1.रटाळ दिवस
आढ्याला
करकर आवाज करत फिरणाऱ्या पंख्याकडे पाहत आपल्या दोन्हीही तंगड्या टेबलावर ठेवून सत्यवीर
आपल्या खुर्चीमध्ये रेलून बसला होता. दोन्ही हात डोक्यामागे बांधून शून्यात पाहत
असल्याप्रमाणे तो वर फिरणाऱ्या पंख्याकडे मलूलपणे पाहत होता. त्याच्या समोरच्या
टेबलावर टेलीफोन, चहाचा कळकट
कप आणि सिगरेटची काही थोटके सत्यवीरप्रमाणेच मलूल पडलेली होती. तसं पाहायला गेलं
तर या छोट्याशा घरात सत्यवीर एकटाच राहत होता. मागे झोपायची एक खोली होती. तिथे एक
बेड, कपाट, त्याला चिटकुनच न्हाणीघर,
पुढे हॉलमध्ये एक टेबल आणि २ खुर्च्या तसेच काही लोखंडी पेट्या एवढाच काय तो ऐवज
होता. सत्यवीर हा पेशाने एक गुप्तहेर होता. शहरातील बरीच किचकट आणि पोलिसांच्या
डोक्याला ताण किंबहुना ताप देणारी गुन्हेगारी प्रकरणे सत्यवीरने त्याच्या
बुद्धीकौशल्याने सोडवलेली होती. शहरातील पोलीस सत्यवीरला खूप मानत असत. असं जरी
असलं तरी मागच्या काही दिवसापासून या हुशार गुप्तहेरावर माशा मारायची वेळ आलेली
होती. बरेच दिवस एकही प्रकरण सत्यवीरकडे आलेलं न्हवत. त्यामुळेच दिवसभर पंख्याची
होणारी घरघर पाहत दिवस काढायची त्याच्यावर वेळ आलेली होती आणि त्याला त्या
गोष्टीचा उबग आलेला होता. नाही म्हणायला काही दिवसांपूर्वी एका माणसाने सत्यवीरला
फोन करून आपली पत्नी अचानक गायब झालीय तिचा शोध घेऊ शकाल काय? अस विचारलं होतं. असलं क्षुल्लक प्रकरण आपण हाताळत नाही तुम्ही पोलिसात
तक्रार करा असं म्हणून सत्यवीर फोन ठेवणारच होता पण बरेच दिवस कोणतंच प्रकरण
हाताशी नसल्याने आणि कामाशिवाय नुसतंच बसून कंटाळल्याने, डोक्याला काहीतरी चालना
मिळावी या उद्देशाने सत्यवीरने त्या माणसाला नाईलाजास्तव होकार दिलेला होता.
त्यानुसार दुसऱ्याच दिवशी मस्तपैकी जॅकेट, बूट आणि इतर
आवश्यक गोष्टी घेऊन सत्यवीर त्या माणसाला भेटायला जायला निघालाच होता. एवढ्यात
त्या माणसाचा फोन आला आणि त्याने सांगितल कि त्याची पत्नी परत घरी आलीय. नवरा बायकोमध्ये
भांडण झाल्यामुळे त्याची पत्नी रुसून तिच्या मैत्रिणीकडे आपल्या नवऱ्याला न सांगता
राहायला गेली होती. पण आत्ता मी माघारी आलीय. तिचा रुसवा पण गेलाय आणि आत्ताच तिला
मी चहा पण टाकायला सांगितलाय. तेव्हा तुम्ही आता तिला शोधायला जायची तसदी घेऊ नका.
त्याने असं सांगताच काहीही नं बोलता चिडून सत्यवीरने फोन ठेवला होता.
शीट.. या
बायका अशा कशा न सांगता गायब होतात आणि होतात त्या होतात वर अचानक माघारी घरी पण
येतात. सत्यवीर चिडून मनातच म्हणाला होता.
बऱ्याच
दिवसांनी एक क्षुल्लक का होईना काम हाती आलेलं होतं आणि ते पण असं निसटून गेलं.
क्षुल्लक का होईना वेळ घालवायला उपयुक्त असलेलं प्रकरण हातचं गेल्याने त्याची
चिडचिड झालेली होती. आज त्याला परत तो प्रसंग आठवला आणि उगाचच तो स्वतःवर चिडला.
त्याने रागातच हाताची मुठ टेबलावर आपटली. काही वेळाने त्याने पटकन वरच्या खिशात
ठेवलेल्या सिगारेटच्या पाकिटातून एक सिगारेट काढली.
ती
सिगारेट तो पेटवणारच होता तेवढ्यात त्याला कसलीतरी आठवण झाली आणि तो खुर्चीवरून
उठला. दाराजवळ जात त्याने समोरच्या घरात कामाला असलेल्या कामवाल्या पोराला हाक
मारली. समोर कामाला असलेला तो पोरगा सत्यवीरच्या दारात आला न आला तोच सत्यवीरने
त्याला कोपऱ्यावरच्या चहाच्या टपरीवरून एक चहा आणायला सांगितला. तो पोरगा आला तसा
शांतपणे निघून गेला. काही वेळातच कामवाल्या पोराने चहा आणला आणि सत्यवीरच्या
पुढ्यात टेबलावर ठेवला. चहा आल्यानंतर सत्यवीरने सिगरेट पेटवली, सिगरेटचे काही झुरके आणि चहाचे दोन
घोट घेतल्यानंतर त्याला जरा बऱ वाटलं. शांतपणे तो आपल्या खुर्चीत बसलेला होता.
इन्स्पेक्टर देशमुखांना फोन लावून काही जबरदस्त गुन्हेगारी प्रकरण आलेलं आहे का?
असं पुढ्यात असलेल्या फोनकडे पाहून त्याच्या मनात विचार आला. पण
नंतर त्याने तो विचार मनात आला तसा झटकला. कारण सारखी सारखी अश्या प्रकारची चौकशी
करून त्याला कंटाळा आलेला होता. कारण इन्स्पेक्टर देशमुख फोनवर त्याला एकच उत्तर
देत होते कि “सत्यवीर सध्यातरी तुझं बुद्धिकौशल्य पणाला
लावायची गरज असलेलं एकही प्रकरण आलेलं नाहीये आणि आलंच तर नक्कीच आम्ही तुला
बोलावू”.
पोलीस
खात्यातील इन्स्पेक्टर देशमुख आणि सत्यवीर यांचं खूप चांगलं जमायचं. बऱ्याचश्या
क्लिष्ट गुन्हेगारी प्रकरणात इन्स्पेक्टर देशमुखांना सत्यवीरने मदत केलेली होती.
शहरातील सोन्याच्या दुकानांमधील रात्री पडणारे दरोडे म्हणा वा शहरातील प्रसिद्ध
उद्योगपतींचा त्यांच्याच कार्यालयात झालेला मृत्यू म्हणा. बऱ्याच गुन्हेगारी घटना
जिथे पोलिसांची मती सुद्धा कुंठीत झालेली होती तिथे सत्यवीरने आपल्या असामान्य
बुद्धीमतेच्या जोरावर त्या प्रकरणांचा उलगडा केलेला होता. काही वेळा खाजगी
प्रकरणात देखील लोक सत्यवीरला बोलावत असतं - एका जमीनदाराच्या घरात दिवसाढवळ्या
झालेली २२ तोळे सोन्याची चोरी जी घरातल्या त्यांच्याच मेहुण्याने केलेली होती. हे
पुराव्यानिशी सत्यवीरने सिद्ध केलं होतं आणि त्यावर खुश होऊन जमीनदाराने सत्यवीरला
त्यातले २ तोळे सोने बक्षीस म्हणून देऊ केले होते. त्या नंतर नलगेकर कुटुंबात
झालेल्या दुहेरी हत्याकांडाचे दोषीसुद्धा सत्यवीरमुळेच गजाआड गेले होते. त्यामुळेच
फक्त इन्स्पेक्टर देशमुखांचाच न्हवे तर संपूर्ण पोलीस खात्याचाच सत्यवीरच्या
बुद्धिमत्तेवर विश्वास होता. आत्ता सत्यवीर राहत असलेलं घरदेखील सत्यवीरला
देशमुखांच्या ओळखीमुळेच मिळालं होतं. एकंदरच काय तर दोघांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध
होते.
सत्यवीरच्या
पूर्वइतिहासाबद्दल बोलायचं झालं तर सत्यवीरला कोणताच आगापीछा न्हवता. सत्यवीर
अनाथालयात वाढलेला एक मुलगा नंतर तो ६ वर्षाचा झाला असताना एका मुल नसलेल्या
मध्यमवर्गीय ख्रिश्चन दाम्पत्याने सत्यवीरला दत्तक घेतलं. त्याला सत्यवीर हे नाव
देखील त्यांचीच दिलं. लहानपणापासूनच सत्यवीर हुशार आणि कुशाग्र बुद्धिमत्ता असलेला
मुलगा होता. सत्यवीरला बुद्धीकौश्ल्याचे खेळ खेळण्यात विशेष रस असायचा. त्याची
बुद्धिमत्ता पाहून त्याच्या मानलेल्या वडिलांनी त्याला बुद्धीबळ खेळायला शिकवलं
होतं काही दिवसातच त्या खेळात सत्यवीरने प्राविण्य मिळवले होते. विलक्षण
बुद्धिमत्ता असलेल्या सत्यवीरची त्या दाम्पत्याने खूप काळजी घेतली, त्याच्यावर माया केली. यशस्वीपणे त्याचं
शिक्षण पूर्ण केलं. सत्यवीरला विविध गोष्टी शिकण्याची आवड होती. कॉलेजला असतानाच सत्यवीरने
इंग्लिश, हिंदी, मराठी, तेलुगु, गुजराथी तसेच जर्मन आणि फ्रेंच या भाषा
अभ्यासल्या. काही कालावधीतच त्या भाषा तो अस्खलितपणे बोलायला आणि लिहायला शिकला. त्या
भाषांचे साहित्य वाचले. नाटक आणि अक्टिंगमध्येसुद्धा त्याला रस होता. बौध्दिक
गणिते आणि कोडी सोडवणे ह्या गोष्टी तर सत्यवीरच्या हातचा मळ होता. सत्यवीरच्या
मानलेल्या आई वडिलांना त्याचा खूप अभिमान होता. पण काळाच्या मनात काय होते काय माहित.
एका दुर्दैवी अपघातात त्या ख्रिश्चन दाम्पत्याचा मृत्यू झाला आणि सत्यवीर परत एकदा
पोरका झाला. त्या दाम्पत्याची मागे संपत्ती अशी काहीच न्हवतीच. नातेवाईक सुद्धा
न्हवते. जी होती न्हवती ती संपत्ती म्हणजे बँकेमधील काही रक्कम आणि राहतं घर विकून
त्यांची मिळालेली रक्कम सत्यवीरने अनाथालयात दान केली कारण आपल्या मानलेल्या
आईवडिलांच्या उर्वरित संपत्तीवर त्याला हक्क सांगायचा न्हवता म्हणूनच स्वतःच नशीब
आजमावायला एकटाच आयुष्याच्या मार्गावर चालायला त्याने सुरुवात केलेली होती.
असा हा
हुशार गुप्तहेर सत्यवीर दिवसेंदिवस कामाव्यतिरिक्त घरी बसून कंटाळलेला होता.
रात्रीनंतर दिवस उजाडला कि तो दिवस अक्षरशः खायला उठायचा. दिवस निरस पद्धतीने
चाललेले होते. आकाशातील उंच उडणारा पतंग दुसऱ्या पतंगाच्या मांजाने कापल्यानंतर
जसा तुटून भरकटत जमिनीकडे येऊ लागतो तशी काहीशी अवस्था सत्यवीरची झालेली होती आणि
तशा अवस्थेतच सत्यवीर आत्ता त्याच्या खुर्चीवर कलंडलेला होता. आज वेळ घालवायला काय
करावे? असा प्रश्न
त्याला भेडसावत होता. आज कोठेतरी बाहेर फेरफटका मारून
येउयात जेणेकरून आजचा दिवस अगदीच निरस जाणार नाही असा त्याचा विचार चाललेला होता.
संध्याकाळ उलटून गेली होती. सत्यवीर बाहेर जाण्याचा विचार करत बसलेला असतानाच
समोरच्या घरात काम करणारा तो पोरगा ज्याने मगाशी सत्यवीरला चहा आणून दिला होता सत्यवीरच्या
घरात हॉलमध्ये आला. सत्यवीर डोळे मिटून हात डोक्यामागे घेऊन शांतपणे खुर्चीवर
बसलेला असल्याचे पाहून तो पोरगा हळू आवाजात म्हणाला.
“दादा, हॉटेलमालक उधारी मागत होता.”
त्याच्या
आवाजासरशी सत्यवीरचे डोळे उघडले आणि हम्म असं आवाज काढून परत डोळे मिटून आपल्या
विचारात गढून गेला.
सत्यवीरचं
अस बेफिकीर वर्तन पाहून तो पोऱ्या जरा मोठ्याने म्हणाला.
“दादा, चहाची उधारी मागत होता तो, ती फेडल्याशिवाय परत चहा देणार नाही असं म्हणाला”. एवढ बोलून तो पोरगा सत्यवीरच्या
उत्तराची वाट पाहू लागला.
त्याचा
असा मोठ्या आवाजातला स्वर पाहून सत्यवीरने डोळे उघडले आणि चरफडतच तो म्हणाला “हो रे.. ऐकू आलं मला. देईन त्याची
उधारी... आधी काम येउदेत एखादं. साला इथे हाताशी काम नाहीये अजून आणि आले हे लोक
उधारी मागायला.” असं म्हणून सत्यवीर चरफडतच खुर्चीवरून उठला आणि
आतमधल्या खोलीत गेला.
“माझ्यावर का ओरडतोयस.. मी काय करू दादा....मला त्याने जे सांगितलय तेच मी
तुला सांगतोय” सत्यवीरसारखाच बेफिकिरीचा स्वर काढून तो पोऱ्या म्हणाला.
“हो हो.. कळले मला...” असं म्हणत मान डोलवत पाण्याने भरलेला ग्लास घेऊन सत्यवीर
बाहेर आला आणि ग्लासातील पाणी गटागटा संपवत ग्लास टेबलावर ठेवून सावकाशपणे
खुर्चीवर बसला.
तो पोरगा
सत्यवीरकडे पाहत तसाच उभा असलेला पाहू सत्यवीरने हातानेच “आता काय झालं” अशी खुण
केली.
तेव्हा
तो पोरगा म्हणाला “दादा... मला बुध्दीबळ
कधी शिकवणार आहेस तू?”
“शिकवीन लवकरच..” सत्यवीर खुर्चीवर जरा आरामात बसत म्हणाला.
“शिकवेन लवकरच.. मागचे काही दिवस एवढचं म्हणतोयस पण कधी शिकवणार आहेस” तो
पोरगा तोंडाचा चंबू करून सत्यवीरच्या अंगचटीला येऊन म्हणाला.
सत्यवीर
चेहऱ्यावर वेडेवाकडे भाव आणत आणि सुस्त चेहऱ्याने म्हणाला- “हे बघ सध्या दिवस खूप वाईट चाललेले
आहेत. हाताशी काम नाही आणि माझ्याजवळ जो बुद्धिबळाचा सेट आहे त्यामधील एक उंट,
दोन घोडे, दोन प्यादे त्यांचे सैन्य सोडून कोठेतरी फरार झालेले
आहेत. त्यामुळे तो उरलेला अर्धवट सेट काही कामाचा नाही. मला काम मिळालं कि पैसे
हाताशी येतील तेव्हा नवीन सेट आणून तुला त्या नवीन बुध्दीबळाच्या पटावर मला छान
शिकवता येईल.”
सत्यवीरच्या
बोलण्यावर नाराज होत पोरगा म्हणाला “म्हणजे अजून वेळ लागणार तुला...” असं म्हणून तो
पोऱ्या सत्यवीरला अजून काहीतरी म्हणणार
एवढ्यात..
टेबलावरचा टेलीफोन खणाणला. त्या टेलीफोनकडे पाहत कोणाचा फोन असेल असा विचार करतच सत्यवीरने
चपळाईने फोनचा रिसिवर उचलला.
“हॅलो सत्यवीर... समोरून आलेला चितपरिचित आवाज ऐकून सत्यवीर जरासा मनातून
सुखावला.
“हॅलो देशमुख बोला.. असं म्हणत स्मितहास्य करत सत्यवीरने समोर उभा असलेल्या
पोऱ्याला हातानेच खुण करून बाहेर जाण्यास सांगितले. कारण फोन इन्स्पेक्टर देशमुखांचा
असल्याने कामदेखील तितकंच महत्वाचं असणार होतं. त्याशिवाय देशमुख स्वताहून फोन
करणार नाहीत. हे ओळखून सत्यवीरने त्या पोराला बाहेर जाण्यास सांगितलं. सत्यवीरचा
इशारा पाहून ते पोर देखील मनातून काहीसं खट्टू होऊन काहीतरी पुटपुटत बाहेर निघून
गेलं. तो पोरगा जाताच सत्यवीरने लक्ष टेलीफोनवर केंद्रित केलं
“सत्यवीर वेळ आहे ना तुला आत्ता... म्हणजे कामात तर नाहीस ना?” इन्स्पेक्टर देशमुख फोनवर घाईघाईत म्हणाले.
“मस्त चेष्टा करताय तुम्ही देशमुख.. अहो सकाळपासून निवांतच आहे मी. किंबहुना
कित्येक दिवसांपासून निवांतपणाच चालू आहे...” सत्यवीर हसत
हसत म्हणाला.
पण सत्यवीरच्या
या उत्तरावर त्याला पुढे अजून काहीही न बोलू देता लगेचच देशमुख त्याला म्हणाले “मग ऐक आत्ता जसा आहेस तसाच सांगतोय
त्या पत्त्यावर लगेचच ये...”
देशमुखांची
बोलण्याची गडबड ऐकून सत्यवीरने कान टवकारले आणि त्यांनी सांगितलेला पत्ता लिहून
घेतला नंतर नक्की काय झालंय हे विचारले असता
“एक गुंतागुंतीच प्रकरण आहे, लवकर ये...” एवढच सांगून
इंस्पेक्टर देशमुखांनी फोन ठेवला.
फोन
ठेवून सत्यवीर विचारमग्न झाला. गुंतागुंतीच प्रकरण आहे एवढच सांगून देशमुख यांनी
फोन ठेवला असला तरी सत्यवीरचं कुतूहल जागृत झालेलं होतं. नक्की काय बऱ घडलं असेल?
विचार करतच त्याने बाहेर जायच्या तयारीला सुरुवात केली. अंगावर जॅकेट, खाली जीन्स, पायात
जाड बूट, जॅकेटच्या आतल्या खिशात महत्वाच्या नोंदी करण्यासाठी लागणारी डायरी आणि
छोटंसं पेन व्यवस्थित ठेवल्याची खात्री करून बऱ्याच दिवसांनी व्यवस्थित केसं
विंचरून तो निघण्यास तयार झाला.
घराबाहेर
पडल्यावर घराजवळ उभ्या केलेल्या आपल्या दुचाकीला त्याने किक मारली. काही वेळातच दुचाकीवरून
सत्यवीर देशमुखांनी दिलेल्या पत्त्यावर पोहोचला. समोर एक दुमजली इमारत होती. ती इमारत
कोणती आहे हे ओळखायला सत्यवीरला वेळ नाही लागला. ती इमारत शव विच्छेदन करण्याचं
ठिकाण होतं. कोणाचा संशयास्पदरित्या मृत्यू आढळून आल्यास विशेषतः खुनासारख्या
प्रकरणात ते शव इस्पितळातून या विभागात आणलं जायचं. इथेच शवविच्छेदन आणि इतर
रासायनिक चाचण्या पार पडायचा. तशा रासायनिक चाचण्या करणारी विशेष प्रयोगशाळा देखील
इथे होती. रात्रीचे ८ वाजले होते. सत्यवीरने आपली दुचाकी पार्किंगमध्ये लावली आणि
मुख्य दरवाजातून आत आला. रात्र झाल्यामुळे आणि कार्यालयीन कामकाज संपल्याने स्टाफ
जास्त जास्त असा न्हवताच. मुख्य दरवाजाच्या आतमध्ये जिन्यापाशी एक हवालदार सत्यवीरचीच
वाट होता. सत्यवीर आतमध्ये आल्याचं त्या हवालदाराने पाहिलं आणि आपल्यामागे येण्यास
त्याने खुणावले. सत्यवीर शांतपणे त्या हवालदाराच्या मागे चालू लागला. तो हवालदार
बाजूचा जिना चढून वर जाऊ लागला सत्यवीर देखील त्याच्यामागे जिना चढू लागला. वर
पोहोचल्यावर एक मोठा लांबरुंद व्हरांडा लागला तिथून पुढे तो हवालदार चालू लागला. त्यामागोमाग
सत्यवीर आजूबाजूचं निरीक्षण करत शांतपणे चालत होता. इथे इतर कोणीही कर्मचारी
न्हवते. आजूबाजूला काही खोल्या होत्या जिथून कसलेतरी विचित्र रासायनिक वास येत
होते. त्या खोल्यांजवळून जात ते दोघेही पुढे आले. काही वेळातच हवालदाराने सत्यवीरला
त्या व्हरंड्याच्या दुसऱ्या टोकाला एका खोलीपाशी आणले आणि ते दोघे त्या खोलीच्या
आतमध्ये गेले. आतमध्ये काही पावले टाकताच बाजूला त्यांना एका टेबलाजवळ खुर्चीत
इन्स्पेक्टर देशमुख बसलेले दिसले. वयाने ते सत्यवीर
पेक्षा काही वर्षांनी मोठे होते. चेहरा रुबाबदार आणि खांदे
रुंद, ओठांवर काळ्याभोर मिशा असून डोक्यावर पोलिसी टोपी होती. त्यांच्या बाजूला एक
हेड कॉन्स्टेबल चेहरा मक्ख करून जबरदस्तीने बांधल्यासारखा उभा होता. टेबलाच्या
दुसऱ्या बाजूला खुर्चीत एक पांढऱ्या रंगाच्या एप्रनमध्ये पुरुष डॉक्टर हाताच्या
मुठीवर हनुवटी ठेवून बसला होता. त्याच्या जवळ तशाच पांढऱ्या एप्रन मध्ये एक लेडी
डॉक्टर एप्रनच्या खिशात हात घालून उभी होती. बाजूला २-३ उभी कपाटे होती. त्या उभट
कपाटांचे कप्पे उघडून आतमध्ये काहीतरी शोधाशोध करत असलेला डॉक्टरांचा एक मदतनीस
होता. असा सगळा लवाजमा तिथे उपस्थित होता. सत्यवीर आणि हवालदार आतमध्ये येताच
सगळ्यांच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या.
“ये सत्यवीर
बसं... जवळच्या रिकाम्या खुर्चीकडे निर्देश करत इन्स्पेक्टर देशमुख म्हणाले.
“बसायचं राहूद्यात.
आधी त्या स्त्रीचा मृतदेह कुठेय तो दाखवा मला” सत्यवीर आजूबाजूला पाहत निर्विकार
चेह्याने म्हणाला.
सत्यवीरच्या
या वाक्याने उपस्थित सगळेजण चाटच पडले. समोर बसलेले डॉक्टर्स पण आश्चर्यवजा
कुतूहलाने त्याच्याकडे पाहत होते. कपाटाच्या कप्प्यांमध्ये शोधाशोध करणारा मदतनीस
सुद्धा काम सोडून तोंड वासून सत्यवीरकडे पाहू लागला. मक्ख चेहऱ्याच्या
कॉन्स्टेबलने मात्र तशाच मक्ख्पणे सत्यवीरकडे पाहिलं. काही क्षण असेच शांततेत
गेले.
“सत्यवीर तुला कसं कळल कि आम्ही तुला एका स्त्रीचा मृतदेह दाखवण्यासाठी
बोलावलं आहे. अर्थात या इमारतीमध्ये येतानाच तुला कळल असेल कि हि इमारत शवविच्छेदन
करण्याचं ठिकाण आहे. पण मृतदेह स्त्रीचाच आहे हे एवढं खात्रीपूर्वक कस कळलं तुला? अजून
कोणालाही या बाबत माहिती नाही कारण या डॉक्टरांच्या समक्षच या इमारतीमधून मी तुला
मगाशी फोन केला होता.” इन्स्पेक्टर देशमुख करत म्हणाले.
“एवढं काही विशेष नाही. फक्त काही तर्क लावले आणि ते तर्क बरोबर बसतायत का
हे पडताळत गेलो” सत्यवीरने शांतपणे इकडे तिकडे पाहत उत्तर दिलं.
“हो सत्यवीर तुझी काम करण्याची पध्दत मला माहित आहेच. पण तू हे तर्क कसे
लावलेस हे जाणून घेण्याची मला इच्छा आहे अर्थात डॉक्टर्सना सुद्धा असेलच.” देशमुख
समोरच्या डॉक्टर्स जोडीकडे पाहत म्हणाले. ते दोन्ही डॉक्टर्स अजूनही आश्चर्याने सत्यवीरकडे
पाहतच होते. त्यांचे चेहरे पाहून सत्यवीरला वाटलं कि यांना आपण हे तर्क कसे लावले
हे सांगितल्याशिवाय ते काही मृतदेह पाहू देणार नाहीत. म्हणून सत्यवीर म्हणाला
“ठीक आहे, सांगतो- मी जसा हवालदार साहेबांसोबत मुख्य दरवाज्यातून जिन्याने
वर आलो तसं पाहिलं कि आजूबाजूला कर्मचारी कोणीच दिसत न्हवते म्हणजे निश्चितपणे
त्यांचा ड्यूटीचा वेळ संपला असल्याने ते निघून गेले होते. व्हरंड्याच्या आजूबाजूला
प्रयोगशाळांच्या खोल्या ओलांडून पुढे आलं कि डावीकडे आतमध्ये एका बाजूला पुरुष
शवगृहांचे आणि उजवीकडे स्त्री शवगृहांचे कप्पे अशा पाट्या तिथे आहेत. समोर येताच
आपण इथे आहोत ती शव विच्छेदनाची खोली. या खोलीच्या दरवाजाबाहेर उजव्या भिंतीजवळ एक
स्ट्रेचर उभा आहे जो शव कप्प्यांमधून नेण्या आणण्यासाठी वापरला जातो. स्त्री शव
कप्प्यांच्या बाजूने शव आणून शव आत ठेवून तो स्ट्रेचर बरोबर खोलीबाहेर उजव्या
बाजूलाच ठेवला आहे ज्या बाजूला स्त्री शव कप्पे जवळ आहेत.”
सत्यवीरकडे
पाहत सगळेजण शांतपणे ऐकू लागले.
सत्यवीर
पुढे बोलू लागला – आतमध्ये
येताच मला पुरुष डॉक्टर्स सोबत एक लेडी डॉक्टर्स पण दिसली. ज्यातून मी असा अंदाज
बांधला कि स्त्रीच्या शवविच्छेदना साठी लेडी डॉक्टर सोबत असणे गरजेचे आहे त्यामुळे
इथे महिला डॉक्टर असावी. हवालदारासोबत जेव्हा खोलीत प्रवेश केला तेव्हा दरवाजाच्या
जवळ कचऱ्याची एक टोपली आहे ज्यात लांबच लांब केसांचे पुंजके दिसले. ते केस स्त्रीचे असावेत असं दिसतं. कारण एवढे मोठे
केसांचे पुंजके पुरुषांचे नसतात. अर्थात काही पुरुष असतात जे मोठे केस ठेवत असतात.
पण स्ट्रेचरची जागा आणि लेडी डॉक्टरची उपस्थिती या दोन गोष्टी शव हे
स्त्रीचं असण्याकडे निर्देश करत होत्या त्यामुळे केसांचे पुंजके स्त्रीचे
असण्याबाबत खात्री देता येते.
सत्यवीरच्या
स्पष्टीकरणाने डॉक्टर्ससकट सगळेच चकित झाले. सत्यवीरची काम करण्याची पद्धत पाहूनच सत्यवीर
खरच एक हुशार गुप्तहेर आहे अशी त्यांची खात्रीच पटली.
“तर आता मला त्या स्त्रीचं शव दाखवाल का ? माझ्या
अंदाजानुसार शवाच्या डोक्यामागे गळ्याच्या वरच्या भागात कुठेतरी तुम्ही शवाचे निरीक्षण
करत होतात कारण कचऱ्याच्या पेटीतील केसांचे मोठाले पुंजके पाहता नक्कीच एखादी जखम
किंवा घाव असण्याची शक्यात आहे ते व्यवस्थित पाहण्यासाठीच ते केसं तुम्ही कापले
असणार यात शंकाच नाही.” सत्यवीर अगदी शांतपणे म्हणाला.
काही
क्षण परत शांततेत गेले. कोणीही एक अक्षरही बोललं नाही.
“हॅलो मिस्टर सत्यवीर, पोलिसांकडून तुमचं नाव ऐकून
होते आज तुमच्या भेटीचा प्रत्यक्ष योग अशा प्रकारे आला याचा खरंच आनंद झाला”
एप्रन घातलेला डॉक्टर शांततेचा भंग करत खुर्चीतून उठला आणि त्याने सत्यवीरशी
हात मिळवला.
सत्यवीरने
देखील हसून हस्तांदोलन केलं.
त्या
डॉक्टरने आता जास्त वेळ न दवडता बाजूच्या लेडी डॉक्टरला सत्यवीरला घेऊन आतल्या
बाजूला जिथे शव होतं तिथे घेऊन जायला सांगितलं. त्याप्रमाणे ती लेडी डॉक्टर सत्यवीरसोबत
आत वळाली. तिच्या मागोमाग पुरुष डॉक्टर आणि देशमुख आतमध्ये जात असताना देशमुखांनी
त्या पुरुष डॉक्टरच्या दंडाला स्पर्श करून त्यांच्या कानाजवळ तोंड नेलं आणि म्हणले
“सांगितलं होतं नं मी कि एकवेळ आम्हा
पोलिसांच्या नजरेतून काही गोष्टी निसटतील पण सत्यवीरच्या नजरेतून गोष्टी निसटण
अवघड आहे. त्याच्या नजरेतून सावज एवढ्या सहजासहजी निसटत नाही”
देशमुखांच्या
या खुसपूसण्यावर तो डॉक्टर फक्त मान डोलावून त्यांच्याकडे पाहत हसला. सगळेजण
आतमध्ये जिथे शवविच्छेदन करतात त्या भागात आले. एका दगडी टेबलासारख्या आकाराच्या
कट्ट्यावर एक शव पांढरे कापड टाकून ठेवण्यात आलेले होते. बाजूला एक बेसिन आणि
स्टेनलेस स्टीलच्या एका प्लेट मध्ये काही वैद्यकीय हत्यारे होती. आजूबाजूला
हिरव्या रंगाचे पडद्यांचे आवरण होते. सगळेजण त्या शवाजवळ आले. लेडी डॉक्टरने
शवावरचा तोंडाजवळचा भाग दूर केला. आणि मानेच्या उजव्याबाजूला निर्देश करत म्हणाली “हिच ती जागा आहे जिथे मृत व्यक्तीला
इजा पोहोचली आहे” लेडी डॉक्टर एवढ बोलून बाजूला झाली. सत्यवीरने
स्वतः पुढे होऊन ती जागा न्याहाळायला सुरुवात केली. सत्यवीरने
ज्याप्रमाणे तर्क लावला होता अगदी तसचं मृत व्यक्तीच्या उजव्या कानाच्या मागच्या
बाजूला काळसर पडलेला भाग होता. डॉक्टर्सनी डोक्याच्या त्या
बाजूचे काही केसं त्या भागाच्या निरीक्षणासाठी कापून काढलेले होते. सत्यवीर अगदी
बारकाईने ती जागा न्याहाळत होता. मानेच्या बाजूला आणि
कानामागे जवळपास चांगलाच मोठा काळा चट्टा पडलेला होता. जणू काही कोणी जड वस्तूने
मारले असता त्या जागेवर मुकामार बसून सूज आल्यावर जसा दिसेल तसा काहीसा हा भाग
दिसत होता. सत्यवीरने मानेजवळचा तो भाग व्यवस्थित निरखून पाहिला. परत जरासा २
पाऊले मागे लांब जाऊन उभा राहिला तिथून त्याने निरीक्षण केले आणि परत शवाच्या जवळ
आला.
“शव प्रथम इथे आणलेलं असताना हा चट्टा एवढा मोठा न्हवता. नंतर तो एवढा मोठा
दिसू लागला” पुरुष डॉक्टरने बोलायला सुरुवात केली. सत्यवीर
आपलं निरीक्षण करतच डॉक्टरांच म्हणण ऐकत होता.
डॉक्टर
पुढे बोलू लागले -“मृत व्यक्तीला
काल जेव्हा शव विच्छेदनासाठी आणलं तेव्हा हा चट्टा दिसून पण येत न्हवता. नंतर
जेव्हा आज सकाळी विच्छेदनासाठी शव तपासायला सुरुवात केली तर आज तो चट्टा चांगलाच
मोठा झालेला दिसत होता. सगळ्या तपासण्या आणि शव विच्छेदनासाठी लागणाऱ्या सगळ्या
चाचण्या पूर्ण केल्यानंतर आम्हाला एवढचं समजतंय कि मृत व्यक्तीच्या शारीरिक क्रिया
बंद पडून त्यांचा मृत्यू झालेला आहे. इतर कोणत्याही ठिकाणी कसलाही घाव किंवा
झटापटीच्या खुणा दिसत नाहीयेत. याच घावामुळे जो आपल्याला कानामागे दिसतोय, या
महिलेचा मृत्यू झालेला आहे” एवढ बोलून डॉक्टर शांत झाला आणि सत्यवीरकडे
पाहू लागला.
“ओह्ह.. असं आहे तर...” सत्यवीर त्या मृत महिलेच्या
शवाकडे पाहत कुजबुजला.
“तुला काय वाटतंय सत्यवीर” देशमुखांनी सत्यवीरला विचारलं.
“मला एक सांगा डॉक्टर मृत्यूची वेळ काय होती” सत्यवीरने
देशमुखांकडे न पाहता डॉक्टरांना विचारलं.
“साधारण संध्याकाळचे साडेसहा ते साडेसात हि वेळ असावी” डॉक्टर उत्तरले.
“ओके.. आणि शव इथे कधी आणण्यात आले?” सत्यवीर परत
प्रश्न विचरला.
“साधारण रात्री ९ च्या सुमारास” डॉक्टर म्हणाले.
“म्हणजे
त्यावेळी तुम्ही हजर न्हावतात. कारण तुमच्या ड्यूटीची वेळ संपलेली असेल बरोबर” सत्यवीर म्हणाला.
“अं...हो मी सहाच्या दरम्यानच इथून निघतो” डॉक्टरांनी
माहिती दिली.
“हा डाग जो आत्ता दिसतोय तुम्हाला किती वाजता दिसला ?
“सकाळी इथे आलो तेव्हा साधारण १० वाजता”
“म्हणजे रात्रीमध्ये हा डाग प्रकट झाला म्हणायचा?” सत्यवीर
शंकेच्या सुरात स्वतःशीच पुटपुटला.
नंतर सत्यवीर
इन्स्पेक्टर देशमुखांना म्हणाला “हा देशमुख आता
मला सविस्तरपणे प्रकरण काय आहे ते सांगा. “
त्यावर
देशमुखांनी सांगायला सुरुवात केली. –
“आम्हाला काल रात्री ८ वाजण्याचा सुमारास एक फोन आला कि आगरकर रस्त्यावर
देसाईंच्याच्या वाड्यावर एका महिलेचा मृत्यू झालाय. त्या महिला म्हणजेच मालती
सरदेसाई त्या वाड्याच्या मालकीण. घटनास्थळी मी दोन हवालदार आणि एक सिनिअर पोलीस
घेऊन गेलो होतो. वाड्यामध्ये आत जिथे मृतदेह होता तिथे जाऊन पाहिलं तर मालतीताई
यांचा देह त्यांच्याच खोलीमध्ये जमिनीवर निष्प्राण पडलेला होता. खोलीतील आजूबाजूच
सामान अगदी आहे तसचं होतं. कसलीही चोरी किंवा मरतेवेळी केलेली झटापट जाणवत न्हवती.
वरवर पाहता हृदयविकाराच्या झटक्याने हा मृत्यू आलेला असावा असं वाटत होतं.
पोलिसांनी दखल देण्याइतपत काही हा मामला वाटत न्हवता.” देशमुख पुढे काही सांगणार
एवढ्यात सत्यवीरने त्यांना मधेच तोडले.
“तुम्हाला या घटनेसंदर्भात माहिती देण्यासाठी कोणी फोन केला होता? सत्यवीरने शांतपणे खाली मान घालून ऐकत असतानाच मधेच देशमुखांना सवाल केला.
“आम्हाला फोन डॉक्टर पाटील यांनी केला होता जे देसाई यांचे फामिली डॉक्टर
आहेत. वाड्याच्या जवळच ते राहतात. मालतीताई यांच्या घरातला आरडाओरडा ऐकून ते
वाड्यात आले. तेव्हा त्यांनी मृतदेह तपासला तर त्यांना मालती देसाई यांचा नाड्या
बंद लागल्या आणि श्वाससुद्धा बंदच जाणावला. मालतीताई यांना उठवण्याचा त्यांनी
प्रयत्न केला. त्या प्रयत्नांत डॉक्टरांना मालतीताई यांच्या मानेमागे एक छोटासा
रक्ताचा थेंब दिसला जो जखमेतून नुकताच वर आलेला असल्यासारखा वाटत होता. तो थेंब
पाटलांच्या निदर्शनास आला आणि त्यांना काहीतरी वेगळीच शंका आली. त्यांनीच मग
पोलिसांना फोन करून बोलावून घेतला. सगळा पंचनामा केल्यावर मृतदेह शवविच्छेदनासाठी
न्यायचं ठरवलं” देशमुखांनी सगळा वृतांत सांगितला.
“साधारण रात्री ९ च्या आसपास मृतदेह या इमारतीत विच्छेदनासाठी आला, आणि तोपर्यंत हा काळसर डाग मानेवर जणू न्हाव्ताच” सत्यवीर
मान खाली घालून कसल्यातरी विचारात असतानाच बोलला.
“अगदी बरोबर” डॉक्टरांनी दुजोरा
दिला.
“दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही सकाळी आला तेव्हा तो डाग तुम्ही पहिला” सत्यवीर
म्हणाला
“संध्याकाळी देशमुख आल्यावर मी त्यांना मानेच्या डागाबाबत माहिती दिली. तेव्हा
ते म्हणाले कि रात्री तर असा कोणताहि डाग तिथे न्हवता अचानक रात्रीतून हा डाग कसा
काय दृश्मान झाला काही कळेना.” डॉक्टर भुवया उडवत म्हणाले.
“अगदी बरोबर, मी पाहिलं तेव्हा तो भाग आत्ता जसा
काळसर दिसतोय असा दिसत न्हवता. अचानक या काळ्या डागाचे गौडबंगाल मला काही कळेना
म्हणूनच मग मी तुला इथे बोलावण्याचा निर्णय घेतला.” इन्स्पेक्टर देशमुख म्हणाले
“तुमचा काय अंदाज आहे डॉक्टर” सत्यवीरने डॉक्टर्सकडे बघत विचारले. पुरुष
डॉक्टर हाताची घडी घालून शांतपणे उभा होता.
“आमचं विचारालं तर आम्ही असा निष्कर्ष काढलाय कि कोणत्यातरी विशिष्ट अशा
रासायनिक पदार्थाचा शरीरात प्रवेश झाला आणि तो पदार्थ रक्तात शरीरभर मिसळला गेला.
त्यामुळेच शरीरक्रिया बंद पडल्या” डॉक्टरने सांगितलं.
“इंजेक्शनच्या सिरींजने त्यांना काहीतरी टोचण्यात आलं असावं. बहुधा विष.”
देशमुखांनी आपली शंका व्यक्त केली
“ते रसायन बहुधा विषसदृशचं असावं. कारण रासायनिक तपासणीत रक्ताचा नमुना
घेऊन चाचण्या करताना ते विष नक्की कोणतं आहे किंवा कोणत्या प्रकारचं आहे याचा तपास
लागला नाही. उलटपक्षी काही वेगळ्याच प्रकारचे रासायनिक घटक शरीरात आढळले आहेत
ज्याची रसायन शास्त्रातील पारंगत फोरेन्सिक अधिकाऱ्यांना सुद्धा माहिती नाहीये.
म्हणजे शरीरात आढळलेले ते घटक पदार्थच त्यांचासाठी नवीन आहे” डॉक्टरांनी माहिती
दिली
यावर
सगळेच शांतपणे बसले.
“म्हणजे ते असं विष असू शकत ज्याची माहिती सध्या तरी रसायनशास्त्राला
उपलब्ध नाहीये आणि त्याच रसायनाच्या शरीरातील प्रवेशामुळे मालती देसाई यांचा
मृत्यू झाला आहे. त्याच रसायनामुळे मानेमागचा भाग काळसर पडला. सत्यवीरने देशमुख आणि
डॉक्टर्स यांचाकडे पाहत विचारलं
त्यावर
दोघांनीही माना डोलावल्या.
“बर ते विष कशामधून देण्यात आलं असावं डॉक्टर.” सत्यवीरने डॉक्टर्स जोडीला
प्रश्न केला
“ते निश्चित सांगता येणार नाही. पण जिथे तो डाग दिसतोय नक्कीच तिथे असं
काहीतरी टोचल गेलंय ज्याने कोणतातरी विशिष्ट पदार्थ शरीरात गेला त्यानंतर तो काळसर
डाग निर्माण झाला. कारण मानेच्या त्या टोचलेल्या भागाजवळच्या पेशी त्या विषप्रभावाने
जळून गेल्या आहेत. तिथे त्या डागाशिवाय अन्य कोणतीच खुण नाहीये फक्त एक छोटंसं होल
आहे. ज्या मार्फत ते विषसदृश रसायन शरीरात प्रविष्ट झालं असेल पण सिरींजमुळे असं
होल पडत नाही म्हणून ते विष कोणत्या गोष्टीच्या सहाय्याने आत गेलं ते सांगता येत
नाही.” डॉक्टर्स पटापट बोलले.
काही वेळ
असाच चर्चा विमर्श करण्यात गेला. पण अन्य कोणताच खुलासा झाला नाही. तूर्तास तरी
एका महिलेचा मृत्यू एका विशिष्ट प्रकारच्या घातक पदार्थाने झाला एवढचं निष्पन्न
होत होतं. सत्यवीरने आपल्या जवळील नोंदवहीत काही नोंदी लिहिल्या.
“काय सत्यवीर, काय वाटतंय तुला या प्रकरणाविषयी? असा
कोणता रासायनिक पदार्थ असावा ज्याने मालती देसाई यांना संपवण्यात आलं.”
इन्स्पेक्टर देशमुख आपल्या गाडीजवळ जवळ उभे राहत म्हणाले.
“सध्या तरी एवढचं दिसतंय कि कोणत्यातरी विचित्र विषप्रयोगामुळे मालती
बाईंचा मृत्यू झालाय. आता तो मृत्यू कसा झाला ते शोधावं लागणार.” सत्यवीर खालच्या
आवाजात सुस्कारा टाकत म्हणाला.
“तुला हि केस महत्वपूर्ण वाटतेय ना? म्हणजे हे प्रकरण
निश्चितच खुनाच आहे आणि तुला हे प्रकरण माझ्यासोबत सोडवण्यात रस आहे कि नाही हे
मला जाणून घ्यायचंय? देशमुखांनी साशंकतेने विचारलं.
“हो देशमुख, निश्चितच मला रस वाटतोय या प्रकरणात. खून करण्याची खुन्याची हि
विशिष्ट पद्धत मला जरा जास्तच रसपूर्ण वाटतेय. मला आवडेल हे खून प्रकरण तुमचासोबत
सोडवायला.” सत्यवीर हसतच सांगितलं.
“हे उत्तम झालं. कारण खरं सांगायचं तर मला हे प्रकरण वाटत तेवढं सोप्पं
वाटत नाहीये. कारण बघ ना, खुन्याने हा खून खूपच अनोख्या पद्धतीने केलाय आणि
खुन्याने खून करण्यासाठी कोणतं हत्यार वापरलं असेल हे देखील समजत नाहीये. माझं
डोकं जरा चक्रावून गेलं होतं म्हणूनच तुला फोन करून बोलावून घेतलं. आणखी एक गोष्ट
सांगतो. मालतीताई या शहराच्या माजी नगरसेविका होत्या तेव्हा त्यांचा मृत्यूची
बातमी लोकांमध्ये पसरलेली आहेच राजकारणाशी संलग्न असलेल्या त्या व्यक्ती होत्या
त्यामुळे मला जरा प्रेशरच आलं होतं. मी कमिशनर साहेबांना सांगितलं आहे कि मी सत्यवीरची
मदत घेईन आणि त्यांनी सुद्धा आनंदाने होकार दिला आहे. आता तू सुद्धा हि केस
सोडवायला माझ्यासोबत आहेस म्हटल्यावर माझा अर्धा ताण गेला बघ” देशमुख स्मितहास्य करत म्हणाले.
देशमुखांच्या
या वाक्यावर सत्यवीरने देखील स्मितहास्य केलं.
“बर, मग आता हे प्रकरण कस हाताळायचं आहे आपण” देशमुखांनी सत्यवीरला प्रश्न
केला.
“तुम्हाला खुनाची खबर देणारा फोन देसाई यांचे फॅमिली डॉक्टर पाटील यांनी केला होता ना? तर सुरुवात त्यांच्यापासूनच करूयात.
उद्या मी त्यांची भेट माझ्या पद्धतीने घेतो आणि तपासाला सुरुवात करतो. एकदा का
शवविच्छेदन उरकून त्याचा रीतसर अहवाल आला कि मालतीताई यांचं शव त्यांच्या
कुटुंबाकडे सुपूर्त केलं जाईल. मग दहन संस्कार झाल्यानंतरच आपण देसाई वाड्यावर
जाऊयात. अर्थात तत्पूर्वी तुम्हाला मी टेलीफोन करेनच. कारण पोलिसांची सोबत मला
लागेल, देसाई कुटुंबीय मला ओळखत असतील वा नसतील माहित नाही. एकदा तिथे पोहोचलो कि
मग मी इतर तपास करेन “ सत्यवीर म्हणाला.
“ठीक आहे तुझा पद्धतीने हवं ते कर मी तुला शक्य ती सगळी कायदेशीर मदत
करेनच. बऱ चल आता रात्र बरीच झालीय तू आता घरी जा आपण उद्या भेटूयात” असं म्हणत
देशमुख पोलिसांच्या गाडीत बसले.
त्यांची
गाडी रस्त्याच्या चौकातून वळल्यावर सत्यवीर देखील आपल्या घराकडे जाण्यासाठी आपल्या
दुचाकीकडे वळला. बऱ्याच दिवसांनी असं रंजक प्रकरण हाती आल्याने सत्यवीरला जरा बर
वाटलं. नाहीतर दिवस कसे नुसते रटाळ जात होते. उद्यापासून कामाला लागायला हवं कारण
हे देसाई वाड्याच प्रकरण पोलिसांना सुद्धा लवकरात लवकर सोडवायचं आहे. सत्यवीर
स्वतःच्याच मनाशी म्हणाला. विचार करतच त्याने आपली दुचाकी चालू केली आणि आपल्या
घराकडे निघाला.
क्रमश:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Fell free to share your Feedbacks