दरवाजाच्या फ़टीतून डोळे लावून ती बाहेर पाहत होती. अंधार पडायला सुरुवात
झालेली होती. जसजसा अंधार वाढत होता. तशी तिच्या जीवाची घालमेल देखील वाढत होती. दरवाजाच्या फटीमधून बाहेरचं जेवढं शक्यं असेल तेवढं ती पाहत होती. बाहेरची
कोणतीही हलचाल अथवा कोणताही आवाज तिला न पाहता आणि ऐकता सोडायचा नव्हता.
"आई.." अचानक तिच्या मागून आवाज आला तशी ती
गर्रकन मागे वळली.
"सोनू तू... अगं किती दचकले मी. तू इथे काय
करतेयस. तुला मी
आतल्या खोलीत जाऊन बसायला सांगितलं होतं ना" तिने दटावणीच्या सुरात विचारलं.
मागे सोनू नावाची सात वर्षाची मुलगी हातात एक छोटी बाहुली घेऊन उभी होती.
"तू किती वेळची इथेच आहेस. मी आतमध्ये एकटीच
होते. मग वाट पाहून मीच बाहेरच्या खोलीत आले तुला पाहायला" सोनुने हळू पण
लाडिक आवाजात सांगितलं.
"अगं मी चाहूल घेतेय. म्हणूनच उभी आहे इथे. तुला
आतमध्ये बसायला सांगितलय ना मी" तिने परत आवाजाला धार आणत विचारलं.
"आतमध्ये नको... मला एकटं वाटतंय" सोनुने
परत तसंच लाडीकपणे विचारलं.
"एकटी कशाने आहेस तू ... दादु आहे ना सोबत
तुझ्या" तिने तिरक्या डोळ्याने पाहत विचारलं.
"दादू उगाचच मगापासून तुझ्यासारखा बाहेर
पाहण्यासाठी खिडकीला डोळा लावुन बाहेर पाहत बसलाय”
"काय... वेडा आहे का तो" रागाने ती आतल्या
खोलीकडे जायला वळली आणि तिच्या पाठोपाठ सोनूसुद्धा निघाली.
आतल्या खोलीमध्ये पाच वर्षाचा दादु बंद खिडकीला
डोळा लावून बाहेर काहीतरी पाहण्याचा प्रयत्न करत होता.
आतमध्ये येताच ती त्याच्यावर डाफरली "दादु काय करतोयस तू .. कशाला पाहतोयस बाहेर.
मी सांगितलं होतं ना तुला कि सोनूसोबत खेळत बस म्हणून "
तिच्या अशा अचानक येण्याने दादु लगबगीने
खिडकीपासून दूर झाला.
"का?..पाहतोयस बाहेर तू .. काय
सांगितलं होतं मी?" तिने परत प्रश्न
केला.
सोनू तिच्यामागे फक्त उभी राहून आपल्या छोट्या
बाहुलीशी चाळा करत आपल्या लहान भावाला आपली आई कशी ओरडत आहे हे पाहत उभी होती.
"अरे बोलशील कि नाही... काय करत होतास?” तिने परत छोट्या
दादुला विचारलं.
"क..काही नाही.... तिथे दूरवर त्या छोट्या
डोंगराजवळ ना.. एक झाड आहे तिथे पाहत होतो" छोट्या दादुने मान खाली घालुन
उत्तर दिलं.
"पण मी तुला सांगितलं होतं ना कि आपल्या दीदीशी
खेळत बस" तिचा स्वर आता जरासा नम्र झालेला होता.
"तू पण तर बाहेर बघत होतीस दरवाजातून.. मी पण मग
बाहेर पाहिलं" तक्रारीचा सूर काढत दादु खाली मान घालूनच बोलला.
"मी बाहेर पाहतेय ते आपल्या सुरक्षिततेसाठी आणि
..." पुढे तिला काय बोलावे ते समजेना कारण छोट्या दादूला ते समजले असते कि
नाही हे तिला सांगता आलं नसतं. म्हणून मग ती गप्पच बसली.
तिच्या या अशा अचानक गप्प बसण्याने सोनू आणि
दादु तिच्याकडे फक्त पाहत उभे होते. ती आणि तिची दोन मुलं एवढेच घरात होते. नवरा
तर बाहेर गेलेला होता तो माघारी येईपर्यंत तिलाच सगळं घर आणि इतर गोष्टी
सांभाळाव्या लागणार होत्या.
नवऱ्याच्या आठवणीने तिला मनातून उमाळा फुटला आणि
ती काहीशी निशब्द झाली.
"आई... आई.. " सोनू तिचा पदर धरून ओढत तिला
काहीतरी सांगत होती तेव्हा ती भानावर आली.
"अ..अं ..काय .."एवढंच ती म्हणाली.
"आई मला कसलातरी जळका वास येतोय. तिथे किचनजवळ
गेलं कि.." सोनुने किचनकडे हात दाखवत तिला सांगितलं
"तुम्ही दोघे इथेच बसा मी आहे बाहेर.. मी बघते
बाहेर.. कोणी आपल्याला काहीही करणार नाही .." तिने त्या दोघांना
सांगितलं आणि बाहेर मुख्यदरवाजापाशी जाऊन परत एकदा बाहेरची चाहूल घेऊ लागली.
बाहेर थोडासा अंधार पडलेला होता. आजूबाजूला
कोणीही दिसत नव्हतं. आसपास घरदेखील नव्हती. पण समोर जनावरांना बांधण्यासाठी एक
खोपटं बनवलेलं होतं. त्याच्या बाजूला एक छोटीशी पाऊलवाट जी माळरानाच्या दिशेने जात
होती.
तिची नजर त्या पाऊलवाटेच्या दिशेने पाहत होती.
आसपास कसला आवाज येत नव्हता कि कसली हालचाल.
"आई.." तिच्यामागे परत एकदा सोनू उभी होती.
पण यावेळेस तिने मागे वळून न पाहता समोर
दरवाजाच्या फटीमधूनच पाहतच तिला प्रत्युत्तर दिलं
"काय झालं सोनू ..तुला मी दादु सोबत
आतमध्येच बसायला सांगितलं होतं"
"दादू बसलाय एकटा खेळत.. मी त्याला माझी बाहुली
खेळायला दिलीय.." सोनू म्हणाली.
"बरं..मग तुही त्याच्यासोबत जाऊन का नाही खेळत
आहेस" तिने मागे न वळता समोरची नजर तशीच ठेवून विचारलं.
"नको.. मला इथे तुझ्यासोबत थांबायचं आहे... आणि
दादू एकटा छान खेळतोय आत.." सोनुने जराशा खालच्या आवाजात उत्तर दिलं.
त्यावर काहीही न बोलता बाहेर पाहत ती शांतपणे
चाहूल घेत होती.
"बाबा कधी येणार आहेत परत...? मला खूपच विचित्र
वाटतेय.. आणि तू सारखी बाहेर का पाहतेयस”? सोनुने पटापट प्रश्न विचारले.
सोनूच्या प्रश्नांवर तिच्याकडे निश्चित अशी
उत्तरं नव्हती. त्यामुळे ती काहीच बोलली नाही. ती काहीच बोलत नाही म्हटल्यावर सोनू
दरवाजाच्या जवळील खुर्चीत जाऊन विसावली.
खुर्चीत बसून सोनू किचनकडे पाहत होती तिथून
येणारा तो जळका वास अजूनही तिच्या नाकात फिरत होता.
ती बाहेर पाहतच होती पण बाहेर कसलीही चाहूल तिला
लागलेली नव्हती.
इतक्यात.. "आई.. आई..”
हलक्या आवाजातल्या हाका आतल्या खोलीतून आल्या.
तिने आणि सोनुने दोघींनी एकदमच त्या आवाजाच्या
दिशेने पाहिलं. आवाज आतल्या खोलीमधून येत होत्या. दोघीही पळतच त्या दिशेने गेल्या.
आतल्या खोलीमध्ये दादू परत एकदा खिडकीच्या फटीला
डोळा लावून बाहेर पाहत होता आणि तशाच अवस्थेत आईला हाका मारत होता. तिने आतमध्ये
येताच पाहिलं दादु खिडकीच्या फटीला नाक लावून बाहेर पाहतोय.
"दादू तुला किती वेळा सांगितलं रे बाहेर पाहू
नकोस म्हणून..” पुढे ती काही बोलणार एवढ्यात दादु तिला
काहीही न बोलू देता म्हणाला.
"आई आई.. त्या डोंगराजवळच्या झाडापाशी कोणीतरी
आहे ..ते बघ ..इथेच पाहतेय ते" दादु त्याचे डॊळे मोठे करत म्हणाला.
त्याच्या या बोलण्यावर सोनू भुवया वक्र करून
त्याच्याकडे पाहू लागली. तीने मात्र पटकन दादुला त्या खिडकीपासून बाजूला केलं आणि
स्वतः खिडकीजवळ जाऊन फटीला डोळा लावून बाहेर पाहिलं.
दूरवर एक छोटी टेकडी होती तिच्या मध्यभागी एक
झाड होतं. अंधाऱ्या टेकडीवरच्या त्या झाडाजवळच एक आकृती उभी होती. जी घराकडेच
पाहत असल्याप्रमाणे वाटत होती. लांबून ती आकृती स्त्री आहे
कि पुरुष दिसत नव्हतं. कारण टेकडी जरा दूर होती. तिने डोळे
बारीक करून त्या अंधाऱ्या भागाकडे पाहण्याचा प्रयत्न केला पण यश आलं नाही. थोडावेळ
बाहेर पाहून ती परत सरळ उभी राहिली आणि तिने एकवार दादुकडे पाहिलं.
"कोण आहे ते आई.." दादुने तिला प्रश्न केला
त्याच्या चेहऱ्यावर कमालीचं औत्सुक्य दिसत होतं.
"माहित नाही.." तिनं एवढंच उत्तर दिलं.
त्यावर कोणीच काहीही बोललं नाही.
काही वेळाने दादू म्हणाला "आई तो कालचा
माणूस असेल का..?"
"नाही रे दादू ... कालचा माणूस तिथे त्या
टेकडीजवळ का जाईल. तो असता तर आईने त्याला ओळखलं असतं ना" सोनुने दादुकडे
पाहत उत्तर दिलं.
"का नसेल ...काल तो आपल्या घराकडेच पाहत उभा
होता. आजसुद्धा तिथे लांब टेकडीवर जाऊन पाहत बसला असेल" दादुने आपले प्रश्न
सोनूला विचारले.
"नाही दादु ... हे कोणीतरी वेगळंच आहे आणि ...
आपल्याला त्याच्यापासून काही धोका आहे अस वाटतं नाही" तिने दादुच्या
प्रश्नाचं समाधान केलं.
दादू आता विचारात पडला.
सोनू सुद्धा शांतपणे उभी राहिली होती. ती सुद्धा
कसल्यातरी विचारात गुंगलेली होती. तेवढ्यात सोनू म्हणाली
"आई मला कोणाच्यातरी बोलण्याचा आवाज येतोय.."
"अं..." भानावर येत ती सोनूकडे पाहू लागली.
"कोणीतरी आहे घराजवळ" सोनुने आवंढा गिळून
सांगितलं.
तसं तिने लगबगीने बाहेर पडत बाहेरच्या खोलीतील
एका खिडकीजवळ जाऊन कानोसा घेतला. खरंच कोणीतरी बोलत होतं. तिने आपला एक कान
खिडकीच्या जवळ नेऊन लावला आणि बाहेरचं बोलणं ऐकण्याच्या प्रयत्न करू लागली.
"अरे बाबा उठ आता. कितीवेळ झालं उठवतोय
तुला." एकजण म्हणाला.
"न.. नाही नाही... मला आधी सांग उद्या सुद्धा
माझ्यासोबत येणार आहेस तू.." दुसरा कसंबसं बोलला.
"उद्याच उद्या बघू.. आधी उठ
आता.. जास्त झालीय तुला चालतासुद्धा येत नाहीये.." पहिला त्याला उठवण्याचा
प्रयत्न करू लागला.
"नाही..आधी सांग उद्यापण
येशील सोबत गुत्त्यावर.." दुसरा अजूनही जमिनीवर पडूनच बोलत होता.
दोघेही तिथेच घराजवळ
संभाषण करत होते. ती आपला कान खिडकीला लावून ऐकतच होती.
"अरे उठ रे लवकर.. आजच
कसंबसं बायकोला थाप मारून तुझ्यासोबत गुत्त्यावर जाता आलं. आता जास्त उशीर झाला तर
तिला संशय येईल कि मी जादा काम करायला गेलेलो नसून गुत्त्यावर गेलो होतो.."
पहिला त्याला विनवत होता.
"काय रे तू ...बायकोला घाबरतोस
...कसला असला नवरा तू तिचा..." पुढचे शब्द जीभ जाड झाल्याने दुसऱ्याला काही
बोलता आले नाही.
पहिला काहीही न बोलता शांत बसलेला होता. दुसऱ्याची
बडबड चालूच होती.
"ए..ए.. हे बघ आपण कुठे आलोय
..बघतोयस का हे घर" पहिला गंभीर आवाजात दुसऱ्याला म्हणाला.
"आ ...काय ...आ.." दुसरा
तंद्रीतच बोलला.
"अरे हे बघ आपण कोणाच्या
घरापाशी आलोय.." त्याच्या आवाजात अजूनही तीच गंभीरता होती.
तिने मात्र आता कान टवकारले. तिच्या शेजारी आत
सोनूही येऊन उभी राहिली होती आणि खिडकीला कान देऊन ऐकू लागली होती.
"ती राहते ना इथे.. नवरा
बाहेरच.." पहिला घराकडे पाहत म्हणाला.
"हा.. हो रे... या घरापाशी
आलोय व्हय..हा आपण... हा तीच घर आहे कि हे..नवरा बाहेर कामाला आणि हि घरात एकटीच..."
दुसरा शब्द अडखळत बोलला. तो अजूनही जमिनीवर बसून होता.
"एकटी नाही.. दोन पोरं पण
आहेत. पण घर तर सगळीकडून बंद दिसतंय" पहिला घराकडे पाहत म्हणाला.
तिने आतून अजून जास्त जोर देऊन ऐकण्याचा प्रयत्न
केला. सोनू आता खिडकीपासून बाजूला गेली आणि खोलीच्या दुसऱ्या कोपऱ्याकडे जाऊ
लागली.
"काय मग.. जायचं का आत.. हा .." दुसरा अडखळत गालातल्या गालात हसत म्हणाला.
"कशाला.." पहिला हळू आवाजात म्हणाला.
"कशाला म्हणजे ...चल जरा
पाहून येऊ आतमध्ये" छद्मी हसत दुसरा जमिनीवरच पडून बोलला.
"येडा झालाय का ..? आपल्याला आतमध्ये जाताना कोणी पाहिलं तर" पहिला इकडे तिकडे पाहत
म्हणाला.
"अरे आसपास आसपास
...कोणीही.. ना ..नाहीये ..." दुसरा म्हणाला.
पहिल्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि जरासं
दोन पावले पुढे जाऊन घराच्या मुख्यदरवाजाकडे टकं लावून पाहू लागला.
तसा टपकन एक दगड त्याच्या डोक्यामागे लागला.
"आऊ ..." डोके चोळतच
पहिला मागे वळून पाहू लागला.
दुसरा अजूनही पहिल्याकडेच स्थिरपणे पाहत बसला
होता.
"येडाय का रे तू.. दगड का
मारलास" पहिला घुश्श्यात म्हणाला.
"मी..मी नाही मारला"
दुसरा अजूनही स्थिरपणेच पाहत होता.
"चल उठ लवकर घरी जाऊयात...उगाचच
काहीतरी" पहिला दुसऱ्याच्या मागे येऊन त्याला उठवू लागला.
तेवढ्यात एक छोटं लाकूड हवेतून भिरभिरत येऊन
दुसऱ्याच्या पाठीत बसले.
"आई ग..." दुसरा
कळवळला.
पहिला काहीसं हबकून जरा बाजूला झाला.
"माझ्या पाठीत मारतोय होय रे
थांब. तुला ना ...बघतो आता" दुसरा आता भेलकांडत उठला
आणि पहिल्याला मारायला धावला.
“अरे अरे.. नाही ..." असं
म्हणत पहिला पुढे पळू लागला तर दुसरा त्याच्यामागे.. “थांब थांब तुला बघतोच” असं म्हणत एक दगड घेऊन मागे
पळू लागला.
ती खिडकीजवळून बाजूला झाली आणि तिने सुटकेचा
निःश्वास टाकला.
बरं झालं गेले ते नालायक. बेशरम लोकांना लाजा
सुद्धा वाटत नाहीत दुसऱ्याच्या घराकडे पाहायला. स्वतःशीच पुटपुटत ती पुढच्या खोलीत
आली.
तिच्या मागोमाग हसत हसत सोनू आली.
"कशी अद्दल घडवली त्या वाईट
लोकांना" हसत हसत सोनू म्हणाली.
"हो दिसलं मला ते... दगड आणि
काठी मारतेस लोकांना लपून... कोणी पाहिलं असतं तर.." ती करड्या आवाजात
म्हणाली.
"अगं कोणीचं नव्हतं पाहणारं..
ते वाईट लोक होते ना म्हणून तसं केलं मी" सोनु आपली बाजू मांडत म्हणाली.
"हो..ते वाईट आणि त्यांना
असं लपून छपून मारणारी तू.. सभ्य का?" तिच्या आवाजात
अजूनही नाराजी होती.
सोनू काहीही न बोलता मान खाली घालून उभी राहिली.
"बरं जा आता आतमध्ये.. मी
येथे थांबते जरा" ती म्हणाली.
"मी पण तुझ्याजवळ थांबते ना
इथे... मला खूप वेगळंच वाटतंय.. बाबा कधी येणारेत" सोनु तक्रारीच्या स्वरात
म्हणाली.
"येतील बाबा.. तोपर्यंत तू
दादु जवळ जाऊन बस .." तिने सोनुला सांगितलं.
तसं काहीसं खट्टू होतं ती तेथून आतमध्ये निघून
गेली.
ती परत एकदा दरवाजाजवळ आली आणि फटीतून बाहेर बघत
एक चाहूल घेतली. बाहेर चांगलंच अंधारून आलेलं होतं. आसपास चिटपाखरूदेखील नव्हतं.
तिला जरासं हायसं वाटलं. दरवाजाजवळच्या खुर्चीतच
ती विसावली.
नवऱ्याची वाट पाहत मुलांकडे लक्ष देणे यामध्येच
तिने स्वतःला झोकून दिलं होतं. नवऱ्याने बाहेर जाताना सांगितलं होतं. नीट दारं
खिडक्या लावून घे. मी आल्याशिवाय कोणालाही घरात घेऊ नकोस. लोकं चांगली नाहीत इथली.
नवऱ्याच्या आठवणीतच ती डोळे मिटुन खुर्चीत पडून
होती. मधे किती वेळ गेला कोण जाणे. तिची पापणी उघडली ती कसल्याश्या धडधडण्याच्या
आवाजानेच.
तिने डोळे उघडले आणि आसपास पाहिलं. तिला डुलकी
लागली होती कि काय माहित नाही पण तिने स्वतःला सावरलं. मुलं आतमध्ये झोपली असावीत
असा तिचा समज झाला.
परत धडधडण्याचा आवाज आला. समोरचं दार आणि
बाजूच्या खिडक्या हवेच्या तडाख्याने आवाज करत होत्या. दारे आणि खिडक्या बंदच
होत्या. पण हवा फटींमधून आतमधे यायला पाहत होती. त्यामुळे धडधड असा आवाज येत होता.
तिने सावकाशपणे दरवाज्याकडे पावलं टाकायला चालू
केली. हवा काही प्रमाणात घरामधे घुसली होती. कारण सोनू मगापासून म्हणत
असल्याप्रमाणे किचनमधुन येणार तो जळका दर्प आतील हवेसोबत सगळीकडे पसरला.
सावकाशपणे पावलं टाकतं ती दरवाजाच्याजवळ आली.
फटींमधून बाहेर पाहायचं धाडस तिला होईना. तिच्या सर्वांगाला कापरं भरलं होतं.
तरीही धीर एकवटून तिने हळूच एक डोळा फटीला लावला आणि बाहेर पाहण्याचा प्रयत्न
केला. बाहेर चांगलाच अंधार पडलेला होता. रस्त्यावर कोणीही नव्हतं. रस्त्याच्या
समोर एक दोन झाडे होती. बाजूला जनावरांना बांधण्यासाठी आणि त्यांच्या निवाऱ्यासाठी
असलेलं एक खोपटं होतं. पुढे काही अंतरावर एक घर होतं. पण
तिथे कसलाही प्रकाश नव्हता.
ती हळुवारपणे सगळीकडे नजर फिरवत होती.
जनावरांच्या खोपटाच्या शेजारून एक पाऊलवाट वर माळरानाकडे जात होती. खोपटाच्या
बाजूला अशी वाट असेल हे लांबून लक्षातही येत नसायचं. तिची नजर काही वेळ त्या
खोपटाच्या दिशेने वळली. पाऊलवाटेकडे एक सावली हलताना तिला दिसली आणि तिच्या काळजात
धस्स झालं. तिथे कोणीतरी होतं तर..
श्वास रोखून ती पापणीहि न लवता त्या खोपटाच्या
दिशेने पाहू लागली. सावली हळूहळू गडद होऊ लागलेली होती. तिचा उर धपापू लागला.
खोपटाच्या बाजूला आता ती सावली पुढे येत स्पष्ट दिसू लागली.
भेसूर चेहरा, केस मोकळे, अंगावर
काळपट राखाडी पोशाख, कृश शरीरयष्टी असलेली ती आकृती अनवाणी होऊन खोपटाच्या
शेजारी चालत होती. चालता चालता ती आकृती जागीच थबकली आणि नाकाने फेंदारत काहीतरी
हुंगू लागली. स्तब्ध उभी राहून इकडे तिकडे पाहत त्या आकृतीची नजर तिच्या घराकडे
गेली आणि तिथेच स्थिरावली. मुख्यदरवाजाकडे पाहून त्या आकृतीने आपले शुभ्र दात
विचकले जणू काही त्या आकृतीला दिसलं होतं कि आतमधून कोणीतरी बाहेर पाहतंय. तिचा
चेहरा भयाने ग्रासून गेला. झटकन ती दरवाजापासून मागे झाली. तिचा श्वास वरखाली होऊ
लागला.
तोच आहे तो... तोच कालचा माणूस.. सारखा इकडेच
घराकडे पाहत होता. काय हवंय त्याला?
दरवाजापासून ती अशी काही बाजूला झाली जणू काही
दरवाजामुळे तिला विजेचा झटका बसला असावा. सुन्न झाल्याप्रमाणे ती काही वेळ तशीच
उभी होती. आतमध्ये जाऊन तिने मुलं काय करतायत ते पाहिलं. दोन्ही मुलं एकमेकांना
बिलगून झोपलेली होती. मुलांकडे पाहून तिला हायसं वाटलं. त्या खोलीबाहेर येऊन तिने
मुख्यदरवाजाच्या जवळ जाऊन हळूच डोळा लावून परत बाहेर पाहिलं. बाहेर मगाशी होता
तसाच मिट्ट काळोख होता. खोपटाशेजारच्या पाऊलवाटेकडे तिने घाबरत घाबरत पाहिलं. पण
तिथे कोणीही नव्हतं.
टक टक टक... घराच्या मागच्या बाजूला आवाज येऊ लागला.
जणू काही बोटांनी लाकडावर कोणीतरी आघात करत असावं. तिचा जीव घाबरा झाला. ती
हळुवारपणे पण सावध पावले टाकतं मागे वळली. तो आवाज ठराविक पद्धतीत येतंच होता.
तिने हळूहळू घराच्या मागच्या बाजूकडे घरातून जात
कानोसा घ्यायला सुरुवात केली. कोणीतरी त्या बाजूला नक्कीच होतं. तोच माणूस असावा
का जो मगाशी पहिला होता याबाबत मात्र तिला खात्री न्हवती. सावकाशपणे ती मागच्या
भिंतीला कान लावून उभी राहिली.
टक... बाहेरच्या बाजूला भिंतीवर कोणीतरी अगदी
तिने जिथे कान लावलेला होता त्याच्याच मागे आवाज केलेला होता. दचकून ती मागे झाली.
धपापता ऊर तिने हाताने दाबून टाकण्याचा प्रयत्न केला. आवाज शांत झाला होता. मागच्या
बाजूला जे कोणी होतं ते हळूहळू पुढे सरकत जात असल्यासारखं तिला वाटलं. पण आता टक
टक आवाज येत नव्हता.
कोण असेल बाहेर याचा थांग लावणं आवश्यक होतं.
कारण मुलांच्या सुरक्षिततेसाठी ते महत्वाचं होतं. स्वतः सावधपणे पावले उचलुन
काहीतरी करणे आवश्यक होतं. मागे जे कोणी होतं ते हळूहळू पुढे जात असावं. कारण तिला
तशी चाहूल लागली होती. ती पुढे झाली. मागच्या खोलीतील पडलेली काही लाकडे आणि जुनी
कापडं गोळा केली. दुसऱ्या मागच्या खोलीला एक खिडकी होती जी तिने आतून बंद केलेली
होती. तिथे जाऊन ती लाकडाला कापड गुंडाळून स्वस्थ उभी राहिली. मागे जे कोणी होतं
त्याची चाहूल आता खिडकीजवळ येऊ लागलेली होती. श्वास रोखून तिने ती मशाल खिडकीपुढे
धरली. खिडकीसमोर ते येताच मशाल जाळून सरळ त्याच्या अंगावर फेकायचा निर्धार तिने केला
होता. बाहेरची चाहूल खिडकीच्या पुढे येण्याआधी मागेच थांबली आणि कसल्यातरी
पुटपुटण्याचा आवाज येऊ लागला.
संथ आवाजात आणि काहीतरी गूढ शब्दोच्चार करत
असल्यासारखा तो आवाज होता..
ती आता घाबरू लागली लागली कारण ते शब्दोच्चार
तिचं काळीज कापत असल्याप्रमाणे तिला वाटतं होते. कसाबसा धीर एकवटून ती खिडकीपुढे
उभी होती. आपल्या इथे उभं राहण्याचा कयास तर बाहेर लागलेला नसेल ना? तिच्या मनात आलं.
बाहेर शब्दोच्चार आता पटापट होऊ लागले होते. तिच्या सर्वांगाला कंप जाणवू
लागलेला होता. मनातून प्रचंड भीती जाणवत होती. हळूहळू बाहेरची चाहूल खिडकीपुढे
सरकू लागली. तिने हात घट्ट आवळून लाकूड पकडलेलं होतं. एक एक क्षण तिला जाणवत होता.
चाहूल आता पुढे पुढे सरकत होती. कधीही चाहूल आता बंद खिडकीपुढे येणार होती. ती
तयार होती. काही क्षणात चाहूल बंद खिडकीच्या मागून तिला जाणवली.
तिने झटक्यात खिडकी उघडली. हातातली लाकूड आणि त्याला लावलेलं कापड पेटवलं.
आगीचा एक लोळ खिडकीबाहेर पडला. लाकूड तिने बरोबर बाहेर सरकवलं होतं जेणेकरून बाहेर
जे कोणी असेल त्याच्या सरळ तोंडावरच जाईल. तिने ठरवल्याप्रमाणे आगीचा लोळ
खिडकीबाहेर फेकला गेला.
बाहेर कोणाच्या तरी ओरडण्याचा आवाज आला. तिने लगबगीने खिडकीतून बाहेर पाहिलं. खाली
जमिनीवर तोच मगाचा भेसूर दिसणारा माणूस पडलेला होता. मानेच्या भोवताली
गुंडाळलेल्या कापडाला लागलेली आग हाताने विझवत होता. त्याला पाहताच तिचा पारा वर
गेला. तिने शेजारच्या खोलीतील लाडके कापडाला गुंडाळून आणली आणि भसाभस आग लावून
बाहेर टाकली. तो भेसूर दिसणारा माणूस अजूनही खाली पडून आग विझवण्याच्या प्रयत्नात
असतानाच अजून आगीच्या ज्वाळा त्याच्या अंगावर पडल्या ज्यामुळे त्याच्या शरीराभोवती
लक्तरं असल्याप्रमाणे दिसणाऱ्या कपड्यांना देखील आग लागली. घाबरून तो भेसूर चेहरा
असलेला माणूस उठला आणि घरापासून लांब जाऊ लागला. आग त्याच्या शरीराभोवती लागल्याने
ती हाताने झटकत तो पळत होता.
"मी येईन.. परत येईन आणि तुला घेऊनच जाईन ..." पळता पळता तो मधेच
ओरडला.
ती मात्र समाधानाने हलकं स्मित करत खिडकीजवळ उभी राहून त्याच्या पळणाऱ्या
आकृतीकडे बघत होती. अंधारात ते दृश्य खूपच विचित्र दिसत होतं. या सगळ्या गडबडीत
सोनू आणि दादुसुद्धा झोपेतून उठून तिच्या मागे येऊन काय झालं हे बघू लागले. त्या
भेसूर दिसणाऱ्या त्या माणसाची अशी त्रेधातिरपीट उडालेली पाहून दादू खळखळून हसला.
"कशी अद्दल घडली. आम्हाला त्रास देत होतास
ना" असं म्हणत खुदुखुदू हसू लागला.
तिने मुलांना परत आतमधे खोलीत जायला सांगितलं आणि खिडकी बंद करून टाकली. सगळेजण आतल्या खोलीत शांतपणे बसलेले होते. ती आता बऱ्यापैकी निर्धास्त झालेली
होती. सोनू आपल्या लाडक्या बाहुलीशी चाळा करत बसलेली होती. दादू उगाचच जमिनीवर
लोळत होता. ती भिंतीला टेकून कसल्यातरी विचारात गढलेली होती.
"आई.. आता आपल्याला अजून कोणी त्रास देणार नाही ना?" सोनुने हलक्या आवाजात
विचारलं.
"अं...ना... नाही" कसेबसे शब्द उच्चारात तिने उत्तर दिले आणि परत आपल्याच
विचारात गढून गेली.
सोनुनेदेखील परत काहीही न
विचारता शांतपणे बाहुलीशी खेळत मग्न झाली.
"दीदी तो वाईट माणूस येणार नाही ना आता" दादुने पडल्या पडल्याच आपल्या
बहिणीला विचारलं. मगाशी सोनुने आईला जे उत्तर दिलं तेच उत्तर सोनू देते का हे
त्याला पाहायचं होतं.
"नाही येणार दादु.. आत्ताच आई सुद्धा नाही म्हणाली ना" थोड्याश्या तिखट
आवाजात सोनुने उत्तर दिले.
"मला नाही वाटत.." दादु सोनूला म्हणाला आणि आपल्या जागेवरून उठला.
"म्हणजे.." न समजून सोनू म्हणाली.
"सारखा सारखाच येतोय तो माणूस... आज आला तसा.. याआधी पण आला होता ना" दादु
आता खिडकीच्या जवळ गेला. खिडकीच्या फटीला डोळा लावुन बाहेर पाहण्याची त्याची अतीव
इच्छा झाली होती पण आई ओरडेल म्हणून फक्त तो खिडकीकडे पाहत उभा होता.
"आता नाही येणार तो.. कदाचित.." सोनुने आपलं वाक्य अर्धचं सोडलं.
तिलासुद्धा पक्क ठाऊक नव्हतं कि उद्या परत तो माणूस येऊन त्रास देईल.
ती मात्र डोळे मिटून आपल्या
मुलांचं संभाषण ऐकत भिंतीला टेकून बसलेली होती. दादुने हळूच तिरकसपणे तिच्याकडे
पाहिलं. तिचं लक्ष नाहीये हे पाहून हळूच खिडकीबाहेर एकदा पाहून घ्यावं असा विचार
त्याच्या मनात आला. सोनू मात्र जमिनीकडे पाहत विचारात पडली. आपल्याजवळील बाहुली
तिने बाजूला ठेवली आणि दोन्ही गुडघे जवळ घेऊन त्यावर हनुवटी टेकवून शांत बसली. ती
अजूनही तशीच भिंतीला टेकून शांतपणे बसून होती. दादू आता हळूच खिडकीच्या नजीक गेला.
"आई... तो माणूस परत येणार नाही ना किंवा अजून कोणी दुसरं..." सोनुने
जमिनीकडे पाहतच विचारलं.
ती मात्र काहीही ना बोलता
तशीच बसलेली होती. दादू जरा थांबला आणि त्याने आईकडे पाहिलं. ती काय बोलेल याची
त्याला उत्सुकता होती पण ती काहीच प्रतिसाद देत नाही म्हटल्यावर तो परत खिडकीच्या
जवळ सरकला. सोनू आता गुडघ्यात डोके घालून बसली होती. बाहेर कसलीही चाहूल नव्हती.
पूर्ण शांत निर्मनुष्य काळोखी रात्रं होती.
तिने डोळे उघडून पाहिलं तर
सोनू डोके गुडघ्यात घालून बसलेली होती. तिने सोनूला जवळ ओढलं आणि थोपटलं. दादू
खिडकीतून बाहेर पाहत असलेला पाहून सुद्धा ती त्याला काहीही बोलली नाही.
काहीवेळाने दादू म्हणाला
"आई... इकडे बघ ना.. खूप सारी लोकं दिसतायत आता"
तिने आणि सोनुने दादुकडे
पाहिलं. तिने सोनूला बाजूला केलं आणि जागेवरून उठून खिडकीजवळ गेली. दादु लगेच
बाजूला झाला. खिडकीच्या फटीला डोळा लावून तिने बाहेर दूरवर दिसणाऱ्या टेकडीकडे
पाहिलं. टेकडीच्या मध्यभागी असणाऱ्या झाडाजवळ आता बऱ्याच लोकांचा घोळका दिसत
होत्या. लांबवर धुरकट वातावरण असल्याने स्पष्ट दिसतं नव्हतं पण तिथे आसपास जमा
झालेली गर्दी मात्र दिसत होती.
ती खिडकीपासून बाजूला झाली
आणि कसल्यातरी विचारात पडली. ती बाजूला होताच दादु लगेचच खिडकीच्या जवळ गेला आणि
बाहेर पाहू लागला. सोनू किलकिल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहू लागली.
"आपल्याला तिथे जायला हवं आता" तिने आपल्याच विचारात शब्द उच्चारले. दादू
आणि सोनू तिच्याचकडे पाहू लागले.
दोन्ही मुले आपल्याकडे
पाहत आहेत हे पाहून ती परत म्हणाली "हो, आपण जाऊयात इथून"
"आणि बाबा परत आले तर..आपण इथे दिसणार नाही त्यांना"
सोनुने विचारलं.
"बाबा नक्कीच तिथे असणार.." दादू खिडकीच्या
फटीतून बाहेर पाहतच म्हणाला.
सोनुने भुवया वक्र करून
दादुकडे पाहिलं. तिने भिंतीचा आधार घेऊन आपलं डोकं त्यावर टेकवलं. कदाचित ती थकली
होती कि तिला तंद्री लागली होती.
"तिथे बाबा दिसलेत का तुला" सोनू जागेवरून
उठून म्हणाली.
"ना.. दिसत नाहीये कोणी.. पण असतीलच कि तिथे.."
दादु समोरची नजर न हटवता म्हणाला.
यावर सोनू काहीही न बोलता
तशीच प्रश्नार्थक मुद्रा करून उभी राहिली.
"चला दादु बाजूला व्हा आता तिथून, सोनू त्याला घेऊन बाहेर थांब जा" अचानक तंद्रीतून बाहेर आल्यासारखी ती पटापट
बोलली. तिच्या त्या बोलण्यामुळे दादू पटकन सोनूजवळ गेला. सोनूसुद्धा काहीहि बोलता
दादूचा हात पकडून त्याच्यासोबत बाहेर गेली.
मुलं गेल्यावर तिने पटकन
समोरच्या खिडकीला डोळा लावला. बाहेर पाहिलं तर काळोख जरा ओसरत होता. टेकडीवरच्या माणसांचा
घोळका आता जलदगतीने झाडाभोवती फिरत होता. तिने घराच्या आसपासच्या परिसरात नजर
फिरवली काळोख कमी झाल्यासारखं जाणवत होतं. कदाचित पहिला प्रहार चालू झाला असावा.
तिने मनाशी निश्चय केला आणि बाहेरच्या खोलीत आली. सोनू आणि दादू मुख्यदरवाजाजवळच
उभे होते.
"चला थोड्या वेळात निघुयात हा आपण आता. बाबा आता तिथेच येतील." समजुतीच्या सुरात
तिने दोन्ही मुलांना सांगितलं. थोडा वेळ तिथेच थांबून परत मुख्य दरवाजाच्या फटीला
डोळा लावून बाहेरची चाहूल घेतली. खरंच काळोख कमी झाला होता आणि बाहेर कोणीही
नव्हतं. बाहेर कोणिहि नाही हे पाहून ती मुलांसोबत बाहेर पडली.
दादूला तिने आपल्या कडेवर
घेतलं होतं आणि सोनुने तिचा हात पकडला होता. अडखळत ती पुढे पुढे सरकत होती.
चालायला तिला तसा त्रासच होत होता. घराच्या पुढच्या दोन रिकाम्या जागा ओलांडून ती
पुढे आली.
पुढच्याच एका वळणावर एक
कोणीतरी इसम कोणाचीतरी वाट पाहत होता. ती मात्र शांतपणे चालत होती. सोनूसुद्धा पाय
ओढत तिच्यासोबत चालत होती. दादू मस्तपैकी अंगठा चोखत तिच्या खांद्यावर डोके ठेवून
इकडे तिकडे पाहत होता. वळणवरचा इसम कोणा तरी ओळखीच्या माणसाची वाट पाहत उभा होता.
थोड्याच वेळात एक प्रवासी वाहतूक करणारी एक रिक्षा तिथे आली आतून एक माणूस उतरला.
वाट पाहणाऱ्या इसमाने त्याला ओळखले आणि त्याची गळाभेट घेतली.
दोघेही मग रस्त्यावरून
चालू लागले. ती एका झाडामागे काहीवेळ उभी राहिली जेणेकरून त्या दोघांची तिच्यावर
नजर पडू नये.
"बऱ्याच दिवसांनी आलास" वाट पाहणाऱ्याने विचारलं.
"हो हो..खूप काळ लोटला. कामामुळे जमलंच नाही" त्या पाहुण्याने उत्तर दिलं.
ख्याली खुशाली विचारून ते दोघे आता तिच्या घराजवळ आले.
"अरे हे तर वसंतचे घर.. असे ओसाड... आणि जळून कशाने गेले" पाहुण्याने
विचारलं. त्या वाक्यसरशी तिने त्या दोघांचा कानोसा घेतला.
दुसऱ्याने त्या घराकडे
पाहत उसासा टाकला आणि म्हणाला "काही दिवसांपूर्वी अचानक आग लागली घराला.
किचनमध्ये कदाचित सिलिंडरचा स्फोट झाला असं लोकं म्हणतात. वसंता कामामुळे बाहेर
होता पण त्याची बायका पोरं मात्र आगीमध्ये दगावली.
"अरेरे... काय हे दुर्दैव... मागच्या वेळेस आलो होती तेव्हा दिसलं होतं हे
कुटुंब. दैवाने कसा घाला घातला असा" पाहुण्याने हळहळ व्यक्त केली.
"हो... दुर्दैवच.. ४ तासाने आग आटोक्यात आली. सगळे जळून गेले होते. नंतर
कोणीतरी वसंताला निरोप देऊन सांगितलं तर घाईगडबडीत येण्याच्या नादात त्याच्या
वाहनाला अपघात झाला आणि तो सुद्धा जागीच गेला.”
"हाय
रे दैवा" पाहुणा आता जास्तच हळहळला. झाडामागची “ती” मुलांसोबत कानोसा घेत तिथेच उभी होती.
"नंतर काही
दिवसांनी रात्री गावातील लोकांना इथे आसपास जरा वेगळ्याच हालचाली जाणवल्या. जळक्या
घरात खिडकीपाशी कोणीतरी लहान मुल उभं आहे असं दिसायचं. दरवाजाजवळ आवाज यायचा. खिडकीमधे
पेटते पलिते दिसायचे काहींना.. रात्री अपरात्री इथे यायला
लोक घाबरायला लागले." माणसाने माहिती पुरवली.
"बापरे
काय सांगतोस काय ...तू पाहिलंस ते" पाहुणा घाबरून बोलला.
"नाही..
लोक सांगतात ते फक्त सांगतोय. नंतर गावप्रमुखांनी अपरात्री येथे भटकायला बंदी केली
लोकांना. काही मांत्रिक या गोष्टीचा फायदा घेऊन आपलं कुकर्म करायला रात्रीचे इथे
घिरट्या घालू लागलेत" त्याने सांगितलं.
"शी
काय पण लोक ते" पाहुणा बोलला.
"जाऊदेत
चल पटकन इथून पुढे जाऊयात लगबगीने. इथे कोणीतरी पाहिलं आणि हटकेल उगाचच. सकाळ होऊ
लागलीये आता घराकडे जाऊ" त्याने पाहुण्याला ओढतच तिथून नेलं.
ती झाडामागून बाहेर आली
आणि एक शेवटची नजर तिने आपल्या जळालेल्या घराकडे टाकली आणि परत हवेतूनच तरंगत
सोनूला पकडून पुढे जाऊ लागली. टेकडीवरच्या माणसांच्या आकृत्या आता स्पष्ट दिसू
लागल्या होत्या. हवेत तरंगतच त्यांनी झाडाभोवती फेर धरला होता.
"ते बघ
बाबा..." सोनू ओरडली. दादू समोर पाहू लागला आणि हर्षोल्हासित होऊन चित्कारला.
टेकडीवर एक काळी आकृती हात
पसरून त्यांच्याकडे पाहत त्यांना बोलावत होती.
“तिने” सुद्धा त्या आकृतीला ओळखले आणि आनंदाने ती भराभर हवेत तरंगत पुढे जाऊ
लागली. आता ती सुरक्षीत होती. आत तिला आणि तिच्या मुलांना कोणीही त्रास देऊ शकणार
नव्हतं. कारण ती आत आपल्यासारख्या लोकांसोबत असणार होती.
=================================================================

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Fell free to share your Feedbacks