१८ एप्रिल, २०२४

गुप्तहेर सत्यवीर आणि कुटीरोवांचं शस्त्र - प्रश्नोत्तरे




प्रश्नोत्तरे

काही वेळातच पोलिसांच्या गाडीमधून सत्यवीर देसाई वाड्याच्या जवळ पोहोचला. देसाई वाडा तसा प्रशस्त आणि आकाराने सुद्धा मोठा वाटत होता. वाडा दुमजली असून मोठ्या दगडाचं बांधकाम जुन्या काळातील होतं. मात्र वाडा अजूनही भक्कम असल्याप्रमाणे उभा होता. आजूबाजूला काही अंतरावर देसाई वाड्यासारखेच काही प्रशस्त वाडे होते. तिथे काही म्हातारी जोडपी राहायची त्यांची मुले इतर ठिकाणी कामाला असल्याने ती दांपत्य इथे एकटेच राहत असत अशी माहिती देशमुखांनी पुरवली. वाड्याच्या मुख्य दरवाजाजवळ एक पाटी होती “देसाई वाडा” अशा नावाची. गाडीतून उतरून सत्यवीर त्या पाटीजवळ उभा राहून ती पाटी न्याहाळू लागला. मागून देशमुख आणि म्हस्के हवालदार त्याच्याजवळ येऊन उभे राहिले आणि सत्यवीर नक्की काय पाहतोय हे बघू लागले.

खूपच जुना आहे वाटतं हा वाडा” दारावरील पाटीकडे पाहतच सत्यवीर म्हणाला.

हो खूपच जुना.. खरंतर मालतीताई यांच्या पूर्वजांचा हा वाडा वडिलांच्या पश्चात मालतीताई यांना मिळाला. मग त्या आपल्या नवऱ्यासोबत इथेच राहत होत्यादेशमुखांनी माहिती पुरवली.

चला आत जाऊ” सत्यवीर अचानक मुख्य दरवाजाकडे वळला.

सत्यवीर आणि देशमुख आतमध्ये आले. देशमुखांनी हवालदार म्हस्के यांना मुख्य दारातच उभे राहायला सांगिलते. जेणे करून इतर चौकशीदरम्यान इतर कोणाचा त्रास नको. सत्यवीर आणि देशमुख वाड्यात प्रविष्ट झाले. वाड्यात आल्यावर सत्यवीर चौफेर पाहू लागला. मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यावर काही पावलांवर तुळशीवृंदावन होतं. तिथे लावलेल्या अगरबत्तीचा सुवास वातावरणात दरवळत होता. तुळशीच्या आसपास मोठी मोकळी जागा आणि आजूबाजूला काही खोल्या होत्या. वाडा दुमजली असून वरच्या मजल्यावर सुद्धा काही खोल्या होत्या. सत्यवीर शांतपणे वाड्याच्या आतला भाग निरखत होता. सत्यवीर आणि देशमुख इथे आल्याची कुणकुण बहुतेक आतल्या लोकांना लागलेली नसल्यामुळे बाहेर कोणीच आलेले न्हवते. इंस्पेक्टर देशमुखांनी पुढे जाऊन मोठ्याने हाका मारल्या.

अविनाश.. आहेस का घरात? देशमुख इकडे तिकडे पाहत म्हणाले.

तेवढ्यात बाजूच्या खोलीमधून अविनाश नावाचा एक इसम बाहेर आला. तो दिसायला उंचपुरा, साधारण पस्तिशीचा आणि शांत चेहऱ्याचा असा होता.

अरे इन्स्पेक्टर साहेब तुम्ही... काहीशा प्रश्नार्थक मुद्रेत अविनाशने देशमुखांना विचारलं.

हो, मी टेलिफोन वरून सांगितलं होतं ना, कि गुप्तहेर सत्यवीरसुद्धा या तपासात सामील होतायत.. ते हेच.देशमुखांनी सत्यवीरकडे निर्देश करत म्हटलं.

तशी अविनाशची नजर सत्यवीरकडे गेली.

सत्यवीरने हात जोडून नमस्कार केला. अविनाशने सुद्धा हसून नमस्कार केला.

सत्यवीर हे अविनाश देसाई. मालती देसाई यांचे ज्येष्ठ सुपुत्र. देशमुख यांनी सत्यवीरची ओळख करून दिली आणि ते पुढे अविनाशकडे पाहत बोलू लागले.

आमच्या खात्यातील वरिष्ठ लोकांनीच सत्यवीरला या प्रकरणात लक्ष घालायला सांगितलं आहे. म्हणूनच घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी करावी म्हणून ते आलेत. तुमची हरकत नसेल तर....एवढ बोलून देशमुख अविनाशच्या प्रतिक्रियेची वाट पाहू लागले.

अहो त्यात हरकत कसली. ते तुमची मदत करणार असतील तर माझी काय हरकत असणारअविनाश हसून देशमुखांना बोलला.

बऱ तुम्ही या बाजूच्या खोलीत बसा मी पाणी घेऊन लगेचच येतो” एवढ बोलून अविनाश स्वयंपाक घराकडे वळणार इतक्यात सत्यवीरने अविनाशला अडवले आणि म्हणाला “तुम्ही जर कुठे बाहेर जाण्याच्या तयारीत असाल तर जाऊ शकता, पण तत्पूर्वी मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन नंतर तुम्ही जाऊ शकता.

सत्यवीरच्या या वाक्यावर अविनाशने देशमुखांकडे आश्चर्याने पहिले आणि म्हणाला “हो.. मी नेहमीप्रमाणे आबांना म्हणजेच माझ्या वडिलांना बाहेरून फिरवून आणायला निघालेलो होतो, पण काही हरकत नाही मी थोडावेळ थांबेन तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईन आणि मग आबांना घेऊन जाईन.

ठीक आहे” एवढं बोलून सत्यवीर शांतपणे आजूबाजूला पाहू लागला. अविनाश पाणी आणायला स्वयंपाक घरात वळला

देशमुख आणि सत्यवीर अविनाशने सांगितलेल्या खोलीत बसले. ती खोली देसाई कुटुंबीय मिटिंग रूम म्हणून वापरायचे. खोलीत आजूबाजूला २-३ खुर्च्या, एक सोफा, छोटा टेबल आणि त्यामागे एक मोठी खुर्ची. कदाचित मालतीताई यांच्या ओळखीतील राजकारणी लोकं त्यांना कामानिमित्त भेटायला आल्यावर इथेच बसवत असतील.

अविनाश बाहेर कुठेतरी निघालाय हे तू कस ओळखलंस” देशमुखांनी सत्यवीरला विचारलं.

तुम्ही त्याला मगाशी हाक मारली तेव्हा तो ज्या खोलीतून बाहेर आला त्याच्या दरवाजाबाहेर त्याचे स्पोर्ट्स शूज होते आणि बाजूलाच मोजे पडलेले होते जसे काही कोणीतरी ते पायात घालायला बाहेर काढतो आणि अविनाशने जो फुल शर्ट घातला होता गडबडीत त्याने त्याच्या शर्टच्या बाहीची बटने लावलेली न्हवती. त्यावरून एक तर्क काढला बससत्यवीरने सांगितलं.

देशमुख पुढे काही बोलणार इतक्यात अविनाश पाणी घेऊन आत आला. सत्यवीर आणि देशमुखांनी पाणी घेतल. अविनाश बाजूच्याच खुर्चीत बसला.

मिस्टर अविनाश, मला खरतर खूप खेद आहे. तुमच्या आईंच्या बाबतीत जे घडलं दुर्दैवी होतं. पण घडलेल्या गोष्टींची उकल व्हावी एवढाच माझा हेतू आहे आणि त्यासंदर्भातच मी तुम्हाला आणि घरातील इतर सदस्यांना काही प्रश्न विचारू इच्छितो अर्थात तुमच्या परवानगीने’’ सत्यवीर पाणी पिऊन झाल्यावर पाण्याचा ग्लास बाजूला ठेवत म्हणाला.

माझी काहीही हरकत नाहीये सत्यवीर. तुम्ही फक्त तुमचं काम करताय याची कल्पना आहे मला. आमच्या बाजूने आम्ही तुम्हाला पूर्णपणे सहकार्य करू? अविनाशने अगदी शांतपणे सत्यवीरकडे पाहत त्याला सांगितल. सत्यवीरला त्याच्या नजरेत एकप्रकारचा ठामपणा दिसला. आईच्या निधनानंतर सुद्धा तो खचून न जाता घरचा भार खंबीरपणे सांभाळत असल्याचे पाहून सत्यवीरला त्याचे कौतुक वाटले.

अविनाश तुम्ही काय काम करतासत्यवीरने अविनाशला विचारलं.

माझी शहराबाहेर बागायती रोपे विकायची नर्सरी आहेअविनाश म्हणाला

अच्छा..अविनाश खरतर तुमच्या आईंच्या बाबतीत जी दुर्दैवी घटना झाली त्यानंतर चौकशीत तुम्ही पोलिसांना अगोदरच तुमचा कौटुंबिक तपशील आणि घटनेसंदर्भात सांगितल असेल. पण मला तो तपशील तुमच्याकडून ऐकायचा आहे तेव्हा मला सांगा कि तुमच्या घरात वा वाड्यात कोण कोण राहत? एवढ बोलून हाताची बोट एकमेकांमध्ये गुंतवून सत्यवीर अविनाशच्या उत्तराची वाट पाहू लागला.

सत्यवीरच्या प्रश्नानंतर अविनाश खुर्चीत सरळ बसला. “या वाड्यात मी, माझे बाबा, माझी बायको नंदिनी आणि माझा धाकटा भाऊ आशुतोष राहतो.

घटना झाली तेव्हा तुम्ही कुठे होता” सत्यवीरने पुढचा प्रश्न केला.

घटना घडली तेव्हा मी डॉक्टर पटवर्धन यांच्या हॉस्पिटलमध्ये होतो. माझ्या वडिलांचे उपचार तिथे चालू आहेत त्यासंदर्भातच त्यांना भेटायला गेलो होतोअविनाश उत्तरला.

अविनाश बोलत असताना सत्यवीरने आपल्या जॅकेटच्या आतल्या कप्प्यातून एक छोटी डायरी आणि पेन बाहेर काढले. अविनाशशी बोलतच तो त्या डायरीमधे काहीतरी लिहू लागला.

काय झालंय तुमच्या वडिलांना” सत्यवीरने डोळे बारीक करत डायरीमधून नजर न काढताच विचारले.

त्यांना स्मृतीभ्रन्शाचा आजार आहे. मागच्या वर्षी ते एके ठिकाणी त्यांच्या मित्रासमवेत फिरायला गेले असताना तिथे त्यांचा एक छोटासा अपघात झाला त्या अपघातात डोक्याला मार लागला. तिथून आल्यावर त्यांना जास्त काहीच आठवेना आणि ते जास्त बोलत देखील न्हवते. नंतर तर आम्हा घरातल्या लोकांना सुद्धा ओळखेनासे झाले. म्हणूनच मग मागच्या काही महिन्यांपासून त्यांचे शहरातील डॉक्टर पटवर्धन यांच्याकडे उपचार चालू आहेत.

अविनाश हे सांगत असताना सत्यवीर आपल्या डायरीमध्ये पटापट काही नोंदी घेत होता.

बर मग घटना घडली तेव्हा वडील कुठे होते आणि घरात कोण कोण होते सत्यवीरने विचारलं.

घरात आबा हे त्यांच्या खोलीत आराम करत होते. माझी बायको आणि आमची कामवाली बाई कमला वाड्याच्या मागच्या बाजूला विहिरीतून पाणी काढत होत्या. आमची कामवाली बाई कमला काही तरी आणायला म्हणून मागच्या बाजूने आत वाड्यात आली तेव्हा आईच्या खोलीसमोरून जाताना तिला दिसलं कि आई जमिनीवर पडली होती. कमलाला वाटलं कि आई बेशुद्ध वगैरे पडली कि काय म्हणून तिने आईला हाका मारल्या. पण तरीही ती काही हालचाल करेना. मग तिनेच आरडाओरड करून सगळ्यांना गोळा केलं.अविनाश म्हणाला.

ओह्ह.. म्हणजे मालतीताई यांना जमिनीवर पडलेलं तुमची कामवाली बाई कमला हिने आधी पाहिलं तर.. बर तुमचे वडील म्हणजेच आबा कुठे होते तेव्हा..सत्यवीरने ओठ मुडपत विचारलं. बाजूलाच बसलेले देशमुख लक्षपूर्वक दोघांची प्रश्नोत्तरे ऐकत होते.

आबा त्यांच्या खोलीतच होते. त्यांना काही ऐकू आलं असेलं असं वाटत नाही. तसंही ते बाहेर आलेच नाही कारण त्यांना चटकन हलता येत नाही आणि त्यांच्या खोलीला आम्ही बाहेरून कडी लावत असतो. कारण आमच्या अपरोक्ष ते चुकून वाड्याबाहेर जाऊ नये म्हणून.अविनाशने माहिती दिली.

ह्म्म्म.. तर एकंदरीत अशी घटना घडली. मग त्यानंतर तुम्ही हॉस्पिटलमधून माघारी आलात. वाड्याजवळ राहणाऱ्या पाटील डॉक्टरांना कोणी बोलावलं” सत्यवीरने हातातील छोटं पेन हनुवटीला टेकवत विचारलं.

कमलाचा आरडाओरडा ऐकून शेजारचे काही लोक बाहेर जमा झाले होते. त्या गर्दीमधीलच कोणीतरी डॉक्टरांना झालेल्या घटनेची खबर दिली आणि ती मिळताच ते तडक आले होते. ते आमचे फॅमिली डॉक्टर पण आहेत आणि आमचे त्यांच्याशी घरगुती संबंध पण आहेत. त्यांनीच आमच्या आईला तपासलं. आईची नाडी लागत न्हवती म्हणून त्यांनी हॉस्पिटलमध्ये हलवायला सांगितलं. पोलिसांना पण फोन करून सांगितलं. त्यानंतर मी घरी आल्यावर डॉक्टर पाटलांनी मला हि माहिती दिलीअविनाशने सांगितलं.

मालतीताईंचा कोणी घातपात केलाय असा संशय कोणाला आला होता का? म्हणजे त्या अचानक अशा त्यांच्या खोलीत कशा काय पडल्या. कोणती शारीरिक व्याधि होती का मालतीताईना?” सत्यवीरने प्रश्न केला.

नाही.. कोणती व्याधि अशी न्हवती. तिची प्रकृती अगदी ठणठणीत होती. म्हणूनच तर आम्हाला कळेना कि ती अचानक अशी कशी काय जमिनीवर पडली. घातपात झाल्यासारखं काही वाटत न्हवत. प्रथम आम्हाला संशय आला कि हदयविकाराचा झटका वगैरे आला कि काय. पण हॉस्पिटलमध्ये आईला नेल्यानंतर त्यांनी आईचा मृत्यू झाल्याचं सांगितल आणि असं पण सांगितलं कि मृत्यूचं कारण स्पष्ट होत नाहीये तर पोस्टमार्टेम करावं लागेल.अविनाशला हे सगळं सांगताना खरंतर भरून आलं होतं.

सत्यवीरने त्याचे प्रश्न थोडेसे थांबवले आणि देशमुखांकडे सूचक नजरेने पहिले तसं देशमुखांनी अविनाशच्या खांद्याला स्पर्श करत बाजूचा पाण्याचा भरलेला ग्लास अविनाशला देऊ केला. अविनाशने देशमुखांच्या हातातून पाण्याचा ग्लास घेतला आणि तो पाणी पिऊ लागला. तोपर्यंत सत्यवीरने आपल्या छोट्या डायरीमध्ये लिहिलेल्या नोंदी परत न्याहाळल्या. अविनाश पाणी पिऊन जरासा स्थिर झाल्यावर सत्यवीरने विचारलं “अविनाश तुम्हाला शेवटचा एकंच प्रश्न विचारतो. मालतीताई यांचा कोणी शत्रू होता काय ज्याने त्यांचा असा घातपात घडवून आणला. कोणाला मागमूस न लागता तो वाड्यात शिरला आणि आपलं काम उरकून निघून गेला असेल?

सत्यवीरच्या या प्रश्नाने अविनाश विचारात पडला. त्याच्या कपाळावर किंचित आठ्यांच जाळ आलं आणि त्याची नजर जमिनीकडे वळली. सत्यवीर अविनाश कडेच निरखून पाहत होता त्याच्याही नजरेतून अविनाशचे हे बदल सुटले नाहीत.

नाही तसं शत्रू वगेरे कोणी असेल असं मला वाटत नाही. राजकारणातील काही व्यक्तींशी तिचे राजकीय मतभेद जरूर होते. पण तेव्हाच ज्यावेळी ती राजकारणात सक्रीय होती. सध्या आई राजकारणात तितकी सक्रीय नसायची तेव्हा मला काही निश्चित सांगता येणार नाही. अविनाशजे जरा अवघडूनच उत्तर दिल. मुळात त्याला सत्यवीरचा प्रश्न तितकासा रुचला न्हवता. सत्यवीरने देखील हे ओळखून त्यावर जास्त काही विचारलं नाही.

ठीक आहे अविनाश, आम्हाला तुमच्या आईची खोली दाखवा जिथे हा सगळा प्रकार घडला आणि त्यानंतर मी तुमच्या कुटुंबातील इतर सदस्यांची ओळख करून घेतोआपल्या जागेवरून उठत सत्यवीर म्हणाला.

हो हो चला” असं म्हणून अविनाश उठून खोलीच्या बाहेर पडला. मागोमाग सत्यवीर आणि देशमुख चालू लागले.

खोलीबाहेर पडताच त्या वाड्याच्या दुसऱ्या टोकाला एक खोली होती अविनाश तिकडे जाऊ लागला.

वाडा आतून दिसायला “C” या इंग्रजी अक्षराप्रमाणे होता. वाड्याच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला पहिली खोली जिथून आत्ताच सत्यवीर आणि देशमुख निघाले होते. तिथून पुढच्या दोन खोल्या या घरगुती सामानानी भरलेल्या होत्या. पुढे वर जाण्यासाठी जिना आणि त्याच्याच बाजूला थोडा व्हरांडा जेथून वाड्याच्या मागच्या बाजूला सुद्धा जाता येत होतं. मुख्य दरवाजापासून डाव्या बाजूला प्रथम स्वयंपाकघर, नंतरची खोली अविनाशचे वडील आबा यांची आणि नंतर तिसरी खोली मालतीताईंची वेगळी खोली होती. त्याच्या बाजूलाच जरा आतमध्ये न्हाणीघर होतं. अविनाश, सत्यवीर आणि देशमुख यांना घेऊन मालतीताईंच्या खोलीबाहेर आला. खोलीचं दार उघडून सत्यवीर आणि देशमुखांनी आतमध्ये प्रवेश केला.

मालतीताईंची खोली जरा मोठी होती. साधारण दोन माणसांना पुरेल एवढी होती. खोलीत प्रवेश केल्याकेल्या डाव्या एका बाजूला बेड, मोठं कपाट, पुढच्या भिंतीवर एक मोठा आरसा आणि त्याच्या बाजूला बंद खिडकी. तिच्या अगदी बाजूला एक टेबल ज्यावर रात्री काम करताना लागेल तसा दिवा आणि काही लिखापडीच्या वह्या पडलेल्या होत्या. जमिनीवर जिथे मालतीताई गतप्राण झालेल्या होत्या त्या जागी पोलिसांनी पांढऱ्या रंगाने रेखांकन केलं होतं जेणे करून बॉडी जमिनीवर कशी पडलेली होती हे समजायला मदत होत होती. सत्यवीरने आतमध्ये सगळ्या गोष्टी बारकाईने पाहायला सुरुवात केली. भिंतींना रंग नवीन पद्धतीने दिलेला असला तरी खिडकी आणि दरवाजाची लाडकी कलाकुसरीची कामे जुन्या पद्धतीची होती. सत्यवीरने खिडकी जी बंद होती तिची खुंटी काढली आणि उघडली. खिडकीला गज न्हवते ती पूर्ण उघडी झाली. सत्यवीरने बाहेर पाहिलं तर बाहेर ऊन उतरून बऱ्यापैकी संध्याकाळ झालेली होती. मालतीताईंच्या खोलीबाहेरून वाड्याचा बाहेरचा डावीकडील भाग दिसत होता. थोडीशी जागा सोडली कि पुढे पुरुषभर उंचीचं वाड्याच दगडी कंपाउंड होतं. शेजारी कोणी राहत न्हवत पण थोडी जागा सोडून पलीकडे जरा लांब देसाई वाड्यासारखाच एक वाडा होता. जिथे एक वृद्ध दाम्पत्य राहायचे अशी माहिती देशमुखांनी मगाशी दिलेली होती. सत्यवीरने बाहेरच सगळं निरीक्षण करून खिडकी परत लावली. खिडकीच्या शेजारच्या भिंतीवरील लावलेल्या आरशाकडे तो पाहू लागला. आरसा चांगलाच मोठा होता. तिथून त्याने खिडकीकडे कटाक्ष टाकला तर ते अंतर जास्त न्हवत. काहीसा विचार करत त्याने खाली वाकून इकडे तिकडे पाहिलं. परत उठला आणि दरवाजाकडे पाहिलं. देशमुख आणि अविनाश फक्त त्याच्या हालचाली पाहत उभे होते. सत्यवीरने खिशातून परत आपली डायरी काढून त्यात काही नोंदी केल्या आणि डायरी परत ठेऊन दिली. थोडा वेळ सगळ्या खोलीचं निरीक्षण करून सत्यवीर म्हणाला चला आता तुमच्या वडिलांच्या खोलीमध्ये जाऊन पाहूयात

अविनाश शांतपणे मालतीताईंच्या खोलीतून बाहेर पडला आणि बाजूच्या असणाऱ्या त्याच्या वडिलांच्या खोलीकडे निघाला मागोमाग सत्यवीर आणि देशमुख होतेच. खोलीला बाहेरून कडी होती. अविनाशनी कडी उघडली आणि सगळे आतमध्ये गेले. आबांची हि खोली मालतीताईंच्या खोलीपेक्षा लहान होती. आतमध्ये एका कोपऱ्यात एक बेड होता आणि त्यावर चादर पांघरून आबा पाठमोरे झोपलेले दिसत होते. अविनाश आबांच्या बेडजवळ जाऊन त्यांना उठवणार पण सत्यवीरने अविनाशला हातानेच खुण करून त्यांना न उठवण्याविषयी खुणावलं. तसं अविनाश जागीच थांबला. बाजूला कपाट, टेबल आणि त्यावर बरीचशी पुस्तकं होती. बेडच्या विरुद्ध बाजूला एक खिडकी उघडी होती. सत्यवीर खिडकीपाशी आला आणि बाहेर पाहू लागला खिडकीला गज न्ह्व्तेच त्यामुळे बाहेर डोकावून पाहता आलं. बाहेर फक्त वाड्याच कंपाउंड दिसतं होतं. दिवसाउजेडी वाड्याच्या बाहेरचा भाग परत एकदा पाहावा असं सत्यवीरला वाटलं आणि त्याने खिडकी लाऊन टाकली. खिडकीतून सत्यवीर बाजूच्या टेबलाकडे वळला. टेबलावर वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं होती. त्यातली काही पुस्तकं घेऊन सत्यवीर चाळू लागला. विविध प्रकारची प्रवासवर्णन असलेली ती पुस्तके होती. पुस्तकं आलटून पालटून पाहत सत्यवीरने परत ती टेबलावर खाली ठेवली पण ती खाली ठेवत असताना पुस्तकांचा आवाज झाला आणि त्या आवाजासरशी बेडवर झोपलेल्या आबांनी चळवळ केली. त्यांची कदाचित झोपमोड झाली असावी. सत्यवीर जागीच थांबला आणि त्यांच्या बेडकडे पाहू लागला. अंगावरची चादर दूर करून आबा पुढच्या कुशीवर वळले आणि किलकिल्या नजरेने पाहू लागले. आपल्या खोली एवढी माणसं पाहताच ते तसेच किलकिले डोळे करत बेडवर उठून बसले. तसा अविनाश त्यांच्या जवळ गेला. आबा उठून एकदा सत्यवीरकडे आणि एकदा देशमुखांकडे पाहू लागले. अविनाशने बाजूच्या टेबलावरील पाण्याचा तांब्या घेऊन त्यातून पाणी काढून आबांना दिले. पण आबांचं लक्षच न्हवत. ते आपले एकसारखे सत्यवीर आणि देशमुखांकडे पाहत होते.

आबा, अहो पोलीस आहेत. तपास करायला आलेत” अविनाश आबांना म्हणाला

“त्यांना चटकन गोष्टी लक्षात येत नाहीत” असं अविनाश सत्यवीरकडे वळून पाहत म्हणाला.

आबा आता अविनाशने पुढे केलेल्या फुलपात्राकडे पाहू लागले आणि नंतर अविनाशकडे. पण बोलले काहीच नाहीत. सत्यवीरने सगळी खोली व्यवस्थित न्याहाळली. खोलीत सामान असे काहीच न्हवते. आबांची तब्येत ठीक नसते म्हणून त्यांना हि स्वतंत्र खोली राहायला केली होती. त्यामुळे जास्त समान असे काहीच न्हवते.

आबांना कधी बऱ वाटेल असं त्यांचे डॉक्टर म्हणाले, म्हणजे त्यांची स्मृती कधी परत येईल?” सत्यवीर भिंतीला टेकून उभं राहत आबा आणि अविनाशकडे पाहत म्हणाला.

अविनाशने दिलेलं पाणी आबांनी संपवलं आणि ते सत्यवीरकडे एकटक पण निर्विकार चेहऱ्याने पाहू लागले. अविनाशने आबांच्या हातातून फुलपात्र घेऊन ते टेबलावर ठेवलं आणि म्हणाला डॉक्टरांचे औषधउपचार चालू आहेत. त्याचं म्हणण आहे कि काही वेळ लागेल पण लवकरच त्यांना सगळं आठवू लागेल आणि गोष्टींच आकलन सुद्धा होऊ लागेल. तोपर्यंत त्यांना विश्रांती घेत राहू देत आणि रोज बाहेर फिरवून आणत जावा

अच्छा... अविनाश आता तुम्ही घरातल्या इतर सदस्यांना बोलावून घ्या त्यांची पण ओळख करून घेतो आणि तुम्हाला जास्त तसदी देत नाही. तुम्ही असंही आबांना बाहेर घेऊन जाणार होतात त्यात व्यत्यय नकोअसं बोलून सत्यवीर आबांच्या खोलीबाहेर आला.

आबांना काही विचारण्यात अर्थच न्हवता. एकतर त्यांची स्मृती गेलेली होती आणि त्यांना काही नीट बोलता येईल असं वाटत पण न्हवते. देशमुखसुद्धा सत्यवीरच्या शेजारी उभे राहिले. अविनाश थोड्या वेळाने बाहेर आला आणि व्हरांड्यातून सरळ गेला. मधला भाग ओलांडून तो आता विरुद्ध बाजूला असलेल्या जिन्याकडे गेला. अविनाश वरच्या खोल्यांकडे इतर लोकांना बोलायला गेला हे पाहून देशमुख सत्यवीरच्या कानाजवळ येऊन म्हणाले सत्यवीर काही सुगावा मिळाला का तुला?

अं..सध्या तरी नाही, उलटपक्षी बरेच नवीन प्रश्न मला पडलेतसत्यवीर हात मागे बांधून दरवाज्याबाहेर समोर दिसणाऱ्या तुळशी वृन्दावनाकडे पाहत म्हणाला.

म्हणजे नक्की म्हणायचं काय तुला?” देशमुखांनी न समजून विचारलं.

म्हणजे वाड्याच्या आसपास जास्त कोणाचीच घर नाहीयेत. मुख्य रस्त्यापासून वाडा जरा आतमध्ये आहे. ज्या कोणी व्यक्तीने मालतीताईंचा खून केला असेल. त्या व्यक्तीला कोणी पाहिलं असेल याची शक्यता खूप कमी वाटतेय आणि दुसरं असं कि...” सत्यवीर पुढे काही बोलणारच त्याआधीच जीन्याकडून पावलांचा आवाज आला. सत्यवीर आणि देशमुखांची मान तिकडे वळली.

अविनाश, त्याची बायको नंदिनी, एक चष्मा घातलेला मुलगा आणि मागे एक कोणीतरी काष्टा घातलेली बाई येत होती. सत्यवीर आणि इंस्पेक्टर देशमुखांचा संवाद तिथेच थांबला. अविनाश त्यांना घेऊन सत्यवीर जवळ आला.

हि माझी बायको नंदिनी ती घरीच असते, माझा भाऊ आशुतोष पदवीच शिक्षण घेतोय आणि ह्या आमच्या कामवाल्या काकू कमलाबाईअविनाशने सगळ्यांची ओळख करून दिली. तसे सत्यवीरने हात जोडून सगळ्यांना नमस्कार केला.

अविनाशच्या शेजारी त्याचा भाऊ उभा होता. वयाने तसा तरुण दिसत होता त्याच्या चेहऱ्यावर चष्मा होता. अविनाश आणि त्याच्या भावाच्या वयात बरेच अंतर असल्याची जाणीव सत्यवीरला झाली. अविनाशची बायको नंदिनी अविनाशच्या मागे उभी होती. ती दिसायला विलक्षण सुंदर होती. क्षणभर सत्यवीरची नजर अनावधानाने तीच्यावरच खिळली. सत्यवीरशी तिची नजरानजर होताच तिने पटकन जमिनीकडे पहिले. नंदिनी मध्यम बांध्याची असून तिने एक साधी साडी घातलेली होती. कपाळावर बारीक टिकली आणि गळ्यात मंगळसूत्र. स्वभावाने शांत असावी अशी दिसत होती. नंदिनी जवळच एक खेडूत दिसणारी एक बाई जिने पदर डोक्यावरून घेतला होता ती देसाई यांची घरची कामवाली कमला होती आणि जवळपास नजर रोखूनच सत्यवीरकडे पाहत उभी होती.

मी या वाड्याच्या मालकीण मालतीताई यांच्या खुनाच्या संदर्भात तपास करणार आहे आणि पोलिसांची मदत करणार आहे. तर तुम्हा सगळ्यांची ओळख करून घ्यायला आज आलो आहे. तपासकार्यात तुमचं सहकार्य मिळाव अशी अपेक्षा आहे जेणेकरून लवकरच खुन्यापर्यंत आम्हाला पोहोचता येईल.सत्यवीरने असं बोलल्यावर कोणीच काही बोललं नाही. 

तुम्हाला आमचे पूर्ण सहकार्य राहिलं आणि चौकशीसाठी तुम्ही कधीही वाड्यात येऊ शकता” अविनाश सगळ्यांच्या वतीने बोलला.

तेवढ्यात दारावर उभा असलेला हवालदार म्हस्के आत आला आणि देशमुखांकडे पाहत म्हणाला साहेब बाहेर पाटील डॉक्टर आले आहेत. आत यायचं म्हणत आहेत आबांची तब्बेत बघायला आलोय असं म्हणत आहेत.”

ठीक आहे, सोड त्यांना आत आणि तुम्ही बाहेरच थांबा” देशमुखांनी म्हस्के हवालदाराला सांगितलं.

पाटील डॉक्टर यावेळी वाड्यावर येण्यामागे काहीतरी कारण नक्कीच असणार असं सत्यवीर वाटलं. सत्यवीरने अविनाशला सगळ्यांना घेऊन परत वर जायला सांगितलं कारण सगळ्यांची ओळख झालेली होती आणि तो अविनाश सोबत वरील मजल्यावर खोल्या पाहायला त्याच्या मागे जाऊ लागला. सगळ्यात पुढे आशुतोष घाईघाईत गेला.

अविनाशने कमलाला घरी जायला सांगितलं कारण सत्यवीर आल्यामुळे त्याने तिला चौकशीसाठी थांबवलं होतं पण आता ओळख झाल्यानंतर तिला तिच्या घरी जायला सांगितलं. अविनाशच ऐकून कमला लगबगीने वाड्याच्या बाहेर गेली. सत्यवीरने देशमुखांना खालीच उभं राहून डॉक्टर पाटील यांच्यासोबत बोलायला सांगितल. जेणेकरून ते नक्की कशासाठी आले आहेत हे समजेल. बाकीचे सगळे म्हणजे सत्यवीर, अविनाश आणि इतर जिन्याने वर जाऊ लागले. जिन्याने वर गेल्यावर समोर एक व्हरांडा होता. डावीकडेच अविनाश आणि नंदिनी यांची झोपण्याची खोली होती. त्याच्या पुढे एक बंद खोली होती आणि त्यानंतर पुढे आशुतोषची खोली जी खालच्या गेस्ट रूमच्या बरोबर वर होती. सगळ्यात आधी वर जाऊन आशुतोष लगबगीने खोलीत गेला आणि आतून दाराची कडी लावली. नंदिनी तिच्या खोलीत जाऊ लागली.

सत्यवीर अविनाशला वर खोल्या किती आहेत असं विचारत होता आणि अविनाश त्याला ते सांगत असतानाच सत्यवीरची नजर खोलीमध्ये जाणाऱ्या पाठमोऱ्या नंदिनीवर गेली. नंदिनी हि खरोखरच एक सुंदर स्त्री असल्याच त्याच्या लक्षात आलं. तिचा बांधा कमनीय असून तिची चाल सुद्धा मोहक होती. त्यामुळेच ती खोलीत जाऊन दार लावत असताना तिच्याकडे ओझरती नजर टाकायचा क्षणभर मोह सत्यवीरला आवरला नाही. सत्यवीरने सुंदर स्त्रिया कधी पहिल्या नाही अशातला भाग न्हवता पण नंदिनीचं सौंदर्य काही वेगळंच होते. साधी राहणी असून पण दिसायला मोहक अशी ती भासत होती. अविनाश पुढे चालत होता. चालता चालता तो एका खोलिपाशी येऊन थबकला.

इथे आम्ही अडगळीच सामान ठेवतो” असं म्हणून तो सत्यवीरकडे पाहू लागला. त्याच्या आवाजासरशी सत्यवीरची तंद्री भंग पावली आणि ओशाळत तो म्हणाला “अं..काय.. सॉरी, मी जरा विचारांमध्ये होतो. काय म्हणत होतात तुम्ही”.

मी सांगत होतो कि हि अडगळीच सामान ठेवायची खोली.हाताने निर्देश करत अविनाश म्हणाला.

अच्छा... आणि तिकडे विरुद्ध बाजूला ज्या खोल्या आहेत तिथे काय आहे” सत्यवीरने विचारलं.

चला तिकडे असं म्हणून अविनाश पुढे होऊन आता विरुद्ध बाजूच्या खोल्यांकडे जाऊ लागला आणि सत्यवीर त्याच्या मागोमागे चालू लागला. काही वेळातच ते दुसऱ्या बाजूला जाऊन पोहोचले.

हि खोली माझ्या कामाची आहे. म्हणजेच विविध प्रकारची माती आणि नर्सरीच काही किरकोळ सामान या खोलीत ठेवत असतोअविनाशने असं सांगितलं आणि खोलीचं दार उघडल. सत्यवीरने आतमध्ये बाहेरूनच डोकावून पाहिलं तर आतमध्ये मातीची बरीच पोती एकमेकांवर ठेवलेली दिसत होती. बाजूला काठ्यांचे जुडगे जे कुंपण करायला लागतात ते ठेवलेले होते. त्याला बांधायची रस्सी बाजूला पडलेली होती आणि इतर काही बांधकामाचे किरकोळ साहित्य. सत्यवीरने आत न जाताच बाहेरूनच निरीक्षण केलं.

हि बाजूची खोलीसमोर निर्देश करत सत्यवीर बोलला आणि त्या खोलीच्या पुढे जाऊन उभा राहिला.

ती माझी अभ्यासाची खोली आहे असं म्हणू शकता कामाच्या सामानाची यादी वगैरे करण्यासाठी किंवा नंदिनी सोबत जरा निवांत गप्पा मारत बसण्यासाठी मी ती वापरत असतो.अविनाश सत्यवीरच्या जवळ येत म्हणाला.

नंदिनीच नाव ऐकताच सत्यवीरच्या नजरेपुढे नंदिनीचा चेहरा आला आणि नंतर तिचा कमनीय बांधा. पण डोक्यातले ते विचार झटकून सत्यवीर म्हणाला “हि तुमची अभ्यासाची खोली बरोबर आबांच्या खोलीच्या वर आहे नाही का आणि ती पलीकडली मातीची पोती आणि इतर समान ठेवलेली खोली हि मालतीताईच्या खोलीच्या वर आहे.

हो.. अगदी बरोबर” अविनाश असं म्हणून शांत बसला.

सत्यवीरने तो व्हरांडा पूर्ण इकडून तिकडे न्याहाळला. व्हरंड्याच्या कठड्यावरून वरून त्याने खाली डोकावून पाहिलं. त्याला खालच तुळशी वृंदावन दिसत होतं. खालचा भाग पूर्णपणे दिसत न्हवता कारण या वरच्या व्हरंड्याच्या पुढे मधल्या भागामध्ये छत थोडे पुढे काढलेले होते त्यामुळे खालचा जास्त भाग दिसत न्हवता. त्यातल्या त्यात तुळशी वृंदावन दिसत होते. खाली देशमुख आणि पाटील डॉक्टर बोलत असल्याचा आवाज देखील त्याला ऐकू आला.

ठीक आहे, बस आता आणखी काही बघायची गरज आहे असं मला वाटत नाही. आपण आता खाली जाऊयात. वाड्यामधील ज्या गोष्टी पाहण्याची आवश्यकता मला वाटत होती तेवढ पाहून झालंय. नंतर गरज पडलीच तर इतर गोष्टींची छाननी करेनच. पण सध्या तरी मला वाटत मी खूपच जास्त वेळ घेतला तुमचा. माझामुळे तुम्हाला आबांना आज फिरायला सुद्धा घेऊन जाता आलं नाही” सत्यवीर हलकेच स्मित करत बाजूच्या भिंतींकडे पाहत म्हणाला.

“ठीक आहे, मी त्यांना उद्या फिरायला घेऊन जाईन” अविनाशसुद्धा स्मितहास्य करत म्हणाला.

ओके, चला आता खाली जाऊयात. आम्ही पण निघतो आता बराच उशीर झालाय” असं म्हणून सत्यवीर खाली जाण्यासाठी वळला. काही वेळात जिना उतरून सत्यवीर आणि अविनाश खाली आले. खाली येताच व्हरंड्यात आबांच्या खोलीपुढे त्यांना देशमुख आणि डॉक्टर पाटील बोलत उभे असलेले दिसले. सत्यवीर आणि अविनाश त्यांच्याजवळ येताच आपलं बोलणं थांबवून त्यांनी त्यांच्या माना सत्यवीरकडे वळवल्या.

काय देशमुख साहेब काय गप्पा मारत आहात” सत्यवीर देशमुखांच्या जवळ जात पाटील डॉक्टरांकडे पाहत म्हणाला.

हे डॉक्टर पाटील आहेत. तपास कसा चालू आहे विचारत होते” डॉक्टर पाटलांकडे इशारा करत हलकेच गालात हसत देशमुख म्हणाले. कारण सकाळीच वेषांतर करून सत्यवीरने डॉक्टर पाटलांची भेट घेतल्याचं त्यांना आठवलं.

मी डॉक्टर पाटील, आत्ताच तुमच्याबद्दल देशमुखांकडून कळल कि गुप्तहेर साहेबपण आले आहेत चौकशीसाठीअगदीच फॉर्मल पद्धतीने पाटलांनी आपली ओळख सांगत हस्तांदोलन करण्यासाठी सत्यवीरपुढे हात केलात्यासरशी सत्यवीरने हसून त्यांचा हात हातात घेऊन हस्तांदोलन केलं.

त्यामुळे एक गोष्ट तरी स्पष्ट झाली कि डॉक्टर पाटलांना आज सकाळी भेटलेला अतरंगी म्हातारा हा वेषांतर केलेला सत्यवीरच होता हे कळालेल न्हवत आणि तसंही सत्यवीरने वेषांतर सुद्धा अगदी चोख केलं असल्याने पाटलांना सत्यवीर हाच सकाळचा म्हातारा होता हे ओळखणे अशक्य होतं.

काय मग डॉक्टर भेटलात का आबांना. कशी आहे त्यांची तब्बेत आता?सत्यवीरने स्पष्टच विचारलं.

आतमध्ये गेलो होतो पण ते झोपी गेलेत बहुधा, मग त्यांना त्रास न देता तसाच बाहेर येऊन देशमुखांशी बोलत उभा राहिलो.शाळकरी मुलासारखं पाटील पटापट बोलून गेलो.

ओह्ह अस्स...” एवढचं सत्यवीर बोलला

चला मिस्टर अविनाश आता आम्ही तुमची रजा घेतो. तसदी दिल्याबद्दल क्षमस्व” सत्यवीर हात जोडून अविनाशला म्हणाला तसं अविनाशने देखील हात जोडले. सत्यवीर मग डॉक्टर पाटलांकडे वळून चला डॉक्टर साहेब आपण बाहेर बोलूयात” असं म्हणून वाड्याचा मुख्य प्रवेशद्वाराकडे चालायला सुरुवात केली.

वाड्याच्या बाहेर सगळेजण पोलिसांच्या गाडीपाशी उभे होते.

डॉक्टर पाटील, तुम्ही इथे जवळच राहत असाल ना?” सत्यवीरने समोरच्या रस्त्याकडे नजर टाकत विचारल.

हो, ते काय ते समोरचे १-२ बंगले दिसतायत ना ते सोडले कि पुढे थोड्या अंतरावर माझं घर आहे” पाटलांनी हात करत सांगितलं.

चला मग तुम्हाला घरापाशी सोडतो आणि तुम्हाला काही प्रश्न पण विचारायचे आहेत?” सत्यवीर असं म्हणत पाटलांच्या उत्तराची वाटही न पाहता गाडीत बसला. सत्यवीरने असं केल्याने पाटलांना गाडीत बसण्यावाचून दुसरं गत्यंतरच उरलं नाही. सत्यवीर बसल्यानंतर बाकीचे सगळे गाडीत बसले आणि हवालदारांनी गाडी चालू केली.

बाहेर चांगलाच अंधार पडलेला होता. थंड अशी वाऱ्याची झुळुक सुद्धा वाहत होती. गाडीत देशमुख पुढच्या बाजूला हवालदारांच्या सोबत बसले होते तर सत्यवीर आणि डॉक्टर पाटील मागच्या बाजूला. रस्त्यावर जास्त पक्का न्हवता त्यामुळे हवालदार म्हस्के गाडी सावकाश पुढे नेत होते.

वाड्यावर चौकशी केल्यावर असं समजलं कि मालतीताई जेव्हा जमिनीवर कोसळल्या तेव्हा तुम्हाला वाड्यावर बोलावलं होतं” सत्यवीरने समोर रस्त्याकडे पाहतच पाटलांना प्रश्न विचारायला सुरुवात केली.

अं.. हो...” सत्यवीरकडे हलकेच पाहत पाटलांनी उत्तरं दिलं. पोलिसांच्या गाडीत बसायची पाटलांची कदाचित पहिलीच वेळ असावी. सत्यवीर असा प्रश्नोत्तरांचा तास घेतोय म्हणून त्यांना थोडासा दडपण आलेलं होतं. त्यामुळे आपला चष्मा सावरत अंग चोरून पाटील बसले होते.  

डॉक्टर साहेब, जेव्हा तुम्ही मालतीताईंच्या वाड्यावर त्या कोसळल्या म्हणून तपासायला गेला तेव्हा काय घडलं. हे सविस्तर सांगू शकाल का? सत्यवीरने मागे टेकत आणि नजर समोर रस्त्यावर ठेवूनच पाटलांना विचारलं.

सत्यवीरच्या या प्रश्नानंतर पुढे बसलेले देशमुख थोडेसे सरकून गाडी चालवणाऱ्या हवालदाराकडे तोंड करून कान मागच्या सीटकडे लावून बसले जेणेकरून पाटील काय म्हणतायत हे स्पष्टपणे ऐकू यावं. थोडं थांबून पाटलांनी सांगायला सुरुवात केली.

त्या दिवशी जवळपास संध्याकाळच्या सुमारास एक जवळपासचा स्थानिक माणूस माझा क्लिनिकमध्ये जे कि घराला लागुनच आहे तिथे धावत पळत आला आणि देसाई वाड्यावर मालतीताई जमिनीवर पडल्यात असं सांगितलं. मी तत्क्षणी माझ्या क्लिनिक मधून पळत वाड्याकडे निघालो. तिथे पोचतो तर मुख्य दरवाजाजवळ काही लोकं थांबलेली पहिली. त्यांना बाजूला करून आतमध्ये गेलो. मालतीताईंच्या खोलीबाहेर कमला आणि त्यांची सून नंदिनी घाबरून उभ्या होत्या. मला कमलाने सांगितलं कि मालतीताई येथे पडलेल्या तिने पहिल्या आणि हाका मारली तरी उठेनात. मी पुढे जाऊन त्यांच्या खोलीत डोकावुन पाहिलं तर मालतीताई जमिनीवर काहीशा उताण्या अवस्थेत पडल्या होत्या. मी त्यांना जोरजोराने हाका मारल्या तरी मला त्यांच्याकडून काही रिस्पोंस येईना. मग मी त्यांच्या जवळ जाऊन त्यांना खांद्याला स्पर्श करून हलवलं. तरीही त्या उठेनात. मग मी त्यांचा हात पकडून नाडी पहिली तर मला ती जाणवलीच नाही तसा मी घाबरलो.” एवढं बोलून डॉक्टर पाटील थांबले.

अच्छा म्हणजे मालतीताई मेल्या आहेत असं तुम्हाला वाटलं” सत्यवीरने हाताची घडी घालत विचारलं.

मला शंका आली होती. पण नाडी लागली नाही म्हणून मी गळ्याच्या इथे नाडी लागते का ते पाहण्याचा प्रयत्न करू लागलो तर मला मालतीताईंच्या मानेजवळ एक छोटासा रक्ताचा थेंब दिसला दिसला. तसा मला जरा वेगळाच संशय आला. म्हणून मग मी कर्तव्यदक्षपणे पोलिसांना फोन लावला.पाटील सभ्यपणाने बोलत म्हणाले.

बर मग पुढे” सत्यवीर शांतपणे म्हणाला.

पुढे काय... पोलिसांनी म्हणजेच या देशमुख साहेबांनी त्यांची कारवाई उरकली. समोर बसलेल्या देशमुखांकडे हात करत पाटील म्हणाले. नंतर मालतीताईंना हॉस्पिटलमध्ये नेलं. हॉस्पिटल मधून फोन आला कि मालतीताई यांचा मृत्यू झालाय. मृत्यू काहीसा संशयास्पद वाटल्याने पोस्टमार्टेम करावं लागेल असं त्यांनी सांगितलं. मग मी अविनाशशी चर्चा करून सांगितलं कि हॉस्पिटल मधले डॉक्टर्स पोस्टमार्टेम करायचं म्हणत आहेत. त्याने सुरुवातीला याची काय आवश्यकता आहे म्हणून विरोध केला पण हॉस्पिटलची हि प्रोसिजर असते असं मी त्याला सांगितलं मग तो तयार झाला.” एवढ बोलून पाटील शांत बसले.

तुमचं काय मत आहे डॉक्टर, कशामुळे मृत्यू झाला असेल मालतीताईंचापाटलांकडे पाहत सत्यवीर म्हणाला. त्याची नजर पाटलांच्या प्रत्येक हालचालींकडे होती. कपाळावर आलेला घाम पाटलांनी हातानेच पुसला.मला काही सांगता येणार नाहीपाटील बोलले.

तेवढ्यात गाडी पाटील राहतात तिथे येऊन पोचली. घराजवळ गाडी येताच इथे थांबा असं पाटील म्हणाले. त्यांच्या सांगण्यासरशी हवालदार म्हस्केंनी गाडी बाजूला उभी केली. तसं पाटील लगबगीने गाडीतून उतरले. गाडीतून उतरताच त्यांना जरा बऱ वाटला कारण सत्यवीरच्या प्रश्नोत्तरांनी त्यांना घाम फुटला होता. डॉक्टर पाटील यांच्या मागोमाग सत्यवीर पण उतरला आणि मागोमाग त्यांच्या घराच्या दाराजवळ आला. त्याने उतरताना देशमुखांना गाडीमधेच बसायला सांगितलं होतं.

अच्छा इथे राहता तर तुम्हीसमोरील घराकडे पाहत सत्यवीर म्हणाला.

सत्यवीर असा अचानक त्यांच्यामागून गाडीतून उतरलेला त्यांना कळाल नाही. त्यामुळे मागे वळून आणि बिचकून पाटील अं..हो..हो” एवढचं म्हणाले. सत्यवीर असा अचानक खाली उतरल्यामुळे पाटलांना काय बोलावे ते सुचेना. समोर पाटलांचे घर होते आणि ते घरात एकटेच राहत असावे. कारण घरातून कोणी बाहेर आलं नाही. सत्यवीर डॉक्टर पाटील यांच्या नजीक उभा राहिला आणि बोलू लागला “हे बघा डॉक्टर, मालतीताईंचा मृत्यू एका ठराविक विषसदृश रासायनिक पदार्थामुळे झालेला आहे. तो पदार्थ कोणता असेल याचा पत्ता फोरेन्सिक खात्याला सुद्धा लागलेला नाहीये. तुम्ही देसाई कुटुंबियांच्या बरेच जवळ आहात तेव्हा तुम्हाला त्यांच्या घरची इत्यंभूत माहिती असेल. तसचं अशी कोणती माहिती जी या खुनासंदर्भात तुम्हाला असल्यास मला नक्की सांगावी जेणेकरून तपासकार्यात मदत मिळेल. कोणतीही माहिती तुम्ही न लपवता मला सांगावी असं मला वाटत. माझी मदत हवी असेल तर मला तसं सांगा. पोलिसांना मधे न घेता ती माहिती आपल्या दोघात राहील याची खात्री मी तुम्हाला देतो. कारण पुढे जाऊन जर हि माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यात संशयाची सुई तुमच्याकडे वळली तर... थोडं थांबून पोलिसांच्या गाडीकडे पाहून आणि परत पाटलांकडे वळत सत्यवीर म्हणाला. “पोलिसांची तपासाची पद्धत आणि संशयितांना हाताळण्याची पद्धत तुम्हाला माहित असेलच. त्यामुळे काही सांगायचं असेल तर हीच वेळ आहे.सत्यवीर दोन्ही हात मागे बांधून पाटलांकडे निरखत उभा राहिला. डॉक्टर पाटील पूर्ण घामाने भिजलेले होते त्यांच्या तोंडातून शब्दहि फुटला नाही. सत्यवीरने दिलेल्या इशाऱ्यामुळे तर त्यांची पूर्ण भंबेरीच उडालेली होती.

अं...म..मी..मला जे माहिती ते सगळं सांगितलं आहे सत्यवीरसाहेब” अतिशय चाचरत पाटील म्हणाले.

तसं असेल तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाहीये आणि कोणती माहिती तुम्हाला द्यावी वाटली तर सरळ माझाकडे येऊ शकता किंवा मला सांगू शकताअसं बोलून सत्यवीरने पाटलांना आपला घरचा फोनक्रमांक दिला आणि त्यांना जायला सांगितलं. शांतपणे काहीही न बोलता पाटील घराकडे वळले. सत्यवीर गाडीमध्ये येऊन बसताच त्याने गाडी सुरु करायला सांगितली. लगेचच हवालदारांनी गाडी सुरु केली.

काय झालं सत्यवीर पाटलांशी काय बोलत होतास तू..गाडी चालू होताच देशमुखांनी विचारलं.

काही विशेष नाही देशमुख साहेब, बस्स डॉक्टर पाटलांना गुन्ह्याचं गांभीर्य सांगितल आणि काही माहित असेल तर पोलिसांना मदत करा असं म्हणालोपाठीमागे रेलत आणि शरीराला झटके देत सत्यवीर म्हणाला.

ओह्ह.. तुला काय वाटत पाटलांना काही विशेष माहिती असेल का या प्रकरणातदेशमुखांनी सत्यवीरकडे पाहत विचारलं.

शक्यता नाकारता येत नाही. तसंपण अंधारात तीर मारला आहे मी.. बघू काय होतंय ते” सत्यवीर हलकेच स्मित करत म्हणाला आणि गाडीच्या बाहेर पाहू लागला. बाहेर चांगलाच अंधार पडलेला दिसत होता. गाडी मुख्य रस्त्यावर आली होती आणि रस्त्यावरचे दिवे लक्ख प्रकाशात उभे होते. सत्यवीर विचारमग्न झालेला असल्याने देशमुखांनी त्याला जास्त काही विचारले नाही. थोड्या वेळाने गाडी सत्यवीरच्या घरापुढे आली. सत्यवीर गाडीतून खाली उतरला आणि देशमुख बसले होते त्या दरवाजाजवळ गेला.

प्रकरण वाटत तितके सोपे नाहीये देशमुख साहेब. बराच काथ्याकुट करावा लागणार असं दिसतंयदरवाजावर हात ठेवत सत्यवीर म्हणाला.

हम्म.. तू म्हणतोयस त्याची कल्पना आलीय मलादेशमुख गाडीमध्ये बसूनच म्हणाले.

आपल्याला दोन गोष्टी समजल्या म्हणजे या खुनाचा सूत्रधार कोण आहे समजू शकेल देशमुखसत्यवीर म्हणाला.

त्या कोणत्या..” कपाळावर आठ्यांच जाळ आणत देशमुख म्हणाले.   

एक म्हणजे ज्या कोणत्या शस्त्राने खून केला गेलाय ते शस्त्र आणि खुन करण्यामागच मागचं कारणसत्यवीर म्हणाला.

हुश्श..” असं करत देशमुख म्हणाले- त्या दोन्ही गोष्टी सध्यातरी आपल्याकडे नाहीत. लवकरच आपल्याला या दोन्ही गोष्टी मिळवाव्या लागतील.

लवकरच त्या गोष्टी मिळतील आपल्याला देशमुख साहेब. तुम्ही फक्त तुमचा तपास चालू ठेवा. कारण संशय हा सगळ्यांवरच आहे. मालतीताईंना मारून बऱ्याच जणांना बदला घायचा असेल. कोणालासुद्धा संशयातून सूट देता कामा नये” हात झटकत सत्यवीर म्हणाला.

ठीक आहे, सत्यवीर मी मालतीताईंच्या राजकीय वर्तुळात जरा चौकशी करतो त्यांच्या कामाबद्दल थोडी माहिती घेतो. त्यांचे कोणी विरोधक होते का असल्यास कितपत विरोध करणारे होते. देशमुख म्हणाले.

हम्म..राजकीय व्यक्ती कोणच्यातरी खांद्यावर बंदूक ठेवून असा घातपात करू शकतात. पण खून घरात झालेला असल्याने कोणाची तरी मदत घेऊन हे कृत्य करता येऊ शकते. सर्व शक्यता पडताळून घ्यायला काहीच हरकत नाहीये.सत्यवीर हनुवटीवर हात ठेवून म्हणाला.

बर.. चला आता उशीर झालाय. उद्या बोलूयात असं म्हणून इंस्पेक्टर देशमुखांनी सत्यवीरचा निरोप घेतला. सत्यवीरसुद्धा आपल्या घराकडे जायला वळला.

क्रमश : 

१४ एप्रिल, २०२४

गुप्तहेर सत्यवीर आणि कुटीरोवांचं शस्त्र - वेषांतर




2.वेषांतर

उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवू लागला होता. रस्त्यावरून चाकरमान्यांची कामाच्या ठिकाणी जायची लगबग चालू होती. सकाळी अगदी नऊच्या सुमारास या बागेमध्ये लहान मुले आणि बिनकामाचे म्हातारेकोतारे लोक फेरफटका मारायला येत. त्यातले काही आपापल्या नातवांना घेऊन येत तर काही म्हातारे पाय मोकळे करायच्या नावाखाली मुलांच्या किंवा मुलींच्या संसारातील कागाळ्या एकमेकांना सांगायला येत असत. बाग तशी खूप मोठी होती. दुपारी १-४ बंद असायची. आजसुद्धा बागेमध्ये बऱ्यापैकी लहान मुले आणि म्हातारी माणसे यांची गर्दी होती. सकाळचे कोवळे उन जाऊन आता त्याची जागा कडक उन्हाने घेतली होती. बागेमध्ये फिरणारे वयोवृद्ध आता फिरायचे सोडून झाडाखालच्या बाकांकडे जाऊन विसावू लागले होते. अशाच एका बाकावर डॉक्टर पाटील हाताच्या बोटांचा चाळा करत समोरच्या घसरगुंडीवर खेळत असलेल्या लहान मुलांकडे बघत बसलेले होते. त्याचं वय साधारण ४० असावे. डोळ्यावरचा चष्मा सारखा करत डॉक्टर पाटील समोर पाहत कसल्यातरी विचारात गढलेले दिसत होते.

तेवढ्यात खाकखाख असं खाकरत एक वयोवृद्ध झालेला म्हातारा पाटील डॉक्टरांच्या जवळ येऊन उभा राहिला. पाटील अजूनही समोरच्या लहान मुलांकडे एकटक पाहत बसलेले होते.

इथे कोणी बसलं आहे काय बाळा...? घसा खाकरत तो म्हातारा पाटलांच्या शेजारील रिकाम्या जागेकडे निर्देश करत म्हणाला.

त्या वाक्यासारखी पाटील डॉक्टर भानावर आले.

अं...क.. काय म्हणालात आजोबा..काही न कळून भानावर येत पाटील त्या म्हाताऱ्याकडे पाहत म्हणाले.

चेहऱ्यावर सुरकुत्या, डोक्यावर पिकलेले केस, अंगात एक पांढरा सदरा आणि खाली एक कळकट्ट धोतरं अशा वेशातील त्या म्हाताऱ्याकडे पाहून पाटलांनी आपल्या चेहऱ्यावरचा चष्मा सारखा करत एक कटाक्ष टाकला.

अरे तुझ्या बाजूला कोणी बसलं आहे का? हे विचारत होतो मीअसं म्हणत आणि पाटलांच्या उत्तराची वाटही न पाहता तो म्हातारा पाटलांच्या शेजारी जाऊन बसला. पाटील काही बोलणार एवढ्यात त्या म्हाताऱ्याने एक पाय खाली सोडून आणि दुसरा पाय दुमडून घेऊन त्या बाकावर बस्तान मांडले.

सदरा थोडा वर करून आतल्या चोर कप्प्यातून कसलीतरी मळकट पुडी बाहेर काढून त्यातली तंबाखू हातावर घेत नंतर डबीतून चुना काढत त्या म्हाताऱ्याने तंबाखू मळायला सुरुवात केली. डॉक्टर पाटील त्या म्हाताऱ्याकडे पाहतच राहिले. असं अगदी शेजारी बसून तंबाखू मळत बसलेल्या म्हाताऱ्याला पाहून त्यांना जरा चिडच आली पण त्या म्हाताऱ्याचं वयं पाहता पाटलांनी शांतपणे नाकावर येणारा चष्मा सरळ करत विचारलं अहो आजोबा शेजारी कोणी बसलं आहे कि नाही हे मी नं सांगताच बसला तुम्ही

असुदे रे कोणी न्हवत बसलं इथे, मी पायल होतं दुरून. मी आपलं उगा इचारायचं म्हणून बोललो. तुम्हा शहरातल्या माणसांना असं इचारून बसावं लागतं असं माझ्या पोराने मला सांगितलं होतंम्हातारा तंबाखू मळत पाटलांकडे न पाहताच बोलला. 

ओह्ह अच्छा... म्हणजे या शहरात नवीन आहात तर तुम्ही” पाटील जरा सावरत म्हणाले.

हा तसं हायेच.. मागच्याच हप्त्यात माझ्या पोराकडे आलोय मी. हे काय पलीकडच्या दोन बिल्डिंगा सोडून घर आहे माझ्या पोराचं. नातवाचा वाढदिवस आहे म्हणून आलो. नायतर आमी काय गावाकडे असतो...बोलता बोलता म्हाताऱ्याने तंबाखू मळून व्यवस्थितपणे तोंडात ठेवली आणि हात झटकू लागला.

अच्छा...” एवढच बोलून पाटील जरा सावरून बसले. खरतर या म्हाताऱ्याच्या येण्याने त्यांची तंद्री भंग पावली होती.

तू काय करतो रे पोराम्हाताऱ्याने तंबाखू चघळत पाटलांना विचारलं. आता म्हातारा काही स्वस्थ बसू देणार नाही असं पाटलांना वाटलं कारण गावाकडून आलेले म्हातारे हे एकदा बोलू लागले कि थांबता थांबत नसत. आता या गपिष्ट म्हाताऱ्याशी बोलण्यावाचून गत्यंतर नाही असं वाटून पाटील बोलू लागले.

मी डॉक्टर आहे आजोबा

अरा बापरे म्हणजे मोठा माणूस हाय रे तू” म्हातारा डोळे मोठे करत म्हणाला.

तसं काही नाही इतर डॉक्टर लोकांसारखाच आहेशक्य तितक्या हळू आवाजात पाटील म्हणाले.

नाई म्हणजे आप्रेशन बिप्रेषन करन म्हणजे काय सोप्पं काम नाही गड्या. ते तुम्हा लोकांना जमतं म्हणजे मोठच कि तुम्हीम्हातारा डोळे मिचमिच करत बोलला.

नाही नाही आजोबा.. सर्जन नाहीये मी. जनरल फ्यिजिशिअन आहे मी.डॉक्टर पाटील स्पष्ट शब्दात आणि काहीशा मोठ्या आवाजात म्हणाले.

ऑ.. काई ते..पाटलांच्या इंग्रजीत उच्चारलेल्या त्या शब्दांच्या उलगडा न झाल्याने म्हातारा कडू तोंड करत म्हणाला.

अ.. म्हणजे ऑपरेशन करणार डॉक्टर नाही. आजाराची लक्षण पाहून औषध गोळ्या देणारा डॉक्टर आहे मी” पाटील स्मितहास्य करत म्हणाले. हि आपली ओळख सांगताना आपण स्मितहास्य करत आहोत हे पाटलांच्या लक्षात येताच पाटील दुसऱ्या क्षणाला शांत बसून समोर पाहू लागले.

हम्म...म्हंजे साधा डाक्टर आहेस तर... असं म्हणून ओठ एकमेकांवर दाबत म्हातारा आपल्या सदऱ्याच्या आत काहीतरी शोधू लागला. अतिशय कुत्सितपणे आपला साधा डॉक्टर म्हणून केलेला उल्लेख पाटलांना मुळीच आवडला नाही. थोडक्यात म्हाताऱ्याचे ते साधा डॉक्टरहे वापरलेले शब्द त्यांच्या वर्मी घाव करून गेले आणि न राहवून पाटील त्या म्हाताऱ्याला म्हणाले.

एक मिनिट आजोबा.. अहो फक्त क्रिडेन्शिअल पाहून तुम्ही अमुक डॉक्टर साधा कि भारी असं नाही ठरवू शकतनाकावर सरकणारा चष्मा सरळ करत पाटील जराश्या घुश्यातच म्हणाले. तो म्हातारा अजूनही सदऱ्यात हात घालून काहीतरी शोधतच होता. पाटील अजूनही त्या म्हाताऱ्याकडे पाहत उत्तराच्या अपेक्षेने तोंड अर्धवट उघडे ठेवून पाहत होते. शेवटी त्या म्हाताऱ्याला सदऱ्याच्या आतमधे जे पाहिजे होते ते सापडले.

पाटलांकडे बघत तो म्हातारा म्हणाला “हे बघ पोरा ते किडे बिडे का काय ते तू जे म्हणालास ते मला काय कळत नाय बघ. आम्हा गावाकडच्या लोकांचं कसं असतंय आप्रेशन करणारा डाक्टर म्हणजे भारी माणूस एवढचं गणित असतंय आमचं

म्हाताऱ्याच्या या उत्तरावर आता मात्र पाटील डोक्याला हात लावून बसले. हा म्हातारा चांगलाच डोकं खाणारा आहे हे त्यांना कळून चुकलं. साला काय कटकट आहे. बागेत नेहमीप्रमाणे फेरफटका मारून शांतपणे बाकावर बसायचो, आज काय हि ब्याद उपटली असं वाटून पाटील डोकं खाजवत समोर पाहत शांत बसले. म्हाताऱ्याने पाटलांकडे पाहिलं आणि त्याला जाणवलं कि पाटील दुखावले गेले आहेत. तसं तो समजुतीच्या स्वरात म्हणाला

अरे पोरा आमच्यासारख्या म्हाताऱ्या माणसाचं बोलण काय मनाला लाऊन घेतोस रे... आम्हाला काय कळतय त्यातलं बाबा तू सुद्धा मोठाच असचील

म्हाताऱ्याच्या या सावरासावरीने पाटलांच काही समाधान झालं नाही उलट डॉक्टर पाटील बसल्या जागीच पाय हलवत जरा रागातच समोर पाहू लागले. पाटलांची शांतता म्हाताऱ्याला काही रुचली नाही तेव्हा तो म्हातारा अजून पुढे म्हणाला. “अरे बाबा माणसांना जीवदान देणारे सगळ डाक्टर सारखेच. फक्त त्यातल्या त्यात जाणारा जीव वाचवा म्हणून धडपड करणारा डाक्टर खरा मोठा बघ” म्हातारा उगाचच दात दाखवत म्हणाला.

मी सुद्धा तसाच डॉक्टर आहे आजोबा. या भागातला एक प्रतिष्ठित, नावाजलेला आणि कित्येकांचा फॅमिली डॉक्टर आहे मी. माझ्या उपचारांचा गुण बऱ्याच जणांना येतो.” पाटील त्या म्हाताऱ्यावर नजर रोखून म्हणाले.

अस्स काय.. असेल हो.. काई सांगूबाबा आजकाल जीवाचा काई भरवसा नाही. खूप स्वस्त झालाय बग. कालच्याला आमच्या शेजारचा बोबडे नावाचा एक माणूस सांगत होता कि एक बाई मेली खालच्या गल्लीतील” म्हातारा जरा आठवल्यासारख करत म्हणाला.

म्हाताऱ्याच्या तोंडून बाई मेली असा उल्लेख ऐकून पाटील जरा गंभीर झाले. त्या बाईचा मृतदेह मीच तपासला असं सांगून या म्हाताऱ्याला गप्प करावं अशा उद्देशाने पाटील म्हणाले हो त्या बाईंचा मृतदेह मीच तपासला होता आणि मृत झाल्याचं घोषित केलं होतं. कारण मी त्यांच्या जवळच राहतो आणि त्यांच्या घरात कोणालाही आजारपण आल्यास मलाच बोलावतात. डॉक्टर पाटील आपली मान ताठ करत म्हणाले.

काई सांगतो काय..जरा मोठ्याने बोलत तोंडातून एक पिचकारी बाजूला मारत म्हातारा आता पाय सरळ करून बाकावर बसला. “माणूस मेलाय हे तुला समजलं लेका.. म्हणजे तू तर मोठा डाक्टर असला पाईजे रे...”

म्हाताऱ्याने आपला या वेळी मोठा डॉक्टर असा उल्लेख केलेला ऐकून पाटील मनातून सुखावले पण त्यांनी चेहऱ्यावर तसं दाखवलं नाही. म्हातारा उगाच काहीतरी खोचक बोलेल म्हणून पाटील यावेळी शांतच बसले. पण म्हातारा काही शांत बसायच्या मूड मध्ये न्हवता.

अरे मग काय झालं काय हुत तिथे नक्की, तुला कस कळल ती बाई मेलिय ते, तुला त्यांनी बोलावलं म्हंजी नक्कीच तू हुशार असला पाईजे बाबा” म्हातारा आ वासून पाटलांकडे बघत म्हणाला. परत एकदा हुशार असा उल्लेख झालेला पाहून पाटील मनोमन सुखावले आणि देसाई कुटुंबीयांकडे त्यांनाच कसं बोलावलं गेलं याबद्दल सांगू लागले.

काही नाही आजोबा.. मी आधीच तुम्हाला सागितलं आहे कि मी इथला खूप नावाजलेला आणि प्रतिष्ठित डॉक्टर आहे. तसाच अनेकांचा फॅमिली डॉक्टर आहे. त्या मेलेल्या बाईंच्या घरच्यांचा सुद्धा फॅमिली डॉक्टर होतो. मी आपल्या क्लिनिकमध्ये बसलो होतो तेव्हा बाहेर अचानक मला आरडाओरडा ऐकू आला तसा बाहेर आलो. बाजूच्या कोणीतरी मला सांगिलते कि समोरच्या वाड्यातील मालतीबाई यांना भोवळ आलीय आणि त्या खाली जमिनीवर पडल्यात तर तुम्ही चला. आजूबाजूला इतर कोणीही माझ्या इतका नावाजलेला डॉक्टर न्हवता त्यामुळे ते कदाचित माझ्याकडे आले असावेत म्हणून मी तडक त्यांच्या वाड्यात गेलो. तर ती बाई जमिनीवर तिच्या खोलीत पडली होती. तिचे ठोके लागत न्हवते आणि नाडीसुद्धा बंद होती. मी स्टेथेस्कोपने तपासलं तर जिवंत असण्याचा एकही पुरावा दिसत न्हवता

मंग काय केलं तू..” पाटलांच वाक्य मधेच तोडत म्हातारा बोलला.

मग काय तेव्हा. मला जरा शंका आली मग मीच हॉस्पिटलमध्ये हलवा असं सांगितलं” पाटील हाताची घडी घालत समोर पाहत गंभीरपणे म्हणाले.

अररर.. बिचारीला अटाक आला असणार बघ... मी म्हणालो ना रे डाक्टर आजकाल जीवाचा भरवसा नाहीच बघ. आमचा शेजारी बोबडे थेरडा उगाचच काहीही उठवतो कि खून झाला म्हणून” म्हातारा उगाचच कसनुस तोंड करत म्हणाला.

अहो आजोबा खुनच झालेला होता त्या बाईचा आणि बिचारी वगैरे कसली हो, चांगलीच पाताळयंत्री बाई होती तीपाटील त्रासिक सुरात समोर पाहत म्हणाले.

अह... अस्स होय...तोंडावरचा घाम धोत्र्याच्या सोग्याने पुसत विचित्र चेहरा करत म्हातारा खाली पाहू लागला.

म्हाताऱ्याला खून हा शब्द ऐकून धडकी भरली असावी. म्हणूनच घाबरून शांत झाला असावा असं वाटल्याने पाटलांना जरा आवेश चढला. आणि ते म्हणाले

अहो आजोबा घाबरू नका. इथे काय दिवसाढवळ्या खून दरोडे घडत नाहीत आणि माझ्यासारख्या नावाजलेल्या डॉक्टरसोबत तुम्ही या बागेत मध्ये बसलेले असताना तुम्हाला कोण काय करणारनाटकी हसत हसत पाटील म्हणाले.

म्हातारा अजूनही जमिनीकडे पाहतच होता. पाटील त्याच्याकडे पाहत होते. त्यांना वाटलं काय पण म्हातारा आहे राव खून म्हटलं कि घाबरतो.

थोड्या वेळाने तो म्हातारा खाली पाहतच म्हणाला अरे पोरा मी घाबरलो नाही फक्त ईचार करतोय कि तू एवढ्या खात्रीने कसं काई बोलला कि खूनच झाला होता म्हनून, कारण तुला तर बाईला भोवळ आलीय आन ती जमिनीवर पडलीय म्हणून बोलावलं होतं ना?” एवढ बोलून म्हाताऱ्याने पाटलांकडे साशंक नजरेने पहिले. त्या म्हाताऱ्याची ती नजर पाहून पाटील अवाकच झाले. म्हणजे हा म्हातारा आपल्यावर संशय घेतोय. याची हिम्मतच कशी काय झाली. असं वाटून पाटील पुढे बोलले.

हे बघा आजोबा मी एक डॉक्टर आहे आणि डॉक्टरांना शरीरशास्त्रातील सगळं कळत. त्या बाईंचं शरीर पूर्णपणे आखडल होतं अगदी काही मिनिटातच. हृदयक्रिया बंद पडल्याने असं काही लक्षण दिसत नाही आणि तिच्या मानेवर सुद्धा रक्ताचा थेंब होता जणू काही कोणीतरी जबरदस्तीने इंजेक्शन देऊन मारलं असावं असा. अर्थात त्यावेळी मी कोणालाच काही सांगितल नाही. तसंही ती काय साधीसुधी बाई वाटली काय तुम्हाला. अहो ती मोठी पोचलेली राजकारणी बाई होती. बऱ्याच लोकांचं नुकसान केलं होत तिने. घेतला असेल कोणीतरी तिचा बदला. तुम्हाला काय माहिती, नवीन आहात तुम्ही इथे” रागारागात एवढ बोलून पाटलांनी आपल्या मनगटावरच्या घड्याळात पहिले १० वाजून गेले होते. आज सकाळ सकाळ म्हाताऱ्याने डोक्याला ताप दिला होता.

तुमचं पन चांगलंच नुकसान केलेलं हुतं वाटतं त्या बाईने, एवढं तावातावाने बोलताय ते” म्हाताऱ्याने तोंडातून एक पिचकारी बाजूला मारून धोतराने तोंड पुसलं आणि उगाचच नजर रोखून पाटलांकडे बघू लागला. पाटलांनी त्या म्हाताऱ्याकडे पहिले त्यांना त्या म्हाताऱ्याची नजर विचित्र वाटली. बोलता बोलता आपण बरंच काही बोलून गेलो याची खंत त्यांना वाटून हाताच्या मुठी आवळून ते जरा आखडून बसले. काही वेळातच या म्हाताऱ्याच्या टकळीपासून सुटका करून घ्यावी म्हणून ते जागेवरून उठले आणि उगाचच मनगटावरच्या घड्याळात पाहत म्हणाले चला मी निघतो माझी दवाखान्यात जायची वेळ झालीआणि त्या म्हाताऱ्याकडे न पाहतच चालू लागले.

बागेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोचल्यावर पाटलांना जरा हायसं वाटलं. बाहेर पडताना उगाचच त्यांनी आपण मगाशी बसलेल्या बाकड्याकडे नजर वळवली. तर तो म्हातारा एक पाय बाकावर ठेवून बागेच्या मुख्य प्रवेशद्वाराकडेच नजर रोखून एकटक त्यांचाचकडे पाहत होता. पाटलांनी तिथून लागलीच काढता पाय घेतला.

आता संध्याकाळ होत आली होती, इन्स्पेक्टर देशमुखांची गाडी पोलीस स्टेशन पासून निघाली. त्यांना तडक सत्यवीरला भेटण्यासाठी त्याच्या घरी जायचं होतं. मालती देसाई खून प्रकारणाच कामकाज म्हणावं तसं वेग घेत न्हवते. कोणतीच महत्वाची माहिती पुढे येत न्हवती. पण आता सत्यवीरने तपासकार्यात हातभार लावायचं ठरवल्यामुळे तपास करण सोप्पं पडणार होतं. काही वेळाने पोलिसांची गाडी सत्यवीरच्या घरापुढे थांबली आणि त्यामधून देशमुख रुबाबात खाली उतरले. सोबतच्या हवालदाराला त्यांनी गाडीजवळच उभं राहायला सांगितलं आणि ते एकटेच सत्यवीरच्या घराच्या दरवाजाजवळ आले. दार अर्धवट उघडच असल्याने ते सरळ आत लोटून देशमुख आत आले आणि समोरचे दृश्य पाहून जरा चपापलेच. आतमध्ये एक म्हातारा खुर्चीत बसून त्याच्या दोन्ही तंगड्या टेबलावर पसरून आरामात सिगारेट ओढत बसला होता.

अ...आपण कोण आणि सत्यवीरच्या घरात काय करताय... इन्स्पेक्टर देशमुखांनी आश्चर्याने विचारलं.

देशमुखांनी बोलताच समोरचा म्हातारा खळाळून हसला आणि त्याने डोक्यावरचा पांढऱ्या केसांचा विग आणि नकली पांढऱ्या मिशा समोर टेबलावर काढून ठेवल्या. आपले केसं तो एका हाताने व्यवस्थित करू लागला.

ओह्ह.. सत्यवीर तू.. अरे मी ओळखलंच नाही तुलादेशमुख चेहऱ्यावर हास्य आणत म्हणाले. तसं देशमुखांना माहित होतं कि काही विशेष कारण असल्यास सत्यवीर वेषांतर करून तपास करतो. तरीपण आत्ता त्याला हे सोंग आणावयाची काय गरज पडली ते समजेना.

चला तुम्ही मला ओळखलं नाही म्हणजे म्हाताऱ्याचे सोंग झकास जमले होते तर” अस म्हणत सत्यवीरने आपल्या नकली मिशा बाजूला सरकवून ठेवल्या.

पण मला एक सांग सत्यवीर हे अचानक असं सोंग का घेतलस बाबा?” देशमुखांना आपलं कुतूहल लपवता आलं नाही.

काही नाही हो इन्स्पेक्टर साहेब मला वाटलं कि मालतीताई यांच्या खुनाची चौकशी आधी बाहेरून करावी” सत्यवीर म्हणाला.

पण असं वाटण्यामागे काही विशेष कारण?” देशमुखांनी विचारलं.

हा.. म्हणजे मला असं वाटलं कि मृत व्यक्ती स्वभावाने किंवा व्यक्तिमत्वाने कशी होती याची विचारणा बाहेरून करून घ्यावी अर्थात ती नेहमीप्रमाणे सरळ मार्गाने न करता या विशिष्ट पद्धतीने. आणि तसंही या प्रकरणात प्रतिष्ठित व्यक्तीचा समावेश असल्याने त्याबद्दलच्या ना ना प्रकारच्या वावड्याच जास्त उठतात. केसचा तपास सुरु करण्यापूर्वी या वावड्या काय असू शकतात त्यात तथ्यांश किती याची चाचपणी करणे गरजेचे होते. लोक पोलिसांना किंवा कोणत्याही खाजगी गुप्तहेराला अशा गोष्टी सरळ सांगत नाही म्हणूनच त्या जाणून घेण्यासाठी हा खटाटोप.” टेबलावरील नकली केसांच्या विगकडे निर्देश करत सत्यवीरने सिगरेटचा एक दिर्घ झुरका घेतला.

ओह्ह... असं आहे तर.. मग तुझ्या हाती काय लागलं. तसं पोलीस खात्याने सुद्धा त्यांच्या परीने बाहेर चौकशी केली होती. पण आता तू म्हणतोयस कि लोक सगळ्याच गोष्टी पोलिसांना स्पष्ट सांगत नाहीत तर तुला नक्की काहीतरी सापडलं असेलच” देशमुखांनी विचारणा केली.

काही गोष्टी समजल्या. ठरल्याप्रमाणे मी डॉक्टर पाटलांना म्हाताऱ्याच्या वेशात बागेत सकाळ सकाळ भेटलो. मी या भागात एक नवखा नागरिक आहे असं भासवून शेजारच्या भागात खून झालाय असं कळल्याचे सांगून झालेल्या खुनाची चौकशी केली.” सत्यवीर सांगत असतानाच देशमुख मधेच म्हणाले.

अरे वाह म्हणजे पाटील डॉक्टरांनी तुला ओळखले नसेलच. तुला त्यांच्याकडून काय माहिती मिळाली.” देशमुख स्मित करत म्हणाले.

मालतीबाई ज्यावेळी जमिनीवर कोसळलेल्या होत्या त्यावेळी डॉक्टर पाटलांना वाड्यावर बोलावलं होतं आणि त्याचवेळी त्यांना असा संशय आला होता कि मालतीबाई यांचा खून झाल्याची शक्यता आहे. इतर माहितीच म्हणाल तर मालतीताई यांच्याबाद्द्ल समाजात चांगली प्रतिमा नाही. त्यांनी बऱ्याच लोकांचं आर्थिक वा सामाजिक स्तरावर नुकसान केलेलं आहे. किंबहुना डॉक्टर पाटील सुद्धा याचे बळी ठरलेत असा मला दाट संशय आहे” सत्यवीरने सिगारेटचे थोटूक विझवत बाजूला ठेवले.

हम्म.. आम्हाला सुद्धा लोक बऱ्यापैकी हेच सांगत होते कि बाई जरा खाष्टच होती. तिच्या फायदाच्या आणि जवळच्या लोकांनाच कामे मिळवून द्यायची. पण डॉक्टर पाटलांनासुद्धा मालतीबाईंचा राग असावा हे विशेष आहे. कारण पोलीस चौकशीत तर डॉक्टर पाटील तसं काही असल्याचं दाखवत न्हवतेदेशमुख विचारमग्न होत म्हणाले.

खुनासारख्या प्रकरणात पोलिसांना अशा माहित्या देऊन कोण कशाला आफत ओढवून घेईन देशमुख साहेब. डॉक्टर पाटील यांच्या चौकशी नंतर मी त्या भागातल्या बऱ्याच लोकांना जसे कि दुकानदार, स्थानिक भागातील ज्येष्ठ नागरिकांच्या क्लब मधील मेंबर यांना भेटलो. सगळ्याचं ऐकून मला हे वाटतंय कि मृत मालती बाईंबद्दल लोकांच मत चागलं नाहीये.सत्यवीर हाताची घडी घालत टेबलाकडे एकटक पाहत म्हणाला.

हम्म.. म्हणजे मालतीबाई यांना मारून बऱ्याच जणांना फायदा होऊ शकतो असं दिसतंय. मालतीबाईंना पाण्यात पाहणारा कोणीतरी असेल ज्याचं मालतीबाईनी नुकसान केलं असेल किंवा त्यांचा कोणी राजकारणातील शत्रू हे कृत्य करू शकतो.” देशमुख म्हणाले.

शक्यता नाकारता येत नाही देशमुख साहेब, पण मालतीताईंचा मृत्यू घरात झालाय. त्यांचा खून करणाऱ्याला त्यांच्या घरात जाऊन मारण्यासाठी कोणा ना कोणाची मदत घाव्यी लागलेली असू शकते. तो व्यक्ती घरात आला तसा खून करून बाहेर गेला असं सहजासहजी शक्य होणार नाही. कोणीतरी त्याला नक्कीच मदत केलेली असेलसत्यवीर हात डोक्यामागे घेत वर आढ्याकडे पाहत म्हणाला.

शिवाय मालतीताईंचा मृत्यू सुद्धा विशिष्ट पद्धतीने झालाय, खुन्याने कोणताही मागमूस न सोडता हे काम कोणाच्या मदतीशिवाय करण शक्य वाटत नहीये.देशमुखांनी सत्यवीरच्या म्हणण्याला जोड दिली.

पण काही प्रश्न हे उरतातच देशमुख. मालतीताईंचा काटा खुन्याने विशिष्ट पद्धतीने का काढला असेल? असं कोणतं विष त्याने वापरलं असेल ज्याने मालतीताई तत्क्षणी मृत्युमुखी पडल्या? चाकू भोसकून किंवा रस्त्यावर अपघात करून मालतीताईंना मारणे शक्य असताना हि विशिष्ट पद्धतच का वापरली असावी? शिवाय खुन्याने ते विष मालतीताईंना कस दिलं असेल?” एकामागोमाग एक प्रश्न उपस्थित करत सत्यवीर आपल्या खुर्चीत डोळे मिटून शांत बसला. यावर काही उत्तर नसल्याने देशमुख सुद्धा विचार करत शांत बसले. काही वेळ सत्यवीर आणि देशमुख विचारमग्न झाले.

काही वेळ शांततेत गेला. नंतर त्या शांततेचा भंग करत सत्यवीर म्हणाला

चला देशमुख मला वाटत आता आपण देसाई वाड्यावर जाऊन प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी आणि घरातील लोकांची चौकशी करायला हवी. उर्वरित प्रश्नांनी उत्तरं आपल्याला कदाचित तिथे मिळू शकतातसत्यवीर लगबगीने म्हणाला.

हो खरतर त्यासाठीचं मी इथे आलो होतो. मालतीताईंच्या देहावर दहन संस्कार होऊन बरेच दिवस झाले आहेत. त्यामुळे तुला टेलिफोन न करता लगोलग तुला घेऊनच देसाई वाड्यावर जावे असा विचार होतादेशमुख जागेवरून उठत म्हणाले.

हे एक बरे केलेत. मला तुमची सुद्धा मदत लागेलच” सत्यवीर म्हणाला.

पुढच्याच क्षणी सत्यवीर आणि इन्स्पेक्टर देशमुख घरातून बाहेर पडले आणि देशमुखांनी खाली उभ्या केलेल्या पोलिसांच्या गाडीत येऊन बसले. गाडीत बसताच देशमुखांनी हवालदाराला आदेश दिला चला म्हस्के गाडी आता तडक देसाई वाड्याकडे न्या

इंस्पेक्टर देशमुखांच्या आदेशासरशी हवालदार म्हस्केनी गाडी चालू केली आणि गाडी देसाई वाड्याकडे जाऊ लागली.

क्रमशः


खोली क्रमांक ४

                                   "अरे नुसता बसलायस काय आतमधे. जरा बाहेर येऊन धक्का मार" अजय वैतागत म्हणाला. "काय..."...