५ ऑक्टोबर, २०२५

"द हार्टफुलनेस वे"




"द हार्टफुलनेस वे" या सुरेख पुस्तकाचा लाभ सगळ्यांनी करावा एवढं सुंदर पुस्तकं आहे ते, कमलेश डी. पटेल (दाजी) हे या पुस्तकाचे लेखक आधुनिक गुरु म्हणून शिकवतात कि आध्यात्मिक शिकवणींना दैनंदिन जीवनाशी जोडा, ज्यामुळे हार्टफुलनेस सुलभ आणि लागू करता येईल. लेखक आशा करतात कि ही पद्धत इतरांच्या जीवनातही अशाच प्रकारे परिवर्तन घडवून आणेल.

लेखकाचा हा प्रयत्न अध्यात्माकडे एक परिवर्तनकारी दृष्टिकोन सादर करतो, जो हृदयापासून जगण्यावर भर देतो. हे हृदय-केंद्रित मार्गदर्शक शिक्षक आणि विद्यार्थ्यामधील संवादातून उलगडते, वाचकांना शतकानुशतके जुन्या हार्टफुलनेस परंपरेत रुजलेल्या ध्यानाच्या एका अनोख्या पद्धतीची ओळख करून देते. दाजी राजयोग आणि सूफीवादाच्या घटकांचे मिश्रण करून एक व्यावहारिक, सुलभ मार्ग तयार करतात जो सर्व पार्श्वभूमीतील व्यक्तींना त्यांच्या आंतरिक दिव्य स्वतःचा शोध घेण्यासाठी आमंत्रित करतो. आधुनिक जीवन आपल्याला अनेकदा भौतिक यश आणि बाह्य प्रमाणीकरणाच्या अथक प्रयत्नांनी व्यापून टाकत असल्याने, हे पुस्तक एक ताजेतवाने पर्याय देते: हार्टफुलनेस दृष्टिकोन आपल्याला स्वीकृती, करुणा, नम्रता आणि प्रेम जोपासण्यास शिकवतो. चार प्रमुख पद्धतींवर लक्ष केंद्रित करून - विश्रांती, ध्यान, पुनरुज्जीवन आणि कनेक्शन - "द हार्टफुलनेस वे" - वाचकांना खोल आध्यात्मिक वाढ आणि परिवर्तन अनुभवण्यास सक्षम करते, हे उघड करते की हृदयस्पर्शी जीवन कसे खऱ्या समाधानाकडे नेऊ शकते.

वरुण सोनी आपल्या कुटुंबाचा भारत ते अमेरिकेपर्यंतचा प्रवास शेअर करतात, नवीन स्थलांतरितांकडून यशस्वी डॉक्टरांकडे त्यांच्या संक्रमणावर भर देतात. पारंपारिक यश मिळवूनही, त्याच्या पालकांना हे माहित होते की खऱ्या समाधानात भौतिक संपत्तीपेक्षा जास्त काही समाविष्ट आहे; त्यात नातेसंबंधांचे संगोपन करणे आणि उद्देश शोधणे समाविष्ट आहे. या अनुभूतीमुळे त्याच्या आईला हार्टफुलनेस ध्यानाचा शोध लागला, ज्यामुळे त्यांच्या घरगुती गतिशीलतेत बदल झाला आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले. या पद्धतीचे वर्णन दैवीशी जोडण्याचे आणि आत्म-साक्षात्काराला प्रोत्साहन देण्याचे साधन म्हणून केले आहे. सोनी अधोरेखित करतात.

हृदयस्पर्शीता ही प्राचीन भारतीय राजयोग पद्धतीमध्ये रुजलेली आहे, जी प्रत्येक व्यक्तीमधील जन्मजात दिव्यता ओळखते.ते आत्मनिरीक्षणावर भर देते आणि ध्यान तंत्रे देते - नकारात्मक भावना शुद्ध करण्यासाठी आणि आतील दिव्य प्रकाशाचे पोषण करण्यासाठी. ही पद्धत कालातीत आध्यात्मिक सत्यांची समकालीन अभिव्यक्ती आहे, ज्याचा उद्देश आधुनिक जगात आध्यात्मिक साधना प्रासंगिक बनवणे आहे. दाजी हार्टफुलनेस परंपरेत एक व्यावहारिक मार्गदर्शक म्हणून काम करतात, पारंपारिक तपस्वी गुरूंच्या तुलनेत. त्यांच्या शिकवणी दैनंदिन वापरासाठी बनवल्या गेल्या आहेत, ज्यामुळे दैनंदिन जीवनाशी सुसंगत असलेल्या अध्यात्माकडे एक समग्र दृष्टिकोन मिळतो.

या पुस्तकात लेखक जीवनाच्या अप्रत्याशित स्वरूपावर चिंतन करतात आणि १९७६ मध्ये किशोरावस्थेत हार्टफुलनेस ध्यानाचा शोध घेतल्याबद्दलची एक वैयक्तिक कहाणी शेअर करतात. या अनुभवाचा त्यांच्यावर खोलवर परिणाम झाला आणि ते त्यांचे पहिले गुरु रामचंद्र (बाबूजी) यांच्याकडे गेले, ज्यांनी त्यांना या साधनादरम्यान मार्गदर्शन केले. गेल्या काही दशकांपासून, हार्टफुलनेस ध्यानाने प्रेम, स्वीकृती, नम्रता आणि करुणा यासारख्या गुणांना जोपासून त्यांचे जीवन समृद्ध केले आहे. बालिश चमत्काराने साधलेल्या ध्यानाची कृती, एक आंतरिक विश्व उघडते जिथे कोणीही त्यांच्या आत्म्याचे सार शोधू शकतो. 

सारांश करायचा झाल्यास हार्टफुलनेस मेडिटेशनचा प्रवास केवळ व्यावहारिक नाही, तो चेतनेचा शोध आणि मनुष्याच्या खऱ्या क्षमतेच्या प्रकटीकरणाचा आणि खऱ्या स्व चा शोध आहे.

========================================================================

२४ ऑगस्ट, २०२५

हडप्पा संस्कृती एक पुरातन सभ्यता...!

 




पुरातत्व खात्याने साधारण १०० वर्षापूर्वी पाकिस्तानातील पंजाब प्रांतात एक पुरातन शहराचा आणि त्या काळातील अतिशय आधुनिक समजल्या जाणाऱ्या संस्कृतीचा शोध लावला. हि संस्कृती अंदाजे ३३०० ते १७०० इसवी सन पूर्व या दरम्यान अस्तित्वात होती. पुरातन अशी असणारी हि संस्कृती पुरातत्व आणि भूगर्भशास्त्राच्या अभ्यासकांसाठी एक अमूल्य संधीच ठरते.

इ.स. पूर्व काळात हडप्पा संस्कृतीची भरभराट झाली, पुरातत्वीय शोधांवरून हडप्पा संस्कृतीचा हळूहळू विकास होत असल्याचे दिसून आले. हडप्पा संस्कृतीला इंग्रजीमध्ये “ Indus valley civilization” असं संबोधतात. संस्कृती प्रथम १९२१ मधे पाकिस्तान मधील पंजाब प्रांतात “ दयाराम साहनी” यांनी शोधली. या शोधात तांबे आणि मिश्रधातूंपासून बनवलेल्या अनेक वस्तू सापडल्या म्हणूनच हि संस्कृती कांस्ययुगीन म्हणून देखील ओळखली जाते. हडप्पा संस्कृतीमध्ये या संस्कृतीची नगररचना हे विशेष समजले जाते. पुरातन काळातील या हडप्पा नगराची रचना आणि स्थापत्य अत्यंत प्रगत होते. प्रचंड इमारती, स्नानगृहे, धान्याची कोठारे, नागरी वस्तीमधील घरे, भव्यदिव्य मंदिरे अगदी नियोजनबद्ध पद्धतीने बांधण्यात आलेली होती. सध्या खेडेगावात ज्याप्रकारे दगडांचा वापर करून घरे बांधतात तशी १०-२० घरे हडप्पा मध्ये ठराविक अंतरावर बांधलेली आढळली. रस्त्याच्या दुतर्फा अशी घरे बांधण्यात आली होती जी आजही भग्न झालेल्या अवस्थेत दिसतात. नगरच्या चहुबाजूला संरक्षक तटबंदी उभारलेली होती. नदीकाठी असलेल्या भागात हडप्पा संस्कृती असल्याने शेती हाच सर्वसामान्यांचा व्यवसाय होता. शेतीबरोबरच इतर शेतीविषयक जोडधंदे आणि दुग्धोत्पादन याची सुबत्ता होती. कुटुंबपद्धती आणि समाजरचनादेखील अतिशय सुसंस्कृतअसल्याचे पुरावे आढळलेले आहेत. एकूणच काय तर अतिशय आदर्श आणि प्रगत अशी हि संस्कृती म्हणूनच हडप्पा संस्कृतीचा उल्लेख होतो. पण असं जरी असलं तरी हि संस्कृती नामशेष कशी काय झाली असावी याचे पुरातत्व खात्यालासुद्धा मोठे कोडे पाडलेल आहे. इसवी सन पूर्व १९००-१३०० काळात हडप्पा संस्कृती नामशेष झाली. हडप्पा नामशेष होण्यामागे अनेक कारणे दिली जातात त्यापैकी परकीय आक्रमण आणि नैसर्गिक आपत्ती हि मुख्य कारणे होय. या दोन कारणांमुळे हडप्पा नगरवासी हे शहर सोडून दुसरीकडे स्थलांतरित झाले असावेत असा अंदाज व्यक्त केला जातो. असं असलं तरीदेखील हडप्पा संस्कृती नष्ट होण्यामागे कोणताही सबळ पुरावा देता येत नाही. नक्की कोणत्या कारणांमुळे नियोजनबद्ध आणि बिनचूक रचना असलेली हडप्पा नामशेष झाली हे अद्यापही गूढच आहे. परकीय आक्रमणात हडप्पा नगरातील घरे आणि लोकवस्त्या असलेली ठिकाणे नष्ट केली असं काही अभ्यासक सांगतात, खोदकामात अनेक मानवी सांगाडे सापडल्याने बहुतांश हडप्पावासी लोक हे परकीय सभ्यतेच्या आक्रमणात मारले गेले असावेत आणि जे काही वाचले असतील त्या लोकांनी इतर भागात स्थलांतर केले असा अभ्यासकांचा प्राथमिक अंदाज आहे.

हडप्पा नामशेषाची कारणे काहीही असोत, हडप्पा हि नेहमीच एक आदर्श नगररचना असलेल शहर म्हणून ओळखले जाईल. सध्या भग्न अवस्थेत जरी असले तरीही आधुनिक जगातील समाजरचना आणि नगररचना हडप्पा संस्कृतीमधून आदर्शवादाची प्रेरणा घेतच राहतील.

=================================================================

१२ एप्रिल, २०२५

गुप्तहेर रॉबिन आणि भूतबंगल्याचे रहस्य - भाग ७ (अंतिम)

 

रात्र चांगलीच पडलेली होती. बंगल्याच्या आसपास नेहमी असते तशीच भयाण शांतात होती, बंगल्यातील आरडाओरडा आणि भयानक किंकाळ्याचे आवाज आता बंद पडलेले असले तरी एक प्रकारची विचित्र शांतता अजूनही तिथे होती. बंगल्याच्या आतल्या भागात एका मोठ्या हॉलवजा खोलीमध्ये एका खुर्चीच्या मागे रॉबिन लपून बसलेला होता. शेजारच्याच खोलीत इ. इनामदार देखील लपलेले होते. अंधाऱ्या रात्री कोणी गुपचूप बंगल्यात प्रवेश केलाच तर त्याला बेसावध गाठून पकडण्याचा इरादा केला गेला होता. बंगल्याच्या मागील उसाच्या शेतात केशवदेखील उसाच्या गर्दीत लपून बंगल्याच्या खिडक्यांवर नजर ठेवून होता आणि कोणी बंगल्यात शिरताना दिसलंच तर इशारा देण्याचं काम रॉबिनने त्याच्यावर सोपवलेलं होतं. बंगल्याच्या शेजारी बांधकामाचे साहित्य आणि इतर बस्तू ठेवायला जे शेड उभं केलेलं होतं त्यामागे हरिभाऊ सुद्धा दबा धरून बसलेले होते. सावज हातातून निसटून बाहेर गेलंच तर केशव आणि हरिभाऊ यांना बाहेर सावजाला पकडायला सोप्पं जावं म्हणून रॉबिननेच त्यांना तिथं लपायला सांगितलं होतं.

रॉबिनच्या योजनेनुसार आज रात्रीच भूतबंगल्यात रंगा आणि बाळूला भूतांची थेरं करायला सांगणारा अनामिक खलनायक बंगल्यात येणार होता त्यासाठीच सगळेजण आपापल्या जागेवर दबा धरून शांतपणे त्या खलनायकाची वाट पाहत बसले होते. रात्रीच्या काळोखात बंगल्याच्या आसपासचा परिसर पूर्णपणे बुडून गेला होता. बंगल्यातील एका छोट्या खोलीत मातीच्या ढिगाऱ्यामागे लपलेल्या इ. इनामदारांना मनातून वाटत होतं कि रॉबिनच्या म्हणण्यानुसार खरंच तो खलनायक इथे येईल का? कि तो रंगा आणि बाळूच्या पकडले गेल्याच्या बातमीमुळे पसार झाला असेल आणि येणारच असेल तर तो नक्की इथे कशासाठी येणार आहे हे सुद्धा रॉबिनने सांगितलं न्हवत, काहीही असो प्रयत्न करायला हवा. अखेर रॉबिनने काहीतरी विचार करूनच हि योजना आखली असेल. कितीवेळ झालं ते सगळे तिथे शांतपणे दबा धरून बसलेले होते. एक एक क्षण त्यांना तासाप्रमाणे वाटत होता, अजूनही कोणाच्या येण्याची चाहूल लागलेली न्हवती. रात्र चढत चाललेली होती, रॉबिन डोळे मिटून शांतपणे बसून होता.

एवढ्यात बंगल्याच्या बाहेरून टिटवीच्या ओरडण्याचा आवाज आला, तो आवाज केशवनेच काढलेला होता, म्हणजेच केशवने दिलेला इशाराच होता. काही वेळाने काहीतरी घासल्यासारखा आवाज रॉबिनला आला, केशवचा इशारा समजून रॉबिन सावध होऊन बसला. बंगल्याच्या खिडकीमधून कोणीतरी हळूच बंगल्यात प्रवेश करू पाहत होतं त्याच्या शरीराभोवती गुंडाळलेल्या कापडांमुळे भिंतीला घासल्यासारखा आवाज येत होता. रॉबिन कान टवकारून ऐकण्याचा प्रयत्न करू लागला, इनामदार साहेबांना देखील तो आवाज ऐकू आल्यामुळे ते देखील श्वास रोखून बसले. बंगल्याच्या मधल्या भागातून आतमध्ये येऊन त्या व्यक्तीने रॉबिन ज्या खोली लपलेला होता त्या खोलीकडे मोर्चा वळवला. त्या व्यक्तीच्या हातात फावडे होते आणि ती हळुवारपणे पुढे सरकत होती. रॉबिनला जाणवलं कि ती व्यक्ती आपण जिथे लपलोय त्याचं खोलीत येतेय त्यामुळे तो देखील खुर्चीमागे अंग चोरून बसला. त्या व्यक्तीने खोलीत प्रवेश केला आणि खोलीच्या कोपऱ्यात जाऊन तिथे हातातल्या फावड्याने तिथे खोदू लागला. खाड खाडss फावड्याचा आवाज खोलीभर घुमला. 

खुर्चीमागून रॉबिनने त्या फावडा मारणाऱ्या व्यक्तीकडे पहिले, ती व्यक्ती पाठमोरी उभी असल्याने तिला मागचे काहीच दिसणे शक्य न्हवते तसेही बंगल्यात अंधारच होता. दबक्या पावलाने पुढे जात रॉबिनने अचानकच मागून त्या व्यक्तीवर उडी घेतली तसं त्या व्यक्तीला मागे वळायचा अवसरही न देता रॉबिनने त्या व्यक्तीच्या मुसक्या आवळल्या. इ. इनामदार सुद्धा आता त्या खोलीत आले, मगाशी केशवने केलेल्या इशाऱ्यासरशीच ते सावध होऊन बसले होते आणि ती व्यक्ती रॉबिन ज्या खोलीत लपलेला होता तिथे गेल्यावर हळूच मागून आत आले होते. ती व्यक्ती रॉबिनच्या तावडीतून सुटण्यासाठी धडपड करत होती पण रॉबिनच्या ताकदीपुढे त्या व्यक्तीचा पाड लागला नाही. 

इ. इनामदारांच्या पाठोपाठ तिथे केशव सुद्धा विद्युत गतीने खिडकीमार्गे आतमधे आला होता. इनामदारांनी आपल्याजवळील बेड्या काढून त्या व्यक्तीच्या हाताला मागे अडकवल्या आणि त्याला सरळ उभं केलं. रॉबिन त्या व्यक्तीच्या समोर उभं राहून तिजकडे पाहत उभा राहिला. ती व्यक्ती घाबरत धडपडतच उभी राहिली अंगावर सभोवती एक काळ वस्त्र त्या व्यक्तीने गुंडाळल होतं, तिच्या चेहऱ्यावर अर्धवट कापड लावल्याने ती व्यक्ती कोण आहे हे कळून येत न्हवत. पाठोपाठ हरिभाऊदेखील आतल्या खोलीत येऊन दाखल झाले, इनामदार साहेब त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील कापड दूर केलं आणि जवळच्या छोट्या टॉर्चने त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर प्रकाशाचा झोत मारला, तसं त्या व्यक्तीने चेहरा लपवण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण केशवने त्या व्यक्तीला मागून घट्ट धरून ठेवलं. केशवच्या पकडीपुढे त्या व्यक्तीला हलतही येईना.

जसा टॉर्चने टाकलेल्या प्रकाशाच्या झोतात त्या व्यक्तीचा चेहरा दिसला तसे हरिभाऊ उद्गारले

” अनमोल तू ...”

विस्फारलेल्या नेत्रांनी केशव आणि इनामदार सुद्धा अनमोलकडे पाहत उभे होते. शेंडेसाहेबांकडे त्यांच्या पतपेढीवर क्लार्क म्हणून काम करणारा अनमोल एवढ्या रात्री फावड घेऊन अनमोल बंगल्यात काय करतोय हे हरिभाऊंना कळेना. म्हणजेच रंगा आणि बाळू यांना पैसे देऊन बंगल्यात भुताची भीती दाखवायला लावणारा अनमोल होता कि काय?

“ अनमोल..तू इथे काय करतोय ..” हरिभाऊ अजूनही विश्वास न बसल्यासारखे अनमोलकडे पाहत बोलले.

पण अनमोल काहीही न बोलता फक्त धीरगंभीर चेहऱ्याने सगळ्यांकडे पाहत होता, हरिभाऊ सोडून त्याला अंधारात कोणाचा आवाज ओळखता आला नाही आणि कोणी नीट दिसलं सुद्धा नाही.

“ काय मग अनमोल उर्फ सनी धोत्रे .... फावडा घेऊन इथे काय शोधत होतात, सांगायचे कष्ट घ्याल का? “ स्मितहास्य करत रॉबिन अनमोलकडे पाहत बोलला.

आपल्या खऱ्या नावाचा केलेला उल्लेख ऐकून अनमोल चांगलाच दचकला, तसचं हरिभाऊ आणि इनामदार सुद्धा बुचकळ्यात पडले. अनमोलचा रॉबिनने केलेला सनी धोत्रे असा उल्लेख ऐकून कोणालाच काहीही कळेना, तथापि रात्र बरीच झाल्याने रॉबिनने अनमोलला घेऊन पोलीस स्टेशनवर घेऊन जाण्यास इनामदारांना सांगितलं. पुढची चौकशी त्याची तिथेच करावी असं ठरलं. रॉबिनने हरिभाऊंना शेंडे साहेबांना घेऊन तडक पोलीस स्टेशनवरच यायला सांगितलं आणि स्वतः केशवसोबत इनामदारांना घेऊन पुढे निघाला.

पोलीस स्टेशनवर आल्यावर इनामदारांनी रॉबिनने अनमोलचा उल्लेख सनी धोत्रे असा का केला म्हणून विचारलं. त्यावर हसून रॉबिनने शेंडे साहेब आले कि सगळ्या समक्षच अनमोल उर्फ सनी धोत्रे आपल्याला काय ते सांगेल असं सांगितलं. काहीवेळातच शेंडे साहेब हरिभाऊंसोबत स्टेशनवर दाखल झाले त्यांची मुद्रा पूर्णपणे बुचकळ्यात पडलेली होती, पोलीस स्टेशनवर यायची त्यांची तिळमात्र इच्छा नसताना रॉबिनच्या सांगण्यानुसार ते इथे आले होते.

“ या या शेंडे साहेब बसा...” जवळच्याच खुर्चीकडे निर्देश करत रॉबिन म्हणाला.

“ रॉबिन हे इथे पोलीस स्टेशनवर का बसलोत आपण ..अर्थात हरिभाऊ बोलेले रात्री बंगल्यावर काय काय घडलं“ शेंडे अस्वस्थ होत म्हणाले.

शेंडेनी रॉबिनला अगोदरच पोलिसांचा हस्तक्षेप नको म्हणून सांगितलेलं असताना देखील रॉबिनने पोलिसांना का प्रकरणात ओढलं हे त्यांना समजेना.

“ तुमची अस्वस्थता कळतेय मला शेंडे साहेब पण इथे आपल्याला सापडलेला मनुष्य भयंकर बदमाष आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे याची तुम्हाला कल्पना नसेल, म्हणून पोलिसांना मध्ये घेणें भाग वाटले आणि तसंही त्यांच्या मदतीशिवाय मला अनमोल हा खरा कोण आहे हे समजलं देखील नसतं” रॉबिन म्हणाला.

रॉबिनकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहण्याशिवाय त्यांना दुसरं काहीही सुचेना. हरिभाऊसुद्धा शेंडेच्या मागे तशाच अवस्थेत उभे होते,

 रॉबिन पुढे म्हणाला” शेंडे साहेब हा अनमोल तुमच्याकडे किती दिवसापासून कामावर आहे”

“ झाले असतील सात आठ महिने” शेंडे बोलले.

“ तुमच्याशी त्याची भेट कशी झाली” रॉबिनने प्रश्न केला.

“ एकदा माझाकडे तो काम मागण्यासाठी आला होता, मला मोठा मेहनती वाटला तो म्हणून ठेवून घेतला कामावर” शेंडेनी उत्तर दिलं.

“ शेंडे साहेब मला सांगायला अत्यंत खेद होतोय कि अनमोल या नावाने सनी धोत्रे या नावाचा इसम तुमचाकडे गेले सात आठ महिने नाव बदलून नोकरीला होता, तसचं त्याने रंगा आणि बाळू या दोन चोरांना पैसे देऊन तुमच्या बंगल्यावर रात्री अपरात्री आरडा ओरडा करून तिथे भूत असल्याचा बनाव करायला सांगितलं होतं, जेणेकरून तुम्ही घाबरून जावे आणि बंगला भुताटकीचा आहे सगळ्यांना कळावे” रॉबिन हाताची बोटे एकमेकांत गुंफून शेंडेकडे पाहत म्हणाला.

रॉबिनच्या या वाक्यावर शेंडेना काय बोलावे ते कळेना. इतके दिवस आपल्याकडे काम करणारा मेहनती माणूस हा अट्टल चोर होता हे ऐकून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

“ रॉबिन पण तो असं का करत होता” शेंडे घाबरत म्हणाले.

“ शेंडे साहेब त्याला तुमच्या बंगल्यात खास रस आहे तो तुमचा बंगला विकत घेण्यासाठी न्हवे तर त्याचं काहीतरी गुपित त्या बंगल्यात दडलं आहे, लोकांनी या बंगल्याच्या जवळ येऊ नये म्हणून त्याने बंगल्यात रंगा आणि बाळूनामक भुते सोडली, आणि तो बंगला भुताटकीचा साबित करून तो त्या बंगल्यात काहीतरी शोधायला येत असे. एवढचं न्हवे तर तुम्हाला सुद्धा त्या बंगल्याच्या जवळ न येऊ देणारा, तुमच्या राहत्या घरात सुद्धा भिंतीवर रक्ताने मजकूर लिहिणारा आणि वस्तूंची फेकाफेक करणारा हाच आहे अशी मला खात्री आहे” रॉबिन म्हणाला.

“ पण बंगल्यात नक्की तो काय शोधत होता” हरिभाऊ कपाळावर आठ्या आणत म्हणाले.

“ मला काहीसा अंदाज आहे, पण आधी त्यालाच याची उत्तरं विचारुयात“ असं म्हणत रॉबिन खुर्चीवरून उठला.

अनमोल उर्फ सनी धोत्रेला एका चौकशीच्या खोलीत आणले गेले, इनामदार आणि रॉबिन त्याची चौकशी करण्यासाठी खोलीत गेले, शेंडे साहेब, हरिभाऊ आणि केशव बाहेरूनच त्यांचं संभाषण ऐकू लागले.

“ बोल मग अनमोल उर्फ सनी, तू त्या बंगल्यात काय शोधत होतास” समोरच्या खुर्चीवर बसत रॉबिन म्हणाला.

रॉबिनच्या या वाक्यावर अनमोलने एकवार रॉबिनला व्यवस्थित न्याहाळल, आणि हसत तो पुढे म्हणाला

“ गुप्तहेर रॉबिन, मला आधी समजलंच नाही कि तू या गावात भूतबंगल्याच्या तपासासाठी आला आहेस, कारण तुझा नाव मी बरंच ऐकून होतो मात्र तुझा चेहरा कधी पहिला न्हवता. शेंडे साहेबांच्या घरात आपली भेट झाल्यावर मला वाटलं कि तू हरिभाऊंच्या सोबत कामाला आलायस, पण मानलं तुला इतके दिवस मी नाव बदलून इथे राहत होतो हे कोणालाच समजलं नाही तू मात्र मला ओळखलंस” तीक्ष्ण नजर रोखत अनमोल म्हणाला.

“ बंगल्यात काय शोधात होतास” रॉबिनने परत आपला प्रश्न अनमोलला विचारला.

“ काही नाही असंच सहज आलो होतो” छद्मी मुद्रा करत अनमोल म्हणाला.

अनमोल उर्फ सनी धोत्रे हा एक अट्टल गुन्हेगार असल्याने आपल्याला तो काही सहजासहजी सांगणार नाही हे रॉबिनला कळून चुकलं त्यामुळे त्याने वेगळ्या प्रकारची खेळी करायचं ठरवलं.

“ हे बघ अनमोल तू जे काही शोधत होतास ते मी स्वतः खोदून काढेन आणि मला ते मिळेल सुद्धा. पण तू जर बऱ्या बोलाने सत्य सांगितलं नाहीस तर लोकांमध्ये दहशत निर्माण करणे, शेंडेच्या घरात चोऱ्या करण्याचा प्रयत्न करणे किंवा खुनाचा प्रयत्न असे अनेक गुन्हे लावून ते साबित करून तुला कमीतकमी जन्मठेप होईल इतकी शिक्षा कशी होत नाही याकडे मी स्वतः जातीने लक्ष देईन. तसचं तुझा आधीच्या गुन्हेगारीच्या कारनाम्यांमुळे न्यायाधीश महोदयांनासुद्धा याची खात्री पटेल. इनामदार याची फाईल जरा आणता का इकडे” रॉबिन कडक आवाजात म्हणाला.

रॉबिनच्या या वक्तव्यावर अनमोल जरासा घाबरला. रॉबिनला गुन्हेगारीच्या कलमांची इत्यंभूत माहिती असून तो आपल्याला कोणत्याही गुन्ह्यात लीलया अडकवू शकतो आणि ते सुद्धा जन्मठेपेपर्यंत असं वाटून घाबरून अनमोलने सगळं सांगण्याचं कबुल केलं त्याला आयुष्यभर तुरुंगात राहायचे न्हवते. तरीही रॉबिनने त्याकडे दुर्लक्ष केलं. इतक्यात इनामदार साहेब अनमोल उर्फ सनी धोत्रे ची फाईल घेऊन आले.

“ तर हा तुझा सगळा गुन्हेगारीचा रेकोर्ड आहे, नाव सनी धोत्रे, वय ३३, गुन्हेगारीचं स्वरूप – घरफोडी, लुटमारी, दरोडे आणि सध्या गावात राहून अजून काही गुन्हे केलेसच त्यात तू शेंडे साहेबांच्या खुनाचा प्रयत्न सुद्धा केलास हे इथे नमूद करायला हवं, मागे केलेल्या एका मोठ्या दरोड्याखाली तुला अटक झालेली असता तुरुंगातून तू पळून बाहेर आलायस. आणि हो.. हा फोटो पहा इनामदार साहेब या फोटोच्या मिशा आणि तुरळक दाढी जर काढली तर तर हा फोटो मधला इसम सनी धोत्रे म्हणजेच अनमोल आहे हे सिद्ध व्हायला किती वेळ लागेल.” रॉबिन इनामदारांकडे डोळे मिचकावत पटापट बोलला. 

इनामदारांनी फोटो निरखून पाहिलं आणि म्हणाले” हो रॉबिन, या फोटोला जशा मिशा आहेत तशा जर या अनमोलला लावल्या तर सनी धोत्रे हाच आहे अशी खात्री पटतेय, मिशा आल्यावरच याला न्यायालयात हजर करू आणि हो शेंडे साहेबांकडून मी जबाब घेतो त्यांच्या खुनाचा प्रयत्न पण केला ना याने”

इनामदार आणि रॉबिन याचं संभाषण ऐकून अनमोल उर्फ सनी धोत्रेची तर चांगलीच पाचावर धारण बसली. 

“ थांबा थांबा..मी कोणाचाही खुनाचा प्रयत्न केलाल नाहीये, उगाचच मला मी न केलेल्या गुन्ह्यात अडकवू नका..मी सांगतो सगळा सांगतो”  अनमोल काकुळतीला येत म्हणाला.

आपली मात्र चांगलीच लागू पडली हे पाहून रॉबिन मनोमन हसू लागला. पण तरीही चेहरा शक्य तितका गंभीर करत तो म्हणाला ” बर बाबा पटकन काय ते खरं खरं सांग” 

“ हो.. हो सांगतो.. असं म्हणून अनमोलने सांगायला सुरुवात केली –

“ सुमारे वर्षभरापूर्वी मी शहरात एका मोठ्या असामीच्या घरात करोडो रुपयांवर डल्ला मारलेला होता, इतकी मोठी लुट मी आजपर्यंत केलेली न्हवती. हि सगळी लुट घेऊन ती खर्च करत आरामात आयुष्य काढायचं असा माझा विचार होता. त्या असामीच्या घरातून मी सोने चांदी तसेच रोख रक्कम घेऊन पळून गेलो होतो पण ते करत असताना पोलिसांना या गोष्टीचा सुगावा माझ्या मागे पोलीस लागले होते, मी जीवाच्या आकांताने शहराच्या मार्गाने या गावाकडे येणाऱ्या मार्गावर पळून जाऊ लागलो. पोलिसांचा ससेमिरा मागे लागलेला होता आणि हातात करोडोंचा ऐवज अशा परिस्थितीत मी शेंडेच्या आत्ताच्या बंगला असलेल्या जागेवर आलो पण तेव्हा तिथे कोणताही बंगला न्हवता. फक्त मोकळी जागा होती आणि दगडी कंपाऊंड तसचं बाजूला एक मोडक शेड होतं, आजूबाजूला शेते होती. पोलिसांना चकवण्यासाठी मी एक युक्ती केली हातातला ऐवज मी बाजूच्या शेडमधील पडलेल्या अवजारांच्या सहाय्याने एके ठिकाणी मोकळ्या जागेत पुरून ठेवला आणि खुणेसाठी एक मोठ्ठा दगड तिथे ठेवला. पोलिसांना सापडला गेलोच तर मुद्देमालासह सापडला जाऊ नये अशी माझी योजना होती आणि नंतर कधीतरी इथे गुपचूप येऊन इथला माल खणून काढावा असं मी ठरवलं आणि बाजूच्या शेतांमध्ये लपून बसलो पण खराब नशिबाने मी पोलिसांच्या हाती लागलो. त्या असामीच्या घरात दरोडा टाकल्याच्या कारणावरून मला तुरुंगात जावं लागलं, पण तिथे गेल्यावर सुद्धा मला मला चोरलेला ऐवज सुरक्षित असेल कि नाही याची चिंता लागून राहिली कारण त्या ऐवजाच्या बळावर मी माझं उर्वरित आयुष्य आरामात घालणार होतो. मी तुरुंगात राहून इथून बाहेर कसं पळून जावं याचा विचार करू लागलो. तुरुंगात राहून बरेच महिने गेले एकदा संधी साधून मी तुरुंगातून पळालो आणि रात्री या गावात जिथे मी चोरलेला ऐवज लपवलेला होता तिथे येऊन पोचलो, समोर बघतो तर एक भव्य बंगला तिथे दिसला, तसेच बांधकामचे अवशेष दिसतं होते, कोणीतरी हि जागा विकत घेऊन इथे बंगला बांधत होतं. मी पळून जाताना खुणेसाठी दगड कुठे ठेवला होता तोही लक्षात येईना, त्यामुळे मला कळेना कि मी तो ऐवज नक्की कोणत्या जागी पुरून ठेवला आहे, तो कोणाच्या हाती तर लागला नसेल ना? हा विचार येताच माझ्या मनात भीतीचा संचार झाला. ज्याला कोणालाही इथे ऐवज मिळाला असेल त्याच्या घशात हात घालून मी तो बाहेर काढायचं ठरवलं होतं.

मी गावातच राहून कामगाराच्या वेशात फिरून तो बंगला कोणाचा आहे, तिथे अन्य काही सापडलं का याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला, तो बंगला शेंडे साहेबांचा असून तो त्यांनी नुकताच मेहता नावाच्या माणसाकडून तो विकत घेतल्याची गोष्ट कळली. मेहता यांनी कशा प्रकारे तो बंगला शेंडेना विकला याची माहिती देखील काढली पण बंगल्याच्या आवारात पुरलेला ऐवज शेंडेच्या हाती लागला नसेल ना असं वाटून मी शेंडेकडे नोकरी मागण्यासाठी गेलो. सोंगे घेण्यात उस्ताद असल्याने आणि थोडंफार शिक्षण झाल्याने माझी वर्णी त्यांच्या पतपेढीवर लागली, मी कष्टाळू आणि इमानदारपणे त्यांच्याकडे काम केले, हेतू एकच कि बंगल्याच्या आसपास मी पुरलेला करोडोंचा ऐवज त्यांच्या हाती लागला आहे कि तो अजूनही तिथेच आहे हे शोधणे. शेंडेच्या घरात राहून मला त्यांना तो ऐवज अजून मिळाला नसल्याचं लक्षात आलं आणि एक निराळाच आनंद मला झाला. बंगला बांधण्याच काम पूर्ण व्हायच्या आत मला तिथला ऐवज शोधून काढून इथून पळ काढायचा होता. पण सततच्या बांधकामामुळे बंगल्याच्या आवारात कामगारांची गर्दी असायची अशात मला तो पुरलेला ऐवज शोधणे शक्य न्हवते. मग मी एक वेगळीच योजना आखली.

मेहतांची मुलगी अवनी हि त्या बंगल्यात जळून मेल्याचं माझ्या कानावर आलेलं होतं याचा फायदा घायचं मी ठरवलं. रंगा आणि बाळू या दोन चोरांना मी गुपचूपपणे जाऊन भेटलो आणि त्यांना पैशाचं लालूच दाखवून रात्री अपरात्री तिथे जाऊन जोरजोरात किंकाळ्या मारण्याचं काम सोपवलं, जेणेकरून तो बंगला भुताने झपाटला आहे असं लोकांना वाटावं. बंगल्यात भुते आहेत अशी अफवा पसरवायला मीच सुरुवात केली. त्यात शेंडेना देखील भुते खरी आहे हे भासवण्याकरिता त्यांच्या घरात रात्री गुपचूपपणे शिरून भिंतीवर जनावरांच्या रक्ताने “मी आले आहे” असा मजकुर लिहिला. नंतर दुसऱ्या एका खोलीतील किल्ल्या मिळवून तिथे सामानांची नासधूस केली आणि चोरीचा बनाव केला. एकदा भुताच्या भीतीने लोक बंगल्याकडे फिरकेनासे झाले कि मग मध्यरात्री तिथे जाऊन आपण पुरलेला ऐवज शोधायचं मी ठरवलं. आधी बरेच दिवस मला ती जागा सापडेना कारण मला आत्ता नेमकं आठवत न्हवत कि रात्रीच्या अंधारात मी तो ऐवज कुठे पुरला होता. मग मी बंगल्याच्या आतमधे सुद्धा खोदकामाला सुरुवात केली. रंगा आणि बाळूच्या मदतीने आधीच वरवरची जमीन भुसभुशीत करून घेतली होती. भुतांच्या अफवेचा जोर चांगलाच पसरलेला होता. बंगला बळकावण्याच्या उद्देशाने बरेच दलाल प्रयत्न करू लागले, त्यात मिस शीला हिने तर एका बाईला तिथे भूत बनून रात्रीचं उभं राहायला सांगितलं हे मला समजलं हे तर माझा पथ्यावरच पडलं आणि लोक आता इथे बंगल्याच्या आसपास देखील यायला कचरू लागले, पण तरीही दलालांच्या दबावाला बळी न पडता शेंडेनी तो बंगला कोणाला विकू नये आणि माझ्या शोधकार्यात अडथळा येऊ नये, म्हणून मी शेंडेना विनवलं कि एवढी महाग मालमत्ता कवडीमोल भावात विकू नका. आपली काळजी वाटुन अनमोलने आपल्याला हा सल्ला दिला असं वाटून शेंडेनी सुद्धा बंगला कोणाला विकायचा नाही हे ठरवलं आणि मग माझं काम बिनधोक झालं. शेंडेनी बंगला कोणी विकू नये तसेच बंगल्याच्या आसपास देखील कोणी फिरकू नये असं मला वाटत होतं. बंगल्यात सगळ्या ठिकाणी जागा खणल्यावर मला अपयश आलं.

 आता फक्त आतली हॉलवजा मोठी खोली खोदायची राहिली होती ऐवज नक्की त्याचं ठिकाणी पुरला असणार असं वाटून मी तिथे खोदायला चालू केलं होतं. नंतर काही दिवसांनी रंगा आणि बाळू पकडले गेल्याचं समजलं मग मात्र मी कामाला वेग घेतला आणि आतल्या मोठ्या खोलीतच खाली तो ऐवज आहे हे मला समजलं होतं. त्यानुसार काल मी तो ऐवज घेण्यासाठीच तिथे गेल्यावर पकडला गेलो.    

हि सगळी कहाणी सांगून अनमोल गप्प बसला. 

त्याच्या या बोलण्यावर काहीही न बोलता रॉबिनने इ. इनामदारांना इशारा केला. इनामदारांनी लगेचच मागच्या खोलीतून रंगा आणि बाळूला रॉबिनपुढे आणले. अनमोलची चौकशी करायच्या आधीच रॉबिनने रंगा आणि बाळूला बाजूच्या खोलीत अनमोलचा आवाज ऐकू येईल अशा खोलीत उभं राहायला सांगितलं होतं.

“ या सनी धोत्रेची कहाणी जी आत्ता तुम्ही मागे उभी राहून ऐकली, त्यावरून त्याचा आवाज कसा आहे हे तुम्हाला समजलंच असेल, तर तुम्हाला बंगल्यात आरडाओरडा करण्यासाठी पैसे देणारा मनुष्यसुद्धा हाच होता का?” रॉबिनने रंगा आणि बाळूला प्रश्न विचारला.

“ होय साहेब, हाच आवाज होता त्या माणसाचा ज्याने आम्हाला पैसे दिले होते” रंगाने पुष्टी दिली. 

चौकशी उरकून रॉबिन आणि इनामदार चौकशी खोलीतून बाहेर आले.

“शेंडे साहेब तुमचं टेंशन आता गेलं असेलं, बंगल्यात कोणती भुते होती हे तुम्हाला समजलंच असेल आता” बाजूच्या खुर्चीवर बसत रॉबिन हसत म्हणाला.

“ खरंच रॉबिन एका मोठ्या तणावातून तुम्ही मला बाहेर काढलंत यासाठी मी तुमचा शतशः ऋणी राहीन” शेंडे साहेब हात जोडतच म्हणाले.

“ खरंच रॉबिन, मला तुझा नेहमीप्रमाणे आजही अभिमान वाटतो. तुला इथे बोलावण्याचा निर्णय अगदीच सार्थ झाला” हरिभाऊ अभिमानाने रॉबिनकडे पाहत म्हणाले.

“ पण रॉबिन अनमोल उर्फ सनीने लपवलेला तो ऐवज चोरीचा असून आपल्याला तो संबंधित मालकाला सुपूर्त करावा लागेल” इनामदार काळजीयुक्त स्वरात म्हणाले.

“ काळजी करू नका मी ज्या खोलीत लपून अनमोल वर झडप घातली होती, त्या मोठ्या खोलीच्या एका कोपऱ्यातच जिथे अनमोल खणत होता तिथे आणखी खाली खणले असता तो ऐवज तुम्हाला सापडेल. तो तुम्ही संबंधित व्यक्तीला सुपूर्त करा” रॉबिन खुर्चीवर रेलत म्हणाला.

‘ रॉबिन त्या बंगल्यात भुते नाहीत हि गोष्ट तुला आधीपासूनच माहित होती ना?” इ. इनामदारांनी विचारलं.

“ हो, म्हणजे जेव्हा मी प्रथम शेंडेसाहेबांच्या बंगल्यावर हरिभाऊंच्या सोबत पाहणीसाठी गेलो असता तिथे भिंतीवर लिहिलेला मजकुर आणि सामानाची फेकाफेक हा प्रकार कोणत्या तरी माणसाचाच आहे हे मला पक्क माहित होतं, थोडीफार पाहणी केल्यावर शेंडेंच्या घराच्या मागच्या बाजूनेच कोणीतरी आतमधे येऊन तो प्रकार केला असणार असा तर्क मी लावला, तसं मी हरिभाऊंना देखील सांगितलं होतं आणि आत्ताच सनी धोत्रेने सुद्धा ते मान्य केलं आहे. तसचं बंगल्यात पाहणीसाठी गेल्यावरसुद्धा तिथे पडलेले ढिगारे आणि जागोजागी पडलेले खड्डे इथे कोणीतरी काहीतरी अमूल्य गोष्ट शोधत असल्याचीच साक्ष देत होते” रॉबिन म्हणाला.

“ आज रात्रीमध्येच तो अनमोल उर्फ सनी धोत्रे बंगल्यावर येणार याची तुला खात्री कशी काय बऱ होती शिवाय त्याचं नाव सनी धोत्रे आहे हे तू कसं काय ओळखलंस?” इनामदारांनी पुन्हा प्रश्न केला.

“ रंगा आणि बाळूला पकडल्यावर माझी खात्रीच झाली कि त्यांना कोणीतरी गुन्हेगारी जगताशी संबंध ठेवणाऱ्या माणसानेच पैसे देऊन भूताटकीचे कृत्य करायला लावलं आहे, मिस शीला हिने फक्त बंगला स्वस्तात मिळावा या उद्देशानेच तमाशात काम करणाऱ्या बाईला तिथे बंगल्यात रात्री उभं राहायला लावलं होतं. तुम्ही जेव्हा तमाशाच्या फडातील बाईला शोधायला गेला होतात तेव्हा मी मागच्या वर्षभरातील सगळ्या गुन्हेगारी घटनांचे आणि त्यातील सामील आरोपींचे रेकॉर्ड व फोटो पाहत इथे पोलीसस्टेशनवर बसलो होतो, त्यात मला वर्षभरापूर्वी एका दरोड्यातील आरोपात असणारा एक गुन्हेगार दिसला ज्याचं नाव सनी धोत्रे होतं, सोबत जोडलेल्या फोटोमध्ये पाहिल्यावर तो माणूस आपण नक्की कुठेतरी पहिला असल्याची जाणीव झाली, नंतर आठवलं कि शेंडेंच्या पतपेढीवर काम करणाऱ्या अनमोलशी या फोटोचं साम्य जुळतंय, अनमोलला आत्ता दाढी मिश्या असत्या तर तो असाच दिसला असता असं मला वाटलं. म्हणजेच रंगा आणि बाळूला पैसे देणारा आणि रात्री अपरात्री बंगल्यात येऊन खोदकाम करणारा अनमोलच असला पाहजे हे मला वाटू लागलं. रंगा आणि बाळू पकडले गेले आहेत म्हटल्यावर सनी धोत्रे शक्य तितक्या लगबगीने बंगल्यात येऊन त्याला हवी असलेली वस्तू शोधायला येणार हे उघडंच होतं” रॉबिन म्हणाला.

“ तुझ्या योजनेनुसार तो आला सुद्धा आणि अलगद आपल्या जाळ्यात सापडला सुद्धा” इनामदार खुषीत येऊन म्हणाले.

यावर रॉबिन फक्त हसला.

“ चला हरिभाऊ, आता मला खूप भूक लागली आहे. घरी जाऊन मस्तपैकी जेवण करून ताणून देऊयात” रॉबिन शरीराला आळोखे पिळोखे देत खुर्चीवरून उठत म्हणाला. 

“ हो चला.. मला सुद्धा बंगल्याच्या बांधकामाच काम लवकरात लवकर पूर्ण केले पाहजे आणि ते सुद्धा इतर कोणती नवीन भुते बंगल्यात उच्छाद मांडण्याच्या आत” शेंडे साहेब हसत म्हणाले.  

शेंडे साहेबांच्या या वाक्यावर मात्र रॉबिन, हरिभाऊ मोठ्याने हसले आणि त्यांच्या या हास्यात केशवसह इन्स्पेक्टर इनामदार सुद्धा सामील झाले.  


समाप्त


८ एप्रिल, २०२५

गुप्तहेर रॉबिन आणि भूतबंगल्याचे रहस्य - भाग ६

 सकाळ झाल्या झाल्या हरिभाऊंनी पोलिसांना कळवलं कि दोन चोर रात्री बंगल्यात गुपचूप शिरून आरडाओरडा करून लोकांना घाबरवण्याचे चाळे करताना पकडले गेलेत. त्यानुसार सकाळीच पोलिसांनी आपल्या गाडीतून रंगा आणि बाळू या दोन्ही चोरांना पकडून नेले. तरीही ते दोघे पकडले गेले आहेत याची गुप्तता बाळगण्याबद्दल रॉबिनने पोलिसांना सूचित केले होते.

रात्री झोप न झाल्याने रॉबिन केशवच्या खोपटातच झोपी गेला. हरिभाऊ मात्र घराकडे निघून गेले होते. दुपारी केशव रॉबिनसाठी जेवण घेऊन खोपटात आला तेव्हा रॉबिन नुकताच उठला होता.

“ गुप्तहेर साहेब तुमच्यासाठी जेवण आणले आहे” केशव हसत म्हणाला.

“ गुप्तहेर म्हणू नकोस, नुसतंच रॉबिन म्हण मित्रा” अंग झटकत तोंड धुण्यासाठी उठत रॉबिन म्हणाला.

रॉबिन हा एक गुप्तहेर आहे हे केशवने कालच ओळखलं होतं. केशव हा शहरात चांगला शिकलेला युवक होता. तिथे असताना महाविद्यालयातील लायब्ररीमधे वर्तमानपत्रात गुंतागुंतीची प्रकरणे सोडवणाऱ्या रॉबिनचा फोटो त्याने एक दोनदा पाहिल्याचं त्याला आठवत होतं, पण रॉबिनला प्रत्यक्ष कधी भेटण्याचा योग आला न्हवता. काल रात्री शेतात हरिभाऊंनी रॉबिनची ओळख मित्राचा मुलगा अशी करून दिलेली असतानाच त्याला शंका आली होती पण अंधारात्त त्याला नीट समजलं न्हवत. रंगा आणि बाळूला खोपटात नेऊन चौकशी करताना केशवला रॉबिनचा चेहरा व्यवस्थित दिसला आणि त्याने बरोबर ओळखलं कि हा गुप्तहेर रॉबिनच आहे. रॉबिनला आणि हरिभाऊंना या गोष्टीचं आश्चर्य वाटलं होतं. नंतर केशवला शेंडेंना भेटून रॉबिनने या प्रकरणाचा कसा तपास चालू केला याची माहिती कळली होती.

“ बऱ ठीक आहे, पण मला सांगा आता रंगा आणि बाळू तर पकडले गेले आहेत, पण त्यांना हे कृत्य करायला कोणी सांगितले हे कसे समजणार “ केशवने बेडवर बसत विचारले.

“आपल्याला ते सुद्धा समजेल पण फक्त रंगा आणि बाळू हे दोघेच नाही तर त्या बंगल्यात रात्री केस मोकळे सोडून एक बाई सुद्धा वावरायची” रॉबिन म्हणाला.

“ अरे हो ..काही लोकांना एक दोनदा त्या बाईचं दर्शन झाल्याचं गावातील लोकं सांगत होते” केशव विचार करत म्हणाला.

“ पण मला समजलंय कि ती बाई आपल्याला कुठे मिळू शकेल” रॉबिन पाण्याने तोंड धूत म्हणाला.

“ काय सांगता .. कुठे आहे मग ती” केशवने अजीजीने विचारलं.

“ समजेल लवकरच..आधी मस्त जेवण करून घेतो.. बर मला सांग शेतात रात्रीचे पाणी देत असताना तुला कधी भुताटकीचे अनुभव नाही का आले? म्हणजे तुझं शेत हे बंगल्याच्या मागच्या शेंडेंच्या शेतांच्या मागेच आहे” रॉबिन मांडी घालत जमिनीवर बसत म्हणाला. 

“ कधीतरी ऐकू यायचे पण मी जास्त लक्ष दिलं नाही तसंही बंगला माझा शेतापासून लांब असल्याने तिथे जाऊन बघण्याचा योग कधी आला नाही कि इच्छा सुद्धा झाली नाही, तसंही घरच्यांनी आधीच सांगून ठेवलं होतं कि तिथे जायचं नाही म्हणून” केशव म्हणाला.

“ तुझा भूताखेतांवर विश्वास आहे का?” रॉबिन म्हणाला.

“ नाही ..मी असल्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही. हा पण रात्री शेतात जंगली जनावर उच्छाद घालत असायचे, बऱ्याचदा सकाळी वीज नसायची त्यामुळे रात्री पाणी देण्यासाठी शेतावर जावं लागायचं ते देऊन झालं कि मी काही वेळ शेताची निगराणी करायचो” केशवने माहिती दिली.

“ कमाल करतोस तू .. बंगल्यातून चित्रविचित्र किंकाळ्याचे आवाज येत असताना तू एकदा जरी बंगल्यात जाऊन पाहून आला असतास तर एव्हाना रंगा आणि बाळू पोलीस कोठडीत असते” रॉबिन घास चावत म्हणाला.

“ हो तसं झालं सुद्धा असत, पण माझा लक्षात आला नाही ते कधी आणि शेतात कामं असल्याने असा विचार कधी आलाच नाही, तसंही या भागात रस्त्यावर विजेची सोय नाहीये म्हणून रात्रीचं काहीही दिसत नाही म्हणून कोणी फिरकत देखील नाही” केशव म्हणाला. 

केशवने आणलेले जेवण रॉबिनने संपवले आणि हात धुवून जवळच्या रुमालाने पुसत तो बेडवर बसला. 

“ काय वाटत तुम्हाला कोण असेल ज्याने रंगा, बाळूला आणि त्या बाईला असं बंगल्यावर तरी जाऊन भुताटकीचा प्रकार करायला सांगितला असेल” केशवच्या चेहऱ्यावर कुतूहल होतं.

“ ती व्यक्ती जी कोणी असेल तिला शेंडे साहेबांच्या बंगल्यात खूप रस आहे एवढ मात्र नक्की. आता ती व्यक्ती लवकरच आपल्याला सापडायला हरकत नाही” रॉबिन दात टोकरत म्हणाला. 

“ खरंच तुम्ही खूप छान काम करता, शहरात शिकताना मी तुमच्या गुन्हेगारीच्या सोडवलेल्या प्रकरणांचे किस्से ऐकलेले होते, ते ऐकून खूप भारी वाटायचं. गुप्तहेर होण्याएवढी अक्कल नाहीये मला पण पोलीस दलात सामील व्हायची इच्छा व्हायची.” केशव स्मितहास्य करत म्हणाला.

“ तशी तुझी इच्छा असल तर तू जरूर प्रयत्न करावास, तुला नक्की त्यामध्ये यश येईल असं मला वाटत” रॉबिन केशवला प्रोत्साहन देत त्याच्या पाठीवर थाप मारत म्हणाला.

बंगल्यात रात्रीच्या वेळी चित्र विचित्र आवाज काढणाऱ्या दोन अट्टल चोरांना रॉबिन आणि केशवने मुसक्या बांधून पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं पण इतक्यात हि गोष्ट कोणाच्या कानावर जाऊ देऊ नका अशी सूचना रॉबिनने हरिभाऊ, केशव आणि पोलिसांना सुद्धा दिली होती कारण रंगा आणि बाळू यांना हे काम करायला लावणारा माणूस या बातमीने सावध होऊ शकतो असं रॉबिनचं मत होतं. 

काही वेळ तिथे केशवसोबत गप्पा मारून रॉबिन तडक पोलीस स्टेशनला जायला निघाला होता. केशवने सुद्धा सोबत येण्याबाबत आग्रह केला होता. रॉबिन इथे आहे तोपर्यंत रॉबिनची सोबत करायची केशवची इच्छा होती, यावर रॉबिनने देखील नकार दिला नाही आणि मग ते दोघे लागलीच पोलीसस्टेशनवर आले.

पोलीस स्टेशनवर इन्स्पेक्टर इनामदार आपल्या टेबलवर समोरची फाईल बघत बसले होते. सकाळीच त्यांनी रंगा आणि बाळूची फाईल काढून त्यामध्ये त्या दोघांनी अजून काही गुन्हे केलेलं आहेत का हे पाहत बसले होते. रंगा आणि बाळू हे फक्त भुरटे चोरच होते, चोऱ्यामाऱ्या, घरफोडी आणि लुटालूट सारखे गुन्हे त्यांनी केलेले होते, त्यासाठी जेलची हवा देखील त्यांनी खाल्लेली होती.

फाईल बघत असतानाच त्यांच्या केबिनमध्ये एका हवालदाराने रॉबिन आल्याची माहिती पुरवली. इ. इनामदारांनी लगेचच रॉबिनला आतमधे सोडण्यास सांगितलं. इनामदारांनी या आधी कधीही रॉबिनसोबत काम केलेलं न्हवत पण रॉबिनच्या तपास केलेल्या बऱ्याच प्रकरणांची त्यांना पोलीसखात्यात असल्याने माहिती होती. शेंडेच्या भूतबंगला प्रकरणात रॉबिनने कशाप्रकारे ओळख लपवून तपास केला याची माहिती त्यांना समजली होती.

“ नमस्कार इन्स्पेक्टर साहेब, काय म्हणतायत रंगा आणि बाळू?” केबिनमध्ये प्रवेश करत रॉबिन म्हणाला.

मागोमाग केशव सुद्धा आलेला होता, इ. इनामदारांनी रॉबिनला आणि केशवला बसण्यास सांगितलं.

“ आमच्या दोन हवालदारांनी रंगा आणि बाळूची चांगलीच खातिरदारी केलीय. गावाच्या बाहेर एका पडक्या जागेवर त्यांना कोणीतरी भेटायला बोलावलं होतं कोणीतरी पैसे देऊन हे काम करायला सांगितलं, त्याचा चेहरा कसा आहे हे त्यांना माहिती नाही एवढचं ते सांगतायत. बंगला सोडून ईतर कुठेही ते गेले नाहीत असं ते म्हणतायत” इनामदार म्हणाले.

“ अजून काही लपवत नाहीयेत ना ते इन्स्पेक्टर साहेब” रॉबिनने विचारलं.

“ शक्यच नाही.. अहो आमचे ते दोन हवालदार भल्याभल्या गुन्हेगारांना पोपटासारखं बोलायला भाग पाडतात आणि त्यांच्यापुढे हे भुरटे चोर काहीच नाहीत” इ. इनामदार म्हणाले.

“ ह्म्म्म ... म्हणजे कोणीतरी असं होतं, ज्याला आपली ओळख लपवायची होती. मुख्य म्हणजे शेंडेंच्या गावातील घरात रंगा आणि बाळू गेले नाहीत तर, बर मला सांगा मिस शिलांची चौकशी केलीत का तुम्ही?” रॉबिनने विचारल.

“ त्यांना ठाण्यावर बोलावलंय, येतीलच इतक्यात. पण रंगा आणि बाळूला ज्याप्रकारे तुम्ही सापळा लाऊन पकडलंत खरंच मनापासून कौतुक करावसं वाटतं तुमचं” इ. इनामदार म्हणाले.

“ खरंतर मी काहीच केलं नाही, या केशवने रंगा आणि बाळूला काठीचा चांगला प्रसाद देऊन आसमान दाखवलं होतं. त्याला या कामाचं सरकारकडून बक्षीस नक्कीच मिळायला हवं” केशवकडे पाहत रॉबिन कौतुकाने म्हणाला.

“ हो हो ..का नाही.. अशा तरुण आणि तडफदार युवकांचीच समाजाला गरज आहे. यांचा सरकारतर्फे उचित सन्मान केला जाईल” स्मितहास्य करत इनामदार बोलले.

“ बर.. बंगल्यावर जाऊन रात्री लोकांना घाबरवण्यात फक्त रंगा आणि बाळूचाच हात न्हवता, तिथे एक बाई पण याच कामासाठी यायची, केस मोकळे सोडून अंगावर कापड पांघरून बंगल्याच्या खिडकीत उभं राहून लोकांना घाबरवायची. रंगा आणि बाळूला याबाबत कल्पना नसणार कारण तिला कोणीतरी दुसऱ्याच व्यक्तीने  हि कामगिरी सोपविली होती” रॉबिन म्हणाला. 

“ ओह्ह म्हणजे तुमचं म्हणण असं आहे कि रंगा आणि बाळूला कोणीतरी दुसऱ्याच व्यक्तीने तिथे बंगल्यावर पाठवलं होतं आणी त्या बाईला कोणीतरी तिसऱ्या व्यक्तीने.” आश्चर्याने इ. इनामदार म्हणाले.

“ हो असंच म्हणावं लागेल.. तुमचं तपासाचं तुम्हाला एके ठिकाणी पाठवावा लागेल तिथे तुम्हाला ती बाई सापडेल” रॉबिन म्हणाला.

“ काय सांगता कुठे..” इनामदार आश्चर्याने म्हणाले.

“ शेजारच्या गावात एक तमाशाचा फड आला आहे, त्या फडात काम करणाऱ्या कोणत्यातरी बाईने बंगल्यावर रात्री येऊन भुतासारख फिरून लोकांना घाबरवलं आहे” रॉबिन म्हणाला.

“ हे कशावरून म्हणता तुम्ही” इनामदार म्हणाले.

“ मी बंगल्यात तपासणीसाठी गेलेलो असताना मला एका खोलीत कापडाच बोचकं आढळलं त्यात बरीच मोठी कापडं होती, सोनेरी कडा असलेले, रेशमी वस्त्र तंबू ठोकण्यासाठी लागतात त्या कापडात ती गुंडाळलेली होती आणि त्यांना एक मंद सुवासाचा स्प्रे मारल्यासारखा गंध येत होता. अशा प्रकारची कापडे हि फक्त सर्कसमधे काम करणारी माणसे किंवा तमाशातील लोकं यांना लागतात. मला गावात चौकशी करत असतानाच तमाशाच्या फडाबद्दल समजलं होतं. म्हणून मला राहून राहून असं वाटत होता कि कोणीतरी तमाशाच्या फडात काम करणारी व्यक्ती या बंगल्यात ये जा करते.” रॉबिन म्हणाला.

 रॉबिन बोलत असतानाच बाहेरून एक हवालदार केबिनमध्ये आला आणि त्याने मिस शिला पोलीस स्टेशनमधे आल्याची बातमी इ. इनामदार यांना दिली.

स्टेशनमध्ये चौकशीच्या करण्याच्या खोलीत मिस शीला बसलेली होती. पोलिसांनी बोलावलं हे समजल्यावर ती मनातून चांगलीच हादरलेली होती पण चेहऱ्यावर तसं दाखवत न्हवती. चौकशी खोलीत इ. इनामदार, एक महिला पोलीस आणि रॉबिन आत आले. रॉबिनला पाहतच मिस शिलांना आठवलं कि या माणसाला आपण कुठेतरी पाहिलं आहे. काही क्षणातच मिस शिलांना आठवलं कि शेंडेसाहेबांच्या घरात रॉबिनला आपण पाहिलं होतं. बापरे म्हणजे हा माणूस पोलीस होता तर. म्हणजे शेंडेनी आपली तक्रार पोलीस स्टेशनमध्ये केली आहे का ? असं वाटून मिस शिलांना चांगलाच घाम फुटला. इनामदार साहेबांनी मिस शिलांची जुजबी चौकशी केली, मिस शीलाने मला इथे का बोलावण्यात आलं आहे असं विचारल्यानंतर नंतर रॉबिनने चौकशीची धुरा हातात घेतली.

“ मिस शीला शेंडेंच्या बंगल्यात तुम्हाला जास्तच रस आहे.. असं का ? रॉबिनने मिस शिलांच्या चेहऱ्यावरचे हावभाव टिपत विचारलं.

“ मी ..मी एक प्रॉपर्टी एजन्ट आहे. मी स्वस्तात मिळणाऱ्या प्रॉपर्टी विकत घेत असते, त्यात शेंडेंच्या बंगल्यात भूतांचा वावर असल्याचं समजलं आणि मग मी त्या बंगल्यात रस घेऊ लागले.” चेहऱ्यावर भीती न दाखवता शीला म्हणाली. 

“ भूत असलेली प्रॉपर्टी विकत घेता म्हणजे धाडसी आहात तुम्ही आणि अशी प्रॉपर्टी तुमच्याकडून घेणार कोण? रॉबिनने प्रश्न केला.

“ शहरात अनेक लोक असतात त्यांना अशा भाकडकथांमध्ये रस नसतो, ती लोकं अशा मालमत्ता विकत घेऊन त्यांचा व्यवसाय त्या ठिकाणी उभारतात.” शीलाने उत्तर दिलं.

“ तुमचा विश्वास आहे का भूतांवर?” रॉबिन नजर रोखत म्हणाला.

या प्रश्नावर शीला काहीच बोलली नाही. तिला आता जरा भीती वाटू लागली होती. रॉबिन पुढे म्हणाला. 

“ पोलिसांना अशी माहिती मिळाली आहे कि भुतांच्या नावाखाली त्या बंगल्यावर रात्री एक महिला केस मोकळे सोडून साडी पसरून, अंगावर कापड गुंडाळून फिरत असते आणी तसं करायला तिला कोणत्या तरी व्यक्तीने सांगितलं आहे आणि तुमचा सुद्धा त्या बंगल्यात रस आहे म्हटल्यावर तुम्हाला बोलावून जरा चौकशी करावीशी वाटली” रॉबिन गंभीर आवाजात म्हणाला.

“ पण इथे माझा काय संबंध आहे.. तुम्हाला माझावर संशय आहे का? कोणत्या पुराव्यावरून तुम्ही असं बोलताय “ उसनं अवसान आणून शीला बोलत होती पण रॉबिनला कळून चुकलं होती कि मिस शीला पुरती घाबरली आहे. तिला अजून घाबरवून तिच्याकडून सत्य वदवून घेण्यासाठी रॉबिन पुढे म्हणाला

 “ ती बाई बंगल्यावर केस मोकळे सोडून फिरत असताना पकडली गेलीय आणि तिने पोलिसांना सांगितलंय कि कोणी तिला असं करायला कोणी सांगितलं होत, तुम्हाला या प्रकरणाबाबत काही माहिती असल्यास आत्ताच इथे सांगा, आम्ही तुम्हाला मदत करू कारण उद्या जर काही वेगळी माहिती हातात आली तर बंगल्यावर भुतांच्या नावाखाली लोकांना त्रास दिल्याबद्दल त्या बाईला आणि तिला तसं करायला सांगणाऱ्या व्यक्तीला दीर्घकाळ तुरुंगाची हवा खाऊ लागू शकते, वर बदनामी होईल ती वेगळीच” रॉबिनने स्पष्ट शब्दात सांगितलं. 

रॉबिनच्या वाक्याने मिस शीला चांगलीच घाबरली आणि ओळखलं कि आता आपली काही धडगत नाही. तिने तत्काळ कबुली दिली कि शेंडेच्या बंगल्यात चित्रविचित्र आवाज काढण्याचे आणि ओरडण्याचे आवाज रात्री अपरात्री यायचे अशी अफवा पसरली होती, तेव्हा या अफवेचा फायदा घेऊन तिने एका बाईला पैसे देऊन रात्रीचं बंगल्यावर रात्री केस मोकळे सोडून खिडकीच्या भागात उभं राहायला सांगितलं होतं. जेणे करून रस्त्यावरच्या येणाऱ्या जाणाऱ्यांना ती बाई दिसावी आणि बंगल्यात भूत आहे हि अफवा अजूनच मजबूत व्हावी. स्वस्तात प्रॉपर्टी मिळवण्याच्या उद्देशाने तिने तसं केलं होतं. मला शिक्षा देऊ नका मी बाकी काही केलं नाहीये अशी गयावया तिने केली. 

“ बंगल्यात रात्रीच्या वेळी अजून दोन लोकंसुद्धा येत असायचे रात्रीच्या अंधारात किंकाळ्या मारत फिरायचे, त्यांना सुद्धा तुम्हीच असं करायला सांगितलं होतं का?” इनामदार कडक आवाजात म्हणाले.

“ न नाही नाही... मला इतर कोणाबद्दल काही माहिती नाहीये, शेंडेच्या बंगल्यात आधीच तसे आवाज यायचे याचा फक्त मी फायदा उचलला एवढचं आहे. उलट मी ज्या बाईला पैसे देऊन रात्रीचं तिथे उभं राहायला सांगायचे तिलासुद्धा असं जाणवलं होतं कि बंगल्यात तिच्याशिवाय दुसरं कोणीतरी येतंय. रात्री तिथे फिरताना जागोजागी खड्डे पडलेले दिसायचे. तिने मला तसं सांगितलं देखील आणि खरंच इथे भूतांचा वावर आहे का असं वाटून घाबरून तिने नंतर हे काम करायला नकार दिला” 

“ म्हणूनच काल संध्याकाळी तिथे जाऊन बंगल्याबाहेर उभं राहून प्रत्यक्ष जाऊन भुते आहेत कि नाही हे पाहून आलात का”. काल रात्री बंगल्यावर पाळत ठेवताना रॉबिनला मिस शीला बंगल्याकडे पाहत उभी असलेली दिसली त्यावरून रॉबिनने तर्क लावत विचारलं

“ अ..हो ..” असं बोलून शीला गप्प बसली. 

आपण काल संध्याकाळी तिथे गेल्याचं पोलिसांना माहित असल्यानं आता काही लपवण्यात अर्थ नाही असं वाटून शीलाने सगळं खरं सांगितलं कि बंगल्यात भूतें असल्याच्या अफवेचा फायदा घेऊन तमाशात हलकी सलकी काम करणाऱ्या एका बाईला पकडून पैशाचं आमिष दाखवून बंगल्यात फिरायला सांगितलं. म्हणून मग रॉबिन आणि इनामदारांनी मिस शिलाला अजून काही विचारलं नाही.

चौकशीच्या खोलीमधून आता रॉबिन आणि इ. इनामदार बाहेर आले. 

“ तुमचा तर्क बरोबर ठरला रॉबिन, तमाशात काम करणाऱ्या बाईनेच रात्री खिडकीत उभं राहून लोकांना घाबरवलं आहे तेही मिस शीला यांच्या सांगण्यावरून. पण एक लक्षात येत नाहीये ज्या कोणी व्यक्तीने रंगा आणि बाळू यांना बंगल्यावर रात्री अपरात्री किंकाळ्या मारायला पाठवले असावे तो कोण असावा, त्या बंगल्यात अजून कोणाचा रस असावा. कि अजून कोणीतरी प्रॉपर्टी एजन्ट यामधे सामील आहे?” इनामदार न समजून बोलले.

“ नाही.. ती व्यक्ती कोणी प्रॉपर्टी एजन्ट नाहीये, मात्र बंगला विकत घेण्यात त्या व्यक्तीचा रस नाहीये. उलट कोणीही हा बंगला विकत घेऊ नये किंवा तिथे राहायला येऊ नये म्हणून त्या व्यक्तीने हा प्लॅन रचला आहे. रंगा आणि बाळूसारख्या बदमाष लोकांशी बोलून त्यांना पैसे देऊन हे काम करण्या इतपत ती व्यक्ती मुरलेली आहे. रंगा आणी बाळू यांनी त्या व्यक्तीच्या सांगण्यानुसार बंगल्यात राहून भूतांची कामगिरी चोख बजावली ” रॉबिनने माहिती पुरवली.

“ बर मग आता ती व्यक्ती कोण आहे, ती कशी सापडणार आपल्याला” इनामदार विचार करत म्हणाले. 

“ ती व्यक्ती स्वतःहून चालत आपल्या जाळ्यात येणार आहे इनामदार साहेब, आपल्याला फक्त जाळ फेकून शांत बसायचं आहे” रॉबिन हलकंस हसत म्हणाला.

इनामदारांनी लगेचच एक पोलीस पथक पाठवून तमाशाच्या फडात काम करणाऱ्या त्या बाईला पकडून आणायला सांगितलं. रॉबिन तोपर्यंत पोलीस स्टेशनमधेच थांबून राहिला आणि त्याने केशवला गावात जायला सांगितलं. गावात जाऊन सगळीकडे भूतबंगल्यावर धुमाकूळ घालत असलेली भुते पकडली गेलीत अर्थात चोर पकडले गेलेत अशी बातमी सगळीकडे पसरवायला सांगितली. याकामात हरिभाऊंची मदत घेण्यास देखील सांगितले. 

तोपर्यंत पोलीसस्टेशनमध्ये बसून रॉबिन शहराच्या आसपासच्या सगळ्या गुन्हेगारी प्रकरणांचे रेकॉर्ड चाळत बसला. त्यात त्याचा निम्मा दिवस गेला. इनामदारांच्या पथकाने तमाशातील बाईला पकडून आणले होते, रॉबिनने तिची चांगलीच चौकशी केली, आधीच घाबरलेल्या तिने आपली चूक मान्य केली. रॉबिनने तिला अन्य कोणाला तिने बंगल्यात रात्री अपरात्री फिरताना पहिले का हे विचारलं, त्यावर तिने सांगितलं कि ती फक्त संध्याकाळी तासभर तिथे थांबायची ते सुद्धा लोकं रस्त्यावर दिसल्यावर त्यांना घाबरवण्यासाठीच. नंतर जास्त अंधार पडल्यावर ती तिथून मागच्या बाजूने निघून जायची. पण तेवढा वेळ बंगल्यात असताना तिला जाणवायचं कि ती सोडून इतर कोणीतरी सुद्धा इथे वावरत असतं. कारण भिंतींवर चरे पडलेले दिसायचे, काही खोल्यांमध्ये आणि मधल्या जाण्यायेण्याच्या भागात खड्डे पडलेले दिसायचे.

रॉबिनने तिचं सगळं म्हणण ऐकून घेतलं आणि एवढ ऐकूनच तिला जास्त काही प्रश्न विचारले नाहीत आणि परत आपल्या गुन्हेगारी रेकोर्डच्या फायली चाळत बसला.

संध्याकाळी केशव आणि हरिभाऊ पोलीस स्टेशनवर आले. तेव्हा रॉबिन एका टेबलाच्या जवळ बसून कोऱ्या कागदावर काहीतरी लिहित बसलेला दिसला.

“ रॉबिन तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळ्या आसपासच्या गावात सांगितलं, आपल्या गावात सुद्धा हि बातमी पसरली आहे, कि बंगल्यावर भुतांच्या नावाने गोंधळ घालणाऱ्या चोरांना पोलिसांनी पकडले आहे” केशव उत्साहात म्हणाला.

“ हो.. शेंडे साहेब तर अगदीच खुश झालेत. म्हणाले कि रॉबिनमुळे आपल्या मागची पीडा गेली” हरिभाऊ बोलले. त्याचं बोलणं चालू असतानाच इ. इनामदार तिथे आले आणी टेबलजवळ बसलेल्या रॉबिनला म्हणाले.

“ बऱ रॉबिन आता पुढे काय” 

“ बंगल्यातील चोरांना पकडल्याच्या बातम्या गावात वाऱ्यासारख्या पसरल्या असतील, त्यामुळे ज्याने कोणी रंगा आणि बाळूला हे काम दिलं असेल तो माणूस नक्कीच आज रात्री बंगल्यात येणार आहे” रॉबिन खुर्चीवरून उठत म्हणाला.

“ काय..बंगल्यात तो माणूस येणार आहे. पण तो का आणि कशाकरिता येईल” इनामदार गोंधळून म्हणाले.

“ कारण ज्या कामासाठी त्याने रंगा आणि बाळूला ठेवले होते ते करायला आता तिथे कोणीही नाहीये आणि बंगला सुद्धा भयमुक्त झालाय, त्यामुळे उद्यापासून गावातील लोकसुद्धा त्या बंगल्याच्या आसपास यायला घाबरणार नाहीत. कदाचित शेंडे सुद्धा आपलं बंगल्याचं उर्वरित काम तिथे सुरु करतील. म्हणून ज्या कोणाचा त्या बंगल्यात रस आहे किंवा ज्याला असं वाटतं होतं कि कोणीही बंगल्याच्या आसपास फिरकू नये तो व्यक्ती गडबडीने बंगल्यात येईल. “ रॉबिन म्हणाला.

“ पण मला अजूनही समजत नाहीये कि बंगल्यात त्या व्यक्तीचा एवढा रस का आहे, काय हवय नक्की त्या व्यक्तीला “ इनामदार म्हणाले.

“ ते आपल्याला आज रात्रीचं कळणार आहे, कारण आज रात्री आपण सगळे त्या व्यक्तीची वाट पाहत बंगल्यात दबा धरून बसणार आहोत, आणि ती व्यक्ती आली कि लगेच तिला तिथे जेरबंद करूयात, मग ती व्यक्तीचं काय ते उत्तर देईल आपल्या प्रश्नांची” हसत रॉबिन म्हणाला.

“ पण नक्की ती व्यक्ती येईल का “ हरिभाऊ साशंकतेने बोलले

“ नक्की येणार ..कारण आज नाही तर पुन्हा कधीच अशी संधी त्या व्यक्तीला मिळणार नाहीये. म्हणूनच आज आपण सगळे बंगल्याच्या आसपास दबा धरून बसणार आहोत, आज आपल्या हातातून ती व्यक्ती निसटणार नाहीच” रॉबिन म्हणाला.

रॉबिनच्या उद्गारासरशी इ. इनामदार, केशव आणि हरिभाऊ उत्साहाने तिथून बाहेर पडले.


क्रमशः


"द हार्टफुलनेस वे"

"द हार्टफुलनेस वे" या सुरेख पुस्तकाचा लाभ सगळ्यांनी करावा एवढं सुंदर पुस्तकं आहे ते, कमलेश डी. पटेल (दाजी) हे या पुस्तकाचे लेखक आध...