलं उगा इचारायचं म्हणून बोललो. तुम्हा शहरातल्या माणसांना असं इचारून बसावं लागतं असं माझ्या पोराने मला सांगितलं होतंम्हातारा तंबाखू मळत पाटलांकडे न पाहताच बोलला. 

ओह्ह अच्छा... म्हणजे या शहरात नवीन आहात तर तुम्ही” पाटील जरा सावरत म्हणाले.

हा तसं हायेच.. मागच्याच हप्त्यात माझ्या पोराकडे आलोय मी. हे काय पलीकडच्या दोन बिल्डिंगा सोडून घर आहे माझ्या पोराचं. नातवाचा वाढदिवस आहे म्हणून आलो. नायतर आमी काय गावाकडे असतो...बोलता बोलता म्हाताऱ्याने तंबाखू मळून व्यवस्थितपणे तोंडात ठेवली आणि हात झटकू लागला.

अच्छा...” एवढच बोलून पाटील जरा सावरून बसले. खरतर या म्हाताऱ्याच्या येण्याने त्यांची तंद्री भंग पावली होती.

तू काय करतो रे पोराम्हाताऱ्याने तंबाखू चघळत पाटलांना विचारलं. आता म्हातारा काही स्वस्थ बसू देणार नाही असं पाटलांना वाटलं कारण गावाकडून आलेले म्हातारे हे एकदा बोलू लागले कि थांबता थांबत नसत. आता या गपिष्ट म्हाताऱ्याशी बोलण्यावाचून गत्यंतर नाही असं वाटून पाटील बोलू लागले.

मी डॉक्टर आहे आजोबा

अरा बापरे म्हणजे मोठा माणूस हाय रे तू” म्हातारा डोळे मोठे करत म्हणाला.

तसं काही नाही इतर डॉक्टर लोकांसारखाच आहेशक्य तितक्या हळू आवाजात पाटील म्हणाले.

नाई म्हणजे आप्रेशन बिप्रेषन करन म्हणजे काय सोप्पं काम नाही गड्या. ते तुम्हा लोकांना जमतं म्हणजे मोठच कि तुम्हीम्हातारा डोळे मिचमिच करत बोलला.

नाही नाही आजोबा.. सर्जन नाहीये मी. जनरल फ्यिजिशिअन आहे मी.डॉक्टर पाटील स्पष्ट शब्दात आणि काहीशा मोठ्या आवाजात म्हणाले.

ऑ.. काई ते..पाटलांच्या इंग्रजीत उच्चारलेल्या त्या शब्दांच्या उलगडा न झाल्याने म्हातारा कडू तोंड करत म्हणाला.

अ.. म्हणजे ऑपरेशन करणार डॉक्टर नाही. आजाराची लक्षण पाहून औषध गोळ्या देणारा डॉक्टर आहे मी” पाटील स्मितहास्य करत म्हणाले. हि आपली ओळख सांगताना आपण स्मितहास्य करत आहोत हे पाटलांच्या लक्षात येताच पाटील दुसऱ्या क्षणाला शांत बसून समोर पाहू लागले.

हम्म...म्हंजे साधा डाक्टर आहेस तर... असं म्हणून ओठ एकमेकांवर दाबत म्हातारा आपल्या सदऱ्याच्या आत काहीतरी शोधू लागला. अतिशय कुत्सितपणे आपला साधा डॉक्टर म्हणून केलेला उल्लेख पाटलांना मुळीच आवडला नाही. थोडक्यात म्हाताऱ्याचे ते साधा डॉक्टरहे वापरलेले शब्द त्यांच्या वर्मी घाव करून गेले आणि न राहवून पाटील त्या म्हाताऱ्याला म्हणाले.

एक मिनिट आजोबा.. अहो फक्त क्रिडेन्शिअल पाहून तुम्ही अमुक डॉक्टर साधा कि भारी असं नाही ठरवू शकतनाकावर सरकणारा चष्मा सरळ करत पाटील जराश्या घुश्यातच म्हणाले. तो म्हातारा अजूनही सदऱ्यात हात घालून काहीतरी शोधतच होता. पाटील अजूनही त्या म्हाताऱ्याकडे पाहत उत्तराच्या अपेक्षेने तोंड अर्धवट उघडे ठेवून पाहत होते. शेवटी त्या म्हाताऱ्याला सदऱ्याच्या आतमधे जे पाहिजे होते ते सापडले.

पाटलांकडे बघत तो म्हातारा म्हणाला “हे बघ पोरा ते किडे बिडे का काय ते तू जे म्हणालास ते मला काय कळत नाय बघ. आम्हा गावाकडच्या लोकांचं कसं असतंय आप्रेशन करणारा डाक्टर म्हणजे भारी माणूस एवढचं गणित असतंय आमचं

म्हाताऱ्याच्या या उत्तरावर आता मात्र पाटील डोक्याला हात लावून बसले. हा म्हातारा चांगलाच डोकं खाणारा आहे हे त्यांना कळून चुकलं. साला काय कटकट आहे. बागेत नेहमीप्रमाणे फेरफटका मारून शांतपणे बाकावर बसायचो, आज काय हि ब्याद उपटली असं वाटून पाटील डोकं खाजवत समोर पाहत शांत बसले. म्हाताऱ्याने पाटलांकडे पाहिलं आणि त्याला जाणवलं कि पाटील दुखावले गेले आहेत. तसं तो समजुतीच्या स्वरात म्हणाला

अरे पोरा आमच्यासारख्या म्हाताऱ्या माणसाचं बोलण काय मनाला लाऊन घेतोस रे... आम्हाला काय कळतय त्यातलं बाबा तू सुद्धा मोठाच असचील

म्हाताऱ्याच्या या सावरासावरीने पाटलांच काही समाधान झालं नाही उलट डॉक्टर पाटील बसल्या जागीच पाय हलवत जरा रागातच समोर पाहू लागले. पाटलांची शांतता म्हाताऱ्याला काही रुचली नाही तेव्हा तो म्हातारा अजून पुढे म्हणाला. “अरे बाबा माणसांना जीवदान देणारे सगळ डाक्टर सारखेच. फक्त त्यातल्या त्यात जाणारा जीव वाचवा म्हणून धडपड करणारा डाक्टर खरा मोठा बघ” म्हातारा उगाचच दात दाखवत म्हणाला.

मी सुद्धा तसाच डॉक्टर आहे आजोबा. या भागातला एक प्रतिष्ठित, नावाजलेला आणि कित्येकांचा फॅमिली डॉक्टर आहे मी. माझ्या उपचारांचा गुण बऱ्याच जणांना येतो.” पाटील त्या म्हाताऱ्यावर नजर रोखून म्हणाले.

अस्स काय.. असेल हो.. काई सांगूबाबा आजकाल जीवाचा काई भरवसा नाही. खूप स्वस्त झालाय बग. कालच्याला आमच्या शेजारचा बोबडे नावाचा एक माणूस सांगत होता कि एक बाई मेली खालच्या गल्लीतील” म्हातारा जरा आठवल्यासारख करत म्हणाला.

म्हाताऱ्याच्या तोंडून बाई मेली असा उल्लेख ऐकून पाटील जरा गंभीर झाले. त्या बाईचा मृतदेह मीच तपासला असं सांगून या म्हाताऱ्याला गप्प करावं अशा उद्देशाने पाटील म्हणाले हो त्या बाईंचा मृतदेह मीच तपासला होता आणि मृत झाल्याचं घोषित केलं होतं. कारण मी त्यांच्या जवळच राहतो आणि त्यांच्या घरात कोणालाही आजारपण आल्यास मलाच बोलावतात. डॉक्टर पाटील आपली मान ताठ करत म्हणाले.

काई सांगतो काय..जरा मोठ्याने बोलत तोंडातून एक पिचकारी बाजूला मारत म्हातारा आता पाय सरळ करून बाकावर बसला. “माणूस मेलाय हे तुला समजलं लेका.. म्हणजे तू तर मोठा डाक्टर असला पाईजे रे...”

म्हाताऱ्याने आपला या वेळी मोठा डॉक्टर असा उल्लेख केलेला ऐकून पाटील मनातून सुखावले पण त्यांनी चेहऱ्यावर तसं दाखवलं नाही. म्हातारा उगाच काहीतरी खोचक बोलेल म्हणून पाटील यावेळी शांतच बसले. पण म्हातारा काही शांत बसायच्या मूड मध्ये न्हवता.

अरे मग काय झालं काय हुत तिथे नक्की, तुला कस कळल ती बाई मेलिय ते, तुला त्यांनी बोलावलं म्हंजी नक्कीच तू हुशार असला पाईजे बाबा” म्हातारा आ वासून पाटलांकडे बघत म्हणाला. परत एकदा हुशार असा उल्लेख झालेला पाहून पाटील मनोमन सुखावले आणि देसाई कुटुंबीयांकडे त्यांनाच कसं बोलावलं गेलं याबद्दल सांगू लागले.

काही नाही आजोबा.. मी आधीच तुम्हाला सागितलं आहे कि मी इथला खूप नावाजलेला आणि प्रतिष्ठित डॉक्टर आहे. तसाच अनेकांचा फॅमिली डॉक्टर आहे. त्या मेलेल्या बाईंच्या घरच्यांचा सुद्धा फॅमिली डॉक्टर होतो. मी आपल्या क्लिनिकमध्ये बसलो होतो तेव्हा बाहेर अचानक मला आरडाओरडा ऐकू आला तसा बाहेर आलो. बाजूच्या कोणीतरी मला सांगिलते कि समोरच्या वाड्यातील मालतीबाई यांना भोवळ आलीय आणि त्या खाली जमिनीवर पडल्यात तर तुम्ही चला. आजूबाजूला इतर कोणीही माझ्या इतका नावाजलेला डॉक्टर न्हवता त्यामुळे ते कदाचित माझ्याकडे आले असावेत म्हणून मी तडक त्यांच्या वाड्यात गेलो. तर ती बाई जमिनीवर तिच्या खोलीत पडली होती. तिचे ठोके लागत न्हवते आणि नाडीसुद्धा बंद होती. मी स्टेथेस्कोपने तपासलं तर जिवंत असण्याचा एकही पुरावा दिसत न्हवता

मंग काय केलं तू..” पाटलांच वाक्य मधेच तोडत म्हातारा बोलला.

मग काय तेव्हा. मला जरा शंका आली मग मीच हॉस्पिटलमध्ये हलवा असं सांगितलं” पाटील हाताची घडी घालत समोर पाहत गंभीरपणे म्हणाले.

अररर.. बिचारीला अटाक आला असणार बघ... मी म्हणालो ना रे डाक्टर आजकाल जीवाचा भरवसा नाहीच बघ. आमचा शेजारी बोबडे थेरडा उगाचच काहीही उठवतो कि खून झाला म्हणून” म्हातारा उगाचच कसनुस तोंड करत म्हणाला.

अहो आजोबा खुनच झालेला होता त्या बाईचा आणि बिचारी वगैरे कसली हो, चांगलीच पाताळयंत्री बाई होती तीपाटील त्रासिक सुरात समोर पाहत म्हणाले.

अह... अस्स होय...तोंडावरचा घाम धोत्र्याच्या सोग्याने पुसत विचित्र चेहरा करत म्हातारा खाली पाहू लागला.

म्हाताऱ्याला खून हा शब्द ऐकून धडकी भरली असावी. म्हणूनच घाबरून शांत झाला असावा असं वाटल्याने पाटलांना जरा आवेश चढला. आणि ते म्हणाले

अहो आजोबा घाबरू नका. इथे काय दिवसाढवळ्या खून दरोडे घडत नाहीत आणि माझ्यासारख्या नावाजलेल्या डॉक्टरसोबत तुम्ही या बागेत मध्ये बसलेले असताना तुम्हाला कोण काय करणारनाटकी हसत हसत पाटील म्हणाले.

म्हातारा अजूनही जमिनीकडे पाहतच होता. पाटील त्याच्याकडे पाहत होते. त्यांना वाटलं काय पण म्हातारा आहे राव खून म्हटलं कि घाबरतो.

थोड्या वेळाने तो म्हातारा खाली पाहतच म्हणाला अरे पोरा मी घाबरलो नाही फक्त ईचार करतोय कि तू एवढ्या खात्रीने कसं काई बोलला कि खूनच झाला होता म्हनून, कारण तुला तर बाईला भोवळ आलीय आन ती जमिनीवर पडलीय म्हणून बोलावलं होतं ना?” एवढ बोलून म्हाताऱ्याने पाटलांकडे साशंक नजरेने पहिले. त्या म्हाताऱ्याची ती नजर पाहून पाटील अवाकच झाले. म्हणजे हा म्हातारा आपल्यावर संशय घेतोय. याची हिम्मतच कशी काय झाली. असं वाटून पाटील पुढे बोलले.

हे बघा आजोबा मी एक डॉक्टर आहे आणि डॉक्टरांना शरीरशास्त्रातील सगळं कळत. त्या बाईंचं शरीर पूर्णपणे आखडल होतं अगदी काही मिनिटातच. हृदयक्रिया बंद पडल्याने असं काही लक्षण दिसत नाही आणि तिच्या मानेवर सुद्धा रक्ताचा थेंब होता जणू काही कोणीतरी जबरदस्तीने इंजेक्शन देऊन मारलं असावं असा. अर्थात त्यावेळी मी कोणालाच काही सांगितल नाही. तसंही ती काय साधीसुधी बाई वाटली काय तुम्हाला. अहो ती मोठी पोचलेली राजकारणी बाई होती. बऱ्याच लोकांचं नुकसान केलं होत तिने. घेतला असेल कोणीतरी तिचा बदला. तुम्हाला काय माहिती, नवीन आहात तुम्ही इथे” रागारागात एवढ बोलून पाटलांनी आपल्या मनगटावरच्या घड्याळात पहिले १० वाजून गेले होते. आज सकाळ सकाळ म्हाताऱ्याने डोक्याला ताप दिला होता.

तुमचं पन चांगलंच नुकसान केलेलं हुतं वाटतं त्या बाईने, एवढं तावातावाने बोलताय ते” म्हाताऱ्याने तोंडातून एक पिचकारी बाजूला मारून धोतराने तोंड पुसलं आणि उगाचच नजर रोखून पाटलांकडे बघू लागला. पाटलांनी त्या म्हाताऱ्याकडे पहिले त्यांना त्या म्हाताऱ्याची नजर विचित्र वाटली. बोलता बोलता आपण बरंच काही बोलून गेलो याची खंत त्यांना वाटून हाताच्या मुठी आवळून ते जरा आखडून बसले. काही वेळातच या म्हाताऱ्याच्या टकळीपासून सुटका करून घ्यावी म्हणून ते जागेवरून उठले आणि उगाचच मनगटावरच्या घड्याळात पाहत म्हणाले चला मी निघतो माझी दवाखान्यात जायची वेळ झालीआणि त्या म्हाताऱ्याकडे न पाहतच चालू लागले.

बागेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोचल्यावर पाटलांना जरा हायसं वाटलं. बाहेर पडताना उगाचच त्यांनी आपण मगाशी बसलेल्या बाकड्याकडे नजर वळवली. तर तो म्हातारा एक पाय बाकावर ठेवून बागेच्या मुख्य प्रवेशद्वाराकडेच नजर रोखून एकटक त्यांचाचकडे पाहत होता. पाटलांनी तिथून लागलीच काढता पाय घेतला.

आता संध्याकाळ होत आली होती, इन्स्पेक्टर देशमुखांची गाडी पोलीस स्टेशन पासून निघाली. त्यांना तडक रॉबिनला भेटण्यासाठी त्याच्या घरी जायचं होतं. मालती देसाई खून प्रकारणाच कामकाज म्हणावं तसं वेग घेत न्हवते. कोणतीच महत्वाची माहिती पुढे येत न्हवती. पण आता रॉबिनने तपासकार्यात हातभार लावायचं ठरवल्यामुळे तपास करण सोप्पं पडणार होतं. काही वेळाने पोलिसांची गाडी रॉबिनच्या घरापुढे थांबली आणि त्यामधून देशमुख रुबाबात खाली उतरले. सोबतच्या हवालदाराला त्यांनी गाडीजवळच उभं राहायला सांगितलं आणि ते एकटेच रॉबिनच्या घराच्या दरवाजाजवळ आले. दार अर्धवट उघडच असल्याने ते सरळ आत लोटून देशमुख आत आले आणि समोरचे दृश्य पाहून जरा चपापलेच. आतमध्ये एक म्हातारा खुर्चीत बसून त्याच्या दोन्ही तंगड्या टेबलावर पसरून आरामात सिगारेट ओढत बसला होता.

अ...आपण कोण आणि रॉबिनच्या घरात काय करताय... इन्स्पेक्टर देशमुखांनी आश्चर्याने विचारलं.

देशमुखांनी बोलताच समोरचा म्हातारा खळाळून हसला आणि त्याने डोक्यावरचा पांढऱ्या केसांचा विग आणि नकली पांढऱ्या मिशा समोर टेबलावर काढून ठेवल्या. आपले केसं तो एका हाताने व्यवस्थित करू लागला.

ओह्ह.. रॉबिन तू.. अरे मी ओळखलंच नाही तुलादेशमुख चेहऱ्यावर हास्य आणत म्हणाले. तसं देशमुखांना माहित होतं कि काही विशेष कारण असल्यास रॉबिन वेषांतर करून तपास करतो. तरीपण आत्ता त्याला हे सोंग आणावयाची काय गरज पडली ते समजेना.

चला तुम्ही मला ओळखलं नाही म्हणजे म्हाताऱ्याचे सोंग झकास जमले होते तर” अस म्हणत रॉबिनने आपल्या नकली मिशा बाजूला सरकवून ठेवल्या.

पण मला एक सांग रॉबिन हे अचानक असं सोंग का घेतलस बाबा?” देशमुखांना आपलं कुतूहल लपवता आलं नाही.

काही नाही हो इन्स्पेक्टर साहेब मला वाटलं कि मालतीताई यांच्या खुनाची चौकशी आधी बाहेरून करावी” रॉबिन म्हणाला.

पण असं वाटण्यामागे काही विशेष कारण?” देशमुखांनी विचारलं.

हा.. म्हणजे मला असं वाटलं कि मृत व्यक्ती स्वभावाने किंवा व्यक्तिमत्वाने कशी होती याची विचारणा बाहेरून करून घ्यावी अर्थात ती नेहमीप्रमाणे सरळ मार्गाने न करता या विशिष्ट पद्धतीने. आणि तसंही या प्रकरणात प्रतिष्ठित व्यक्तीचा समावेश असल्याने त्याबद्दलच्या ना ना प्रकारच्या वावड्याच जास्त उठतात. केसचा तपास सुरु करण्यापूर्वी या वावड्या काय असू शकतात त्यात तथ्यांश किती याची चाचपणी करणे गरजेचे होते. लोक पोलिसांना किंवा कोणत्याही खाजगी गुप्तहेराला अशा गोष्टी सरळ सांगत नाही म्हणूनच त्या जाणून घेण्यासाठी हा खटाटोप.” टेबलावरील नकली केसांच्या विगकडे निर्देश करत रॉबिनने सिगरेटचा एक दिर्घ झुरका घेतला.

ओह्ह... असं आहे तर.. मग तुझ्या हाती काय लागलं. तसं पोलीस खात्याने सुद्धा त्यांच्या परीने बाहेर चौकशी केली होती. पण आता तू म्हणतोयस कि लोक सगळ्याच गोष्टी पोलिसांना स्पष्ट सांगत नाहीत तर तुला नक्की काहीतरी सापडलं असेलच” देशमुखांनी विचारणा केली.

काही गोष्टी समजल्या. ठरल्याप्रमाणे मी डॉक्टर पाटलांना म्हाताऱ्याच्या वेशात बागेत सकाळ सकाळ भेटलो. मी या भागात एक नवखा नागरिक आहे असं भासवून शेजारच्या भागात खून झालाय असं कळल्याचे सांगून झालेल्या खुनाची चौकशी केली.” रॉबिन सांगत असतानाच देशमुख मधेच म्हणाले.

अरे वाह म्हणजे पाटील डॉक्टरांनी तुला ओळखले नसेलच. तुला त्यांच्याकडून काय माहिती मिळाली.” देशमुख स्मित करत म्हणाले.

मालतीबाई ज्यावेळी जमिनीवर कोसळलेल्या होत्या त्यावेळी डॉक्टर पाटलांना वाड्यावर बोलावलं होतं आणि त्याचवेळी त्यांना असा संशय आला होता कि मालतीबाई यांचा खून झाल्याची शक्यता आहे. इतर माहितीच म्हणाल तर मालतीताई यांच्याबाद्द्ल समाजात चांगली प्रतिमा नाही. त्यांनी बऱ्याच लोकांचं आर्थिक वा सामाजिक स्तरावर नुकसान केलेलं आहे. किंबहुना डॉक्टर पाटील सुद्धा याचे बळी ठरलेत असा मला दाट संशय आहे” रॉबिनने सिगारेटचे थोटूक विझवत बाजूला ठेवले.

हम्म.. आम्हाला सुद्धा लोक बऱ्यापैकी हेच सांगत होते कि बाई जरा खाष्टच होती. तिच्या फायदाच्या आणि जवळच्या लोकांनाच कामे मिळवून द्यायची. पण डॉक्टर पाटलांनासुद्धा मालतीबाईंचा राग असावा हे विशेष आहे. कारण पोलीस चौकशीत तर डॉक्टर पाटील तसं काही असल्याचं दाखवत न्हवतेदेशमुख विचारमग्न होत म्हणाले.

खुनासारख्या प्रकरणात पोलिसांना अशा माहित्या देऊन कोण कशाला आफत ओढवून घेईन देशमुख साहेब. डॉक्टर पाटील यांच्या चौकशी नंतर मी त्या भागातल्या बऱ्याच लोकांना जसे कि दुकानदार, स्थानिक भागातील ज्येष्ठ नागरिकांच्या क्लब मधील मेंबर यांना भेटलो. सगळ्याचं ऐकून मला हे वाटतंय कि मृत मालती बाईंबद्दल लोकांच मत चागलं नाहीये.रॉबिन हाताची घडी घालत टेबलाकडे एकटक पाहत म्हणाला.

हम्म.. म्हणजे मालतीबाई यांना मारून बऱ्याच जणांना फायदा होऊ शकतो असं दिसतंय. मालतीबाईंना पाण्यात पाहणारा कोणीतरी असेल ज्याचं मालतीबाईनी नुकसान केलं असेल किंवा त्यांचा कोणी राजकारणातील शत्रू हे कृत्य करू शकतो.” देशमुख म्हणाले.

शक्यता नाकारता येत नाही देशमुख साहेब, पण मालतीताईंचा मृत्यू घरात झालाय. त्यांचा खून करणाऱ्याला त्यांच्या घरात जाऊन मारण्यासाठी कोणा ना कोणाची मदत घाव्यी लागलेली असू शकते. तो व्यक्ती घरात आला तसा खून करून बाहेर गेला असं सहजासहजी शक्य होणार नाही. कोणीतरी त्याला नक्कीच मदत केलेली असेलरॉबिन हात डोक्यामागे घेत वर आढ्याकडे पाहत म्हणाला.

शिवाय मालतीताईंचा मृत्यू सुद्धा विशिष्ट पद्धतीने झालाय, खुन्याने कोणताही मागमूस न सोडता हे काम कोणाच्या मदतीशिवाय करण शक्य वाटत नहीये.देशमुखांनी रॉबिनच्या म्हणण्याला जोड दिली.

पण काही प्रश्न हे उरतातच देशमुख. मालतीताईंचा काटा खुन्याने विशिष्ट पद्धतीने का काढला असेल? असं कोणतं विष त्याने वापरलं असेल ज्याने मालतीताई तत्क्षणी मृत्युमुखी पडल्या? चाकू भोसकून किंवा रस्त्यावर अपघात करून मालतीताईंना मारणे शक्य असताना हि विशिष्ट पद्धतच का वापरली असावी? शिवाय खुन्याने ते विष मालतीताईंना कस दिलं असेल?” एकामागोमाग एक प्रश्न उपस्थित करत रॉबिन आपल्या खुर्चीत डोळे मिटून शांत बसला. यावर काही उत्तर नसल्याने देशमुख सुद्धा विचार करत शांत बसले. काही वेळ रॉबिन आणि देशमुख विचारमग्न झाले.

काही वेळ शांततेत गेला. नंतर त्या शांततेचा भंग करत रॉबिन म्हणाला

चला देशमुख मला वाटत आता आपण देसाई वाड्यावर जाऊन प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी आणि घरातील लोकांची चौकशी करायला हवी. उर्वरित प्रश्नांनी उत्तरं आपल्याला कदाचित तिथे मिळू शकतातरॉबिन लगबगीने म्हणाला.

हो खरतर त्यासाठीचं मी इथे आलो होतो. मालतीताईंच्या देहावर दहन संस्कार होऊन बरेच दिवस झाले आहेत. त्यामुळे तुला टेलिफोन न करता लगोलग तुला घेऊनच देसाई वाड्यावर जावे असा विचार होतादेशमुख जागेवरून उठत म्हणाले.

हे एक बरे केलेत. मला तुमची सुद्धा मदत लागेलच” रॉबिन म्हणाला.

पुढच्याच क्षणी रॉबिन आणि इन्स्पेक्टर देशमुख घरातून बाहेर पडले आणि देशमुखांनी खाली उभ्या केलेल्या पोलिसांच्या गाडीत येऊन बसले. गाडीत बसताच देशमुखांनी हवालदाराला आदेश दिला चला म्हस्के गाडी आता तडक देसाई वाड्याकडे न्या

इंस्पेक्टर देशमुखांच्या आदेशासरशी हवालदार म्हस्केनी गाडी चालू केली आणि गाडी देसाई वाड्याकडे जाऊ लागली.

क्रमशः

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Fell free to share your Feedbacks

"द हार्टफुलनेस वे"

"द हार्टफुलनेस वे" या सुरेख पुस्तकाचा लाभ सगळ्यांनी करावा एवढं सुंदर पुस्तकं आहे ते, कमलेश डी. पटेल (दाजी) हे या पुस्तकाचे लेखक आध...