हॉस्पिटलमध्ये
स्पिरिटचा आणि औषधांचा वास जास्तच दरवळत होता. नर्सेसची येण्याजाण्याची लगबग चालू
होती. त्या त्या स्पेश्यालीटीचे डॉक्टर्स आपापल्या केबिनमध्ये आलेले होते आणि
नंबरनुसार पेशंट्सना तपासत होते. अशाच एका केबिन बाहेर सत्यवीर आपला नंबर येण्याची
वाट पाहत बाकावर बसला होता. त्याच्या आजूबाजूला जास्त पेशंट्स न्हवते कारण
डॉक्टरांची तपासायची वेळ अजून सुरु झालेली न्हवती. डॉक्टर येण्याची वेळ पाहूनच सत्यवीरने
तातडीने दिवसाची पहिली अपॉइंटमेंट घेतली होती. डॉक्टरांनी अजून पेशंट तपासायला
सुरुवात केली न्हवती त्यामुळे सत्यवीरला पटकन आत जाऊन डॉक्टरांची भेट घेता येणार
होती.
एवढ्यात
केबिन मधून एक गलेलठ्ठ बाई डोळ्यावरचा चष्मा सावरत बाहेर आली आणि तिने आवाज दिला.
“मिस्टर सत्यवीर कोण आहेत” असं म्हणत बाकावरच्या २-३
लोकांकडे शोधक नजरेने पाहू लागली.
“मीच आहे सत्यवीर” जागेवरून उठत सत्यवीर म्हणाला.
“डॉक्टरांनी बोलावलंय.. आतमधे या..” असं म्हणत ती तिच्या बसण्याच्या
जागेकडे वळली.
सत्यवीर
पुढे होत डॉक्टरांच्या केबिनजवळ आला. केबिनच्या दारावर ठळक अक्षरात पाटी होती.
“डॉ. सचित पटवर्धन, न्युरोलॉजी तज्ञ. सत्यवीरने
केबिनच्या दारावर टकटक केली. तसा आतून आवाज आला “प्लीज कम इनसाईड”
सत्यवीर
आतमध्ये गेला. एका मोठ्या टेबलाच्या समोर मोठ्या खुर्चीत डॉक्टर सचित पटवर्धन
एकटेच हलकंसं स्मित करत बसले होते. बाजूलाच पेशंटला तपासायचा बेड होता. मागच्या
शेल्फमध्ये काही औषधांचे बॉक्सेस आणि सलाईनच्या बाटल्या होत्या. बाजूलाच कसलीतरी हेल्मेटसारखी
मशीन होती.
“हेल्लो डॉक्टर सर्वप्रथम धन्यवाद मला तातडीने वेळ दिल्याबद्दल” सत्यवीर पुढे झुकत हात जोडत म्हणाला.
“अहो सत्यवीर धन्यवाद कसले आम्ही जशी समाजाची सेवा करतो. तशीच तुम्ही
सुद्धा समाजाची सेवा करता. तुम्हाला वेळ द्यावाच लागला.. या या बसा..” डॉ. सचित समोरच्या खुर्चीत निर्देश करत हसत म्हणाले.
डॉक्टर
सचित यांच्या नम्र वागण्याने सत्यवीरला खूप बरं वाटलं. डॉक्टर सचित पटवर्धन यांना सत्यवीरबद्दल
माहिती होती. तो सध्या देसाई खून प्रकरण हाताळतोय आणि त्यानिमित्तच त्याला आपली
भेट हवी असं त्यांचं सत्यवीरसोबत फोनवर बोलण झालेलं होतं.
“तुमचा जास्त वेळ न घेता मी मुद्द्यालाच हात घालतो. म्हणजे तुम्ही पण तुमचे
पेशंट्स पाहायला मोकळे आणि मी पण माझी कामं करायला मोकळा” सत्यवीर
म्हणाला.
“शुअर, गो अहेड” डॉ. सचित पुढे
झुकत म्हणाले.
“ओके, खरंतर फोनवर आपलं बोलणं झालंच आहे तरीही परत
एकदा सांगतो. तुम्ही परदेशात वास्तव्यास असताना मेंदूच्या तंतुंबद्दल केलेलं
संशोधन माझ्या वाचण्यात आलं. त्याबद्दल मला काही प्रश्न आहेत.” सत्यवीरने बोलायला सुरुवात केली. त्यावर डॉ. सचित यांनी फक्त मान डोलावली.
त्यामुळे पुढे सत्यवीर बोलू लागला.
“डॉक्टर तुमचा सायंटिफिक मॅगझिन मधला लेख वाचला. परदेशातील काही औषधनिर्मात्या कंपनीतील ज्येष्ठ
शास्त्रज्ञांसोबत मिळून तुम्ही एक वेगळ्या पद्धतीची उपचारपद्धती शोधून काढली. ज्यामुळे
मेंदूशी निगडीत असलेले अनेक रोग बरे होण्यास मदत तर झालीच पण त्याहून अधिक म्हणजे
फिट्स आणि स्मृतीभ्रंश यासारख्या आजारांवर सुद्धा हा इलाज रामबाण ठरला. परदेशातील
पेशंट्स बरे होण्याचं प्रमाण जवळपास ९८ टक्के इतके आहे. अगदी जुनाट मेंदूचे रोग
असलेले पेशंट्स जे अतिवयोवृद्ध आहेत त्यांना सुद्धा या
उपचार पद्धतीने फरक पडलाय. त्याच उपचार पद्धती तुम्ही इथे स्वदेशात वापरत आहात.
मला त्याबद्दल जाणून घ्यायचंय.
“तुम्ही माझे लेख अत्यंत मनापासून वाचलेले दिसतायत मिस्टर सत्यवीर” डॉ. अतिशय कौतुकाने म्हणाले.
“माझा पेशा गुप्तहेराचा असल्याकारणाने आणि माझ्या केसमध्ये याचं महत्व मला
जाणवल्याने तो लेख बारकाईने वाचण भाग होतं” शांतपणे सत्यवीर
म्हणाला.
“हम्म.. हे बघा सत्यवीर उपचार पद्धतीच म्हणाल तर मी ज्या परदेशी शास्त्रज्ञ
टीम सोबत काम करून एक औषध निर्माण केलं होतं ते औषध आणि काही रोजच्या दैनंदिन सवयी
उदाहरणार्थ खाण्याच्या सवयी, झोपेतून उठायच्या सवयी यांचा
ताळमेळ बसवून पेशंट्सना बरे करता येऊ शकते अशा निष्कर्षाप्रत आम्ही आलो होतो.
परदेशात त्याचे अफलातून रीजल्ट आलेत. तुम्ही म्हणालात तसे जवळपास ९८% इतके. आपल्या
देशात सुद्धा हि उपचार पद्धती मी आणली आणि इथे सुद्धा चांगले निष्कर्ष आहेत.”
डॉ सचित म्हणाले.
“आपल्या देशात किती रुग्णांवर हि उपचार पद्धत अवलंबली गेली आणि किती रुग्ण
बरे झालेत?” सत्यवीरने गंभीर होत विचारलं.
“माझ्या जवळील अधिकृत महितीनुसार या उपचार पद्धतीने तब्बल २०८ पेशंट्स मी
हाताळले. त्यातले जवळपास २०५ पूर्ण बरे झालेत. उर्वरित ३ बरे न झालेल्यापैकी २
अगदीच वृद्ध होते आणि त्यांना मेंदूचे सोडून इतर दुर्धर आजार पण होते. त्यांच्या
मेंदूची तंतू असलेली रचना सुधारत होती. पण इतर दुर्धर आजारात शरीर जास्तच
खंगल्यामुळे ते दगावले. डॉ. पटापट बोलले.
“तिसरा पेशंट जो बरा झाला नाही ते म्हणजे याचं शहरातील रहिवासी असलेले
आबासाहेब देसाई बरोबर ना?” हनुवटीवर दोन्ही हात ठेवत सत्यवीर
म्हणाला.
“येस्स.. मागच्या बऱ्याच महिन्यांपासून त्यांची ट्रीटमेंट माझ्याकडे चालू
आहे. सी.टी. स्कॅनचे रिपोर्ट्स मी चेक केले. मागच्या दोन महिन्यात त्यांच्या
मेंदूच्या तंतूंची सुधारणा छान झालीय. ठरलेली औषधउपचार पद्धती आणि दैनंदिन
सवयीसुद्धा उपचार पद्धतीप्रमाणे चालू आहेत. पण त्यांना अजून पूर्ण बरं वाटत
नाहीये. त्यांची स्मृती त्यांना दाद देत नाहीये. डॉ. सचित खंत व्यक्त करत म्हणाले.
“उपचार जर व्यवस्थित चालू असतील तर त्यांची स्मृती का दाद देत नाहीये अजून”
सत्यवीरने विचारणा केली.
“कदाचित त्यांच्या केसमध्ये उपचारांमुळे गुण येण्यास जास्त कालावधी लागत
असेल” डॉ. बोलले.
“पण डॉक्टर तुमच्या हातून बरे होणाऱ्या रुग्णांची जास्त संख्या आणि
त्यावरील सकारात्मक सर्वे पाहता असं होणं थोडं विचित्र नाही का? म्हणजे देसाई हे इतके म्हातारे पण नाहीत किंवा असपण नाही कि त्यांना इतर
काही आजार आहेत, ज्यामुळे उपचारांचा गुण येण्यास वेळ लागतोय”
सत्यवीरने आपली शंका उपस्थित केली.
“खरंतर ते एव्हाना बरे व्हायला हवे होते. पण काही केसेस मध्ये ठराविक घटनांचा
पेशंट्ना मानसिक धक्का बसलेला असतो त्यामुळे रिकवरीला वेळ लागतो.” डॉ. सचित आपली बाजू मांडत म्हणाले.
“ते आहेच.. पण तुमचा संशोधन लेखाप्रमाणे रुग्णांच्या बरे होण्याच्या यादीत
आबासाहेब देसाई हि केस जरा वेगळी आहे असं म्हणायला हरकत नाही.” सत्यवीर स्मित करत म्हणाला.
“हो.. एक अपवाद म्हणा हवं तर. पण मला खात्री आहे त्यांना आज ना उद्या नक्की
पूर्ण बरं वाटेल आणि त्यांची गेलेली स्मृती सुद्धा परत येईल.” डॉ सचित खात्रीपूर्वक म्हणाले.
“नक्कीच डॉक्टर मला सुद्धा तुमच्याकडून याचं उत्तराची अपेक्षा होती. आज ना
उद्या त्यांना नक्कीच पूर्ण बऱ वाटणार. चला तुमचा खूप वेळ घेतला.” सत्यवीर आभार व्यक्त करत उठला. हस्तांदोलन करत सत्यवीरने डॉक्टर सचित
पटवर्धन यांचा निरोप घेतला.
केबिनच्या
बाहेर येत हलकंसं स्मित करत आणि शिळ वाजवतच तो चालू लागला.
घरी
पोचताच सत्यवीरने आपले अंग बेडवर टाकले. रात्रभर त्याला झोप न्हवती. एकतर त्या गूढ
व्यक्तीचा पाठलाग करताना सपाटून आपटल्याने त्याची पाठ चांगलीच दुखावली गेली होती आणि
वाड्यावरून त्यादिवशी आणलेली प्रवासवर्णनांची पुस्तकं वाचता वाचता पहाट कधी झाली
त्याला कळलेच नाही. सकळी लवकर डॉक्टर सचित पटवर्धन यांची ठरलेली गाठ घेणे भाग
असल्याने झोप अपूर्णच राहिली. त्यामुळे थोडी झोप घेण्याच्या उद्देशाने सत्यवीरने
अंग टाकलं आणि लागलीच त्याला झोप लागली. सत्यवीर झोपून काही तासच झाले असतील कि
त्याची झोपमोड झाली ती टेबलावरच्या फोनच्या आवाजानेच. डोळे किलकिले करत चरफडतच सत्यवीर
उठला आणि फोनजवळ गेला.
“कोण आहे” सत्यवीरने त्रासिक सुरात विचारले.
“इस्पेक्टर देशमुख बोलतोय, सत्यवीर काय झालं एवढ वैतागायला” समोरून देशमुख बोलले.
“अच्छा देशमुख तुम्ही आहात होय.. काही नाही हो रात्रभर झोप न्हवती नुकतीच
झोप लागली तर तेवढ्यात तुमचा फोन आला. बऱ ते सोडा तुम्ही कशासाठी फोन केला होता”
सत्यवीर मुद्द्याला हात घालत म्हणाला.
“आशुतोषबद्दल सांगायचं होतं. तू सांगितल्याप्रमाणे त्याच्या मागावर माणूस
ठेवलेला होता.” देशमुख शांतपणे बोलले.
“बऱ मग काय हाती लागलं” सत्यवीर जवळच्या खुर्चीत बसत
म्हणाला.
“शहरात तो ज्या क्लासला जातो तो क्लास ७ वाजता सुटतो पण कधीकधी शहराबाहेर
असणाऱ्या बारमध्ये सुद्धा आशुतोष साहेब दिसले होते. सिगरेट आणि दारू पीत
मित्रांसमवेत वेळ घालवताना” देशमुख व्यंगात्मक पद्धतीत
बोलले.
“हम्म.. मला शंका होतीच. साधारण किती वाजता दिसला आशुतोष तिथे?” सत्यवीर म्हणाला.
“साधारण ९ च्या आसपास होता तिथे. बारमध्ये चौकशी केली तेव्हा समजले
आठवड्यातून एक दोनदा येत असतो तो बारमध्ये याच सुमारास. पण मला एक शंका आहे सत्यवीर.
९ वाजता त्याला वाड्याच्या बाहेर जाताना कोणी हटकल नसेल का? कि
एवढ्या रात्री कुठे जातोयस म्हणून ” देशमुखांनी विचारलं.
“अहं.. कोणीही हटकल नसेल. कारण तो वाड्याच्या मुख्य दरवाजातून जातच नाही
मुळी. बाहेर पडायला तो त्याच्या खोलीतील खिडकीचा वापर करतो. वाड्यात देखील कोणाला
त्याच्या व्यसनांविषयी माहिती नसावी” सत्यवीर म्हणाला.
“तू एवढ ठामपणे कस काय बोलतोस” देशमुख बोलले. त्यावर सत्यवीरने
आशुतोषच्या खोलीत जाऊन तिथे दिलेली भेट सांगितली. त्याच्या खिडकीबाहेर त्याने
विझवलेली सिगरेट आणि त्यामुळे खिडकीबाहेर पडलेले सिगरेटचे डाग, सिगरेट विझवून खाली टाकलेलं थोटूक आणि त्याच्या कपाटामध्ये त्याने ठेवलेला
तो गाठी मारलेला दोरखंड याबाबत सविस्तर वृतांत सांगितला.
“ओह्ह असं आहे तर... म्हणजे रात्री गुपचूप दोरीच्या सहाय्याने आशुतोष
खिडकीवाटे खाली उतरून बारमध्ये दारू प्यायला जातो तर.” देशमुख
म्हणाले.
“येस देशमुख, दोरीच्या साहाय्याने खिडकीबाहेर खाली
उतरून बाजूचं पुरुषभर उंचीचं कंपाऊंड उडी मारून
ओलांडायला त्याला अवघड नाहीये” सत्यवीर खुर्चीत बसत म्हणाला.
“सध्यातरी आशुतोषबद्दल एवढचं आहे. तुला काही अजून माहिती मिळाली” देशमुखांनी विचारणा केली.
त्यावर सत्यवीरने
त्या रात्री पाटील डॉक्टरांना दिलेली भेट, डॉक्टरांच्या घराबाहेर ठेवलेली पाळत आणि एका गूढ व्यक्तीचा केलेला पाठलाग
सांगितला.
“माय गॉड सत्यवीर, एवढ
सगळं झालं मग तू मला त्याचवेळीच का नाही कळवलस” देशमुख
मोठ्याने बोलले.
“तितका वेळ न्हवता देशमुख आणि तसंही इतर गोष्टींची छाननी करण बाकी होतं”
सत्यवीर म्हणाला.
“ठीक आहे सत्यवीर, पण तुला काय वाटत कोण असावी ती व्यक्ती जी अपरात्री
पाटलांच्या घरात होती. काय काम असेल तिचं तिथं” देशमुख अधीर
होत म्हणाले.
“मला अंदाज आला आहे. त्या व्यक्तीचा बुरखा लवकरच फाडणार आहे मी. खरतरं
त्याचं दिवशी सगळ्या गोष्टींचा सोक्षमोक्ष लावणार होतो मी. पण मला खात्री करून
घ्यायची होती म्हणून थांबलो होतो” सत्यवीर शांतपणे म्हणाला.
“खात्री.. कसली खात्री? तुला नक्की कोणावर संशय आहे का? आत्ताच जाऊन त्याची
चौकशी करूयात आपण” देशमुख तावातावात म्हणाले.
“रिलॅक्स देशमुख सगळं काही करायची संधी मिळेल तुम्हाला. तुम्ही लगेचच देसाई
वाड्यावर यायला निघा सगळं काही प्रात्यक्षिक करूनच दाखवतो आणी हो.. त्या डॉक्टर
पाटलांना सुद्धा त्याचं मानगुट पकडून आणा वाड्यावर” सत्यवीर
जरा कडक आवाजात म्हणाला. सत्यवीरच्या अशा ठाम उद्गारानंतर तर देशमुखांची खात्रीच
पटली कि सत्यवीरला गुन्हेगार कोण आहे ते समजलंय. देशमुख यावर भलतेच खुश झाले आणि
त्या खुशीतच त्यांनी फोन ठेवला. सत्यवीर सुद्धा पटकन आवरून देसाई वाड्याकडे
जाण्यासाठी निघाला.
काही वेळाने
सत्यवीर देसाई वाड्याच्या जवळ पोहोचला. आपली दुचाकी देसाई वाड्याबाहेर थांबवून सत्यवीर
देशमुखांची वाट पाहत उभा होता. इन्स्पेक्टर देशमुख आल्यावरच वाड्यात प्रवेश करावा
या इराद्याने सत्यवीर बाहेर थांबलेला होता. सत्यवीरला जास्त वाट पाहायला लागली
नाही कारण थोड्या वेळातच देशमुखांची गाडी देसाई वाड्याजवळ येऊन थांबली. गाडीच्या
आतमधून देशमुख लगबगीने उतरले आणि त्यांची वाट पाहत असणाऱ्या सत्यवीर जवळ आले. नंतर
गाडीतून हवालदार म्हस्के आणि अजून दोन हवालदार उतरले. गरज पडेल म्हणून देशमुखांनी
पोलिसांची जादा कुमक सोबत आणली होती.
“बोल सत्यवीर काय योजना आहे” अधीर होत देशमुखांनी
विचारलं. आज देशमुख वेगळ्याच उत्साहात होते.
“आपण दोघे आतमध्ये वाड्यात जाऊयात. हवालदार म्हस्केना सांगा त्या पाटील डॉक्टरांना
उचलून वाड्याच्या मुख्यदरवाजापाशी आणून उभं करून ठेवा आणि जोपर्यंत मी आवाज देत
नाही तोपर्यंत त्यांना आत आणू नका. उर्वरित दोन हवालदारांपैकी एकाला मुख्य
प्रवेशद्वारापाशी आणि दुसऱ्याला आतमध्ये अंगणात उभं राहायला सांगा. मी
सांगितल्याशिवाय कोणीही वाड्यात येणार नाही किंवा बाहेर जाणार नाही. सत्यवीरने
पटापट देशमुखांना निर्देश दिले.
देशमुखांनी
सत्यवीरच्या निर्देशानुसार सगळ्यांना आदेश दिले. हवालदार म्हस्के डॉक्टर पाटलांना
आणायला गेले. उर्वरित दोन हवालदार देशमुखांनी सांगितलेल्या जागेवर जाऊन थांबले. सत्यवीर
आणि देशमुखांनी वाड्यात प्रवेश केला.
क्रमशः

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Fell free to share your Feedbacks