२२ मार्च, २०२५

गुप्तहेर सत्यवीर आणि भूतबंगल्याचे रहस्य -भाग ५

 


भाग ५

गावातीलच एका छोट्याश्या हॉटेलमध्ये मिसळ खात सत्यवीर बसला होता. हॉटेलमध्ये इतर कोणीही गिऱ्हाईक न्हवते. शेंडेंच्या बंगल्यातील होणाऱ्या भुताटकीच्या घटनांमागे नक्की कोण असावे असा विचार करत तो बसला होता. गावात नीट व्यवस्थित चौकशी करावी असा त्याचा विचार होता. भूतबंगल्यावर जाऊन पाळत ठेवणे देखील गरजेचे होते. हरिभाऊ आपली घरातली कामे उरकून नंतर इथेच येणार होते. नंतर पुढचं काय ते ठरवावं सत्यवीर असं विचार करत बसलेला असतानाच त्याला बाजूच्या रस्त्यावरून एक गाडी हॉटेलसमोरुन पुढे गेलेली दिसली, त्याची नजर त्या गाडीवर गेली असता गाडीमध्ये शेंडेंचा मुलगा भैरव आणि त्यांचा मेहुणा रावसाहेब बसलेले दिसले, मागच्या सीटवर पाठीमागे गावातीलच दोन तरुण पोरं उगाचच दात काढत बसलेली होती. गाडीला छत न्हवत ग्रामीण भागातील जीप सारखी गाडी होती त्यामुळे सत्यवीरला भैरव आणि रावसाहेबांना ओळखता आलं. ते नक्की कुठे जातायत हे पाहावं म्हणून सत्यवीर आपलं खाण संपवून उठला आणि हॉटेल मालकाकडे गेला.

दादा, मगाशी एक जीप या मार्गावरून पुढे गेली ती नक्की कुठे गेली असेल” सत्यवीर ने विचारलं.

“ ती जीप व्हय, शेंडे साहेबांच्या पोराची जीप व्हती ती. गेले असतीला उंडारायला तळ्याकड” हॉटेलमालकाने माहिती पुरवली.

“ अच्छा म्हणजे पुढे तळे आहे तिथे जातात तर ते “ सत्यवीर म्हणाला.

“ हा तित तळ हाये, तित जात्यात, भलतीच अवखळ कार्टी हायती बघा. डोक्याला नुसता उच्छाद आनत्यात.” हॉटेल मालक वैतागून म्हणाला. हॉटेल मालकासोबत बोलून सत्यवीरने ती जीप कुठे गेली याची माहिती मिळवली आणि त्यांच्यामागे ते नक्की काय करतायत हे पाहायला त्यांच्यामागे निघाला.

तळ्याच्या परिसर तिथून जास्त काही लांब न्हवता. गावातीलच बाय बापड्या तिथे धुणं धुवायला येत असायच्या. सत्यवीर काही मिनिटातच त्या ठिकाणी पोहोचला. समोर त्याला दिसलं कि तळ्याच्या ठिकाणी जीप उभी करून भैरव आणि रावसाहेब तळ्याच्या काठावर धुणं धुणाऱ्या बायांकडे पाहत काहीतरी शेरेबाजी करत उभे होते. सोबतची दोन पोरे उगाचच खी खी करत हसत त्यांना साथ दत होती. गावातील गरीब बाया बिचाऱ्या गपगुमान धुणं धूत होत्या. सत्यवीर तिथे पोहोचला आणि त्या जीपच्या जवळ गेला, त्याला भैरव आणि रावसाहेबांच हे वागणं अजिबात आवडलेलं न्हवत. जीपच्या बोनेटवर भैरव आरामात बसला होता, त्याच्या जवळ रावसाहेब उभा होता. सत्यवीर जवळ येताच त्या दोघांची नजर त्यावर गेली.

“ आ..इकड कुट फिरताय म्हणावं आता पाव्हण” बेरक्या नजरेने रावसाहेबाने सत्यवीरच्या या उलट बोलण्याने भैरव चांगलाच चिडला. कोण कोठला नवखा माणूस आपल्या गावात येऊन आपल्याला प्रश्न विचारतो म्हटल्यावर त्याची चांगलीच सटकली.

“ ए...आर बसतो का गप..उलट प्रश्न विचारतोस का आम्हाला” भैरव कडाडला.

“ असू द्या भाचं. आपल्या हरिभाऊकड आलंय हे बेणं. नवीन मानसाला आपली अजुक वळक न्हाही” रावसाहेब छद्मी हास्य करत म्हणाला.

“अरे हो ओळखीवरून आठवलं. तुम्ही शेंडे साहेबांचे सुपुत्र आहात ना? कामधंदा करता कि नाही काही? कि आत्ता जे करताय हेच काम आहे तुमचं. हे शेजारी उभे असलेले तुमचे मामा ना? तुम्हाला काही चांगला उपदेश देत असावेत असं वाटत नाही” सत्यवीरने अतिशय तिखट आवाजात भैरवला सुनावलं होतं.

त्याच्या या बोलण्याने धुणं धुणाऱ्या बायकासुद्धा हा कोण नवीन माणूस शेंडेंच्या मुलाला बोलतोय म्हणून काम सोडून पाहून लागल्या. सत्यवीर हे बोलण भैरवच्या जिव्हारी लागलं होतं.

“ए याला इथून हाकलून द्या रे, लयच चुरूचुरू बोलतोय” भैरवने बाजूच्या दोन हडकुळ्या अंगाच्या पोरांना सांगितल.

तसं ती दोन पोरं सत्यवीरकडे त्याला इथून हाकलून देण्यासाठी जवळ आली. त्यातील एकाने सत्यवीरच्या कॉलरला हात लावायला हात पुढे केला. पण सत्यवीरने चपळाईने त्याचा हात पकडला आणि त्याची बोटे पुढे वाकवून अगदी सहज त्याला बाजूला केल. ते हडकुळं पोरगं बोंबलत हाताला पकडून बाजूला जाऊन पडलं. त्याला तसं पडलेलं पाहून दुसरं पोरगं सत्यवीरच्या जवळ त्याचा हात पकडायला आलं. जसं त्या दुसऱ्या पोराने हात सत्यवीरजवळ आणला तसं त्याच्या मनगटाला पकडून सत्यवीरने असं काही वाकवल कि त्या पोराच्या मस्तकातच कळ गेली आणि जोरात ओरडून ते पोरगं बाजूला झाला. अगदी उभ्याउभ्या जागेवरून न हलताच सत्यवीरने त्या दोन्ही लुकड्या सुकड्या पोरांना बाजूला केलं होतं. त्याला तसं करताना पाहून भैरव आणि रावसाहेब तर चकितच झाले होते. त्यांना वाटलं होतं हरिभाऊंच्या घरात कोणीतरी लहान सहान कामे करणारा माणूस आला असावा त्याला सहज उडवून लावूयात पण त्यांना सत्यवीरची खरी ओळख माहित न्हवती. भैरव आता जीपच्या बोनेटवरून खाली उतरला होता आणि रागातच सत्यवीरकडे पाहत होता. सत्यवीर मात्र अगदीच शांतपणे त्यांच्याकडे पाहत त्या दोघांच्या अगदी नजीक गेला.

“मला इतकंच म्हणायचं होतं भैरव कि आपल्या वडिलांची गावात प्रतिष्ठा आहे ती अशी वाह्यात वागून धुळीला मिळवू नये काहीतरी उद्योग करावा नसेल तर वडिलांना कामात हातभार लावावा. नसेल तर बंगल्यावर जाऊन तिथे खरंच भुते आहेत कि नाहीत याचा छडा लावावास” भैरवच्या नजरेला नजर देत सत्यवीर स्पष्ट शब्दात म्हणाला आणि आपल्या अंगावरचं जॅकेट काढून त्याने दुसऱ्या हातात धरलं. जसं सत्यवीरने जॅकेट काढलं तसं फक्त टी-शर्ट आणि जीन्समधे उभं राहिलेल्या सत्यवीरकडे पाहत भैरव चपापलाच. रावसाहेबांनी तर आ च वासला.

सत्यवीरची शरीरयष्टी भलतीच पिळदार होती, त्यातूनच त्याचे पोट पूर्ण सपाट आणि त्यांचे दोनही दंड भरलेले आणि जाडजूड भासत होते. अंगातील जॅकेटमुळे सत्यवीरची शरीरयष्टी सहसा दिसून येत नसे. त्यांना मुद्दाम धाक दाखवण्याच्या उद्देशाने सत्यवीर तसं वागत होता. आपला एक हात सत्यवीरने रावसाहेबांच्या खांद्यावर ठेवला आणि मुद्दाम त्यांच्या खांद्यावर जोर दिला. तसं रावसाहेबांना खांद्यात जोरात कळ आली आणि ते जरासे कण्हू लागले. तळ्यावरील धुणं धुवायला आलेल्या बायका सुद्धा तोंडावर पदर घेऊन खुसपुसून हसू लागल्या.

“ तुम्हाला दोघांना कुस्ती खेळण्याची आवड आहे हे मला माहित न्हवत. काय आहे ना आमच्या शहरात कुस्त्यांचे आखाडे नसतात. इथे कुठे आखाडा असेल तर सांगा मला. सोबतच सराव करू आखाड्यात.. काय म्हणता?”  शेवटच वाक्य एकदम हळुवारपणे म्हणत भैरवच्या नजरेत नजर रोखत चेहऱ्यावर करारीपणा आणत सत्यवीर म्हणाला. बोलत असताना सत्यवीरने रावसाहेबांच्या खांद्यावर ठेवलेल्या हाताने जोरात दाब दिला तसं रावसाहेब कळवळला त्यांच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्ट दिसून आली. आधीच अधू झालेल्या हाताला पकडून थांबलेली पोरं पाहून भैरव गांगरला होता, त्यातच रावसाहेबांच वेदनेने भरलेल तोंड पाहून भैरवने आवंढाच गिळला काय बोलावे हे त्याला सुचेना. काहीही न बोलता आपलं भय लपवत तो जीपच्या सीटवर जाऊन बसला आणि म्हणाला “चल मामा असल्या लोकांच्या तोंडी आपल्याला लागायचं नाहीये

रावसाहेब कण्हत कण्हत आपला दंड पकडत बाजूला जाऊन बसला.. क्षणार्धातच जीप सत्यवीरपुढून निघून गेली. सत्यवीर मात्र गालातल्या गालात हसत होता. तळ्यावरील बायका कौतुकाने सत्यवीरकडे पाहत होत्या. आज भैरव आणि रावसाहेबांना गावात अद्दल घडवणारा कोणीतरी भेटला होता.

तळ्यावरून सत्यवीर परत निघाला. मगाशी थांबलेल्या हॉटेलमध्ये तो परत आला होता. तिथे हरिभाऊ त्या हॉटेलमालकासोबत गप्पा मारत उभे होते. सत्यवीरने हरिभाऊंना तळ्यावरील घडलेला प्रसंग सांगितला तसं हरिभाऊ चकित होऊन ऐकतच राहिले. पण एका अर्थी बरंच झालं त्या दोघांचं जरा अतीच झालेलं होतं त्यांना अशा प्रकारें अद्दल घडवणारा कोणीतरी हवाच होता. गप्पाटप्पा झाल्यावर सत्यवीरने आज रात्रीच्या वेळी बंगल्यावर पाळत ठेवायला जायचा प्लान हरिभाऊंना सांगितला चाचरतच हरिभाऊंनी त्या गोष्टीला मान्यता दिली. त्यानुसार संध्याकाळ झाल्यावर दोघेही हॉटेलमालकाच्या गाडीवरून बंगल्याच्या दिशेने रवाना झाले. काही वेळातच बंगल्याच्या परिसरात ते दोघे येऊन पोहोचले. बंगल्याच्या आसपास नेहमीसारखीच स्मशानशांतता होती कसलाही आवाज न्हवता. मंद वारा वाहत होता. आपली गाडी बाजूच्या झाडीत कोणाला दिसू नये अशी लावली. सत्यवीर आणि हरिभाऊ बंगल्याच्या बाजूला जिथे पत्र्याचं शेड उभं होतं तिथे येऊन पोहोचले. तिथून पुढे उसाची शेते चालू होत होती. शेडच्या मागून बंगला व्यवस्थित दिसत होता, तिथे एका दगडावर सत्यवीर बसला.

“ आपण इथे बसलो आहोत खरे पण नक्की कोण येत असेल इथे रात्रीच्या वेळी काय माहित “ बाजूच्याच एका दगडावर बसत हरिभाऊ बंडीतून पानाचे पुडकं काढत म्हणाले.

“ जे कोणी असेल ते लवकरच समोर येईल“ सत्यवीर शेडच्या आडूनच बंगल्याकडे पाहत बोलला.

“ पण ते जे कोणी असतील हे आपल्याला कसं समजणार आणि समजल्यानंतर नक्की आपण करणार काय आहोत.” हरिभाऊ बोलले.

“ बंगल्यात ते कोणत्या तरी मार्गाने येत असावेत आणि परत त्याचं मार्गाने जात असावेत, जात असताना एका बेसावध क्षणी त्याचावर झडप घालून त्याच्या मुसक्या आवळायच्या, या शेडमध्ये दोरखंड असेलच ना” सत्यवीर म्हणाला.

“ हो आहे, बांधकामाच्या साहित्यासाठी लागतो तो दोरखंड आणि अजून सामानदेखील आहे” हरिभाऊ तोंडात पान टाकत म्हणाले.

सत्यवीरने आपल्या पँटच्या चोरकप्प्यात हात घालून चाकू नीट व्यवस्थित जागेवर आहे कि नाही ते पाहिलं. हरिभाऊंनी ते पाहिलं आणि म्हणाले “ तू या चाकूचा वापर करावा अशी वेळ येऊ नये “

“ वेळ आली तर करावाच लागेल हरिभाऊ, या ठिकाणी चाकूच पुरेसा आहे. नाहीतर गरज पडली तर मी छोटंसं पिस्तुल देखील जवळ बाळगून असतो.” सत्यवीरने माहिती पुरवली.

ते दोघे बोलत असतानाच बंगल्याच्या समोर रस्त्यावर एक मोटारगाडी येऊन थांबली. त्यातून एक बाई उतरून गाडीजवळूनच बंगल्याकडे पाहू लागली. गाडीच्या आवाजाने सत्यवीर आणि हरिभाऊ याचं लक्ष बंगल्यासमोरच्या रस्त्याकडे गेलं.

“ हि तर ती मिस शीला आहे. हि तिथे उभं राहून काय करतेय” हरिभाऊ जरा डोकं वर काढत म्हणाले.

“ पाहूयात नक्की ती काय करतेय इथे” भुवया ताणत सत्यवीर रस्त्यावरच्या त्या गाडीकडे पाहत म्हणाला.

काहीवेळ बंगल्याकडे एकटक पाहत निरीक्षण करून मिस शीला आपल्या गाडीत परत बसली आणि रस्त्यावरून निघून गेली.

“ हि बाई परत आली तशीच निघून गेली” हरिभाऊ डोळे बारीक करत बोलले. 

“ नक्कीच ती काहीतरी पाहत उभी होती हरिभाऊ, कदाचित तिच्याच सांगण्यावरून कोणीतरी बंगल्यात चित्रविचित्र आवाज काढत असणार, ते काम नीट होतंय का ते पाहायला ती आली असणार “ शेडच्या पत्र्याच्या मागे लपत सत्यवीर म्हणाला.

संध्याकाळ सरून आता चांगलाच अंधार पडलेला होता. रस्त्यावर शुकशुकाट पसरला होता. सत्यवीर आणि हरिभाऊ शांतपणे पत्र्याच्या शेडमागे बसलेले होते. कोणत्याच बाजूने ते तिथे बसलेल आहेत हे लक्षात येत न्हवत. बंगल्याच्या मुख्य दरवाजापासून ते मागच्या भागापर्यंतचा सगळा भाग या जागेवरून नजरेच्या टप्प्यात येत होता. मध्ये बराच गेला हरिभाऊंना आता डुलकी येऊ लागली होती. सत्यवीर मात्र टक्क नजर लावून बंगल्याच्या सगळ्या बाजूला पाहत बसला होता, रात्रीच्या अंधारात स्पष्ट दिसतं न्हवत. म्हणून तीक्ष्ण नजरेने तो सगळीकडे पाहत होता.

अजून किती वेळ असं बसायचं म्हणून हरिभाऊ विचारणारच होते पण तितक्यात बंगल्याच्या मागच्या बाजूला शेताच्या बाजूने काही काळ्या आकृत्या पुढे येताना दिसल्या. सत्यवीर सावध झाला आणि त्याने हरिभाऊंना हलवून सावध केलं. पुढे जाऊन शेडच्या मागे चिकटून सत्यवीर हळूच त्या बाजूला पाहू लागला. अगदी सावकाशपणे चालत त्या आकृत्या बंगल्याच्या मागच्या भागातील खिडकीतून बंगल्यात गेल्या.

“ कोणीतरी गेलंय बंगल्यात सत्यवीर. आता काय करायचं आपण” भेदरलेल्या अवस्थेत हरिभाऊ म्हणाले.

“ थोडावेळ वाट पाहूयात काय होतंय ते सत्यवीर आपली नजर न हटवता तिथे पाहत म्हणाला.

की वेळाने बंगल्यातून मोठ्याने कुsss असा आवाज ऐकू आला. आवाज एवढा भयानक होता कि हरिभाऊ घाबरून सत्यवीरच्या मागेच येऊन उभे राहिले. थोडावेळाने चित्रविचित्र आवाजात किंकाळी मारल्याचा आवाज आला.

सत्यवीर आणि हरिभाऊ शांतपणे आवाज ऐकत उभे होते. फारच विचित्र आवाजात त्या किंकाळ्या ऐकू येत होत्या. कोणीतरी व्यवस्थितपणे अशा आवाजात ओरडत होते कि ते ऐकून कोणालाही वाटेल कि इथे भुते वावरत आहेत. काही वेळ आवाज काढल्यानंतर शांतता पसरली. सत्यवीरची विचारचक्रे फिरू लागली. बंगल्यात ठिकठिकाणी उघड्या खिडक्यांच्या जागा आहे तिथूनच कोणीतरी आतमध्ये शिरलं आहे, जे कोणी बंगल्यात आहे ते जिथून आलंय तिथूनच मघारी परतेल असं समजून चाललं तर ते जातानाच त्याच्यावर झडप घालणं योग्य होईल. सत्यवीर विचारात मग्न असतानाच काही किंकाळ्या आणि ओरडण्याच्या आवाजाने बंगला दणाणून गेला, रात्रीच्या त्या भयाण शांततेत या आवाजाने अजूनच भीती वाटत होती. हरिभाऊ सत्यवीरच्या मागेच उभे होते. काही वेळ शांततेत गेला आणि आवाज येणे बंद झाले.

“ हरिभाऊ आता तयार राहा जे कोणी बंगल्यात मागच्या बाजूने गेलंय ते माघारी जाताना सुद्धा त्याचं बाजूने जाणार कारण तो मार्ग त्याला सुरक्षित वाटत असणार” कुजबुजत्या आवाजात सत्यवीर हरिभाऊंना म्हणाला. यावर हरिभाऊंनी फक्त मान डोलावली. किंकाळ्याचे आवाज बंद आले तसे सत्यवीर आणि हरिभाऊ तयारीत उभे राहिले कारण आता बंगल्याच्या मागून ती व्यक्ती कधीही बाहेर येऊ शकत होती. सत्यवीरने पत्राच्या शेडमधून लांब दोरखंड घेऊन तो हरिभाऊंच्या हातात दिला आणि सावकाशपणे चालत ते दोघे बंगल्याच्या बाजूच्या भागात गेले. तिथून बंगल्याच्या मागचा भाग स्पष्ट दिसत होता. भिंतीला चिटकून सत्यवीर आणि हरिभाऊ उभे होते. काही वेळाने बंगल्याच्या मागच्या भागात जिथे खिडकीसाठी जागा बनवली होती तिथून परत काळ्या आकृत्या हळूच बाहेर पडल्या आणि शेताच्या दिशेने जात आतमधे गडप झाल्या.

“ चला हरिभाऊ सावज निघालंय” एवढं बोलून सत्यवीरने पॅन्टच्या चोरकप्प्यातून आपला चाकू बाहेर काढला आणि चपळाईने शेताच्या आतमध्ये घुसला. शेतात इतका अंधार होता कि डोक्यात बोट घातलं तरी दिसू नये तरीसुद्धा अंदाज घेत घेत सत्यवीर पुढे सरकत होता. समोर असणाऱ्या त्या काळ्या आकृत्यांना आपली चाहूल लागू नये याची दक्षता घेत सत्यवीर त्यांचा पाठलाग करू लागला. मागोमाग दोरखंड हातात घेऊन सावकाशपणे हरिभाऊ त्याच्या मागोमाग येत होते खरंतर मनातून घाबरलेले होते. त्या काळ्या आकृत्या आता जलदगतीने पुढे चाललेल्या होत्या. शेतांची रांग सोडून आता एक बांध ओलांडून ते दोघे दुसऱ्या शेतात घुसले होते. सत्यवीर त्या आकृत्यापासून अंतर राखून पुढे चालू लागला पण थोड्या वेळाने त्या आकृत्या नजरेच्या टप्प्यातून दिसेनाशा झाल्या. सत्यवीर आता जरा घाईने पुढे जाऊ लागला हरिभाऊ आणि त्याच्या मधले अंतर कमी होऊ लागले. उसाच्या पाचटातून मार्ग काढत सत्यवीर पुढे चालला होता. तेवढ्यात सत्यवीरला बाजूच्या उसाच्या शेतातील गर्दीत खुसपूस ऐकू आली, कोणीतरी तिथे होतं आणि हळूहळू पुढे सरकत होतं. सत्यवीर श्वास रोखून तिकडे कान देऊन ऐकू लागला. बाजूच्या उसाच्या रांगांमधून कोणीतरी पुढे येत होतं. हळूहळू त्याच्या चालण्याचा वेग वाढला. सत्यवीर हातातला चाकू घेऊन तयार होताच, पुढे उडी घेत कोणीतरी सत्यवीरवर काठीचा वार केला. सत्यवीर आधीच सावध होता, आपल्या चाकूने बरोबर काठीचा लक्षभेद करत त्या काठीचे दोन तुकडे केले होते. अंगात बंडी आणि पायजमा घातलेलं कोणीतरी सत्यवीरच्या बाजूला उभं होतं. हातातल्या तुटलेल्या काठीकडे पाहत ती व्यक्तीने पुढे जाऊन सत्यवीरवर हल्ला करणार इतक्यात मागून हरिभाऊंचा आवाज आला.

“ केशव थांब. ते माझ्यासोबत आहेत. मी हरिभाऊ आहे “ अंधारात ओळख पटण्यासाठी हरिभाऊ बोलले

त्या आवाजासरशी सत्यवीर आणि ती व्यक्ती हातातली हत्यार हवेतच रोखून मागे पाहू लागली. हरिभाऊ धपापत्या उराने त्या दोघांजवळ येऊन पोहोचले.

सत्यवीर हा केशव आहे, बाजूलाच याचं शेत आहे, रात्री शेताला पाणी द्यायला तो इथे येत असतो आणि केशव हा माझ्या घरात पाहुणा म्हणून आलेला माझ्या मित्राचा मुलगा सत्यवीर आहे” हरिभाऊंनी एका दमात सांगून टाकलं.

“ ओह्ह हरिभाऊ तुम्ही ओळखलंच नाही मी...मला वाटलं शेतात रानटी जनावर फिरत आहेत कि काय म्हणून मी बघायला आलो, परत यांना पाहून वाटलं कि कोणी चोर उस चोरायच्या उद्देशाने शेतात घुसला कि काय कारण तुम्ही यायच्या आधीपण काहीतरी खुसपुसत इथून पुढे गेलं होतं” केशवने सत्यवीरकडे पाहत सांगितलं.

सत्यवीर आणि केशव आता व्यवस्थित उभे राहिले होते. केशव अंगापिंडाने चांगलाच मजबूत असा तरुण होता. हरिभाऊंनी आपण इथे का आलो आहोत याचं कारण सांगितलं.

“ आपल्याला त्या व्यक्तीला पकडायला हवं आहे केशव “ हरिभाऊ म्हणाले

“ आपल्याला गप्पा मारायला वेळ नाही हरिभाऊ, त्या काळ्या आकृत्या समोर जिथे गेल्या आहेत, तिथे आपल्याला वेळ न दवडता लवकर जायला हवं” सत्यवीर चाकुवरची पकड मजबूत करत म्हणाला.

“ काळजी करू नका इथला सगळा परिसर माझ्या पायाखालचा आहे. रात्रीच्या अंधारात सुद्धा मला इथल्या सगळ्या पाउलवाट चोख माहिती आहेत, त्यांना जास्त दूर जाता येणार नाही कारण शेतात पाणी सोडला आहे गाळात पाय रुतून त्यांची गती मंदावेल ” असं म्हणून केशव सुद्धा त्या दोघांसमवेत त्या आकृत्यांच्या मागावर निघाला. जाताना त्याने सत्यवीर आणि हरिभाऊंना याच मार्गाने पुढे जात एका बांधावरून पुढे सरकायला सांगितलं आणि स्वतः दुसऱ्या बाजूने जात पुढे गेलेल्या त्या अनोळखी आकृत्यांच्या मागावर गेला. दोन्ही बाजूंनी पुढे जात त्या अनोळखी आकृत्यांना कोंडीत पकडायचा डाव त्यांनी आखलेला होता. सत्यवीर आता वेगात पुढे जात होता. केशवच्या मते पुढच्या शेतांना पाणी दिल्याने आतमध्ये बराच गाळ साठला असून तिथून जे कोणी गेलंय वेगात पुढे कोणालाच जाता येणार न्हवत. तरीसुद्धा हि आलेली संधी सोडायची नाही म्हणून सत्यवीर शेताच्या बाजूबाजूने अंदाज घेत पुढे निघाला होता.

अचानक पुढे जोरात कण्हण्याचा आवाज आला. आवाज ऐकून सत्यवीर आणि हरिभाऊ वेगात पळत त्या बाजूने पाळायला लागले. पळता पळता हरिभाऊंचा पाय शेतातील पाणी दिलेल्या भागात अडकू लागल्याने त्यांचा वेग मंद होऊ लागला. सत्यवीर मात्र सरावाने पुढे जात आवाज आलेल्या दिशेने निघाला. थोड्याच वेळात तो एका उसाच्या रांगेतून पुढे आला तिथे त्याला केशव हातात तुटलेलं दांडका घेऊन दिसला त्याच्या समोर एक अंगावर काळा कपडा पांघरलेला एक व्यक्ती उभा असलेला दिसला ज्याच्या हातात भला मोठा चाकू होता आणि अजून एक व्यक्ती त्याने सुद्धा काळा कपडा अंगावर पांघरलेला होता जमिनीवर लोळत कण्हत होता.

हातात चाकू घेतलेला तो माणूस केशववर चाल करून जाणार होताच तेवढ्यात सत्यवीरने मागून येऊन अशी काही ढुशी त्या माणसाला मागून दिली कि तो त्याच्या तोंडावर जाऊन पडला. मग क्षणाचाही विलंब न करता सत्यवीरने त्याच्या हातातील चाकू काढून बाजूला फेकला आणि हाताने एक जोरदार फटका त्या पडलेल्या माणसाच्या कानावर दिला तसा तो माणूस देखील कानाला हात लावून कण्हत पडला. काही वेळात हरिभाऊ दोरखंड घेऊन पळत पळत आले.

“ इथे जवळपास कुठे विसाव्यासाठी जागा आहे का?” सत्यवीरने केशवला विचारलं.

“ हो जवळच माझं एक छोटं खोपट आहे, रात्री पाणी द्यायला शेतात आलं कि आम्ही तिथे आराम करतो” केशवने माहिती दिली.

“ अच्छा मग आता यांना तिथेच नेऊन बांधून ठेवूयात आणि यांची चांगली चौकशी करूयात” असं म्हणत सत्यवीरने हरिभाऊंकडून दोरखंड घेतला आणि कण्हणाऱ्या त्या दोन्ही इसमांचे हात बांधून त्याची टोक पुढे केशवच्या आणि मागे स्वःतच्या हातात बांधून त्यांना घेऊन केशवच्या खोपटाकडे निघाला. खोपट जवळच असल्याने ते लवकरच तिथे पोचले. ते एक छोटस खोपट होतं आतमध्ये एक लाकडी बेड आणि शेतीची अवजारे होती. केशवने आतमध्ये जाऊन दिवा लावला. सत्यवीरने त्या दोन्ही इसमांचे हात आणि पाय बाजूच्या खांबाला दोरखंडाने बांधून टाकले. हरिभाऊ दारातच उभे होते.

“ बोला आता, कोण आहात तुम्ही दोघं आणि बंगल्यात काय करत होतात” बाजूच्या बेडवर बसत सत्यवीरने प्रश्न विचारायला सुरुवात केली.

ते दोघेजण दिसायला चांगलेच बदमाष वाटत होते. दोघे अजूनही कण्हत होते, केशवच्या दांडक्याचा प्रहार एकाच्या कपाळावर बसल्याने तिथली जागा सुजून चांगलीच लालसर दिसत होती. त्यातल्या एकजण वजनाने चांगलाच जाडजूड असून दुसरा मध्यम शरीरयष्टीचा होता. दोघांच्या अंगात जुनाट मळकट कपडे होते जेणेकरून अंधारात ते उठून दिसू नयेत त्यातच अंगावर काळे झगे असल्यासारखे कापड घातलेलं होते.

 “ अ..आ..आम्ही चोर आहोत, बंगल्यात क.. काही मिळते का हे बघायला आम्ही चोरून आत शिरलो होतो” माझं नाव रंगा आणि हा माझा साथीदार बाळू रंगा कण्हत म्हणाला.

“ अस्स... मग बंगल्यात गेल्यावर मोठमोठ्याने आवाज का काढत होतात, किंचाळत का होतात” हाताची घडी घालत गंभीरपणे सत्यवीरने प्रश्न केला.

केशव आणि सत्यवीरला पाहून ते दोघे चांगलेच घाबरले होते.

“ ते.. ते..असंच कोणी इथे येऊ नये म्हणून आम्हाला पकडू नये म्हणून..आम्हाला सोडून द्या आम्ही परत इथे येणार नाही कधी” रंगा चाचरत्त म्हणाला. तो धादांत खोटे बोलत होता हे सत्यवीरला ठावूक होतं आणि बऱ्या बोलाने तो सांगणार न्हवता म्हणून सत्यवीर म्हणाला” केशव मला वाटतं तुझा मगाच्या दांडक्याचा प्रसाद यांना अजून हवाय त्याशिवाय हे खरं बोलणार नाहीत” सत्यवीरच्या या वाक्यासरशी केशवने बाजूला पडलेले दांडके उचलले आणि काही कळायच्या आत दोघांच्या नडग्यांवर जोरात हाणले. तसे रंगा आणि बाळू मोठ्याने ओरडले.

“सांगतो सांगतो... आम्हाला रात्री तिथे मोठमोठ्याने आवाज काढण्यासाठी आणि लोकांना घाबरवण्यासाठी पैसे दिले होते” कण्हत रंगा पटकन बोलला.

“ कोणी दिले होते पैसे” सत्यवीरने विचारलं.

“ आम्हाला नाही माहित त्याचा चेहरा नीट पहिला नाही आम्ही” बाळू तडफडत म्हणाला. हात बांधल्याने त्याला दुखऱ्या भागावरून हातदेखील फिरवता येत न्हवता.

“म्हणजे...नीट काय ते स्पष्ट सांगा” सत्यवीर म्हणाला.

कण्हत कुथत ते दोघेही गडबडा लोळत होते आणि तशाच अवस्थेत ते बोलू लागले.

“काही महिन्यांपूर्वी एका व्यक्तीने आमच्याशी संपर्क साधून आम्हाला काही पैसे दिले होते आणि रात्री अपरात्री बंगल्यात जाऊन चित्रविचित्र आवाज काढायला सांगितले होते. त्या व्यक्तीचा चेहरा त्याने लपवला असल्याने आम्हाला कळले नाही कि तो कोण आहे”

“ओह्ह असं आहे तर... म्हणजे रात्री अपरात्री तुम्ही तिथे जाऊन ओरडत होतात का?

“अ..हो रात्री तिथे थांबायचो, कधी कधी उशीर झाला कि जाताना जेवणाचं पार्सल नेऊन जेवण सुद्धा तिथेच करायचो “ जाड शरीराचा रंगा म्हणाला.

“चिकन खाऊन हाडांचे तुकडे तुम्हीच टाकले आहेत तर तिथे. बऱ मग तुमच्या सोबत दुसरी कोणी बाई पण सामील आहे काय यामध्ये जी साडी घालून खिडकीत उभी राहून लोकांना घाबरवते” सत्यवीर म्हणाला.

“न.. ना.. नाही नाही बाई कोणी नाही आम्ही दोघेच आहोत” दोघेही एकदम म्हणाले.

थोडासा विचार करून सत्यवीरने परत प्रश्न केला – “बंगल्यात आतमध्ये खड्डे कशाला पाडलेत तुम्ही?”

“ना.. नाही आम्हाला माहित नाही.. आम्हाला नाही माहित खड्डे का पडलेत तिथे, आम्ही तिथे रात्री जायचो त्यामुळे एवढ काही कळत नसायचं. तसंपण आम्ही इतर कुठल्याच गोष्टीकडे लक्ष न देता पैसे मिळतात म्हणून गपचूप सांगितलेलं काम करून निघून यायचो” रंगा केविलवाणा भाव करत म्हणाला.

“ मी सुद्धा रात्री पाणी द्यायला यायचो तेव्हा उसाच्या शेतात फिरायचो, उसाच्या पाचटातून खुसपुसत जातानाचे आवाज अनेकदा मी ऐकले पण मला वाटलं कोणतातरी जंगली जनावर किंवा सरपटणारा प्राणी असेल म्हणून दुर्लक्ष केलं होतं. आजपण तसाच आवाज ऐकून मी जवळ जाऊन पाहावं म्हणून आलो होतो. तेव्हा तुम्ही दिसलात ” केशवने सांगितलं

एकंदरीतच हे चोर कोणाच्यातरी सांगण्यावरून बंगल्यात रात्री घुसून किंकाळ्या मारत असावेत जेणेकरून हा बंगला भूतबंगला वाटावा. पण हे करायला त्यांना कोणी का सांगितले बरे असावे असं सत्यवीरला वाटून गेलं.

सत्यवीर खोपटच्या बाहेर आला. बाहेर सगळीकडे अंधार पसरलेला होता. समोर पसरलेल्या शेतांकडे पाहत विचार करू लागला. सत्यवीरच्या मागोमाग हरिभाऊ खोपटातून बाहेर आले.

“ आता यांचं काय करायचं सत्यवीर” प्रश्नार्थक मुद्रा करून हरिभाऊ म्हणाले.

“ उद्या सकाळ झाली कि यांना पोलिसांच्या ताब्यात देऊन टाकूयात.” सत्यवीर शांतपणे म्हणाला.

“ हो ते करूच.. पण यांना हे कृत्य करायला कोणी सांगितलेलं असेल. संध्याकाळी आपण पाळत ठेवताना मिस शीला तिथे आली होती, तिनेच तर नाही ना कोणाकडून तरी यांना पैसे देऊन हे काम करायला सांगितलं ” हरिभाऊ म्हणाले.

“ मिस शीलाची पण चौकशी करूच सत्य काय ते लवकरच समजेल, पण भूतबंगल्यात कोणती भुते आहेत हे आपल्याला समजलं आहे त्यामुळे आता तिथे जायला घाबरण्याची गरज नाहीये” सत्यवीर म्हणाला.

हे दोघे बोलत असतानाच खोपटातून केशव बाहेर आला आणि सत्यवीर जवळ उभं राहून त्याला जवळून निरखून पाहू लागला. तो असं का पाहत होता हे दोघांना पण कळेना.

“ तुम्ही शहरात काम करणारे गुप्तहेर सत्यवीरच आहात ना केशव स्मितहास्य करत म्हणाला.

त्याच्या या प्रश्नासरशी सत्यवीर आणि हरिभाऊ एकमेकांकडे आश्चर्याने पाहतच राहिले.

क्रमशः

क्रमशः

१७ मार्च, २०२५

गुप्तहेर सत्यवीर आणि भूतबंगल्याचे रहस्य - भाग 4

 



सकाळी सत्यवीर झोपेतून उठला आणि लाडकी बाजेवर तसच आळसावलेल अंग टाकून तो उगाच पडून राहिला. हरिभाऊंच्या घराजवळच एक छोटी चूल होती त्यावर हंडा ठेवून हरिभाऊ पाणी गरम करत होते आणि खांद्यावरील पंचाने गरम हंड्याला लावून तो गरम झालेला पंचा डोक्याला लावत होते. म्हणजेच डोक्यावरील टेंगळाला शेक देत होते. त्यांना तसं करताना पाहून सत्यवीरला कालचा प्रसंग आठवला आणि हसू आवरलं नाही. हात तोंडावर धरून हरिभाऊंना ऐकू येऊ नये म्हणून खुसपुसत हसू लागला. पण त्याच्या खुसपूस करत हसण्याचा आवाज हरिभाऊंना आलाच.

“हस बाबा हस आमच्या वेंधळेपणावर..” गंभीर आवाजात मागे वळून न पाहता आपल्या कपाळाला पंचाने  शेक देत हरिभाऊ म्हणाले. सत्यवीर बाजेवरून उठत हरिभाऊंच्या शेजारी जाऊन बसला.

“माफ करा हरिभाऊ...पण कालचा प्रसंग आठवून हसल्यावाचून राहवलं नाही” सत्यवीर हसतच म्हणाला.

“भूतबंगल्यात गेल्यावर अशीच अवस्था होणार ना” अशी प्रतिक्रिया देऊन हरिभाऊंनी आपल्या कपाळावरील टेंगळाला शेक देणे चालूच ठेवले.

“मला तर तिथे एकाही भुताचा किंवा कोणत्या भूतसदृश विचित्र गोष्टींचा वास आला नाही.” चुलीपुढे हात शेकत सत्यवीर चवड्यावर बसला होता.

“पण वातावरण किती भयानक आणि स्मशानशांततेसारखे होतं तिथे” बंगल्याची आठवण काढताच हारीभाऊना हुडहुडी भरली होती.

“आजूबाजूला माणसांचा जास्त वावर नसल्यामुळे तसं वाटणं साहजिक आहे. पण मला तर तिथे वेगळेच काहीतरी जाणवले. असं वाटत होतं कि तिथे कोणीतरी चोरून लपून राहतंय” सत्यवीर म्हणाला.

“कसं काय?” हरिभाऊंनी विचारलं.

“जवळपास प्रत्येक खोलीत भिंतींवर चरे पडलेले होते ते मुद्दाम कोणीतरी पाडलेले वाटतात. जमिनीवर खोदलेले खड्डे माणसांनी खोद्ल्यासारखे वाटत होते बांधकाम करताना असे खड्डे कोणी घरात पाडत नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे बंगल्याच्या सगळ्यात आतल्या मोठ्या खोलीत जिथे लोखंडी कपाटे ठेववलेली आहेत तिथे एका टेबलाखाली हाडे पडलेली होती. एकदम छोटी छोटी हाडे होती. कदाचित कोंबडीच्या पायांची असावीत. चिकन खालून उर्वरित हाडे तिथे कोणीतरी टाकलेली असावीत. कापडाची बोचकी आढळली ज्यामध्ये कापडांचे तुकडे होते. ती कापडं अंगा खांद्याला गुंडाळून खिडकीत उभं राहिल्यास रात्रीत लांबून चित्रविचित्र आकार दिसत असावेत.” सत्यवीरने हरिभाऊंना माहिती पुरवली.

म्हणजे आतमध्ये कोणीतरी गुपचूप राहतंय आणि भुताचे आवाज काढतंय जेणेकरून लोक घाबरावेत” हरिभाऊ डोळे बारीक करत बोलले.

“निश्चितपणे, वरची पाहणी करून जिन्यावरून खाली येताना नेमके तुम्ही बाहेरून खाली हॉलमधे येत होतात. तुमच्या कातडी चपलेचा वाळूवर येणार कर्रकर्र आवाज ऐकल्यावर मला वाटलं कि इथे जे कोणी गुपचूप राहतंय ती व्यक्तीचं आली असणार म्हणून सावध होऊन मी पुढची पावले उचलली”  सत्यवीर जागेवरून उठत म्हणाला.

“बापरे..मग जर असं असेल तर आपल्याला लगेच शेंडे साहेबांना सांगावं लागेल. ते उगाचच भुताचा धसका घेऊन घाबरू लागले” हरिभाऊ सुद्धा जागेवरून उठत उभा राहिले.

“हो ते तर करूच. पण हे असं गुपचुप पणे तिथे कोण राहतंय याचा छडा लावायला हवा. त्यासाठी रात्री गुपचूप बंगल्याच्या आवारात जाऊन दबा धरून पाहायला हवं कि आतमध्ये कोण राहतंय” गंभीर आवाजात सत्यवीर म्हणाला.

यावर हरिभाऊ काहीच बोलले नाही पण एक गोष्ट तर समजली होती कि कोणीतरी लोकांच्या नकळत तिथे वावरतंय. पण ते कोण असावं याचा शोध घेणे क्रमप्राप्त होतं. सत्यवीरने झटपट अंघोळ वगेरे उरकली आणि शेंडेंच्या गावातल्या घराकडे जायला निघाला. हरिभाऊंना उगाचच काल दमछाक झाल्याने त्यांना आराम करायला घरातच थांबा असं त्याने सांगितलं आणि एकटाच तो गावातून निघाला. कच्चा रस्ता तुडवून गावातून इकडे तिकडे निरीक्षण करत तो शेंडेंच्या घरापाशी पोहला. गेटबाहेर एक मोठी चारचाकी उभी होती. गाडीकडे पाहतच गेट उघडून तो आतमध्ये आला. नोकरचाकर झाडांना पाणी घालण्याचं आणि वाळलेल्या पानांचा पालापाचोळा गोळा करण्याचं काम करत होते. सत्यवीरला पाहून त्यांनी ओळखलं कि हा काल हरिभाऊंसोबत आलेला त्यांचा पाहुणा आहे म्हणून कोणीही त्याला हटकल नाही. मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये येऊन तो तडक शेंडेंच्या ऑफिसच्या कामाच्या खोलीकडे निघाला. ऑफिसच्या खोलीचा दरवाजा उघडाच होता. आतमधून जरा मोठ्याने बोलण्याचा आवाज येत होता.

“अहो मी आधीच सांगितलंय ना तुम्हाला. मला नाही विकायची माझी मालमत्ता. सध्या माझा तसा कोणताही विचार नाहीये” शेंडेंचा आवाज आला.

“हे बघा मिस्टर शेंडे, आजच्या घडीला जो भाव मिळतोय उद्या त्यापेक्षा जास्त भाव उद्या मिळणार नाहीये. तेव्हा माझं ऐका आणि हट्ट सोडा” एक मधाळ आवाज आतून आला.

सत्यवीर दरवाजाच्याजवळ येऊन उभा राहिला. आतून शेंडेच लक्ष बाहेर उभ्या असलेल्या सत्यवीरकडे गेलं.

“अरे सत्यवीर, या या आत या ...” शेंडेनी हसतमुखाने सत्यवीरला आतमध्ये बोलावलं.

सत्यवीर आतमध्ये येऊन बाजूच्या सोफ्यावर बसला. शेंडे साहेबांसमोर एक मध्यम वयाची बाई बसली होती. तिची केशरचना खूपच आधुनिक प्रकारची होती तसेच कपडे सुद्धा आधुनिक होते. तिने सोफ्यावर बसलेल्या सत्यवीरकडे एक कटाक्ष टाकला. ती एक आत्मविश्वासू बाई असल्याचं सत्यवीरला जाणवलं. तो काहीही न बोलता शांतपणे बसला.

“ठीक आहे मिस शीला, तुम्ही आता येऊ शकता. माझ्याकडे आता पाहुणे आलेले आहेत” शेंडे त्या बाईला म्हणाले.

तसं ती बाई खुर्चीवरून उठली आणि सत्यवीरकडे परत एक कटाक्ष टाकून चालत दरवाजाजवळ गेली आणि म्हणाली “बघा नीट विचार करा परत”

“या तुम्ही मिस शीला” हाताने इशारा करत जरासं भाषेवर जोर देत शेंडे म्हणाले. त्यावर ती बाई काहीही न बोलता बाहेर निघून गेली.

“बोला सत्यवीर काय म्हणताय” टेबलावरील फाईल बाजूला ठेवत शेंडे सत्यवीरला म्हणले.

“तुम्हाला एक चांगली बातमी द्यायला आलोय मी” सत्यवीरने शेडेंना सांगितलं.

यावर शेंडेचा चेहरा जरा फुलला. “काय सांगताय काय. कोणती बातमी? बंगल्याच्या प्रकरणाचा छडा लावलात कि काय ” दोन्ही हात टेबलवर ठेवत शेंडे म्हणाले.

“अगदीच तसं नाही पण तुमच्या बंगल्यावर तपासासाठी गेलो होतो. तिथे मला भूत नावाचा प्रकार मला तरी जाणवला नाही” असं म्हणत सत्यवीरने कालच्या बंगल्यावरील निरीक्षणाची संपूर्ण माहिती शेंडे साहेंबांना दिली. मिळालेली हाडे, कापडाची बोचकी. हरिभाऊंच्या आणि त्याच्या गैरसमजातून जो प्रकार घडला तो देखील सांगितला.

“अरे वाहः हे तर मस्तच झालं. म्हणजे भूतबित असलं काही नाहीये तर तिथे” आनंदाने चेकाळत शेंडे बोलले.

“निश्चीत नाहीये. भुतांच्या बाबतीत बिनघोर राहा. पण भुतांच्या नावाखाली दुसरं कोण तिथं गुपचूप राहून उच्छाद घालतंय हे मात्र शोधावं लागणार आहे. तसचं जे कोणी भूतबंगल्यात राहत आहे त्यानेच तुमच्या घरात गुपचुपपणे शिरून वस्तूंची फेकाफेक आणि रक्ताने मजकूर लिहिला असण्याची शक्यात आहे. ”असं सांगत शेंडेच्या घरातील केलेली निरीक्षणे आणि घरात आडमार्गाने बाहेरून कुठून येता येऊ शकत ते सत्यवीरने शेंडेंना सांगितली.

“अहो ते तुम्ही शोधून काढालच हो. पण भुतांच्या तावडीतून मी सुटलो याचा आनंद जास्त झाला बघा छान बातमी आणलीत तुम्ही” शेंडे आनंदात होते.

“तुमचा कोणावर संशय आहे का? म्हणजे कोणी हितशत्रू किंवा इतर कोणी” सत्यवीरने विचारलं.

“संशय तसा कोणावर घेणार ना. हे असले प्रकार कोण करेल माहित नाही आणि मुळातच माझा स्वभाव मितभाषी असल्याने शत्रू कोणी असतील असं वाटत नाही” शेंडे बोलले.

ते दोघे बोलत असतानाच एक चष्मा घातलेला एक तरुण आतमधे आला. त्याच्या हातात फाईलचा गठ्ठा होता.

“ती नालायक बाई परत आली होती ना? तिला एकदा सांगितलेलं कळतच नाही वाटत. बाहेर गेटवर भेटली. म्हणत होती कि साहेबांना समजावून सांग. तर मी म्हटल कि साहेबांना तो बंगला विकायचा नसताना कशाला त्यांना भरीस पाडताय आणि हेलपाटे घालताय सारखे” तावातावाने तो तरुण बोलत होता.

त्या तरुणाच्या या वाक्याने शेंडे आणि सत्यवीरने मान त्याच्याकडे वळवली. एक चष्मा घातलेला मिशीवाला तरुण रागारागात तिथे आला होता.

“अरे हो हो अनमोल.. शांत हो. खाली बस बर आधी. त्या बाईचं सोडून देत. त्याचं कामाचं आहे ते” शेंडे त्याला शांत करत म्हणाले.

शेंडेनी त्याला शांत बसायला सांगितल्यावर तो खुर्चीत बसला. सोफ्यावर बसलेल्या सत्यवीरकडे भुवया ताणत तो पाहत होता.

अनमोलची ती नजर पाहून सत्यवीरकडे हात करत शेंडे बोलले “हे आहेत..” असं बोलून शेंडे जरा थांबले. त्यांना सत्यवीरची ओळख करून द्यायची होती. पण ती काय करून द्यावी असा विचार करत ते थोडं थांबले. कारण आपण गुप्तहेर म्हणून इथे तपास करायला आलोय हे सांगायला सत्यवीरने मनाई केली होती.

“हे आपले..हरिभाऊ आहेत ना..त्यांच्याकडे आले आहेत. हरिभाऊ शहरात असताना त्यांचे एक ख्रिचन स्नेही होते त्यांचाच हा मुलगा सत्यवीर याचं नाव. शेंडेनी सत्यवीर व्यवस्थित ओळख करून दिली.

“आणि सत्यवीर, याचं नाव अनमोल. आमच्या पतपेढीवर क्लार्क म्हणून आहे. भरपूर मेहनती आहे.

तसं त्या तरुणाने अनमोलने हात पुढे केला. सत्यवीरने देखील हसत त्याचाशी हस्तांदोलन केलं.

“साहेब त्या बाईला वेळीच आवर घालायला हवा नाहीतर तिच्या सारखे अजून काही प्रॉपर्टी एजन्ट इथे घिरट्या घालू लागतील” अनमोल शेंडेकडे वळत म्हणाला.

 “अरे अनमोल कोणीही येणार नही. हि मिस शीला फक्त महत्वाकांक्षी आहे म्हणून सारखी येतेय. बाकी इतरांना माहितीये आपण बंगला विकणार नाहीये म्हणून इथे कोणीही येणार नाही’ शेंडे आरामात खुर्चीत रेलत म्हणाले.

अनमोलच्या बोलण्यावरून सत्यवीरला एक समजलं होतं कि तो इथे येण्यापूर्वी जी बाई बसली होती ती एक प्रॉपर्टी एजन्ट असून तिचं नाव मिस शीला आहे. तिची अजून माहिती काढण्याकरिता सत्यवीर पुढे विषय वाढवत म्हणाला. “नक्की कोण होत्या या बाई. इतर कोणीही रस घेत नसताना त्याच फक्त एवढ्या का मागे लागल्यात बंगला विकत घेण्याच्या”

“अहो काय सांगू तुम्हाला सत्यवीर, ती एक निर्ढावलेली एजंट आहे. जुन्या किंवा वादातल्या मालमत्ता विकत घेऊन परत त्या मोठ्या भावात लोकांना विकायच्या हाच व्यवसाय आहे तिचा” अनमोलने माहिती पुरवली.

“हो.. तिचे वडील आधी हा व्यवसाय करायचे. त्यांच्या माघारी आता हि बाई त्यांचा व्यवसाय सांभाळते.” शेंडेनी पुढची माहिती दिली.

“पण त्या बंगल्यात तर भुते आहेत ना. अशा भुतांनी पछाडलेल्या बंगल्याल्या विकत घेऊन नंतर कोणाला विकणार त्या” सत्यवीरने मुद्दाम अनमोलसमोर आपली शंका उपस्थित केली.

“भुतांच्या नावाखाली इतर कोणीहि ती मालमत्ता घेणार नाही म्हणून स्वस्तात प्रॉपर्टी विकत घेऊन नंतर त्या पाडून त्यावर एखादी व्यावसाईक इमारत किंवा हॉटेल्स बांधून नफा मिळवायचा हा प्लान असतो या लोकांचा” अनमोलने चष्मा सावरत म्हणाला.

“अच्छा असं आहे तर” एवढ बोलून सत्यवीर शांत बसला.

“चला मी निघतो आता. फाइल्स द्यायला आलो होतो फक्त” असं म्हणून अनमोल जागेवरून उठत म्हणाला.

“मी सुद्धा निघतो. साहेबांना भेटायला आलो होतो सहजच” हसत हसत सत्यवीर म्हणाला आणि अनमोल सोबत बोलून या मिस शिलाची अजून माहिती घ्यावी म्हणून तिथून निघाला. शेंडेंचा निरोप घेऊन दोघेही सोबतच घराबाहेर बाहेर पडले आणि गेटमधून बाहेर पडून सोबत जाऊ लागले.

सत्यवीर तुम्ही कामधंदा काय करता” अनमोलने विचारलं.

“मी काही विशेष नाही. असचं हाताला येईल ते काम करत असतो. तुम्ही कधीपासून आहात शेंडे साहेबांकडे” सत्यवीर म्हणाला.

“मी काही महिने झाले त्यांच्याकडे काम करतोय. कोणाचा आगापिछा नसताना इथे काम शोधत आलो होतो. लोकांनी शेंडे साहेबांचं नाव सुचवलं. मग त्यांच्याकडे काम मागायला गेल्यावर त्या सद्गृहस्थाने काम दिलं. माझ्यावर खरोखरच उपकारच केले बघा त्यांनी” अनमोल भावूक होऊन म्हणाला.

“हो हो खरंय.. शेंडे साहेब मनाने तसे भावनाशील आहेतच. पण भूतांचा खूपच धसका घेतलाय त्यांनी. लोकं इथे गावात चर्चा करताना ऐकलं मी” सत्यवीरने मुद्दाम विषय छेडला.

“हो हेही खरंय, पण त्यांच्या याच भावूक स्वभावाचा लोकं गैरफायदा घेतात. जसं कि मेहतांनी घेतला” अनमोलने जरा घुश्यातच सांगितलं.

“मेहता म्हणजे कोण?” बंगल्याच्या आधीच्या मालकाबद्दल अनमोलकडून अधिक माहिती मिळवण्याच्या उद्देशाने सत्यवीरने अजाणतेपणाचा आव आणत विचारलं.

“आधी ती जागा मेहता नावाच्या एका माणसाची होती. शेंडेसाहेबाचं आणि त्याचं चांगलंच जमायचं. नंतर त्यांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू त्या घरात झाला. मेहता कुटुंबियांना ते घर सोडून जावं लागलं. पण जाताना इथे कशाला मालमत्ता ठेवायची म्हणून भावनिक होऊन मेह्तांनीच शेंडेना गळ घातली आणि त्यांना जागा विकत घ्यायला लावली. शेंडेनी सुद्धा ती बंगला असलेली जागा विकत घेतली आणि अडकले” अनमोलने खाली मान घालत सांगितलं.

“ओहो किती नुकसान झालं त्यांचं आणि आता तर ती मालमत्ता घ्यायला एजन्ट लोकांच पेवच फुटलं असेल नाही सत्यवीरने त्याच्या पाठोपाठ सुस्कारा सोडला.

“ आधी झालं तसं. पण शेंडेनी कोणाला भिक घातली नाही. एवढी महागातली मालमत्ता स्वस्तात कोण देईल हो. पण हि मिस शीला हि काही पिच्छा सोडेना साहेबांचा” रागातच अनमोल म्हणाला.

“या मिस शीला यांनी या मालमत्तेत जरा जास्तच लक्ष घातलं आहे” सत्यवीरने विचारलं.

“हाडाची प्रॉपर्टी एजन्ट आहे ती बया. अशा बऱ्याच वादातल्या मालमत्ता तिने स्वस्तात घेऊन लोकांना विकल्यात”

“हि भूतबंगला असलेली प्रॉपर्टी मिळाली तर तिच्या फायद्याचा सौदा ठरणार आहे तर” सत्यवीर म्हणाला.

अनमोलने यावर फक्त मान डोलावली.

“खूपच वाईट हो.. बिचाऱ्या साहेबांना किती मनस्ताप होत असेलसत्यवीरने माहिती काढण्याच्या उद्देशाने विचारलं.

“मी अजून गेलो नाही तिथे त्यामुळे मला सांगता येणार नाही पण लोकं बऱ्याच गोष्टी सांगत असतात. त्यांना दुसरी कामेच काय आहेत ” अनमोलने सांगितल.

चालत चालत दोघेही पुढे नानांच्या घरापुढून जात असतानाच घराच्या दरवाजातूनच नानांनी आवाज दिला

“काय अनमोल कुठे फिरताय पाहुण्यांना घेऊन” आवाज येताच दोघेही थांबले.

“काही नाही असचं फिरतोय कपाळावर आठ्या देत अनमोल म्हणाला. ‘आता हा उपटसुंभ उगाचच वेळ खाईल’ असं पुटपुटत अनमोल पुढे चालू लागला.

“थांब कि जरा चहा घेऊन जा” नानांनी नेहमीप्रमाणे आपली टकळी चालू केली.

“नाही मला काम आहे” असं अनमोल म्हणाला.

सत्यवीर मात्र नानांशी थोडं बोलायचं म्हणून थांबला. पण अनमोल मात्र कामाचा बहाणा करून तिथून निसटून गेला. नानाच्या घराजवळ जात सत्यवीर बोलला- काय म्हणता नाना”.

“काही नाही बघ आराम. काय म्हणतायत तुमचे शेंडे साहेब, काही काम दिलं कि नाही त्यांनी” माहिती काढण्याच्या आपल्या नेहमीच्या स्वभावात नानांनी विचारलं.

“नाही तिथे एक बाई आली होती तिच्यासोबत बोलत होते फक्तसत्यवीरने आगाऊपणाने माहिती दिली.

“काय म्हणतोस बाई..” बाई हा शब्द ऐकताच नानांच्या चेहऱ्याचा नूर बदलला. हे ओळखून सत्यवीरने त्यांना तुम्ही समजताय तशी बाई नाही तर बंगल्याच्या संदर्भात बोलायला ती आली असल्याचं सांगितलं.

“मग ती मिस शीला असेल. मालमत्ता खरेदी विक्रीची कामे करते. कोणी घेत नसलेल्या किंवा वादातल्या मालमत्ता घेणे हा तिचा हातखंडा आहे” नाना बोलले.

“शेंडेंच्या भूतबंगल्यात भारीच रस दिसतोय तिला” सत्यवीर म्हणाला

“असणारच.. तो बंगला कोणी घेणार नाही म्हणून स्वस्तात मिळणार ना तिला” नाना पोट खाजवत म्हणाले.

“पण बंगल्यात तर भुते आहेत ना” सत्यवीर उगाचच घाबरत बोलला.

“भुते आहेत असं लोकं म्हणतायत. आत जाऊन कोणी पाहिलंय तेव्हा“ नाना म्हणाले.

“तुम्हाला काय वाटतं भुते खरच असतील तिथे” सत्यवीरने साळसूदपणे विचारलं.

“मला नाही वाटतं. लोक उगाच रात्रीत झाडाच्या काळ्या सावल्यांना भुते म्हणत असावीत.” नाना बोलले.

“मग तुम्ही बंगल्यात जाऊन भुते आहेत वा नाहीत याचा शोध घेऊन लोकांना का नाही सांगतसत्यवीर म्हणाला.

“छे छे .. मी कशाला जाऊ तिथे, मला काय दुसरी कामे नाहीत” अंग झटकत नाना बोलले.

“मग बंगल्यात मेहतांची मुलगी अवनी हिच भूत दिसतं असं लोकं का म्हणतायत” सत्यवीर म्हणाला.

“लोकं मुद्दाम अफवा पसरवतात रे. या कानाच त्या कानाला लागून. ती शीलाच मालमत्ता स्वस्तात मिळवण्याच्या हेतूने मुद्दाम लोकांमध्ये अशा अफवा पसरत असावी” नाना भुवई उडवत म्हणाले.

या नानांच्या तर्कावर मात्र सत्यवीर विचारात पडला. मालमत्ता काबीज करणाच्या अट्टाहासापोटी मिस शीला या गोष्टी करू शकते. त्यात तिचा भरपूर फायदा आहे. कि दुसरीच कोणती तरी व्यक्ती यामागे असू शकेल. जी पडद्यामागे राहून कोणाला तरी हाताशी धरून या गोष्टी करतेय. पण शेंडे मात्र बंगला स्वस्तात न विकण्यावर ठाम आहेत. जो कोणी भुताच्या नावाखाली बंगल्यात रात्री अपरात्री वावरतोय त्याला शेंडेंनी वा इतर कोणीही या बंगल्यात राहायला येऊ नये असं वाटतंय. पण असं करण्यामागे त्याचा हेतू काय असावा? मिस शीलाचा यामध्ये हात असू शकेल का? सत्यवीर मनातल्या मनात विचार करू लागला. नक्की बंगल्यात किती जण रात्री वावरतात याचं देखील गणित कळत नाहीये. कधी लोकांना बंगल्यात विचित्र आवाजात ऐकायला येतात तर कोणाला बाई दिसते. हे नक्की प्रकार तरी काय आहे. कारण ज्या कोणी व्यक्ती यामागे आहेत त्यांचा हेतू निश्चितपणे निर्भेळ नाहीये. इथे काहीतरी वेगळीच डाळ तिथे शिजतेय असं राहून राहून सत्यवीरला वाटू लागलं होतं.

क्रमशः


चाहूल

  दरवाजाच्या फ़टीतून डोळे लावून ती बाहेर पाहत होती. अंधार पडायला सुरुवात झालेली होती. जसजसा अंधार वाढत होता . तशी तिच्या जीवाची घालमेल देखील...