“ द माइंडगेम ” (भाग 3)
पैसा हा माणसाची बुद्धी फिरवतो हे खरंच आहे, त्याच पैशाच्या
लोभापायी सायमन इतक्या लांब आला होता, पैशासाठी वाटेल ते करायची त्याची तयारी होती. आणि रुबेला तर पैशाला हपापलेली होतीच.
दिवसभर मेरी सायमनच्या ऑफरचाच विचार करत होती. आपला नकार हा आपलं नुकसान करणारा
ठरणार होता असं तिला वाटत होतं, इकडे रुबेला पण आपले फासे टाकायला तयार होतीच पण
सध्यातरी तिच्याकडून काहीच हालचाल दिसत न्हवती, किंवा तसं ती काही दाखवत न्हवती. सायमनच्या ऑफरला उत्तर द्यायला अजून चोवीस तासांचा अवधी बाकी होता.
रात्री सगळी निजानीज
झाल्यावर मेरीच्या घरामागून एक काळी आकृती हळूच बाहेर पडली, अंधारात आपण दिसणार नाही
याची पुरेपूर खात्री त्या आकृतीने घेतली होती. बाजूच्याच भिंतीला चिटकून उभी
केलेल्या सायकलीवर ती आकृती बसली. पुन्हा
इकडे तिकडे पाहून कानोसा घेतला, आणि सायकल चालवत आडरस्त्याने निघून गेली.
मधले दिवस खूपच ताण असल्यासारखे गेले, मेरीला ते २ दिवस अक्षरशः युगासारखे वाटले. सायमनला होकार द्यायचा दिवस आला होता, दिवसभर मेरी
त्याच तंद्रीत वावरत होती. बागेतल्या रोपांना पाणी घालून झालं, आज मेरीने जेवणात
काही नवीन पदार्थ बनवले होते, बागेच्या कामातून वेळ काढून मेरी नवनवीन रेसिपी बनवण्याचा प्रयत्न करत असे. रुबेला आल्यानंतर एकत्रच जेवणं उरकली, फारसं बोलण
झालंच नाही. जेवणानंतर रुबेला तिच्या खोलीत झोपायला निघून गेली. मेरी काहीवेळ टीव्ही पाहत बसली,
तिने घडयाळात पहिला तर घड्याळामध्ये आताशी अकरा वाजले होते, आज मेरीला सायमनला आपला निर्णय
कळवायचा होता. आणि मेरीने सायमनला होकार द्यायचं ठरवलेलं होतं.
आपला होकार कळल्यानंतर सायमन रुबेलाची विल्हेवाट लावणार होता. आपला
कुठेही प्रत्यक्ष सहभाग येणार नसल्याने मेरी जराशी निश्चिंत वाटत होती. बारा वाजले
तशी मेरी उठली टीव्ही बंद केलं आणि आपल्या खोलीकडे चालू लागली. जाण्याआधी तिने
रुबेलाच्या खोलीबाहेर उभं राहून कानोसा घेतला आणि ती झोपलेलीच आहे याची
खात्री करून घेतली. न जाणो ती जागी असेल नसेल त्यामुळे खात्री करून घ्यावी असं
मेरीला वाटून गेलं. रुबेला झोपलेलीच होती कारण तिच्या खोलीत शांतता वाटली निदान बाहेरून
मेरीला तसं जाणवलं. नंतर मेरी जिने चढून आपल्या खोलीमध्ये आली. दार लॉक केलं आणि
खिडकीजवळ आली, थोडावेळ रस्त्यावरील रात्रीची शांतता न्याहाळत उभी राहिली. उद्याचा दिवस काय नवीन गोष्टी घेऊन उजाडतो माहित न्हावत. घडयाळात बारा वाजून पंचवीस मिनिट झाली होती,
मेरीने कपाटातून टॉर्च घेतला
आणि खिडकीजवळ आली, पडदा सरकवला आणि बाहेर पाहिलं काळा गडद अंधार पसरलेला होता, समोरच्या
झाडीमध्ये सायमन थांबला असेल असं तिला वाटलं, बरोबर साडेबारा वाजता मेरीने टॉर्चच्या प्रकाशाचा झोत खिडकीबाहेर दाखवला. सायमनला तो नीट दिसावा म्हणून दोन वेळा चालू बंद पण केला
आणि त्याच्या प्रतिसादाची वाट पाहत बसली. रस्त्यावर खूपच शांतता होती, मेरीला जरा
काळजी वाटत होती कि सायमन आपला इरादा बदलून रुबेलाला मदत तर नाही ना करणार , पण
रुबेला पक्की वस्ताद असल्याने त्याने हि ऑफर खरंतर आपल्याला देऊ केली असणार
नक्कीच.
तेवढ्यात झाडीतून टॉर्चचा प्रकाशझोत दिसला. अंधारात तर तो खूपच उठून
दिसला. याचा अर्थ सायमनला आपला होकार कळला होता. त्या झाडांच्या गर्दीत कोणी उभं
असेल असं वाटत देखील न्हवत. मेरीने पडदा लावला, एक मोठं कामं झालेलं असल्याप्रमाणे तिला वाटलं. २ दिवस आलेला ताण जरासा हलका झाला होता. थोड्याच वेळात ती शांतपणे झोपी गेली.
आपला होकार
कळवल्यानंतर सायमनची वाट बघण्याखेरीज मेरीला दुसरा पर्यायच न्हवता. रुबेला आजकाल
अबोल वाटत होती, दोघींमध्ये जास्त संभाषण तसंपण होत नसायचच. एके दिवशी रुबेला कामानंतर
लवकर घरी आली, मेरी टीव्ही पाहत बसली होती, रुबेलाने आतमध्ये येऊन आपली पर्स
टेबलावर ठेवली. मेरीने तिच्याकडे पाहिलं तर ती काहीशी अस्वस्थ वाटली,
“ तू ठीक आहेस ना” मेरीच्या या अचानक प्रश्नाने रुबेला
काहीशी दचकलीच कारण रुबेलाच तिच्याकडे लक्षच न्हवत.
“ हो .. म..मी ठीक आहे” कसबस सावरत रुबेला म्हणाली आणि तिच्या
खोलीकडे जाऊ लागली. ती जात असताना मेरीची नजर तिच्या पाठमोऱ्या भागाकडे गेली. रुबेलाचा टॉप मागून थोडासा फाटला होता. कोणत्या तरी वस्तूमध्ये अडकल्यामुळे कदाचित फाटला असावा.
“तू खरंच ठीक आहेस ना ?” मेरीने त्या फाटक्या भागाकडे पाहत विचारलं
“ होय.. तुला अजून काही विचारायचं..” काहीश्या संतापात रुबेला उद्गारली आणि दाराजवळच
थांबली.
“ मी पिझ्झा ऑर्डर केला आहे तुला थोडा ठेवलाय “मेरी शांतपणे म्हणाली
“ नकोय मला “ एवढं बोलून आत वळून रुबेलाने धाड्कन दरवाजा लावून
घेतला.
दोन दिवस काहीच झालं नाही, सायमनला होकार दर्शवल्यानंतर ना सायमन कडून काही बातमी आली कि
रुबेलाची काही हालचाल दिसली, मेरीला काहीतरी वेगळीच जाणीव होत होती, तिच्या पोटात ढवळून
आल्यासारखं वाटत होतं. कारण लवकरात लवकर या प्रकरणाचा सोक्ष मोक्ष लागेल तेवढं
मेरीला बरच होतं. तिसऱ्या दिवशी अचानक दरवाजावरची बेल वाजली. मेरीने दरवाजा उघडला आणि
समोर पाहते तर काय. समोर एक पोलीस अधिकारी उभा होता,
“ येस कोण हवंय आपल्याला “ मेरीने काहीसं चाचरतच त्याला
विचारलं.
“ गुड इविनिंग , मी डिटेक्टिव्ह स्कॉट, ब्रॅडफोर्ड पोलीस डिपार्टमेंट. “ मोठ्या आदबीन तो बोलला.
“ हो या नं “ मेरीने त्या पोलिसाला घरात घेतलं. तोवर रुबेला तिच्या खोलीमधून बाहेर आलीच होती. पोलिसाला पाहून ती जराशी कावरीबावरी झाली,
“ काय झालं ऑफिसर काय काम आहे तुमचं” रुबेलान काहीश्या
संशयाने आणि गडबडीने विचारलं.
ऑफिसर शांतपणे आत आला आणि सोफ्यावर बसला. सभोवार नजर फिरवली
आणि मग रुबेलाकडे पाहत म्हणाला “तुमची ओळख “
“ मी या घराची मालकीण रुबेला किडमन “ रुबेला ठसक्यातच
म्हणाली, पोलीस अधिकारी असला म्हणून काय झालं. त्याचं हे असं विचारण रुबेलाला आवडलं
नाही. पण घराची मालकीण म्हणून रुबेलाने केलेला स्वतःचा उल्लेख मेरीला तितकासा
रुचला नाही. पण लगेचच
“आणि तुम्ही” आपली नजर मेरीकडे वळवून त्या डिटेक्टिव्हने
विचारलं.
“ मी मेरी आणि हि माझी सावत्र आई “ मालकीण म्हणून केलेल्या रुबेलाच्या उल्लेखनाला प्रतुत्तर म्हणून मेरी तसं बोलली.
“ हम्म “ असा आवाज काढून तो डिटेक्टिव्ह घरभर आपली नजर
फिरवू लागला. मेरी आणि रुबेला त्याचाकडेच पाहत होत्या.
“ काही दिवसांपूर्वी ग्रीन वॅली पार्क मध्ये एका इसमाचा
मृतदेह आम्हाला आढळला आहे. त्याचं संदर्भात चौकशी करायला मी आलो आहे.” डिटेक्टिव्ह आपली
घारीसारखी नजर घरभर फिरवत म्हणाला.
मेरीने चमकून रुबेलाकडे पहिलं, ती त्या डिटेक्टिव्हकडेच
पाहत होती. डिटेक्टिव्ह पुढे म्हणाला “ मृत इसमाच नाव बेन्जामिन असं होतं, या
इसमाला गोळ्या घातल्या गेल्या होत्या.” हे ऐकून मेरीने तोंडावर हात ठेवला.
“ पण या घटनेचा आणि आमचा काय संबंध.” रुबेलाने विचारणा
केली.
“ तो इसम इथे जवळपासच राहत होता, त्यामुळे या भागातील
सगळ्या रहिवाश्यांची चौकशी करत आहोत, तुम्हाला याबद्दल काही माहित आहे का? माहित
असल्यास पोलिसांना सांगा आणि त्यांना सहकार्य करा" डिटेक्टिव्ह कडक आवाजात म्हणाला.
“ अहो पण तो बेन्जामिन का कोण, काळा का गोरा हे देखील
आम्हाला माहित नाही. आमचा या घटनेशी काही संबंध नाही “ रुबेला वैतागून बोलली .
डिटेक्टिव्हने रुबेलाकडे निरखून पाहिलं, रुबेलाच्या सतत तक्रारीच्या सुरांनी तो जरासा चिडलेला दिसला तरीही संयम बाळगून तो पुढे म्हणाला“ संबंध आहे कि नाही
ते आम्ही शोधून काढूच, पण तुम्ही दोघींनी हॉस्पिटल मध्ये शवागारामध्ये येऊन त्या मृत इसमाची डेड बॉडी पहावी. कदाचित त्याचा चेहरा तुमच्या ओळखीचा असेल”
डिटेक्टिव्ह दोघींची हालचाल बारकाईने टिपत होता.
मेरी स्तब्ध होऊन रुबेलाकडे पाहत होती तर रुबेला जणू काही हा काय भलताच प्रकार असल्याप्रमाणे एकदा मेरीकडे आणि परत त्या डिटेक्टीवकडे पाहत होती.
मेरीने त्या डिटेक्टिव्हला आपण
येऊ असं सांगितलं मग काही वेळाने तो निघून गेला.
दुसऱ्या दिवशी मेरी आणि रुबेला शवागारात गेल्या, तिथल्या
पोलीस अधिकाऱ्याने त्यांना आतमध्ये नेलं, आतमधल वातावरण स्मशानापेक्षा कमी न्हवत,
एक विचित्र वास तिथे दरवळत होता. समोर लोखंडी कपाटे रांगेत लावलेली होती. मेरी
रुबेलाला चिटकून त्या अधिकाऱ्यामागे चालली होती. तो अधिकारी एका कपाटाजवळ आला, एका
कप्प्याच हँडल पकडून ओढलं, कप्पा बाहेर आला, एक माणूस झोपेल एवढा मोठा कप्पा होता
तो, मेरी आणि रुबेला लांबच उभ्या होत्या त्या धास्तावलेल्या दिसत होत्या.
“ पुढे या ” तो अधिकारी बोलला.
तसं त्या दोघी सावकाश पुढे गेल्या, त्या कप्प्यामध्ये एका
माणसाच शव होतं. दोघींनी पुढे होऊन त्या माणसाचा चेहरा पहिला, मेरीला त्याचा चेहरा
पाहून गरगरल्यासारखच झालं. ती पडता पडता वाचली कारण तो मृत इसम दुसरा तिसरा कोणी
नसून “सायमन” होता.
“ओळखीचा वाटतो का हा चेहरा” तो अधिकारी म्हणाला.
“ नाही” रुबेला पटकन म्हणाली. खरंतर तिला पटकन असल्या घाणेरड्या वातावरणातून बाहेर सटकायच होतं.
मेरीनेदेखील नकारार्थी मान हलवली.
“ आम्ही याला ओळखत नाही ऑफिसर आता आम्ही जाऊ शकतो का”
रुबेला फणकार्याने म्हणाली.
त्या अधिकाऱ्याने जायला परवानगी दिली. रुबेलाला ऑफिसला जायचा असल्याने तिने मेरीला घरी सोडलं आणि ती लगेचच ऑफिसला निघून गेली. मेरी तडक आपल्या खोलीमध्ये
जाऊन पडली आता तिला चांगलीच काळजी वाटू लागलेली होती. सायमन जो बेन्जामिन या नकली
नावाने इथे वावरत होता आणि आपल्या घरावर पाळत ठेऊन होता त्याचा खून झाला होता. मेरीने
आपण त्याला ओळखत नसल्याच खोटच सांगितलं कारण तिला दुसरं काही सुचलंच नाही. रुबेला
तर त्याला साहजिकच ओळखत नसावी. मेरीला जरासं दडपण आल होता अत्यंत गूढपणे सायमनचा
मृत्यू झाला होता. तो रुबेलाची विल्हेवाट लावण्याआधीच त्याची वाट लागलेली होती. खरंच
कोणाच कृत्य असावं हे.मेरी डोळे मिटून पडली होती आणि अचानक मेरीला त्या दिवशी रुबेलाचा फाटलेला
टॉप आठवला. रुबेला शवागारातसुद्धा खूपच अस्वस्थ वाटत होती. रुबेलाचा टॉप कसा काय फाटला असेल, त्या दिवशी नक्की काय घडलं असेल कोणास ठाऊक. शवागारातील तो विचित्र दर्प मेरीला अजूनही जाणवत होता...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Fell free to share your Feedbacks