कुंभमेळा हा एक अध्यात्मिक सोहळा आहे. हा सोहळा प्रयागराज, हरिद्वार, नाशिक, उज्जैन या ठिकाणी दर १२ वर्षांनी भरतो.
कुंभमेळा हा शब्द कुंभ आणी मेळा या दोन शब्दांपासून बनलेला आहे. थोडक्यातच काय तर अमृताचे कुंभ अथवा भांडे, पौराणिक कथेनुसार देव आणी दानवांनी अमृतकुंभासाठी एकमेकांसोबत लढाई केलेली होती. या लढ्यात खेचाखेचीमध्ये देवतांनी अमृताचे चार थेंब खाली सांडले गेले हे थेंब पृथ्वीवर प्रयागराज, हरिद्वार, नाशिक, उज्जैन या ठिकाणी पडले म्हणून दर १२ वर्षांनी या ठिकाणी कुंभमेळा भरवला जातो.
येत्या १३ जानेवारीपासून हा महाकुंभमेळा हरिद्वारमध्ये गंगा नदीच्या किनारी सुरू होणार आहे. सामाजिक प्रवाहांनी घडवलेला हा उत्सव जगातील सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवांपैकी एक मानला जातो. या उत्सवाचा समावेश युनेस्कोने मानवतेच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत केला आहे. महाकुंभाच्या पर्वात पवित्र जलात स्नान केल्याने पापक्षालन होतं आणि जन्म-मृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळते अशी भाविकांची धारणा आहे. त्यामुळे भाविक लोकांचा अथांग सागर कुंभमेळ्याच्या ठिकाणी लोटतो. भारताच्या कानाकोपऱ्यातून कोट्यवधी भाविक तसेच परदेशातून लाखो पर्यटक हरिद्वार, प्रयागराज, नाशिक आणि उज्जैन या चार शहरांमध्ये होणाऱ्या या भव्य मेळ्यात सहभागी होण्यासाठी येतात. लाखो सामान्य लोक, फकीर आणि संन्यासी येथे एकत्र येतात.
कुंभमेळा लाखोंचा मेळावा असला तरी त्यातील मुख्य भूमिका आखाड्यांची आहे. हे आखाडे विविध पंथांशी संबंधित योद्धा-संन्याशांच्या गटांचे प्रतिनिधित्व करतात. यात शैव संन्यासी, वैष्णव बैरागी, उदासी आणि शीख निर्मले यांचा समावेश होतो. जाणकार लिहितात कि “कुंभमेळ्याच्या पवित्र कालखंडात या आखाड्यांना सर्वात महत्त्वाच्या स्नानस्थळांवर हक्क असतो. ही स्थळं सामान्य लोकांसाठी बंद ठेवली जातात. आखाडे या स्नानस्थळांपर्यंत ‘शाही स्नान’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भव्य मिरवणुकीतून जातात. या मिरवणुकीत ते शस्त्र, ध्वज आणि राजसत्तेची चिन्हं बाळगतात.” आखाडे शाही स्नानासाठी कोणत्या क्रमाने पुढे जातील यावरून त्यांची इतरांपेक्षा असलेली श्रेष्ठता ठरवली जात असे. त्यामुळे स्नानक्रम ठरवण्यावरून अनेकदा हिंसक वाद उद्भवले आहेत. या हिंसाचारात हजारो लोकांचा बळी गेला आहे. ब्रिटीश कालखंडात अनेक लेखकांनी यावर लिखाण केलेलं आहे. अशाच एका भीषण घटनेचा उल्लेख १७६० च्या हरिद्वार कुंभमेळ्यासंदर्भात सापडतो. १७८९ च्या नाशिक मेळ्याचा आहे. या मेळ्यात मोठ्या प्रमाणात रक्तपात झाला होता. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पेशव्यांनी बैराग्यांचं स्नानस्थान जुन्या शहरातील रामकुंडावरून शेजारच्या त्र्यंबकेश्वर या तीर्थक्षेत्रात हलवलं. ही व्यवस्था आजही सुरू आहे. ब्रिटीश राजवटीत स्नानक्रम अधिक ठोस करण्यात आला. कारण वसाहतकालीन शासकांनी आखाड्यांना कायदेशीर करारांद्वारे बांधून ठेवलं. त्यामुळे हिंसाचार रोखला जाऊ शकला. हीच पद्धत सध्याच्या मेळा प्रशासनानेही स्वीकारली आहे. या प्रक्रियेत आखाड्यांना ब्रिटिशांनी घालून दिलेल्या मर्यादांमध्ये काम करावं लागलं. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश वसाहतकालीन राजवटीने कुंभमेळ्यावर मोठा प्रभाव टाकला. कारण कुंभमेळे देशभक्तीच्या भावना जागृत करण्यासाठी केंद्रबिंदू ठरले. धार्मिक मेळावे असल्यामुळे ते राष्ट्रवादी भावना निर्माण करण्यासाठी आदर्श ठरले. वसाहतवादी सत्तेसाठी हा एक संभाव्य धोकादायक उत्सव होता. त्यामुळेच या उत्सवावर कठोर नियंत्रण आणि नियमांची गरज होती. त्यामुळे सर्वच प्रतिष्ठित आखाड्यांना सन्मानाने स्नानाचा लाभ घेता आला.
आजच्या काळात देखील पवित्र जलात स्नान करण्याची संधी सर्वसामान्य जनता देखील सोडत नाही. कारण सध्या कुंभमेळ्याच्या प्रसिद्धीत देखील वाढ झालेली आहे. देशातीलच नाही तर परदेशातील लोकसुद्धा आता कुंभमेळ्यात सहभागी होत आहेत.
स्त्रोत-लोकसत्ता

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Fell free to share your Feedbacks