२४ ऑक्टोबर, २०२६

गुप्तहेर सत्यवीर आणि विलक्षण खून (भाग ३ घटनाविश्लेषण)


 


विश्लेषणात्मक म्हणून ज्या मानसिक गुणांचा उल्लेख केला जातो त्यांचे स्वतःचे विश्लेषण करणे फारसे शक्य नसते. आपण त्यांना त्यांच्या परिणामांवरूनच ओळखतो. विश्लेषण करण्यायोग्य बुद्धिमत्ता असलेले हे गुण एखाद्या व्यक्तीत अतिशय प्रबळ प्रमाणात असतील तर त्यांचा निघणारा परिणाम त्या व्यक्तीस अत्यंत तीव्र आनंद देतो. जसा एखादा बलवान मनुष्य आपल्या शारीरिक सामर्थ्यावर आनंद व्यक्त करतो. कुस्ती किंवा धरपकड असणाऱ्या खेळात वाकबगार असल्याने तो आपल्या बलवानपणावर खूष असतो किंवा त्या गोष्टी त्याला आनंद देतात म्हणूनच आपल्या स्नायूंना कार्यरत करणाऱ्या व्यायामांचा तो नेहमीच आनंद घेत असतो. त्याचप्रमाणे विश्लेषकाला गोष्टींची गुंतागुंत उकलण्यात जी मानसिक क्रिया लागते तिच्यात आनंद मिळतो तसेच त्याआधिक त्या उकल झालेल्या घटनांनंतर झालेल्या परमानंदाचा तो भोक्ता असतो. त्याच्या विश्लेषणात्मक कौशल्याला वाव देणारी अगदी क्षुल्लक कामेदेखील त्याला आनंद देतात. त्याला कोडी, गुंतागुंतीचे प्रश्न आणि चित्रलिपी यांची विशेष आवड असते. त्यांची उत्तरे शोधताना तो अशी तीक्ष्ण बुद्धिमत्ता दाखवतो की, सामान्य माणसाला ती जवळजवळ अलौकिक वाटते. त्याचे निष्कर्ष प्रत्यक्षात पद्धतशीर विचारांच्या अगदी मूलभूत तत्त्वांवर आधारित असतात तरी त्यांच्यात अंतःप्रेरणेचा भास निर्माण होतो.

सत्यवीरच्या बाबतीत याचं गोष्टी होत्या. कोणताही गुन्हा किंवा गुन्हेगारी कृत्य जे कि सामान्यतः साधारण वाटतं असतं पण सत्यवीरमधला विश्लेषक त्या घटनांकडे एका वेगळ्याच नजरेतून पाहत असतो म्हणूनच तो इतरांपेक्षा वेगळा ठरतो. घटना ह्या त्याचं असतात पण बऱ्याच लोकांना त्यातली कारणमिमांसा समजत नाही अशा प्रकाराकडे सत्यवीर आपल्या विश्लेषक चष्म्यातून पाहतो.

दिनशॉ खून प्रकरण कळल्यापासून सत्यवीर काहीसा याच विश्लेषकांच्या भूमिकेत गेलेला होता.

रात्र बरीच पुढे सरकली होती.

निंबाळकरांच्या घरातील पाहुण्यांची गर्दी केव्हाच ओसरली होती. काही वेळापूर्वी जिथे हशा, गप्पा आणि संगीताचा आवाज घुमत होता त्याच घरावर आता एक विचित्र शांतता उतरली होती.

समोर समुद्र काळोखात हरवून गेला होता. बंदरावरची काही मोजकी दिवे अजूनही पाण्यावर लुकलुकत होती. अधूनमधून एखाद्या मालवाहू जहाजाचा लांबवरून येणारा भोंगा त्या शांततेला छेद देत होता.

पोर्चमध्ये एका खुर्चीवर सत्यवीर ग्लासातून मद्याचे घोट घेत बसलेला होता. दिनशॉ खून प्रकरण हाताळायला तो तयार झाला असल्याने निंबाळकरांनी त्याला आपला पाहुणा म्हणूनच घरात राहायला सांगितलं होतं.

"कसल्या विचारात गढला आहेस" मागून निंबाळकर त्याच्याजवळ येत म्हणाले.

पण त्याचं लक्ष नव्हतं.

"अं..काही नाही... केसचे दुवे जुळवत बसलोय" सत्यवीर जरा ताठ बसत म्हणाला.

निंबाळकरांनी खुर्चीत मागे रेलत सत्यवीरकडे पाहिलं.

"मला पण सांग कि काय हाती लागलंय तुझ्या विचारमंथनातून.." निंबाळकरांनी आता समोरच्या टीपॉयवरील रिकामा ग्लास घेऊन बाटलीतून थोडं मद्य त्यात ओतलं आणि ग्लास ओठाला लावला.

"सध्या तरी काही विशेष नाही" मद्याचा एक घोट घेत सत्यवीर म्हणाला.

"चल... आता पुन्हा एकदा सुरुवातीपासून विचार करूया." निंबाळकर त्याच्याकडे पाहत म्हणाले.

सत्यवीरने ग्लास टेबलावर ठेवला.

"पहाटे चार वाजता किंकाळ्या ऐकू आल्या."

"बरोबर"

"दिनशॉ कुटुंबाच्या घराचा मुख्य दरवाजा आतून बंद होता."

"बरोबर."

"दरवाजा तोडून आत गेल्यावर घरात झटापटीचे स्पष्ट पुरावे होते. फर्निचर अस्ताव्यस्त. गादी पलंगावरून काढून फेकलेली. रक्ताने माखलेला वस्तरा. केसांच्या बटा."

निंबाळकर शांतपणे ऐकत होते.

"आणि आतमधे दोन मृतदेह" ते म्हणाले.

"हो. मेहेर घरातल्या एका खोलीत मृत अवस्थेत. तिच्या गळ्यावर आवळल्याच्या खुणा आणि शेहरीन... घराच्या मागच्या बाजूच्या टेरेसवर गळा कापला गेलेल्या अवस्थेत."

सत्यवीर काही क्षण शांत राहिला.

"पण मला सगळ्यात आधी एक गोष्ट समजून घ्यायची आहे."

"कोणती?"

"त्या किंकाळ्या नेमक्या कोणाच्या होत्या?"

निंबाळकरांनी भुवया उंचावल्या.

"मेहेरच्या असाव्यात."

"असाव्यात?"

"एका शेजाऱ्याचं म्हणणं होतं कि एकच व्यक्तीच्या किंकाळ्या ऐकल्या. मेहेरचा मृत्यू गळा आवळल्याने झाला. त्यामुळे..."

"म्हणजे आपण गृहीत धरलं की त्या मेहेरच्याच किंकाळ्या होत्या." सत्यवीर चेहरा काहीसा तिरकस करत म्हणाला.

निंबाळकर काही क्षण विचारात पडले.

"खून करताना झटापटीत त्या किंचाळल्या असतील.."

निंबाळकर काही क्षण विचारात पडले.

सत्यवीर उठला आणि पोर्चच्या कठड्याजवळ जाऊन उभा राहिला.

"समजा त्या मेहेरच्या किंकाळ्या होत्या."

त्याने हाताने हवेत एक काल्पनिक घराचा आराखडा आखल्यासारखं केलं.

"खुनी घरात शिरतो. मेहेरला गाठतो. तिची झटापट होते. ती किंचाळते. खुनी तिचा गळा आवळतो."

"हो आणि पुढे?"

"मग प्रश्न आहे कि शेहरीन कुठे होती?"

निंबाळकर सरळ बसले.

"घरातच असणार."

"पण कुठे?"

निंबाळकरांनी उत्तर दिलं नाही.

सत्यवीर हळूहळू बोलू लागला.

"शेहरीन वृद्ध होती. घरात फक्त दोनच स्त्रिया राहत होत्या. रात्री चार वाजता मुलीच्या किंकाळ्या ऐकल्या तर आई धावत आली असती."

"कदाचित ती झोपलेली असेल." निंबाळकरांनी आपला तर्क दिला.

पण शेजाऱ्यांनी ऐकलेल्या किंकाळ्या इतक्या मोठ्या होत्या की संपूर्ण इमारत जागी झाली."

निंबाळकरांनी हळूच मान डोलावली.

"बरोबर."

"आता दुसरी शक्यता पडताळून पाहू."

"खुनी आधी शेहरीनकडे गेला. तिचा काटा काढला"

निंबाळकरांनी लगेच विचारलं "मग मेहेरच्या किंकाळ्या?"

"त्या नंतरच्या.."

सत्यवीर काही क्षण गप्प राहिला. पोर्चमध्ये अचानक शांतता पसरली. समुद्रावरून आलेल्या वाऱ्याने टेबलावर ठेवलेली कागदपत्रं हलली.

निंबाळकरांनी सत्यवीरकडे निरखून पाहिलं.

"म्हणजे तुझ्या मते आधी शेहरीनचा खून झाला?"

"शक्यता आहे."

पण तिचा मृतदेह टेरेसवर सापडला. आणि मेहेरचा मृतदेह घरात."

"यातून मग एक प्रश्न निर्माण होतो."

सत्यवीरने टेबलावर बोटाने दोन बिंदू केले.

"इथे मेहेर."

दुसरा बिंदू.

"इथे शेहरीन."

मग दोन्ही बिंदूंना जोडणारी काल्पनिक रेषा आखली.

"हल्लेखोराला दोघींना वेगवेगळ्या ठिकाणी गाठावं लागलं.. दोघींना एकत्रच गाठून त्याने हल्ला चढवला. शेहरीन घाबरून घरच्या मागे असलेल्या टेरेसकडे धावली. मेहेरचा गळा आवळेपर्यंत शेहरिनाने किंकाळी मारली नंतर खुन्याने तिचा गळा कापला..किंवा आधी शेहरीनचा गळा कापला ते पाहून मेहेर किंचाळली मग खुन्याने ती जास्त किंचाळू नये म्हणून तिचा गळा आवळला"

या तर्कावर होकार दर्शवत डोलवत निंबाळकर फक्त शांत बसले.

ग्लासमधून काही घोट घेतल्यानंतर निंबाळकर म्हणाले- "तुझा मते हा पूर्वनियोजित गुन्हा आहे?"

"मला वाटतं त्यापेक्षा जास्त काहीतरी आहे."

"म्हणजे नक्की काय?"

"घटनास्थळावर खूप काही जास्त आहे."

निंबाळकर गोंधळले.

"जास्त?"

"हो."

"फर्निचरची तोडफोड, बेडवरची गादी जमिनीवर पडलेली. रक्ताळलेला वस्तरा, केसांच्या बटा, उघडी तिजोरी आणि त्यातुन काहीही चोरीला गेलेलं नाही."

सत्यवीर कठड्यावर हात ठेवत म्हणाला.

"हम्म.. हे खरं आहे गोंधळात टाकणारं देखील" निंबाळकर म्हणाले.

"हे सगळं एखाद्या झटापटीत नैसर्गिकपणे घडू शकतं. पण जेव्हा प्रत्येक गोष्ट आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते. तेव्हा मला त्या गोष्टीवरच संशय येतो."

निंबाळकर हलकेच हसले.

"तुझं निरीक्षण कौशल्य खरोखरच कौतुकाला पात्र आहे. देशमुखही याचं गोष्टीची स्तुती करायचा"

सत्यवीर हसला.

"तुम्ही पोलिसात बत्तीस वर्षं काम केलंय. तुम्हालाही माहिती आहेच कि गुन्हेगार कधी कधी पुरावा लपवण्यापेक्षा पुरावा तयार करण्यात जास्त चुका करतो."

"घटनस्थळी वस्तरा पण मिळालाय?"

"वस्तरा खरोखर वापरला गेला आहे."

"हो तर.. फॉरेन्सिकने सांगितलंय."

"हो.. पण तो शेहरीनला मारण्यासाठी वापरला गेला असला. तरी तो तिथे कसा पोहोचला हे महत्त्वाचं आहे."

दोघेही पुन्हा शांत झाले. दूर समुद्रावरून एखाद्या होडीच्या इंजिनाचा आवाज आला. काळोखात समुद्रावरच्या जहाजांची दिव्याची लुकलुक खुपचं मनोरम्य दिसत होती.

निंबाळकरांनी हळू आवाजात विचारलं.

"केसांच्या बटा?"

सत्यवीरने एक उसासा टाकला "तो दुसरा विचित्र भाग."

"त्या वृद्ध स्त्रीचे केस असतील?" निंबाळकरांनी सांगितलं.

"कदाचित."

"मग कोणाचे?"

"पण शौनकने सांगितलं की त्या केसांना मुळांसकट ओढून काढल्यासारखं दिसत होतं."

"म्हणजे झटापट झाली असणार."

"कदाचित."

"तुला प्रत्येक गोष्टीत 'कदाचित” का दिसतंय?"

"कारण अजून मी घटनास्थळ पाहिलेलं नाही." सत्यवीर मंद हसत म्हणाला.

निंबाळकर काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिले.

"तू उद्या तिथे जाणार आहेस बाय द वे... "

"हो.. पण आपण जी कल्पना करतोय... घटना खरंच त्या क्रमाने घडणं शक्य आहे का?"

निंबाळकर शांत झाले. सत्यवीरने पुन्हा घटनाक्रम मांडायला सुरुवात केली.

"समजा रात्री तीन वाजून काही मिनिटांनी खुनी घरात प्रवेश करतो."

"मुख्य दरवाजाने?"

"तोच प्रश्न.. दरवाजा आतून बंद होता."

"खिडकीमधून?"

"तिसरा मजला आहे."

"मग?"

"खुनी आधीपासून घरात असण्याची शक्यता?"

"कसं शक्य आहे...पण घरात दोन स्त्रिया राहत होत्या."

"आणि त्या दोघींना कदाचित तिसरी व्यक्ती घरात असल्याचं माहीतच नव्हतं. कदाचित ती व्यक्ती आधीच तिथे येऊन लपली असेल"

निंबाळकर अचानक पुढे झुकले.

"सत्यवीर... हे कसं असेल"

“जर खुनी आधीपासून घरात लपून बसला असेल. तर त्याला तिजोरीची किल्ली कुठे आहे हे माहिती असायला हवं आणि तिजोरी उघडण्यासाठी किल्ली वापरली गेली... म्हणजेच खुन्याला तिजोरी माहीत होती."

सत्यवीरच्या चेहऱ्यावर हलकंसं समाधान उमटलं.

"पण तिजोरीमधून काहीही घेतलं नाही." निंबाळकर विचार करत बोलले.

"किंवा... आपल्याला वाटतंय की तिजोरीतून काही घेतलं गेलं नाही."

"म्हणजे?"

“आपण फक्त तिजोरीत काय शिल्लक राहिलंय हे पाहिलंय. कदाचित तिथे आधी काहीतरी होतं"

निंबाळकरांच्या डोळ्यांत चमक आली.

दोघांमध्ये पुन्हा शांतता पसरली. समुद्रावर पुन्हा एकदा जहाजाचा भोंगा घुमला आणि त्या आवाजात सत्यवीरच्या मनात एक नवा प्रश्न जन्माला आला.

दिनशॉंच्या घरात त्या रात्री खरंच दोनच व्यक्ती होत्या का?

===========================================================


गुप्तहेर सत्यवीर आणि विलक्षण खून (भाग २ शौनकची व्यथा)


 

भाग २ 

शौनकने सांगायला सुरुवात केली -

त्या दिवशी पहाटे सुमारे चार वाजता टपालनगर येथील रहिवाशांची झोप भयंकर किंकाळ्यांच्या मालिकेमुळे भंगली. या किंकाळ्या टपालनगर येथील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून येत होत्या. त्या घरात शेहरीन दिनशॉ आणि तिची मुलगी मेहेर दिनशॉ या दोघीच राहत असल्याचे माहीत होते. किंकाळ्यांच्या आवाजांनी आसपासचे शेजारी सगळेच जागे झाले. किंकाळ्या ह्या दिनशॉ कुटुंबाच्या घरातून ऐकू आल्याने सगळे तिकडे धावले. पण दरवाजा आतून बंद होता. पोलिसांनी फोन केला गेला.

दोन हवालदारांना घेऊन मी घटनास्थळी गेलो. नेहमीच्या पद्धतीने घरात प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर काही वेळाने लोखंडी दांडा वापरून मुख्य दरवाजा फोडला आणि आठ-दहा शेजारी मी आणि दोन पोलिस अधिकारी आत गेलो. आतील ते दृश्य पाहून उपस्थित प्रत्येक व्यक्तीला भय आणि आश्चर्याचा एकाच वेळी धक्का बसला.

खोलीत सर्वत्र अत्यंत गोंधळ उडालेला होता. फर्निचर तुटलेले होते आणि वस्तू सर्व दिशांना अस्ताव्यस्त फेकलेल्या होत्या. खोलीत फक्त एकच पलंग होता. परंतु त्यावरील गादी काढून खोलीच्या मध्यभागी फेकलेली होती. एका खुर्चीवर रक्ताने माखलेला वस्तरा पडलेला होता. एका कोपऱ्यातील जागेवर दोन-तीन लांब आणि जाड पांढऱ्या/करड्या मानवी केसांच्या बटा आढळल्या. त्या रक्ताने माखलेल्या होत्या आणि त्या केसांना मुळांसकट ओढून काढल्याचे दिसत होते. जमिनीवर नाण्यांनी भरलेल्या दोन पिशव्या सापडल्या ज्यात काही रोख रक्कम होती.

मी सगळ्या खोलीची तपासणी करायला घेतली. पलंगाखाली एक छोटी लोखंडी तिजोरी सापडली. ती उघडी होती आणि तिच्या कुलपात किल्ली अजूनही होती. त्यामध्ये काही जुनी पत्रे आणि फारसे महत्त्व नसलेली काही कागदपत्रे यांशिवाय काहीही नव्हते.

त्यानंतर आम्ही घराच्या मागील बाजूच्या एका छोट्या फरसबंदी केलेल्या अंगणात गेलो. जिथे छोटंसं टेरेस होतं. तेथे वृद्ध स्त्रीचे प्रेत पडलेले होते. तिचा गळा इतका पूर्णपणे कापला गेला होता की तिला उचलण्याचा प्रयत्न करताच तिचे डोके धडापासून वेगळे झाले. तिचे शरीर आणि डोके दोन्ही इतक्या भयानक रीतीने विद्रूप झाले होते की शरीरात माणसाचे कोणतेही स्पष्ट स्वरूप जवळजवळ उरले नव्हते. या भयंकर रहस्याचा अद्याप आमच्या माहितीनुसार यत्किंचितही माग काढता आलेला नाही.

हि आपली व्यथा सांगून शौनक शांत बसला..

पलंगाखाली एक छोटी तिजोरी होती म्हणजे ज्याला तिजोरी उघडायची होती त्याच्याकडे किल्ली होती आणि त्याने काही घेतलं नाही” सत्यवीरने कुतूहलाने विचारलं.

“दिसत तर तसंच आहे.”

“मग तिजोरी उघडण्याचं कारण काय?”

"काही समजत नाही" शौनक खाली मान घालत विचारात पडला.

“खून नक्की कशासाठी झालाय.. हेच तर कोडं आहे” निंबाळकर साहेब सत्यवीरकडे पाहत म्हणाले.

काही क्षण शांतता पसरली.

"मुलीचा मृतदेह म्हणजेच मेहरचा मृतदेह घरातल्या दुसऱ्या खोलीत आढळला. तिच्य गळ्यावर हाताने आवळल्याच्या खुणा होत्या. शरीरावर झटापटीच्या खुणाही होत्या. चेहऱ्यावर ओरखडे होते. ती स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत असावी. नंतर घराच्या मागच्या बाजूच्या छोट्या फरसबंदी केलेल्या टेरेसवजा अंगणात शेहरीन यांचा मृतदेह गळा कापल्याच्या अवस्थेत सापडला.” सत्यवीर हनुवटीवर हात ठेवून म्हणाला.

"हो" शौनकने मान डोलावली.

"तुम्ही सांगितलंत कि खुर्चीवर रक्ताने माखलेला वस्तरा पडलेला होता. कदाचित त्यानेच शेहरीनचा गळा धडापासून वेगळा केला गेला असावा?" सत्यावरीने विचारलं.

"हो वस्तार्यानेच गळा कापला गेलाय.. पण वस्तऱ्यावर कोणाचे ठसे आहेत ते सापडत नाहीये.." शौनकने पुढची माहिती दिली.  "मेहेरचा मृत्यू गळा आवळल्यामुळे झाल्याचं प्राथमिक तपासात दिसतं. पण शेहरीनच्या मृत्यूचं स्वरूप पूर्णपणे वेगळं आहे. तिच्या गळ्यावर गंभीर जखम होती.

“आणि तिच्या मृत्यूची पद्धत पाहता... हल्लेखोर अत्यंत क्रूर असावा असं वाटतं" सत्यवीर म्हणाला.

"कुणी काही संशयास्पद व्यक्ती पाहिल्याचं सांगितलेलं नाही का?  कि सगळ्यांनी किंकाळ्याच ऐकल्या" सत्यवीरने पुढे विचारलं.

"हो... बऱ्याच शेजाऱ्यांनी किंकाळ्या ऐकल्या मात्र एक शेजारी जो दिनशॉ कुटुंबाच्या जवळ राहत होता तो म्हणाला त्याने एक माणसाचा आवाज ऐकला.. हाका मारत असल्यासारखा जो कि विचित्र भाषेत होता" शौनकने गूढ पद्धतीती सांगितलं.

"ओह्ह.. विलक्षण आहे" सत्यवीर म्हणाला.

शौनक क्षणभर थांबला.

"किंकाळ्या एका व्यक्तीच्या होत्या की दोन?" सत्यवीरने पुढचा प्रश्न केला.

“हा प्रश्न आम्हालाही पडला आहे.” शौनक काहीसं चाचरत म्हणाला.

“म्हणजे?”

“बहुतेकांनी फक्त एकाच व्यक्तीच्या किंकाळ्या ऐकल्या असं सांगितलं.”

"दिनशॉ कुटुंबियांच्या जवळ असलेल्या कोणा व्यक्तीची तपासणी किंवा कुटुंबीयांविषयी माहिती घेतलीच असतील तुम्ही त्यांचं काय म्हणणं आहे" सत्यवीरने विचारलं.

"नातेवाईक असं कोणी नाही पण घरात कामाला आलेल्या नोकरमाणसांकडून जुजबी माहिती मिळाली ती हि कि शेहरीन आपला उदरनिर्वाह भविष्य सांगून करत असावी. गेल्या सहा वर्षांपासून त्या तिथे राहत होत्या ते एक भाड्याचे घर होते भाड्याबाबत कधी कोणती तक्रार आलेली नव्हती. वृद्ध स्त्री शेहरीन काहीशी बालिश किंवा विचित्र स्वभावाची होती. आसपासच्या लोकांनी गेल्या सहा वर्षांत तिच्या मुलीला फक्त पाच-सहा वेळा पाहिले होते. त्या दोघी अत्यंत एकांतप्रिय जीवन जगत होत्या आणि त्यांच्याकडे भरपूर पैसा असल्याची चर्चा होती" शौनकने माहिती दिली.

शौनकने खिशातून तो कागद बाहेर काढला जो त्याने काही वेळापूर्वी निंबाळकरांना दाखवला होता. तो कागद सत्यवीरसमोर ठेवत म्हणाला,

सत्यवीरने कागदाकडे पाहिलं.

“हा कागद त्या घराच्या तिजोरीत सापडलेल्या जुन्या कागदपत्रांपैकी एक आहे.”

सत्यवीरने कागद हातात घेतला.

त्यावर काही जुन्या तारखा, काही नावे आणि एका जुन्या मालमत्तेचा उल्लेख होता. ज्यात काही जमिनीच्या मालकीचा उल्लेखदेखील दिसत होता. त्याने कागद पुन्हा एकदा काळजीपूर्वक वाचला.

"सत्यवीर मला वाटतं तू या केसबाबत शौनकला मदत करावीस. तसंही त्याच्यापुढे मोठा पेचप्रसंग ओढवलेला आहे आणि तू सुद्धा इथे आलेलाच आहे तर माझ्या घरचा पाहुणचार पण घे काही दिवस" इतके वेळ शांत बसलेले निंबाळकर साहेब सत्यवीरकडे पाहत म्हणाले.

सत्यवीरने त्यांच्या या म्हणण्यावर आनंदाने होकार दिला. शौनकची आणि सत्यवीरची आधीपासून ओळख नव्हतीच पण निंबाळकर साहेबांच्या मध्यस्तीने कोणाची मदत मिळत असल्यास त्याला हवंच होतं म्हणून तो सुद्धा निंबाळकर साहेबांचे आभार मानून तिथून लगेचच निघून गेला.

गेट बंद झाल्याचा आवाज आला आणि त्याच क्षणी जणू त्या घरावरचं काहीतरी अदृश्य ओझं पुन्हा हलकं झालं.

अंगणातून हशा ऐकू आला.

कुणीतरी मोठ्याने म्हणत होतं- “अहो निंबाळकर आता तुम्हाला रोज सकाळी सहाला उठवायला कोणी फोन करणार नाही”

त्यावर दुसऱ्याने लगेच टोमणा मारला.

“अरे… सहाला उठवणं बंद झालं तरी वाहिनी आठ वाजता उठवतील”

सगळे हसले.

निंबाळकरही हलकेच हसले.

पण सत्यवीर मात्र तिथेच उभा होता. नेहमीसारखाच तो केसच्या विचारात गढलेला होता.

त्याच्या मनात काही मिनिटांपूर्वी ऐकलेल्या प्रत्येक गोष्टीची पुनरावृत्ती होत होती.

चार वाजता किंकाळ्या.

आतून बंद असलेला दरवाजा...

विस्कटलेली खोली....

रक्ताळलेला वस्तरा....

कोपऱ्यातील सापडलेल्या केसांच्या बटा.

उघडी तिजोरी... आणि कुलपात असलेली किल्ली...

दोन मृतदेह.

सत्यवीरने डोळे मिटले. घटनास्थळ त्याच्या कल्पनेत पुन्हा उभं राहिलं. तो हळूहळू मनात प्रश्नांची मांडणी करू लागला. दरवाजा आतून बंद होता तर हल्लेखोर बाहेर कसा गेला? तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून जाणं शक्यं आहे?

की तो अजूनही घरातच होता?

पण घराची तपासणी झाली होती. मग खून झाल्यावर दरवाजा आतून कोणी बंद केला?

त्याने डोळे उघडले. त्याच क्षणी त्याच्या मनात दुसरा प्रश्न आला. मेहेरच्या किंकाळ्या शेजाऱ्यांनी ऐकल्या... पण शेहरीनने त्या ऐकल्या नसतील?

मेहेर घरात ओरडत असताना.. शेहरीन अंगणात कशी पोहोचली?

आणि सर्वांत महत्त्वाचं त्या राखेत सापडलेले केस नेमके कुणाचे?

“काय विचार करतोयस?”

सत्यवीर दचकला. निंबाळकर साहेब त्याच्या शेजारी येऊन उभे होते.

“केस ऐकल्यावर प्रश्न पडत आहेत.”

“पडायलाच हवेत.”

निंबाळकरांनी त्याच्या हातातला रिकामा ग्लास पाहिला. निंबाळकर त्याच्या शेजारी बसले.

"सत्यवीर..” निंबाळकर हळू आवाजात म्हणाले, “तुला एक गोष्ट सांगू?”

“बोला.”

“माझ्या निरोपाच्या दिवशी मला केस मिळेल असं मी कधीच कल्पना केली नव्हती.”

सत्यवीर हसला. बाजूच्याच टेबलावरील बाटली घेऊन निंबाळकरांनी सत्यवीरच्या रिकाम्या ग्लासात दारू ओतली.

“मला सुद्धा कल्पना नव्हती कि तुमच्याकडे पार्टीला आल्यावर खुनाची केस ऐकावी लागेल.”

निंबाळकरही हसले.

पण त्यांचं हसू फार काळ टिकलं नाही.

त्यांनी समुद्राकडे पाहिलं. काही क्षण दोघेही शांत राहिले. समोर पार्टी सुरू होती. हशा, गप्पा, संगीत, जेवणाचा सुगंध...

दोघांची नजर दूर समुद्रावर स्थिरावली होती. बंदरावरच्या दिव्यांची प्रतिबिंबं काळ्या पाण्यावर हलत होती. निंबाळकर आणि सत्यवीर दोघेही आपापल्या प्याल्यातून एक एक करून घोट घेत होते

समोर पार्टीचा गोंगाट सुरूच होता. निंबाळकर समाधानाने समोर पाहत पीत बसले होते पण सत्यवीरच्या मनात आता एकच प्रश्न घुमत होता.

टपालनगरच्या दिनशॉ कुटुंबीय राहणाऱ्या त्या घरात पहाटे चार वाजता नेमकं काय घडलं होतं?

==============================================================


गुप्तहेर सत्यवीर आणि विलक्षण खून (भाग १ स्वेच्छानिवृत्ती)

 




भाग १ -  स्वेच्छानिवृत्ती

समुद्रापासून फारसं अंतर नसलेलं ते छोटंसं गाव. गावाच्या एका टोकाला जुनं बंदर होतं. दिवसाढवळ्या तिथे मच्छीमारांच्या होड्या ये-जा करत. मालवाहू बोटींचे आवाज घुमत आणि खाऱ्या वाऱ्यासोबत डिझेलचा उग्र वास संपूर्ण परिसरात पसरत असे. देशोदेशींना जाणारे खरेदी विक्रीचे सामान वाहून नेणाऱ्या भल्यामोठ्या मालवाहू नौका, जहाजे बंदरावर ठिय्या ठेवून उभ्या असायच्या. सामान हलवायला हमाल लोकांची पळापळ सुरू व्हायची. पण संध्याकाळ झाली की बंदरावरची लगबग कमी व्हायची. काम जवळपास संपलेलं असायचं आणि गावावर एक वेगळीच शांतता उतरायची.

त्याच छोट्याश्या गावात समुद्राकडे तोंड करून उभ्या असलेल्या जुन्या पण प्रशस्त घरात त्र्यंबकराव निंबाळकर गेली काही वर्षं आपल्या पत्नीसोबत राहत होते. पोलिस दलात तब्बल बत्तीस वर्षं सेवा केल्यानंतर काही महिन्यांपूर्वीच त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता.

निंबाळकरांना दोन मुली. दोघीही लग्न करून परदेशात स्थायिक झालेल्या. मोठी मुलगी कॅनडात आणि धाकटी जर्मनीत. दोघींची लग्नं झाली होती. नातवंडंही होती. निंबाळकरांच्या फोनमध्ये त्यांच्या नातवंडांचे फोटो भरलेले होते. कधी व्हिडिओ कॉलवरून त्यांचा आवाज ऐकू आला की कठोर चेहऱ्याचा हा माणूस काही क्षणांत आजोबा बनून जायचा. सेवेत असताना निंबाळकरांना तितका वेळ मिळत नसायचा. दोन्ही मुली जावई निंबाळकरांना आता धावपळ सोडून इथे आमच्याकडे या नातवंडांमध्ये रमा अशा प्रकारची गळ घालायचे. निंबाळकरांना सुद्धा आता निवांतपणा हवा होता. शरीर पाहिल्यासारखं साथही देत नव्हतं. धाकट्या मुलीला नुकतंच एक मुलं झालं होतं त्याच्या नामकरण सोहळ्याला इकडे जर्मनीत यावंच लागेल असा लकडा तिने लावलेलाच होता. सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन निंबाळकरांनी शेवटी स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय घेतला.

आज त्यांच्या निरोप समारंभाचा दिवस होता.

घराच्या अंगणात सकाळपासूनच लगबग सुरू होती. मंडप उभारला गेला होता. घराच्या भिंतींवर फुलांच्या माळा चढल्या होत्या. अंगणात गावातील मंडळी, नातेवाईक आणि पोलिस दलातील त्यांचे जुने सहकारी येत-जात होते.

निंबाळकर मात्र नेहमीप्रमाणे शांत होते.

पांढरा शुभ्र कुर्ता, त्यावर नेहरू जॅकेट, चेहऱ्यावर वयाची सुरकुती आणि डोळ्यांत अजूनही पोलिसी धार. निवृत्त झाले असले तरी त्या डोळ्यांनी अजूनही समोरच्याला दोन क्षणांत वाचण्याची सवय सोडली नव्हती.

"अहो पाहुणे येतील आता सगळे.. पुढे हॉलमधे जाऊन बसा?" त्यांच्या पत्नीने हसत विचारलं.

निंबाळकरांनी तिच्याकडे पाहिलं.

"हो हो ... पण मी एका माणसाची वाट पाहतोय."

"कोणाची?"

"आहे एक व्यक्ती."

त्यांच्या आवाजात नकळत उत्साह आला.

"हो पण ती व्यक्ती येणार आहे ना?" निंबाळकरांच्या पत्नीने विचारलं.

"बेलाशक.. देशमुख स्वतः म्हणालाय तसं."  निंबाळकरांच्या चेहऱ्यावर समाधान उमटलं.

क्षणभर ते शांत झाले.

"आणि देशमुख येणार नाहीयेत का?" पत्नीने विचारलं.

"देशमुख स्वतः येणार होते. पण एक केस अडली म्हणे. बाहेरगावी जावं लागलं. म्हणून सत्यवीरला पाठवलं."

"तुम्ही त्याला आधीपासून ओळखता?" पत्नीने विचारलं.

निंबाळकर मंद हसले.

"नावानेच नाही... कामानेसुद्धा ओळखतो...फक्त आज त्याला भेटायचा योग्य आला आहे"

त्यांच्या त्या उत्तरानंतर निंबाळकरांच्या पत्नी पुढे काहीही न विचारता स्वयंपाकघरात तयारीला गेली.

निंबाळकर काहीसे तसेच स्वस्थ बसून राहिले.

हळूहळू घरात पाहुण्यांची गर्दी वाढली होती. एका बाजूला निंबाळकरांचे भाऊ, पुतणे आणि इतर नातेवाईक बसले होते. दुसऱ्या बाजूला पोलिस दलातील त्यांचे जुने सहकारी गप्पा मारत होते. खाण्याची ताटे टेबलावर ठेवली जात होती. काही लोक कोपऱ्यात ड्रिंक्स घेत उभे होते. पण निंबाळकर सगळ्यांचं आदरतिथ्य पाहत होते. पण त्यांची नजर अजूनही दरवाजावर खिळलेली होती.

काही वेळात गेटच्या समोर एक टॅक्सी येऊन उभी राहिली. गाडीतून एक उंच, शरीराने मजबूत असा तरुण खाली उतरला.

साधा डार्क निळा शर्ट, ऑफ व्हाईट पॅन्ट आणि हातात एक छोटी बॅग.

चेहऱ्यावर कोणताही विशेष भाव नव्हता. त्याने आजूबाजूला नजर फिरवली. समोर बंदर होतं.

दूरवर काही मच्छीमारीच्या होड्या हेलकावत होत्या. खाऱ्या वाऱ्याची झुळूक त्याच्या चेहऱ्यावर आली. त्याने घड्याळात पाहिलं.

संध्याकाळचे पाच वाजले होते. तो घराच्या दिशेने चालू लागला. दारापाशी पोहोचताच आतून आवाज आला.

"या या ...सुस्वागतम" त्र्यंबकराव स्वतः दारापर्यंत आले होते.

दोघांची नजरानजर झाली.

क्षणभर निंबाळकरांच्या चेहऱ्यावरचा कडकपणा नाहीसा झाला.

"गुप्तहेर सत्यवीर" अतिशय सौम्य आवाजात त्यांनी हाक मारलेली होती.

"नमस्कार निंबाळकर साहेब."

सत्यवीरने आदराने वाकून नमस्कार केला. निंबाळकरांनी त्याला तसं करू न देता वरचेवर त्याचा हात घट्ट धरला.

"साहेब नाही रे आता. निवृत्त झालो."

"तुम्ही निवृत्त झाला म्हणून सवय थोडी बदलणार आहे."सत्यवीर हलकंसं हसला.

निंबाळकर मोठ्याने हसले.

"अगदी देशमुखांसारखं बोलतोस...असायला हवा होता इथे तो"

"हो पण एका केससंदर्भात बाहेरगावी जावं लागलं त्यांना."

"हो हो... सांगितलं मला त्याने"

निंबाळकर सत्यवीरला घरात घेऊन आले.

"देशमुख पोलीस अकादमीमध्ये सामील झाला तेव्हा त्याचं ट्रेनिंग मीच घेत होतो... मोठा उमदा आणि मेहनती तरुण.. आजही कर्तव्यनिष्ठा बजावत आहे.. जेव्हा जेव्हा त्याला फोन करतो तेव्हा तुझ्याबद्दल तर भरभरून बोलत असतो. एकदा तुला भेटायचचं होतं.. मला आनंद आहे तू आज आलास. "निंबाळकरांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला.

सत्यवीरने त्यांच्या डोळ्यांकडे पाहिलं. त्या नजरेत फक्त आनंद नव्हता. प्रेमभावाची झलक होती.

निंबाळकरांनी सत्यवीरची ओळख आलेल्या सगळ्या पाहुण्यांना करून दिली. सत्यवीर थोडंसं लाजतच तिथे बसला. लगेचच बाजूच्या वेटरने एका थाळीत ड्रिंक्स घेऊन त्याला ऑफर केली. प्रवासाने शिणवल्याने सत्यवीरने एक पेग उचलला आणि घोट घेतला तसं त्याला बरं वाटलं.

दुसऱ्या बाजूला पोलिस दलातील त्यांचे जुने सहकारी गप्पा मारत होते. कुणी जुन्या आठवणी सांगत होतं.

कुणी निंबाळकरांच्या धाडसी कारवायांचा उल्लेख करत होतं. तर कुणी त्यांच्या स्वभावातील कडकपणाच्या मजेदार आठवणी सांगत होतं.

"तुमच्या साहेबांनी मला एकदा मध्यरात्री स्टेशनवर बोलावलं होतं," एक वयस्कर पोलीस अधिकारी हसत सांगत होता, "आणि कारण काय तर माझे बूट चकाकत नव्हते!"

सगळे हसले.

निंबाळकरांनी दूरूनच त्याच्याकडे कटाक्ष टाकला.

"तेव्हा बूट चकाकवले असते तर आज निवृत्तीच्या कार्यक्रमात ही गोष्ट सांगावी लागली नसती."

पुन्हा हशा पिकला.

सत्यवीर मात्र शांतपणे सगळं निरीक्षण करत होता.

घर, लोक... त्यांची ये-जा.. प्रत्येक चेहरा... प्रत्येक आवाज.

त्याची नजर अधूनमधून खिडकीबाहेर जात होती. खिडकीच्या पलीकडे बंदर दिसत होतं. निंबाळकर साहेब सगळ्यांना बोलत होते.

"आता घराकडे लक्ष द्यायला हवं," ते आपल्या जुन्या मित्रांकडे पाहत म्हणाले.

"म्हणून निवृत्ती?"

"हो."

ते खिडकीजवळ गेले.

"बत्तीस वर्षं पोलिसात घालवली. चोर, गुन्हेगार, राजकारणी, अधिकारी... सगळ्यांचा पाठलाग केला."

क्षणभर ते समुद्राकडे पाहत राहिले.

पण आता वाटतं. स्वतःच्या आयुष्याचा थोडा पाठलाग करायला हवा. मुली म्हणतात बाबा आता तुम्ही आणि आई आमच्याकडे राहायला या. नातवंडांसोबत वेळ घालवा." निंबाळकरांच्या आवाजात मऊपणा आला.

"तुम्ही निर्णय योग्य घेतलात." एक जण म्हणाला.

निंबाळकरांनी त्याच्याकडे पाहिलं.

"आपल्या पोलिसांना देखील कुटुंब असतात कधीकधी आपल्यालाच याचा विसर पडतो. कुटुंबाकडेसुद्धा लक्ष द्यायला हवं"

"खरं आहे अगदी" दुसऱ्या एकाने दुजोरा दिला.

सत्यवीर त्यांचं बोलणं ऐकून हलकंसं हसला.

संध्याकाळ सरत चाललेली होती. कार्यक्रमासाठी सगळे अंगणात जमले. मंचावर निंबाळकरांचा सत्कार करण्यात आला. शाल, श्रीफळ, पुष्पहार आणि स्मृतिचिन्ह देण्यात आलं.

एका जुन्या सहकाऱ्याने भाषण करताना म्हटलं- "त्र्यंबकराव निंबाळकर हे फक्त अधिकारी नव्हते. ते एक शिस्त होते. सगळ्या डिपार्टमेंटसाठी प्रेरणास्थान होते "

टाळ्यांचा कडकडाट झाला. निंबाळकरांनी हात जोडले.

त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होतं. सत्यवीर मागच्या रांगेत उभा राहून सगळं पाहत होता.

कार्यक्रम संपल्यानंतर लोक पुन्हा गप्पांमध्ये रमले. काहीजण पुन्हा एकदा ड्रिंक्स घेऊ लागले.

तेवढ्यात एक व्यक्ती गेटमधून घरात आली. तिच्या चेहऱ्यावर तणाव आणि थकवा स्पष्ट दिसत होता. तिच्या अंगावर पोलिसांचा गणवेश होता म्हणजेच ती व्यक्ती ऑन ड्युटी होती. खांद्यावरचे स्टार्स धुळीने माखलेले. बूटांवर रस्त्याची माती. चेहऱ्यावर प्रचंड थकवा आणि डोळ्यांत अस्वस्थता.

तो थेट घराकडे आला. निंबाळकरांनी त्याला पाहताच ओळखलं.

"शौनक... ये ये"

"नमस्कार सर." 

शौनक दासगुप्ताने सलाम केला.

निंबाळकरांनी त्याच्याकडे बारकाईने पाहिलं.

"काय झालं?"

शौनकने एक क्षण आजूबाजूला पाहिलं.

"सर... दोन मिनिटं बोलायचं होतं."

निंबाळकरांच्या चेहऱ्यावरचा उत्साह नाहीसा झाला.

"चल."

दोघे घराच्या एका बाजूला गेले.

शौनक दासगुप्ता. स्थानिक पोलीस ठाण्याचा इन्स्पेक्टर.

निंबाळकर सेवेत असताना तो त्यांना जुनिअर होता. त्याच्या अनेक तपासांत त्यांनी त्याला मार्गदर्शन केलं होतं. पण आज परिस्थिती वेगळी होती. निंबाळकर निवृत्त झाले होते आणि शौनक आजही ड्युटीवरून थेट इथे आला होता. म्हणजे प्रकरण गंभीर असणार होतं.

सत्यवीरने दोघांकडे पाहिलं.

शौनक काहीतरी सांगत होता. निंबाळकर मध्येच प्रश्न विचारत होते.

एकदा शौनकने खिशातून कागद बाहेर काढला आणि काहीतरी दाखवलं.

निंबाळकरांचा चेहरा क्षणभर बदलला. ते काहीतरी गंभीरपणे म्हणाले त्यावर शौनकने मान खाली घातली.

काही मिनिटांनी निंबाळकरांनी अचानक सत्यवीरकडे पाहिलं.

"सत्यवीर.. जरा इकडे येतोस का?"

सत्यवीर पटकन जागचा उठला आणि त्यांच्या दिशेने गेला.

निंबाळकरांनी दोघांची ओळख करून दिली.

"सत्यवीर.. हा शौनक दासगुप्ता. आपल्या इथल्या ठाण्याचा इन्स्पेक्टर.,,आणि शौनक हा गुप्तहेर सत्यवीर.

तुझ्यासारखाच माझा एक जुनिअर ऑफिसर आहे देशमुख नावाचा त्याचा हा मित्र. ज्या ज्या केसमधे देशमुखची मती कुंठित झाली तिथे यानेच केसचा छडा लावला. असा हा एक हुशार गुप्तहेर"

शौनकने हात पुढे केला. सत्यवीरने हसून हात मिळवला

"सत्यवीर शौनक सध्या एका विचित्र आणि गुंतागुंतीच्या केसमध्ये अडकला आहे. सेवेत असताना त्याला माझी मदत घेणं सोपं जायचं पण आता मी निवृत्त झालोय त्याला माझी फारशी मदत होणं अवघड झालंय" निंबाळकर म्हणाले.

"शौनकच्या हातात असलेली विलक्षण केस तुही ऐकावी असं मला वाटलं म्हणून तुला मगाशी हाक मारली... शौनक... सुरुवातीपासून सांग" निंबाळकरांनी मात्र वेळ न दवडता विचारलं

"ठीक आहे सर..." शौनकने खोल श्वास घेतला आणि बोलू लागला.

"एक विलक्षण खून झालाय." खोल आवाजात शौनक म्हणाला.

===============================================================



गुप्तहेर सत्यवीर आणि विलक्षण खून (भाग ३ घटनाविश्लेषण)

  विश्लेषणात्मक म्हणून ज्या मानसिक गुणांचा उल्लेख केला जातो त्यांचे स्वतःचे विश्लेषण करणे फारसे शक्य नसते. आपण त्यांना त्यांच्या परिणामांव...