“ द माइंडगेम ” (भाग १)
थंडीच्या दिवसातील ती एक प्रसन्न सकाळ होती. मेरी आज
नेहमीपेक्षा लवकरच उठली होती. उठल्याबरोबर तिने खिडकीतुन बाहेर पाहिलं. आदल्या
दिवशी रात्री हिमवृष्टी झाल्यामुळे सगळीकडे बर्फाचे थर साचलेले होते. झाडांच्या
पानावर बर्फ साचून एक जड थर निर्माण झाल्यामुळे ते दृष्य मोठे विलोभनीय दिसत होते.
रस्त्यावर बर्फ साचल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये म्हणून काही कर्मचारी
रस्त्यावरुन साचलेले बर्फ बाजूला करत होते. रस्त्यावर पडलेलं कोवळं ऊन पाहून मेरीला
जरा बरं वाटलं. सकाळचं आन्हिक आवरून मेरी ब्रेकफास्ट करायला खाली आली. मेरी टेबलावर बसली कि
लगेचच रुबेलाने न्याहारीची थाळी मेरीपुढे सरकवली.
संपूर्ण घरामध्ये फक्त दोनच
व्यक्ती राहत असत. एक मेरी आणि तिची सावत्र आई रुबेला. हा पण रुबेला हि काही
जन्मापासूनची आई न्हवती. मेरीचे वडील विल्यम यांचा स्वतःचा ट्रान्सपोर्ट
व्यवसाय होता. कामानिमित्त त्यांना सतत देशाबाहेर जावे लागत असे. युरोपमध्ये
विल्यम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या व्यवसायाचं जाळे पसरवून मोठा नफा कमावला होता. विल्यम याचं त्यांच्या एकुलत्या एक मुलीवर मेरीवर मनापासून प्रेम होतं. मेरी हि खूपच चुणचुणीत मुलगी होती, अभ्यासात कायम पुढे, तिच्या वडिलांना तिचा खूपच अभिमान वाटायचा. मेरीची आई मेरी दहा वर्षाची
असतानाच वारली. मेरीचं मातृछत्र हरवलं तशी ती खूपच उदासवाणी झाली, तिच्या वडिलांनी म्हणजेच विल्यम यांनी तिला तऱ्हेतऱ्हेची अनेक ठिकाणे दाखवून आणली, तरी मेरी पहिल्यासारखी उस्फुर्त झाली नाही. विल्यमला त्यांच्या कामामुळे देशाबाहेर राहावे लागे, अशा परिस्थिती मध्ये विल्यम
मेरीकडे कसे लक्ष देणार होते. हसरी बोलकी मेरी आता खूपच शांत आणि उदासपणे वावरत असे. विल्यमला तिची खूपच काळजी वाटत होती.
आपल्या अनुपस्थितीत मेरी कशी जगू शकेल, नीट खाऊ पिऊ शकेल कि नाही याचीच चिंता त्यांना भेडसावत होती. मेरीला देखभालीची गरज होती किंबहुना आधाराची, त्यामूळेच विल्यम
दुसऱ्या लग्नाला तयार झाले केवळ नाईलाज म्हणून किंवा मेरीच्या काळजीपोटी त्यांनी हे पाउल उचललं. मेरीला याबद्दल काहीच आक्षेप न्हवता, किंबहुना तिला आताशा कोणत्याच गोष्टीबाबत आक्षेप नसे. शेवटी अशा प्रकारे विल्यम आणि मेरी यांच्या आयुष्यात आगमन झालं ते रूबेलाचं. विल्यम यांची दुसरी पत्नी म्हणून रुबेला त्यांच्या घरात आली. विल्यमची
संपत्ती पाहूनच कदाचित रुबेला लग्नासाठी तयार झाली असावी. कारण आपल्या नवऱ्याला त्याचा
पहिल्या पत्नीपासून मुल आहे आणि ते आपल्याला सांभाळावे लागणार आहे हे पाहून
स्त्रिया कोणाची दुसरी पत्नी व्हायला सहसा तयार होत नसत. रूबेलाचं लग्न कधीच झालेलं न्हवत हे तिचं पाहिलंच लग्न होतं. कामाच्या निमित्ताने एकदा विल्यम यांची रुबेलाशी ओळख झालेली होती. रुबेलाला जवळचं असं कोणीही न्हवते. विल्यम यांनी रुबेलाला आपल्या घरावर ओढवलेली परिस्थिती सांगितली आणि रुबेलाला मागणी घातली तशी रुबेलाने होकारार्थी मान हलवली. रुबेला हि आर्थिकदृष्ट्या यथातथा असणारी स्त्री, कोरड्या मनाची आणि बऱ्यापैकी व्यावहारिक असणारी.
विल्यमकडे विचार करायला फारसा वेळ न्हवता. तिच्या होकारासरशी विल्यम आणि रुबेला विवाहबध्द झाले. रुबेला व्यावहारिक स्वभावाची असूनदेखीलही ती मेरीचा
नीट सांभाळ करायची, पण त्यामध्ये मेरीला कधी प्रेमाची ऊब जाणवलीच नाही. एक काम म्हणून ती मेरीचा सांभाळ करे. तिला हवं नको ते सगळं पाहे. अर्थात असं केलं तरच रुबेलाला विल्यमच्या अलिशान घरात त्याची पत्नी म्हणून राहता येणार होतं. विल्यम
देशाबाहेर गेले कि मेरीला नेहमी आपल्या वडिलांची आठवण येत राही. विल्यम मध्ये
मध्ये त्या दोघींना पैसे पाठवत असत, मेरीसाठी काहीतरी भेटवस्तू पाठवत. रुबेलाची मात्र
चंगळ व्हायची. विल्यमने पाठवलेल्या पैशातून रुबेला महागड्या वस्तू, पार्लर, शॉपिंग यामध्ये यथेच्छ पैसा
उडवायची. पण तिला हेही पैसे कमी पडायचे, रुबेला नोकरी करत असली तरी तिच्या तुटपुंज्या पगारामध्ये तिची चैन
भागायची नाही, नशिबानेच विल्यमची पत्नी होण्याचं भाग्यं तिला मिळालं होतं. त्यामुळे ती विल्यामकडे सारखी पैशासाठी तगादा लावायची. जगाला
दाखवायला ती नोकरी करायची पण पैसा हा तिची कमजोर कडी होता. आपण फक्त
नवऱ्याच्या पैशावर मजा मारतो असा कोणालाही वाटू नये म्हणूनच तिने नोकरी सोडलेली न्हवती. पैसे मिळाले कि ती आपल्या सगळ्या हौस मौज भागवत असे, त्यामुळे इतर कोणत्या गोष्टीकडे ती फारसं लक्ष देत नसे, बाकी मेरीला तिने सावत्र आई म्हणून त्रास वगैरे काही दिला न्हवता. रुबेलाला फक्त पैशाची चटक होती आणि तो तिला
मिळत असेपर्यंत बाकी तिला कसलीही परवा न्हवती. त्यामुळे तिने मेरीवर कसलेही बंधन वगैरे
लादलेले न्हवते. ती मेरीला तिच्या इच्छेप्रमाणे वागू द्यायची. रुबेला कामावर जायची
त्यावेळी मेरी घरीच असायची.
मेरीचं शिक्षण पूर्ण झालेलं होतं. पदवीच्या शेवटच्या
वर्षी असताना तिने सादर केलेल्या क्रिमिनल सायकोलॉजी या प्रबंधाला तर प्रोफेसर
सिम्सन यांनी तर “ए” श्रेणी दिली होती आणि ते पूर्ण कॉलेजभर मेरीच्या प्रबंधाबद्दल स्तुतिसुमने गात होते. रसायनशास्त्र या विषयातसुद्धा तिला चांगली गती
होती. रसायनशास्त्रातील किचकट अभिक्रिया तिच्या हातचा मळच होत्या. मेरीला कॉलेज मध्ये बरेच मित्र मैत्रिणी होते, पण जसं आई गेली आणि कॉलेज संपले तसे मित्रांची ती कधी फारशी भेटेनाशी झाली. फक्त डॅनिअल, एलिना, आणि स्टिव्ह कधी मधी भेटत असतं, हेच तिचे जवळचे मित्र. त्यांच्यासोबत ती कधीतरी कॉफी प्यायला किंवा कोणत्यातरी नवीन रेस्टॉरंटमधे बनवलेला एखादा नवा पदार्थ चाखण्यासाठी जात असे.
दिवस असे बरे चाललेले असतानाच अचानक एक दिवस बातमी आली,
मेरी सकाळी सकाळी तिच्या घरामागे असणाऱ्या बागेत एक रोप लावण्यासाठी खड्डा खणत होती. रुबेला त्यादिवशी घरीच होती, दुपारी मैत्रिणींसोबत शॉपिंगला जाण्यासाठी आजारपणाच खोटं कारण सांगून तिने सुट्टी घेतलेली होती. एक माणूस दारावरची बेल वाजवत होता. मेरी मागच्या दारातून पुढच्या रुममध्ये रुबेलाच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून पळतच आली. आलेल्या माणसाने खबर आणली होती. मेरीच्या वडिलांचं
हृदयविकाराच्या झटका येऊन निधन झाला होतं. कामाच्या ठिकाणीच त्यांच्या सोबतच्या लोकांना त्यांचा मृतदेह मिळाला. शवविच्छेदन झाल्यानंतर त्यांचा मृतदेह मेरीच्या घरी आणण्यात आला. या घटनेने मेरी खूपच तुटून गेली. तिला आता खूप एकट एकट वाटायला लागलं,
तीचं तिच्या वडिलांशिवाय कोणी आपलं असं न्हवत, रुबेलाने तिचं फक्त नावालाच सांत्वन
केलं. मेरीला ते खूपच कृत्रीम वाटलं. झालेली दुखःद घटना स्वीकारल्याशिवाय मेरीपुढे मार्गदेखील न्हवता. आईच्या मृत्युच्या धक्क्यातून ती सावरतच असताना अजून एका मोठ्या धक्क्याला तिला सामोरे जावे लागले. रुबेला जेव्हा कामाला जायची तेव्हा मेरी घरीच उदासवाणे बसून असायची, घरामध्येच काही बाही करत वेळ घालवत बसायची. नोकरी करायची इच्छा देखील तिला राहिलेली न्हवती.
रुबेलाला कामावरून घरी यायला कधी कधी उशीर व्हायचा तोवर
मेरी झोपी जायची. कसेबसे दिवस पुढे सरकत होते. मेरीला कळल कि आयुष्य हे असेच जगावे लागणार वाईट घटना घडतंच राहणार पण आपण पुढचा विचार करायला हवा. तेव्हापासून मेरीने स्वतःला वेगवेगळ्या कामात गुंतवून ठेवायला सुरुवात केली. आज सकाळी निर्माण झालेल्या प्रसन्न वातावरणामुळे मेरीला जरा
उत्साह वाटत होता, दोन दिवसापासून तिच्या अंगात जरा कणकण तिला जाणवत होती. बागेमध्ये झाडांची काळजी घेण्यात आणि झाडांच्या आजूबाजूला उगवलेले अनावश्यक तण काढण्यात तिचे ४ दिवस गेले होते. अंगदुखीमुळे ती जरा वैतागली होती पण आज जरा तिला बऱ वाटत होतं. नाश्ता
झाल्यावर मेरी आजचं वृत्तपत्र चाळत बसली.
“मेरी आज मला कामावरून यायला जरा उशीर होईल असं वाटतंय, रात्री जेऊन
घे आणि दार वगैरे व्यवस्थित लावून झोपी जा.” आपली जाडजूड पर्स सावरत रुबेला
दाराबाहेर पडली.
मेरीने तिचा फक्त ऐकून घेतलं आणि कोणताही उत्तरं न देता आणि परत वृत्तपत्र चाळू लागली. अर्थात रुबेलाल त्याचं कहीच वाटलं न्हवत. विल्यम गेल्यापासून तिचं या घराची मालकीण झाल्यामुळे तिला आता एकदम निवांत असल्यासारखं वाटत होत. मेरीला रात्री झोपायला सांगून रुबेला तिच्या उंच टाचांच्या सॅंडलचा आवाज करत निघून गेली. मेरी नाश्ता करत वृत्तपत्र चाळू लागली,
वृत्तपत्रात आलेल्या एका बातमीने तिचं लक्ष वेधून घेतलं. शहरातील काही भागात चोर आणि
लुटारूंचा सुळसुळाट वाढला होता, रात्री अपरात्री रस्त्यावरुन जाणाऱ्या लोकांना धाक
दाखवून पैशासाठी लुटलं जात होतं. मेरी ती बातमी वाचून काहीशी अस्वस्थ झाली, रुबेलाच उशिरा
घरी येणं आजकाल जास्तच वाढलं होतं, आणि मुख्य म्हणजे रुबेला आजकाल वेगळ्याच
तंद्रीत असायची. घरात देखील कधीकधी लक्ष नसायचं तीच. कामच्या व्यापामुळे रुबेलाच चित्त थाऱ्यावर नसेल असं मेरीला वाटून गेलं. पण त्यादिवशी रुबेला जरा वेगळीच वाटली, एकदा जेवणाच्या
टेबलवर मेरी आणि रुबेला जेवण करत होत्या. त्यावेळी अचानक रुबेला म्हणाली ” मेरी,
तुझं कोणत्या बॅंकमधे खाते आहे,? “खाते कधी काढले? कसे काढले"? असले काही बाही प्रश्न
ती विचारात होती. मेरीला जरा आश्चर्य वाटलं,
कारण रुबेलाने असली विचारणा या आधी
कधीहि केली न्हवती. मेरीच्या आयुष्यात तिने कधीही कसलीही दखल दिलेली न्हवती. एकदा दोघी घर आवरत होत्या पसारा आवरत असतानाच रुबेलाला पती
विल्यमच्या काही वस्तू मिळाल्या, आणि ती विल्यामच्या आठवणीत काहीशी हरवून गेली. नंतर काही वेळाने अचानकपणे ती म्हणाली” मेरी तुला आजकाल झोप नीट लागते ना”
त्यावर मेरी “ हो ” असं म्हणाली खरी
पण तिला तिचं आश्चर्य लपवता आलं नाही. कारण अशी काळजीयुक्त विचारणा तिने याआधी कधीही केलेली न्हवती. नाही म्हटलं तरी मेरीला थोडंस भरून आल्यासारखं झालं.
“असं का विचारलं? “ मेरीने स्वतःला सावरत प्रतिप्रश्न केला.
“काही नाही सहजंच, म्हणजे परवा तुला बरं वाटत न्हवत ना ”
रुबेला म्हणाली.
“हम्म” एवढचं मेरी बोलली.
खरंतर रुबेला एवढी आस्थेवाईकपणे
बोलत होती तशी याआधी कधीच बोललेली न्हवती, या गोष्टीचा मेरीला आनंद व्हायला हवं होता पण तसा काही आनंद मेरीला झाला नाही. कारण ज्याकाळात मेरीला रुबेलाच्या आपुलकीची गरज होती तेव्हा रुबेलाकडून मेरीला जवळ करण्याकरिता कोणतंच पाउल उचललं गेलं न्हवत. रुबेला आपल्याच आयुष्यात मश्गुल असायची तर मेरी कुढत घरामधे बसून दिवस काढायची. ते दिवस आठवून मेरीला ढवळून आलं.
एके रात्री मेरी झोपेतून अचानक उठली, तिला तहान लागली होती. वरच्या
खोलीतून मेरी खाली आली. बाथरूममधून
पाण्याचा आवाज येत होता, रुबेला घरी आली असावी असं मेरीला वाटलं. बाहेर थंडी असल्यामुळे ती गरम पाण्याचा
शॉवर घेत होती, मेरी पाणी पिऊन माघारी वळाली, तेवढ्यात तिची नजर टेबलावरच्या रुबेलाच्या
पर्स कडे गेली. मगरीच्या कातडीपासून बनवलेली ती जाडजूड पर्स रुबेला कशी बाळगत असेल
याचं मेरीला आश्चर्य वाटलं, पर्स पाहत असतांनाच मेरीला अचानक ती पर्स चाचपण्याचा
मोह झाला. रुबेला अजूनही बाथरूम मधेच होती, असं करावं कि नाही याचा विचार करण्याकरिता मेरीने जरा वेळ घेतला कारण असं इतरांच्या वस्तू त्यांचा परवानगीशिवाय हाताळण चुकीचं होतं. पण का कोणास ठावूक मेरीने चूक बरोबर चा विचार झटकला आणि हळूच टेबलावर पडलेल्या पर्सची चैन उघडली.
पर्सच्या आतमध्ये
रुबेलाचं मेकअपचं समान होतं. लिपस्टिक, रुमाल, आय लायनर आणि इतर गोष्टी. पर्सच्या तळाशी
काहीतरी असल्याचं मेरीला जाणवलं. दिवे बंद असल्याने तिला व्यवस्थित ती वस्तू काय आहे ते
कळलं नाही, मेरीने हात घालून हळूच ती काहीशी जड भासणारी वस्तू बाहेर काढली आणि ती वस्तू पाहताच तिने आश्चर्याने आ
वासला. आपण काय पाहतोय यावर क्षणिक तिचा विश्वासच बसेना, ,कारण ती वस्तू म्हणजे एक
छोटंसं पिस्तूल होतं. मेरीला नाही म्हटलं तरी धक्का बसला होता, रुबेला आपल्या पर्स
मध्ये पिस्तूल का बाळगून आहे. मेरीला क्षणभर काही सुचेना. पण बाथरूम मधून शॉवरचा आवाज येणं बंद झालं. रुबेलाची अंघोळ उरकत आली असेल असं वाटून मेरीने ते पिस्तूल पर्सच्या तळाशी आहे तसं ठेवून दिलं आणि इतर वस्तू सुद्धा जशास तशा ठेवल्या. पर्स बंद केली आणि सावकाशपणे आपल्या खोलीमध्ये
येऊन बेडवर पडली. मेरीला राहून राहून ते पिस्तुलंच सारखं आठवत होता, रुबेला ते
पिस्तुलं का बाळगते याचाच तिला प्रश्न पडला होता. ति त्या पिस्तुलाचा वापर तर करत नाही
ना?, अरे देवा, म्हणजे लोकांचे मुडदे पाडते का काय हि बया, उगीचच शंकेची पाल मेरीच्या मनात उपस्थीत झाली. रुबेला एका खाजगी कंपनीमध्ये
काम करते हे तिला माहित होतं, पण ते सोडून ती इतर काय काय कामे करत असेल? असे एक ना
अनेक प्रश्न तिला भेडसावू लागले तेवढ्यात तिला आठवलं वृत्तपत्रात परवा आलेली बातमी ज्यामधे लिहिलं होतं कि शहरात आजकाल लुटमारीच
प्रमाण वाढलं आहे. लोकांना धाक दाखवून लुटलं जातंय. त्या बातमीमुळे रात्री घराकडे परतणारे सगळे चाकरमाने त्या लुटीचे शिकार होत होते. त्यात हि बया अपरात्री घरी येते त्यामुळे संरक्षणाच्या हेतूने
ति पिस्तुल स्वतःजवळ बाळगत असेल. कारण रुबेला स्वतःच्या काळजीबाबत दक्ष असायचीच. मेरीला हा स्वतःचा तर्क पटला, आपण उगाचच सुतावरून स्वर्ग गाठतोय असं तिला वाटलं. डोळे मिटून डाव्या कुशीवर वळत ती झोपी गेली.
आज मेरीने घरच्या पुढच्या भागात बागकाम करायचं ठरवलं होतं,
बाजूच्याच भागात्त राहणाऱ्या मिस्टर जोनाथन यांच्याकडून तिने छानशी रोपं आणली होती. जमिनीमध्ये
खड्डे केले आणि माती मोकळी केली. त्या खड्ड्यात जोनाथन यांच्याकडून आणलेली रोपं तिने एक एक करून त्यात लावून टाकली. अशी
कामे करण्यात मेरीला मोठी मौज वाटायची, पण एवढ्याशा कामानेदेखील तिला थकायला झालं.
रात्री ती न जेवताच झोपी गेली, रात्री तिला जाग आली तेव्हा तिला भुकेची जाणीव
झाली, खाली जाऊन काहीतरी खाऊन यावं असं तिला वाटलं. किचन मधे जाऊन तिने खाऊन घेतलं,
टेबलावरच्या रुबेलाच्या जाडजूड पर्सच्याकडे पाहून ती घरात आलेली असल्याचं दिसतं होतं, आल्या आल्या रुबेला झोपी गेली होती. जेवण करून मेरी आपल्या खोलीमध्ये आली, सहज म्हणून झोपायच्या आधी तिने खिडकीचा पडदा जरा बाजूला केला आणि बाहेर
पाहिलं. बाहेर सगळीकडे अंधार दिसत होता, रस्त्याचवरचे दिवे अंधुकपणे लुकलुकत होते,
रस्त्याच्या पलीकडे झुडूप आणि झाडी असल्याने तिथे काहीसा अंधार होता. मेरी पडदा
सरकवून आपल्या बिछान्यावर जाणारच होती तेवढ्यात तिला रस्त्याच्या पलीकडील झाडीमध्ये एक लालबुंद
ठिपका दिसला, डोळे बारीक करून मेरीने पाहिलं पण तिथे पुरेसा प्रकाश नसल्याने तिला
स्पष्ट दिसेना. मेरीला तो लाल ठिपका ठराविक अंतराने गडद होताना दिसत होता. नक्की काय होतं ते हे पाहण्याकरिता मेरीने डोळे किलकिले केले आणि खिडकीच्या काचेला डोळा लावून पाहण्याचा प्रयत्न केला.
अरेच्चा कोणीतरी तिथे सिगारेट ओढत होतं तर, तो लाल ठिपका म्हणजे सिगरेटच टोक होतं, कोणीतरी
त्या अंधारात सिगारेट ओढत उभा होता. मेरीच्या छातीत धडधडायला लागलं. तरी मेरी तशीच
उभी राहून पाहत होती, रात्रीच्या काळोखात तिथ सिगारेट ओढण्यात तिथे कोणाला स्वारस्य
असणार होतं काही कळतंच न्हवते, काही वेळाने तो ठिपका विझला, तिथे जे कोणी होतं ते
मागच्या मागे निघून गेलेलं असणार कारण नंतर तिथे काहीचं दिसलं नाही. मेरीच्या मनात
विचारांचं काहूर दाटलं होतं. कोण होतं तिथें? आणि जे कोणी असेल ते अपरात्री तिथे या वेळी सिगारेट ओढत का उभं असेल? बराच वेळ मेरीला झोप लागली नाही. त्या रात्री पाहिलेली
ती गोष्ट मेरीने कोणालाच सांगितली नाही, आपला मित्र डॅनिअलला हि घटना सांगावी का
असा तिला प्रश्न पडला पण नंतर तिला वाटलं कि असं काही सांगितलं कि डॅनी उगाचंच
आपली थट्टा करेल नकोच त्यापेक्षा. इथलाच एखादा रहिवासी तिथे सिगारेट ओढत उभं नसेल कशावरून मेरीने स्वतची समजूत घालत विचार केला.
त्यामुळे मेरीने कोणालाच काहीही सांगितलं नाही.
बागेतल्या रोपांची निगा राखण्यात
आणि साफसफाई करण्यात दिवस कसा गेला ते मेरीला कळलच नाही. रात्र झाल्यावार ती आपल्या खोलीत आली. बाहेर थंडी वाढली
होती म्हणून मेरीने हिटर वाढवला आणि खिडकीतुन बाहेर पहिल, बाहेरच्या वातावरणात खूप शांतता होती. पडदा सरकवून मेरी झोपायला
वळाली. काम केल्याने तिला लागलीच झोप लागली. मधे कधीतरी रात्री कसल्यातरी आवाजाने मेरीला जाग आली कसल्यातरी बुटांच्या करकरण्याचा आवाज होता
तो. रुबेला आली असेल म्हणून मेरी तशीच पडून राहिली.
तेवढ्यात तिला आपल्या खोलीच्या
बाहेर कसलीतरी चाहूल जाणवली. मेरीने आपले कान टवकारले, खोलीबाहेर हळूहळू पावलं
टाकत असल्यासारख काहीतरी तिला जाणवलं.
तिच्या कपाळावर एवढ्या थंडीत देखील घाम आला, तिने
पांघरून घट्ट धरून ठेवलं आणि शांतपणे पडून कानोसा घेत राहिली. नाही म्हटल तरी
तिला भीती वाटतच होती. आपल्या रूमच्या बाहेर एवढ्या रात्री कोण असेल या विचारांनीच तिला घाम फुटला. काहीवेळ कसलीच हालचाल जाणवली नाही. मेरीचे कान बाहेरचा आवाज
घेण्यासाठी आसुसलेले होते. काहीवेळात पावलांचा आवाज परत आला.
बाहेर जे कोणी होतं ते जिना
उतरून खाली गेलं होतं. मेरी अजून पांघरून घट्ट पकडून होती. तिची छाती अजून धडधडतच
होती, खोलीमध्ये हिटर असूनपण तिच अंग गारठल्यासारखं झालं होतं. कोण असेल बाहेर तिला काहीच अंदाज
न्हवता. रुबेला होती का? जर ती असेल तर ती असं चोरून का येईल? नाना प्रश्न मेरीला
पडू लागले होते. तिने बाजूच्या घडयाळात पाहिलं
दोन वाजून वीस मिनिटे झाली होती...
क्रमशः

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Fell free to share your Feedbacks