१२ मे, २०२४

गुप्तहेर सत्यवीर आणि कुटीरोवांचं शस्त्र - शेवटच्या सुया


 

8.शेवटच्या सुया

आपल्या घराच्या बाहेर कट्ट्यावर सत्यवीर आरामात सिगरेट पीत विचार करत बसला होता. आबांच्या नाटकाचे बिंग बाहेर काढल्यानंतर खरंतर त्याला समाधान वाटायला हवे होते. कारण त्याने खुनात वापरलेल्या हत्याराचा शोध लावलेला होता आणि या प्रकरणात प्रगती केली होती. पण त्याला म्हणावं तसं समाधान लाभलेलं न्हवत. आबांनी त्यांचा नाटकी खेळ हा फक्त मालतीताईंचे खरं स्वरूप बघणे यासाठी चालवलेला होता. अर्थात मालतीताईंचे लोकांसोबतचे चुकीचे वागणे आणि बाहेरील बेकायदेशीर प्रकरणं वाढली असती तर आबांनी मालतीताईंचा जीव घ्यायला सुद्धा मागेपुढे पहिले नसते. तसं आबांनी स्वतः बोलून दाखवलं होतं. पण आबांनी काही करायच्या आतच दुसऱ्या कोणीतरी मालतीताईंचा काटा काढलेला होता. कुटीरोवांच्या हत्यारानेच मालतीबाईचा बळी गेला असल्याची सत्यवीरला पक्की खात्री होती. आबांच्या खोलीत मिळालेल्या आबांच्या मित्राच्या पुस्तकात त्याला त्या शस्त्राविषयी माहिती मिळाली होती. ओल्डोमा वनस्पतीच्या खोडापासून एक वितभर लांब पोकळ नळी बनवली जाते. ज्यामध्ये इंच-दोन इंचाच्या टोकदार सुया ज्या ओल्डोमा वनस्पतीपासूनच बनवल्या जात. त्या सुयांच्या अग्रभागी ओल्डोमाच्या जहरी पानांपासून काढलेला घट्ट रस लावून ती सुई अलगदपणे लांब नळीत ठेवायची आणि नळी एका उघड्या बाजूने तोंडात धरून जोरात फुंकायची. वाऱ्याच्या वेगाने सुई निश्चित लक्ष्यामधे घुसून काही मिनिटातच काम तमाम करायची. हत्यार तर समजल होतं पण दुर्दैवाने सापडलेलं न्हवत. त्यामुळे सत्यवीर काहीसा चिंताक्रांत होता. तरीहि एक प्रश्न त्याला भेडसावत होताच तो असा कि त्या हत्याराचा वापर कोणी केला असेल आणि का?.

सिगरेटच्या धुराची वलय हवेत सोडतच सत्यवीरने सुस्कारा सोडला.

सिगरेट संपवून सत्यवीर आपल्या खोलीत आला. खुर्चीवर बसून त्याने आपले दोन्ही पाय टेबलावर ठेवले आणि विचारात गढून गेला तेवढ्यात टेबलावरचा फोन खणाणला...

विचारांच्या तंद्रीतच सत्यवीरने फोन उचलला.

हॅलो सत्यवीर..” समोरून इन्स्पेक्टर देशमुख यांचा आवाज आला.

हॅलो.. देशमुख बोला” आपल्या विचारांची तंद्री भंग न करताच सत्यवीर बोलला.

सत्यवीर माझं ऐक मी आबांना आणि पाटील डॉक्टरांना चांगलं रिमांडमधे घेऊन चौकशी करतो. नक्कीच ते काहीतरी लपवत आहेतदेशमुख घाईघाईत म्हणाले.

देशमुखांना अजूनही आबांवर आणि पाटील डॉक्टरांवर संशय होता. पण सत्यवीरने याही वेळी देशमुखांना दाद दिली नाही.

आपल्याला काहीतरी मिळाले आहे हे वरिष्ठांना सांगण्यासाठी का तुम्हाला त्या दोघांना रिमांड मध्ये घ्यायचं आहे.सत्यवीर देशमुखांची नस पकड शांतपणे म्हणाला.

हे बघ सत्यवीर मला तर वाटतंय कि आपण एकदा त्यांची व्यवस्थित चौकशी करायलाच हवी नक्कीच काहीतरी मिळेलदेशमुख त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत आत्मविश्वासाने म्हणाले.

देशमुख, ते दोघेही गुन्हा करण्याइतपत सक्षम नाहीयेत. पाटील डॉक्टर म्हणजे शेळपट शेळी आहे. आबांचं म्हणालं तर ते मालतीताईंना मारण्याच्या तयारीत होते. पण त्यांची ती मनीषा पूर्ण झाली नाही आणि जरी त्यांची ती इच्छा पूर्ण झाली असती तरी त्यांनी स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केलं असतं. आबा तितके स्वाभिमानी आहेत असं मला तरी वाटतंसत्यवीर खुर्चीत रेलत म्हणाला.

कदाचित त्या ओल्डोमा नावाच्या वनस्पतीच्या बिया कुठे आहेत हे त्यांना माहित असेल त्यामुळे जरा कडकपणे चौकशी केली तर त्या बिया कुठे आहेत याचा थांग आपल्याला त्यांच्याकडूनच नक्की मिळेल. डॉक्टर पाटलांना जरा फैलावर घेतल्यावर पोपटासारखे बोलतील बघ तेदेशमुख आग्रह करत बोलले.

अहो देशमुख त्या बिया काय आत्तापर्यंत तशाच असणार आहेत का? ज्याने त्या घेतल्या असतील त्याने त्यांचं रोप तयार....” एवढ बोलून सत्यवीर बोलायचा थांबला... आणि फोन तसाच कानाला लावून विचारात गढला.

इकडे देशमुखांना वाटलं सत्यवीरने फोन ठेवला कि काय..

“हॅलो.. हॅलो..” असं देशमुख एकसारखं म्हणू लागले.

ओह्ह शीट.. हे मला आधी का नाही सुचले....सत्यवीर मनातच म्हणाला.

देशमुख मला एक अत्यंत महत्वाच काम आठवलय मी नंतर बोलतो” असं म्हणत देशमुख काय बोलतायत हे न ऐकताच सत्यवीरने फोन ठेवून दिला आणि त्वरेने हालचाल करत पटकन आपल्या घराच्या खाली लावलेल्या दुचाकीपाशी आला. घाईघाईतच त्याने आपली दुचाकी चालू केली आणि शहराच्या बाहेर निघाला.

दुचाकी चालवत असतना तो एका गुढ विचारात असल्यासारखा दिसतं होता. काही वेळाने दुचाकी चालवल्यानंतर तो शहराबाहेर एका कच्च्या रस्त्यालगत असलेल्या नर्सरीजवळ आला. आजूबाजूला लोकांची शेती दिसत होती. जास्त कोणती वर्दळ किंवा दुकाने वगैरे न्हवती. फक्त काही अंतरावर एक छोटंसं टपरीवजा हॉटेल दिसतं होतं. समोरच नर्सरीच छोटसं गेट होतं. सत्यवीरने गेटमधून प्रवेश केला.

आत येताक्षणी त्याला विविध प्रकारची रोपं आजूबाजूला दिसली. प्लास्टिकच्या पिशवीमध्ये माती टाकून गुलाब, मोगरा, प्राजक्त अशा प्रकारची फुलझाड होती. जरा पुढे गेल्यावर बाजूलाच विविध फळझाड असलेली रोपं लावलेली होती. कलमी रोपं आणि औषधी झाडांची रोपंसुद्धा व्यवस्थित ओळीत ठेवलेली दिसत होती. आतमधे येण्यासाठी आजूबाजूला असलेल्या रोपांच्या गर्दीतून सत्यवीरला पुढे यावं लागलं. पुढे आल्यावर आतमध्ये रिकाम्या जागेत एक पस्तिशीचा एक माणूस खाली बसून माती वेगळी करण्याचं काम करत होता.

या नर्सरीचे मालक कोण आहेतसत्यवीरने मुद्दाम नवख्या माणसासारखं त्या इसमाला विचारलं.

त्या माणसाने मागे वळून पाहिलं.

अविनाशसाहेब देसाई आहेत मालक.. तुम्ही कोण आहात?मातीतून हात बाहेर करत डोळे रोखून त्या इसमाने विचारलं.

मला त्यांना भेटायचं होतं. काही रोपं घ्यायची होती. कधी येतील ते?सत्यवीरने इकडे तिकडे पाहत विचारलं.

येतील थोड्या वेळात...तुम्ही बसा तोवर” एवढ बोलून त्या माणसाने आपले हात परत मातीत घातले आणि काम करू लागला.

तुम्ही इथे काम करता का?” सत्यवीरने विचारलं.

हो इथे कामाला आहे मी” मान वर न करता त्या इसमाने उत्तरं दिलं.

ठीक आहे मी तोवर नर्सरीमधे जरा फेरफटका मारतो” सत्यवीरने असं म्हणाल्यावर त्या माणसाने फक्त मान डोलावली आणि आपल्या कामात गढून गेला.

सत्यवीर मग तिथून पुढे आतमधे नर्सरीच्या मागच्या बाजूला जिथे एक छोटं शेड होतं तिथे गेला. नाही म्हटलं तरी नर्सरीची जागा मोठी होती तसच खूप वेगवेगळ्या प्रकारची रोपं तिथे उपलब्ध होती. शेडजवळ पोहोचल्यावर सत्यवीरला दिसलं कि वर पारदर्शक प्लास्टिकचं छत केलेलं होतं त्यामुळे आतमध्ये उजेड येत होता. शेडमध्ये शेतीसाठी उपयुक्त झाडे ठेवलेली दिसत होती. बाजूलाच एक फावडे आणि छोटीशी कुदळ होती. शेडच्या कोपऱ्यात थोडीशी माती वर आलेली दिसत होती. जणु जमीन खणल्यासारखी दिसतं होती. सत्यवीरने पुढे जाऊन पाहिलं तर कोणतं तरी झाडं उपटून टाकल्यासारखं वाटत होतं. इतर रोपाप्रमाणे ते प्लास्टिकमधे मातीत नसणार तर जमिनीमध्ये लावलेलं असणार असं दिसतं होतं. जमीन कुदळीच्या सहाय्याने खणुन काढल्यासारखी दिसतं होती. सत्यवीर तिथे खाली झुकून पाहू लागला.

रोप मुळासकट उपटून टाकल्यामुळे तिथे इतर कोणताच मागमूस राहिलेला न्हवता. सत्यवीर आजूबाजूला पाहू लागला. जमिनीवर इतर काही खुणा आहेत का ते त्याला पहायचं होतं. पण तसं काहीच आढळलं नाही. शेडच्या एक बाजूला छोटासा दरवाजा होता त्याच्यामागे मातीचा ढिग होता. रोपांसाठी मातीची व्यवस्था तिथून केली जायची. शेडच्या कोपऱ्याकोपऱ्यात बांबू उभे केले होते जेणेकरून शेडला आधार देता येईल. शेडची उंची जास्त उंच न्हवती. सत्यवीरने हात वर केले असते तरी त्याचे हात शेडच्या छताला टेकले असते. सत्यवीर कोपऱ्यांमध्ये उभ्या केलेल्या बांबूकडे गेला आणि त्या बांबूच निरीक्षण करू लागला. जिथे जमीन खणली गेली होती त्याच्या जवळच्या बांबूवर काहीतरी टोचल्याप्रमाणे बारीक बारीक होल दिसत होत्या. सत्यवीरने जवळ जाऊन निरीक्षण केलं आणि हाताची घडी घालून विचार करू लागला. लांबून काहीतरी टोकदार वस्तू फेकून मारल्याच्या खुणा वाटत होत्या. सत्यवीरने बारकाईने त्या खुणांना न्याहाळल तेव्हा त्याला त्या खुणा नजरेस पडल्या. तिथलं निरीक्षण करून सत्यवीर लगेच अचानक तिथून बाहेर पडला आणि बाहेर काम करत बसलेल्या त्या इसमाजवळ आला.

साहेब आले नाहीत का अजून” सत्यवीरने विचारलं.

नाही आले अजून....खरंतर एव्हाना यायला हवे होते.कपाळावर आठ्यांच जाळ आणत तो इसम बोलला.

इथे नर्सरीत तुमचे मालक एकटेच येतात का कि अजून कोणी येत असत त्यांच्यासोबत?सत्यवीरने विचारलं. तसं विचित्र चेहरा करून त्या इसमाने सत्यवीरकडे पाहिलं. त्याला मुळात प्रश्नच कळला नाही.

म्हणजे..अस म्हणत आपला चेहरा तिरकस ठेवत तो म्हणाला.

म्हणजे नर्सरी खूप मोठी आहे आणि छान ठेवलीय. कोणी मदतीला येतं का तुमच्या मालकांच्या कि तू एकटाच असतो इथेसत्यवीर सहजपणे म्हणाला.

मीच असतो इथे देखभालीला. पण साहेबांच्या पत्नी म्हणजे छोट्या बाईसाहेब पण येतात इथे केव्हा केव्हाएवढ बोलून तो इसम आपलं काम करू लागला.

त्याला इसमाला अजून जास्त काहीही न विचारता सत्यवीर तडक तिथून बाहेर पडला आणि बाहेर लावलेल्या आपल्या दुचाकीजवळ आला. आसपास कुठे फोनबुथ आहे का ते त्याला पहायचं होतं. पण इथे जवळपास हॉटेल किंवा फोन असल्याचं काहीच लक्षण दिसत न्हवत. सत्यवीर दुचाकीवर बसला आणि समोर काही अंतरावर टपरीसारखं काहीतरी दिसतं होतं तिथे निघाला. त्या टपरीजवळ पोहोचताच त्याला दिसलं कि आतमधे छोटेखानी हॉटेल आहे जिथे नाश्ता, चहा अशा गोष्टी मिळतात. तिथे समोरचं गल्ल्यावर एक इसम बसलेला होता. त्याच्याकडे चौकशी केल्यावर सत्यवीरला समजलं कि आतमधे फोन आहे. आतमधे गेल्यावर एका कोपऱ्यात ठेवलेला टेलिफोन त्याला दिसला आणि सत्यवीर तिथे गेला.

रिसीवर हातात घेऊन त्याने नंबर फिरवून देशमुखांना फोन लावला. पहिल्या दोन रिंगमधेच देशमुखांनी फोन उचलला.

हा.. इन्स्पेक्टर देशमुख बोलतोयदेशमुखांचा भारदस्त आवाज आला.

देशमुख, मी सत्यवीर बोलतोय.” फोनवर सत्यवीर आहे कळताच त्याला पुढे काहीही बोलू न देता देशमुख म्हणाले

अरे सत्यवीर कुठे होतास. किती वेळ झालं तुझ्या घरी फोन करत होतो. तू फोन उचलला नाहीस

देशमुख मी अविनाशच्या नर्सरीमध्ये छाननी करण्यासाठी आलोय” सत्यवीर म्हणाला.

त्याची काही एक आवश्यकता नाहीये आता सत्यवीर. आपल्याला गुन्हेगार मिळालायदेशमुख पुढे काही बोलणार इतक्यात सत्यवीर आश्चर्याने म्हणाला “काय...कोण आहे गुन्हेगार

आत्ताच काही वेळापूर्वी अविनाश पोलीस स्टेशनमधे आला होता आणि त्याने कबुल केलंय कि खून त्यानेच केलाय म्हणूनदेशमुख म्हणाले.

काय.. असं म्हणाला तोसत्यवीर जवळपास ओरडतच म्हणाला.

होय त्यानेच कबुलीजबाब दिलाय कि त्या संध्याकाळी त्यानेच गुपचूप हॉस्पिटलमधून येऊन मालतीताईंना बेसावध क्षणी गाठून संपवलं. घरी त्याला आणि त्याच्या बायकोला दिलेल्या त्रासाला कंटाळून त्याने हे पाउल उचललं होतं. त्यामुळे मला वाटतंय कि आता खुनी सापडलाय. तुला हेच सांगायला मी फोन करत होतो पण तू घरात न्हवतासदेशमुखांनी एका दमात सांगून टाकलं.

खून जर अविनाशने केलाय असं त्याचं म्हणण आहे तर मग कुटीरोवांच्या शस्त्राबद्दल त्याने काय सांगितलंसत्यवीरने प्रश्न केला.

अ..ते त्याने नष्ट केलंय असं त्याचं म्हणण आहे. पण कोर्टात तो हे सगळं सांगणार आहेदेशमुखांनी माहिती पुरवली आणि तू सुद्धा ताबडतोब पोलीस स्टेशनला ये असं सांगून देशमुखांनी फोन ठेवला.

यावर काहीही न बोलता फोन ठेवून सत्यवीर तेथून विचार करत बाहेर पडला. आपल्या दुचाकीजवळ येऊन तो थांबला. त्याला दोन मिनिट विश्वासच बसत न्हवता कि अविनाशने खुनाची कबुली दिलेली आहे आणि स्वतः पोलिसांच्या स्वाधीन झालाय.

सत्यवीरने मनाशी काहीतरी ठरवलं आणि आपल्या दुचाकीवर बसला.

नर्सरीमध्ये शेडच्या आत जमीन खणल्याच्या खुणा आणि बांबूवरची टोकदार होल कशाची आहेत हे त्याला समजून चुकलं होतं. आपली दुचाकी चालवत तो शहराकडे निघाला. काही वेळानंतर त्याची गाडी देसाई वाड्याजवळ येऊन थांबली. संध्याकाळ होऊ लागलेली होती. अंधुकसा प्रकाश वाड्याभोवती पसरलेला होता.

वाड्याच दार उघडंच होतं त्यामुळे सत्यवीरने आतमध्ये प्रवेश केला. अंगणात येऊन पाहिलं तर त्याला कोणीच दिसलं नाही. सत्यवीरने मग आपला मोर्चा स्वयंपाक घराकडे वळवला. स्वयंपाकघरच्या दाराशी आल्यावर त्याला आतमध्ये नंदिनी काम करताना दिसली. ती पाठमोरी उभी होती. सत्यवीरने यावेळी लक्ष विचलित न होऊ देता दरवाजावर टकटक करून आपल्या उपस्थितीची जाणीव करून दिली. नंदिनीने मागे वळून पाहिलं. सत्यवीरला पाहून ती काहीच बोलली नाही तशीच मान खाली घालून उभी राहिली.

मला असं समजलंय कि अविनाशने गुन्हा कबुल केलाय आणि तो स्वतः पोलीसस्टेशन गेलायसत्यवीर धारधार नजरेने नंदिनीकडे पाहत म्हणाला.

हो..” एवढचं बोलून नंदिनी खाली पाहत ओट्यावरच्या भांड्यांशी चाळा करू लागली.

मी नर्सरीवर जाऊन आलोय मगाशीएवढ बोलून सत्यवीर नंदिनीच्या हालचालींच निरीक्षण करू लागला.

त्यावर काहीही न बोलता नंदिनी मागे वळली आणि ओट्यावरच्या भांड्यांची आवराआवर करू लागली. तिची अशी शांतता सत्यवीरला रुचली नाही.

काही बोलणार नाहीस का यावर तू...सत्यवीर नंदिनीचा एकेरी उल्लेख करत स्पष्टपणे नंदिनीला म्हणाला.

सत्यवीरच्या या एकेरी उल्लेखावर कोणतीही प्रतिक्रिया न देता नंदिनीने आपलं काम चालूच ठेवलं. तिने शेगडीवर भांड ठेवून गॅस पेटवला. काही क्षण शांततेत गेले. नंतर त्या शांततेचा भंग करत नंदिनीच म्हणाली

तुम्ही एक दिवस माझ्यापर्यंत येणार याबाबत मला खात्री होती. पण एवढ्या लवकर याल असं वाटलं न्हवतएवढ बोलून नंदिनी मागे वळली. बाजूच्या लाकडी फळीवरील एक डबा बाहेर काढून ओट्यावर ठेवला

तुम्ही चहा घेणार ना?” अतिशय स्पष्ट आणि शांत शब्दात नंदिनी म्हणाली.

तिच्या या थंड आणि आत्मविश्वासु वागण्याने सत्यवीर खरंतर अवाकच झालेला होता. पण तरीही तसं चेहऱ्यावर न दाखवता तो स्पष्टच म्हणाला.

नर्सरीमध्ये कुटीरोवांकडून मिळालेल्या त्या बियां तुचं पेरल्यास. नंतर त्याचं रोप उगवलं. तुझं काम पूर्ण झाल्यावर नंतर तूच ते रोपट उपटून टाकलेस.. मानलं तुला.

ते शस्त्र किंवा त्याबद्दलचा कोणताही मागमूस तुला ठेवायचा न्हवता. पण दुर्दैव तुझं या सत्यवीरच्या नजरेतून गोष्टी सहजासहजी गोष्टी सुटत नाही याची तुला कल्पना नसावीसत्यवीर घारीसारखी नजर रोखत नंदिनीला पाहत म्हणाला.

जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा वाड्यात आलेलं पाहिलं तेव्हाच तुम्ही खूप आत्मविश्वासू आहात हे कळलेलं होतं. तुमची चौकशी करण्याची पद्धत, वाड्याच्या आसपास तुम्ही केलेली निरीक्षणे, मुख्य म्हणजे आबांचं नाटक तुम्ही ज्या पद्धतीने बाहेर काढलंत तेव्हाच कळाले होते कि तुमच्या नजरेतून गोष्टी सहजासहजी सुटत नाहीत. खरंच तुमच्या हुशारीची दाद द्यावी वाटते. तुमच्यामुळे खरंतर आम्हाला आबा परत मिळाले असं म्हणायला हरकत नाहीनंदिनी शांतपणे पण खंबीर आवाजात म्हणाली

तुला एवढं समजलं असेल माझ्याबद्दल तर हे पण सांग कि तू मालतीताईंचा खून केलेला असताना अविनाशने स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन का केलंय. अर्थात पोलिसांना अविनाशला अटक करून काहीही मिळणार नाहीये हे मला माहितीये. कारण खुनाच शस्त्रच त्यांना मिळालेलं नाहीये. त्याच्या नुसत्या कोरड्या कबुलीजबाबावर खटला उभारू शकत नाही आणि राहिलाच तर तो टिकूच शकत नाहीहाताची घडी घालत नंदिनीकडे पाहत सत्यवीर म्हणाला.

नंदिनीच्या चेहऱ्यावर या वाक्यांचा काहीही परिणाम झाला नाही जणू काही तिला माहित होतंच कि सत्यवीर हेच बोलणार आहे.

म्हणूनच तर ते पोलिसांना स्वाधीन झालेत ना पुन्हा शांतपणे बोलत नंदिनीने फळीवरून काढलेल्या डब्याच झाकण उघडले. तिच्या हावभावातला शालीनपणा जाऊन आता एक कणखरपणा दिसू लागलेला होता. तिने मागे वळून गॅसवरच भांड खाली ठेवलं. फळीवरच्या उघडलेल्या डब्यातून काहीतरी बाहेर काढलं आणि सत्यवीरला दाखवत म्हणाली

या शेवटच्या दोनच सुया राहिल्यात” असं म्हणत तिने त्या ओल्डोमा वनस्पतीच्या खोडापासून बनवलेल्या सुया शेगडीच्या धगधगत्या आगीवर धरल्या. सत्यवीरला काही कळणार इतक्यात त्या जाळून खाक झाल्या होत्या.

तुम्ही आमच्या आबांना आमच्यात परत आमच्यात आणलत. त्याच्या बदल्यात कमीत कमीत तुम्ही त्या शस्त्राची हलकीशी झलक बघायचे हकदार नक्कीच आहात म्हणून तुमच्याचसाठी आत्तापर्यंत ठेवलेल्या होत्याएवढ बोलून नंदिनीने तो डबा बाजूला ठेवून दिला. कुटीरोवांच्या शस्त्राचे अस्तित्व सांगणारे पुरावे सत्यवीरच्या देखत जाळून खाक झालेले होते.

किती विचित्र खेळ खेळतेयस ना तू...आपल्या सासूला त्याच शस्त्रांनी जिवनिशी मारून तुला जराही खंत वाटत नाहीये. नक्कीच दगड मनाची आहेस तूसत्यवीर आवेशात म्हणाला.

तसं नंदिनीने स्वयंपाकघराच्या खिडकीबाहेर पाहिलं. संध्याकाळच कोवळ उन खिडकीतून तिच्या अंगावर पडलेलं होतं. तिच्या नजरेत आता एक प्रकारचा दुःखाचा डोंब दिसून आला. मगाचा चेहऱ्यावरचा कणखरपणा जाऊन तिथं आता एक स्त्रीचा नाजुकपणा आलेला होता. तिला तसं पाहताच सत्यवीरचा आवेश जरासा ओसरला.

एका आईच आईपण हिरावून नेल्यानंतर ती कोमल मनाची राहत नाही सत्यवीरपहिल्यांदाच नंदिनीने सत्यवीरचं नाव आपल्या तोंडून घेतलेलं होतं.

तिच्या नेत्रातून दोन अश्रूबिंदू तरळले. ती पुढे बोलू लागली. तुम्हाला हे समजलंच आहे कि माझ्या सासूबाईंचा खून मी केलाय. पण असं करायला मी कशी धजावले हे सुद्धा मला तुम्हाला सांगावं लागेल. कदाचित त्यानंतरच तुम्ही समजू शकाल कि इतकी दगड मनाची मी का झाले.”

क्षणभर डोळ्यातले तरळणारे अश्रू नंदिनीने पदराने पुसले आणी बोलू लागली -

मी एक अनाथ मुलगी होते. लग्नानंतर या घरात आल्यापासून मला माझ्या नवऱ्याने आणि माझ्या सासऱ्यांनी आबांनी कधीच अनाथ असल्याची जाणीव होऊ दिली नाही. नेहमीच माझ्याशी प्रेमाने वागत आले. आशुतोषसुद्धा वहिनी वहिनी करत माझ्याशी मैत्रीपूर्ण बोलायचे. आपलं घर काय असत याची जाणीव मला या लोकांनी करून दिली. पण सासूबाई अगदी त्या उलट होत्या. मला सारखं टोचून बोलायच्या. मला सुद्धा माहित नसलेल्या माझ्या आईबाबांचा उद्धार करायच्या. पण मी कधी तक्रार केली नाही ना कोणाजवळ काही बोलले. माझ्या इतर प्रेमळ माणसांमध्ये मी असले कि या सगळ्या गोष्टी मी विसरून जायचे.

असेच दिवस पुढे जात होते काही दिवसांनी मला समजले कि मला दिवस गेले आहेत. मी खूप आनंदी झाले आणि हि गोड बातमी मी फक्त अविनाश यांना सांगितली. त्यांचा सुद्धा आनंद गगनात मावेना. पण हि बातमी काही दिवसांनी वाड्यातील सगळ्यांना सांगावी असं आमचं ठरलं. एके दिवशी माझ्या सासूबाईनी मला खूप काम सांगितली. त्यांचे कपडे धुवायचे होते आणि काही कपड्यांना इस्त्री करून द्यायची होती कारण त्यांना बाहेर जायचे होते. मला दिवसभर कामं करून थकायला झालं होतं. म्हणून मी व्हरंड्यातल्या जिन्याच्या पायरीवर बसले होते. तेवढ्यात सासूबाई आल्या आणि मला बसलेलं पाहून खूप शिव्या देऊ लागल्या. काम करायची सोडून बसते काय नुसती म्हणत त्यांनी आरडाओरडा केला. लगेचच कपड्यांना इस्त्री कर म्हणून मागे लागल्या. मी त्यांना सांगितलं कि मी थकलेय जरा बसते मग नंतर करून देते. मी काहीतरी उगाच कारण सांगून काम टाळायला बघतेय असं त्यांना वाटलं. म्हणून त्यांना जास्तच राग आला. माझं काहीही न ऐकता मला दंडाला धरून त्यांनी तिथून उठवलं आणि मला मारू लागल्या. आता मात्र माझा नाईलाज झाला मी त्यांनी सांगितलं कि आई मला दिवस गेले आहेत. मी थोडं आराम करून नंतर कपड्यांना इस्त्री करते. पण मी काहीतरी खोटं बोलतेय असं वाटून त्यांनी मला रागाने लांब ढकलून दिलं त्यांचा जोर इतका होता कि व्हरंड्यातल्या बाजूच्या खांबावर जाऊन मी आदळले आणि माझ्या पोटाला मार लागला. मला असह्य कळ जाणवली आणि आई ग.. म्हणून मी कळवळले. तरीही माझ्या या अवस्थेकडे दुर्लक्ष करून त्या निघून गेल्या. मला जमिनीवरून उठवल देखील नाही. बराच वेळ मी तशीच कण्हत पडून होते थोड्या वेळाने कमलाबाई आल्या त्यांनी पटकन मला तिथून उचलून नेलं. त्यांना वाटलं मला चक्कर आली होती. मी सुद्धा त्यांना घडलेला प्रकार सांगितला नाही.

रात्री अविनाशना मी घडलेला प्रकार सांगितलं. माझ्या पोटात कळ येतेय हे समजताच लागलीच त्यांनी मला एका हॉस्पीटलला नेलं. तिथे गेल्यावर समजल कि माझ्या पोटाला मार बसल्याने आतमध्ये बाळाला धक्का बसलेला आहे आणि बाळ त्यातच दगावल. हे ऐकून आमच्या तर पायाखालची जमीनच सरकली. डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करायला सांगितली. त्यामुळे माझ्यासुद्धा जीवाला धोका होता तो टळला. पण आमचं बाळ दगावल्याने आम्ही खूप दुखीः झालो. यांनी माझी समजूत घातली कि आपण बाळासाठी परत प्रयत्न करू. पण नंतर प्रयत्न करून देखील मला दिवस राहिना म्हणून परत हॉस्पीटला जाऊन चेकउप करून पाहिलं तर त्यात कळल कि पहिला गर्भपात झाल्याने गर्भाच्या पिशवीला इजा झालीय आणि मला परत आई होता येणार नाही.

एवढ बोलून नंदिनी ओक्साबोक्स्शी रडू लागली. नंदिनीवर ओढवलेल्या या दुर्दैवी प्रसंगाचं सत्यवीरला सुद्धा खूप वाईट वाटलं. तो फक्त मान खाली घालू उभा राहिला. हे भयंकर दुखः झेलणाऱ्या नंदिनीच सांत्वन कसं करावं हे देखील त्याला समजेना आणि अशा प्रसंगी कोणते सांत्वनपर शब्द वापरावेत हे देखील त्याला समजले नाही. त्यामुळे सत्यवीर तसाच दुःखी मानाने उभा होता. थोड्या वेळाने नंदिनीने स्वतःला सावरलं आणि ती पुढे सांगू लागली.

आमच्या दोघांवर दुःखाचा डोंगर कोसळल्यासारखे झाले होते. अविनाश खूप गप्प गप्प राहायचे. रात्रभर मी उशीत तोंड खुपसून रडत दिवस काढले. पण एके दिवशी ठरवलं कि बस्स आता यापुढे सहन करायचं नाही. मी स्वतःवर येणारी कोणतीही वेळ निभावून नेली असती पण माझ्या बाळाला या जगात येऊन श्वास घेण्याआधीच या जगाचा निरोप घ्यायला लावणाऱ्या माझ्या क्रूर सासूचा जीव घ्यायचा. मी हे ठरवलेले कोणालाच सांगितलं नाही आणि कशाप्रकारे सासूबाईना मारता येईल त्याचा विचार करू लागले. दरम्यान आबा फिरायला म्हणून डोंगरदऱ्या आणि धबधबे पाहायला गेले होते. तिथून ते मला पत्र पाठवायचे कि ती ठिकाणं कशी आहेत. तुला आणि अविनाशला मी इथे एकदा तरी फिरायला आणणार अशा अर्थाची पत्र असायची. त्यांनी मला पत्रातून तिथे त्यांना भेटलेल्या कुटीरोवा जमातीबाद्द्द्ल आणि त्यांच्या शिकार करण्याच्या पद्धतीबद्दल सांगितलं होतं. कुटीरोवा शस्त्राबद्दलची माहिती घरात फक्त मला आणी आबांनाच होती

दुर्दैवाने तिथून येताना आबांना अपघात झाला आणि त्यांना हॉस्पिटलला नेलं. त्याचं समान मात्रं घरी आणल होतं. तेव्हा त्याचं सामान त्यांच्या खोलीत लावत असताना मला एक लोखंडी पेटी सापडली. त्या पेटीत मला त्या ओल्डोमा वनस्पतीच्या काही बिया दिसल्या. तेव्हा माझ्या मनात एक कल्पना आली. अनायसे अविनाश यांची नर्सरी होतीच तेव्हा या बिया तिथे पेरुयात असं मी ठरवलं. एका मोक्याच्या क्षणी मी त्या वनस्पतीपासून कुटीरोवांच हत्यार बनवणार होते. नर्सरीत काम करणाऱ्या कामगाराला मी या रोपाला हात न लावण्याविषयी सुचवलं होतं. एक छोटं कुंपण त्या रोपाच्या बाजूला बनवलं आणि त्या वनस्पतीची काळजी घेऊ लागले. माझी मेहनत फळाला आली आणि ते रोप उगवून आलं. त्याची एक छोटी फांदी काळजीपूर्वक तोडून त्यापासून पोकळ नळी आणि सुया बनवल्या. मी दर आठवड्याला तिथे जाऊन पाने तोडून त्याचा रस बनवून ठेवायचे आणि तिथल्या बांबूवर एक कागद लावून लांबूनच नळी तोंडाजवळ धरून नळीच्या तोंडाशी फुंकून सुया बरोबर त्या कागदावर मारायचा सराव करायचे. कारण मला हे शस्त्र वापरण्याची संधी जेव्हा कधी मिळेल तेव्हा लगेचच ते चालवावं लागणार होतं. सुदैवाने पानांचा रस जास्तकाळ टिकून राहत असे. सासूबाई कधीकधी संध्याकाळी अंघोळ करून बाहेर जातात हे मला माहित असायचं. त्याचं वेळी सासूबाईंचा काटा काढायचं ठरवलं. अपेक्षितपणे कमला आणि मी स्वयंपाक घरात असताना मला त्यांनी काही कपडे धुवायला दिले आणि आताच्या आत्ता धुवा असं सांगून त्या अंघोळीला निघून गेल्या. मी या संधीचा फायदा घ्यायचं ठरवलं.

माझ्या डोक्यात योजना तयार होती. कमलाबाई त्या दिवशी माझ्यासोबत कपडे धुवू लागल्या त्याचा खरंतर फायदा झाला कारण त्या सोबत असल्यावर माझ्यावर संशय येणार न्हवता. कमलाबाईंच्या नकळत स्वयंपाकघरातून चाकू घेतला आणि एका कपड्यात बांधून धुण्याच्या बादलीतल्या कपड्यात तो टाकला. कमलाबाई पुढे गेल्या तेव्हा ओट्याच्या खाली कोपऱ्यात ठेवलेली ओल्डोमाच्या रसांची डबी बादलीत वर ठेवली. नळी आणि सुया साडीला कमरेच्या काच्यात गाठ मारून ठेवल्या. पटकन मागे विहीरिवर गेले. कमलाबाईंना दुसऱ्या बादलीतील कपडे धुवायला दिले.

माझ्या जवळची बादली मी बाजूला ठेवली. सासूबाईंची अंघोळ करायला किती वेळ घेतात हे माहित असल्याने तेवढा वेळ जाऊ दिला. रहाटाने पाणी काढून थोडे कपडे धुतले. नंतर कपड्यात गुंडाळलेला चाकू गुपचूप हातात घेतला. कमलाबाई गप्पा मारत कपडे धूत होत्या. मी रहाटाचा दोर घेऊन कळशी घट्ट करण्याच्या बहाण्याने चाकूने निम्म्याहून अधिक उसवला मग कळशी लावली आणि विहिरीत कळशी सोडली. कळशी भरून वर खेचताना काही झटके दिले त्यामुळे उसवलेला दोर तुटला आणि भरलेली कळशी खाली निसटून विहिरीच्या तळाशी गेली. कमलाबाई दुसरी कळशी आणायला वाड्याच्या अडगळीच्या खोलीत गेल्या. जिथे एका कोपऱ्यात मी जादाच्या कळश्या ठेवलेल्या होत्या पण त्या बादल्या आणि इतर भांड्यांच्या आड होत्या. जेणेकरून कमलाबाईंना कळशी सापडायला वेळ लागणार होता. कमलाबाई कळशी आणायला गेल्यावर मी त्वरेने कमरेला लावलेल्या ओल्डोमा वनस्पतीच्या सुया बाहेर काढल्या आणि बादलीतल्या डबीच झाकण काढून त्याची टोकं बुडवली.

नळीमध्ये सुया घालून पळतच वाड्याच्या मागच्या दारातून वाड्यात आले. वाड्यात कोणीही आलेलं न्हवत. सासूबाईंची अंघोळ झालेली होती आणि त्यांना त्यांच्या खोलीत जाताना मी पाहिलं. माझं नशीब बलवत्तर होतं. कमलाबाईंना दुसरी कळशी अजून सापडलेली न्हवती कारण वरच्या मजल्यावरून भांड्यांचा आवाज येत होता त्यावरून समजत होते कि त्या अजून कळशी शोधत होत्या. मी आजूबाजूला कोणी नाही हे पाहून पटकन सासूबाईंच्या खोलीबाहेर आले. सासूबाई समोर आरशात पाहून केस विंचरत होत्या त्यामुळे त्यांना समजलं नाही कि मी मागे आहे. त्यांनी त्यांचे एका बाजूचे केस बाजूला केले होते. मी क्षणाचाही विलंब न लावता हातातल्या नळीला तोंडाजवळ नेले आणि नळी जोरात फुंकली त्यासरशी वेगाने आतील सुया बाहेर पडल्या आणि बरोबर सासूबाईंच्या कानाच्या खाली घुसल्या. त्या घुसताक्षणी सासूबाई तोंडातून हलकासा अस्फुट आवाज करत जमिनीवर कोसळल्या. त्यांचं शरीर पूर्ण आखडल होतं आणि त्यांना कसलीही हालचाल करता येत न्हवती. मी पुढे जाऊन त्यांच्या मानेमागच्या घुसलेल्या सुया पटकन बाहेर काढल्या. पण त्या नादात त्या ओढल्या गेल्या आणि थोडंसं रक्त बाहेर आलं पण मला जास्त विचार करायला वेळ न्हवता. कमलाबाई कधीही खाली आल्या असत्या. मी त्या सुया काढल्या आणि पटकन पळत मागच्या दरवाजाने विहिरीजवळ आले. बादलीतल्या ओल्या कपड्यात नळी आणी सुया एका कापडात बांधून ठेवून दिल्या आणि कपडे धुवायचं नाटक करत कमलाबाईंची वाट पाहत बसले.

थोड्या वेळाने मला कमलाबाईंचा आरडाओरड ऐकू आला. मला समजलं कि कमलाबाईंना सासूबाई त्यांच्या खोलीत आडव्या पडलेल्या दिसल्या असणार. मी पळत आतमध्ये गेले आणि मग पुढे काय झालं हे तुम्हाला माहित आहेच

एवढ बोलून नंदिनी मान खाली घालून शांत बसली. खिडकीबाहेर बाहेर आता अंधार पडू लागलेला दिसत होता. सत्यवीर शांतपणे हातावर हनुवटीवर टेकून उभा होता.

खरंतर मला सुरुवातीला डॉक्टर पाटलांवर संशय होता. पण नंतर त्यांच्या घरी आबा गुपचूप येजा करतात. हे समजल्यावर आबांवर संशय बळावला. पण मालतीताई कोसळल्या तेव्हा आबा घरात न्हव्तेच आणि त्यांच्याकडे ओल्डोमाच्या बिया सुद्धा सापडल्या नाहीत म्हटल्यावर मला माझी तपासाची दिशा बदलावी लागली. बिया गायब झाल्या म्हणजे नक्की कोणाला तरी त्या पेरून त्याचं रोप बनवायचं असणार हे मला समजलं होतंच. त्यामुळे साहजिकच अविनाशवर संशय आला. कारण रोपे लावायला नर्सरीपेक्षा सुरक्षित जागा दुसरी असणार न्हवती. आबांना हॉस्पिटलला घेऊन जाऊन तिथून गुपचूप माघारी येऊन त्यानेच मालतीबाईंचा काटा काढला असणार असं वाटत होतं. नर्सरीला भेट दिल्यावर नक्की रोप सापडणार असं वाटून मी तिथे गेलो पण तू आधीच रोपाची विल्हेवाट लावलेली होतीस.

खिडकीबाहेर पाहणाऱ्या नंदिनीकडे पाहत सत्यवीर म्हणाला आणी पुढे बोलु लागला

शेडमधे आधाराला उभ्या केलेल्या बांबूवरची बारीक होल पाहून समजलंच कि येथे कोणीतरी येऊन सुया मारून लक्षभेद करण्याचा सराव केलेला दिसतोय. अविनाश सोडून नर्सरीत राजरोसपणे कोणी येउजाऊ शकत असेल असं वाटलं.

पण नर्सरीतल्या कामगाराने तू तिथे जात असायचीस हे सांगितलं. नंतर देशमुखांनी सांगितलं कि अविनाशने गुन्हा कबुल केलाय तेव्हा खून त्याने केलाय हे खरं वाटलं नाही कारण नक्कीच तो कोणाला तरी वाचवत असणार हे स्पष्ट होतं. विचार करता करता माझ्या लक्षात आलं कि तो नक्की कोणाला वाचवतोय.

मालतीताई वाड्यात कोसळल्या. तेव्हा दोनच व्यक्ती वाड्यात होत्या एक कमलाबाई आणी तू. नर्सरीमध्ये रोप तूच लावलेलं असणार हे मला पक्क समजल. मग मी आबांचा रहस्यभेद केल्यावर तुला वाटलंच असेल कि आज न उद्या मी कुटीरोवांच्या शस्त्रापर्यंत पोहोचणार म्हणून मी तिथे पोहोचायच्या आधीच तू ते रोप नष्ट केलंस.

यावर नंदिनी थोडावेळ शांत बसली. मागे वळून तिने गॅस बंद केला आणि परत सत्यवीरकडे वळत ती म्हणाली

मला माहित होतं ज्यावेळी तुम्हाला कुटीरोवांच्या शस्त्राबद्दल माहित होणार त्याचं वेळी तुम्ही त्याच्या मागावर जाणार. आबांच्या खोलीत येऊन ज्यावेळी तुम्ही त्यांचं बिंग बाहेर काढलं त्याचवेळी मला समजलं कि तुम्हाला कुटीरोवांच्या शस्त्राबद्दल समजलंय. त्या रात्री मी अविनाश यांना आमच्या झोपायच्या खोलीत सगळ्या गोष्टी सांगितल्या. मीच सासूबाईना मारलंय यावर त्यांचा विश्वास बसला नाही. तसं करण्यामागच कारण काय होतं हे देखील त्यांना सांगितलं. ते सांगताना मला अश्रू अनावर झाले. पण त्यांनी मला समजून घेतलं. त्यांना सुद्धा वाईट वाटलं. तुमची इच्छा असल्यास मी पोलिसांच्या स्वाधीन होते असं मी म्हणाले पण त्यांनी नकार दिला ते म्हणाले कि असं काही करू नकोस देसाईंच्या सुनेबाबत लोकांनी भलत्यासलत्या गोष्टी बाहेर केलेल्या योग्य होणार नाही. त्याउलट ते म्हणाले कि तुझा ऐवजी मी गुन्हा केलाय असं सांगतो. मी सुरुवातीला ओढेवेढे घेतले पण नंतर आमचं ठरलं कि आधी गुन्हा कबूल करायचा पण कोर्टात गेल्यावर तो नाकारायचा. अशाने कोर्टात केस टिकणार नाही. पण मग कुटीरोवांच शस्त्रसुद्धा नष्ट करावं लागणार होतं. कधीतरी तुम्ही नर्सरीवर ओल्डोमा वनस्पतीच्या शोधार्थ येणार हे समजून म्हणून मीच नर्सरीवर जाऊन ते रोप उकरून काढलं आणी नष्ट केलं.

एवढ बोलून नंदिनी शांत बसली. तिला जेवढं बोलायचं होतं तेवढं बोलून झालं होतं. सत्यवीरने खाली मान घालून उसासा टाकला. बाहेर चांगलाच अंधार पडलेला होता. रातकिड्यांचा आवाज वाड्याच्या बाहेरून येत होता. काहीही न बोलता सत्यवीर स्वयंपाकघरातून बाहेर पडला.

वाड्याबाहेर येऊन हताश होत त्याने दुचाकी चालू केली आणि घराकडे निघाला. त्याला खुनी सापडला होता पण तो गुन्हा सिध्द करू शकत न्हवता कारण खुनाच हत्यार नष्ट झालेलं होतं आणि खुनाचा हेतू सुद्धा गुप्त राहणार होता. सगळ्या गोष्टी समजून पण सत्यवीर हतबल होता. खरंतर असं त्याच्या गुप्तहेरीच्या कार्यकाळात प्रथमच घडत होतं. खरंतर मालतीताई यांना असं मरण येणं अपेक्षितच होतं असं सत्यवीरला वाटून गेलं.

आपल्या घरातल्या सुनेला त्यांनी अत्यंत वाईट प्रकारची वागणूक दिलेली होती. नंदिनी हि कोणी गुन्हेगारी प्रवृत्तीची व्यक्ती न्हवती. एका आईने आपल्या बाळाच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यूचा बदला घेतलेला होता. त्यामुळे तिला गुन्हेगार म्हणून साबित करण्याची खटपट सुद्धा सत्यवीरला करू वाटली नाही.

यातच काही दिवस निघून गेले. इन्स्पेक्टर देशमुखांनी अविनाशच्या जबानीनुसार त्याच्यावर खटला भरला होता. प्रकरण कोर्टात गेलं. अविनाशने कोर्टात आपला शब्द फिरवून गुन्हा केल्याचं नाकबूल केलं अर्थात हे सगळं त्याने आणि नंदिनीने आधीच ठरवलं होतं. सन्माननीय कोर्टाने देखील पुराव्याअभावी अविनाशला निर्दोष ठरवलं. देशमुखांचा तिळपापड झाला. खून अविनाशनेच केलाय असं त्यांना अजूनही वाटतंय. सत्यवीरने देशमुखांना खरा खुनी कोण आहे याबाबत काहीहि सांगितलं नाही आणि सांगून पण काय करणार कारण त्याच्याकडे पुरावेच न्हवते. होते ते फक्त तर्क. तसंही सत्यवीरला नंदिनीने केलेल्या कृत्याबाबत काहीही गैर वाटत न्हवते. वाटत होती ती फक्त एक सहानुभूती. भविष्यात कधीतरी योग्य वेळ आली कि देशमुखांना या प्रकरणाचा खरा खुनी कोण होता हे सांगायचं सत्यवीरने ठरवलं होतं.

संध्याकाळ होत आलेली होती सत्यवीर आपल्याच खोलीत खुर्चीत स्वस्थपणे बसून होता. हातची बोट एकमेकांत गुंफवून आत्तापर्यंत घडलेला सगळ्या घटनांचा क्रम मनाशी घोळवत शांत बसला होता.

तेवढ्यात दारामधून घराच्या समोर काम करणारा पोरगा आतमध्ये आला.

दादा हे पार्सल आलंय तुझा नावानेहातामध्ये खाकी पार्सल नाचवत तो पोरगा सत्यवीरजवळ आला.

मला पार्सल कोणी पाठवलं असेल? हा विचार करतच सत्यवीरने ते पार्सल त्या पोराकडून घेतलं आणि खुर्चीतून उठून बाजूच्या खिडकीजवळ गेला. पार्सल जास्त जड न्हवते. समोर काम करणारा पोरगा तिथेच उभा राहून सत्यवीरकडे आशाळभूतपणे पाहत होता. सत्यवीरने काळजीपूर्वक पार्सलचे सील काढले. आतमध्ये पैशाच्या काही नोटा होत्या आणि एक चिठ्ठी. सत्यवीरने नोटा आतमध्ये तशाच ठेवल्या आणि फक्त चिठ्ठी बाहेर काढून तो वाचू लागला –

मला लिहायला जास्त जमत नाही. पण तरीही प्रयत्न करावा असं वाटलं. तुम्ही खूप कष्टाने आणि प्रामाणिकपणे तपासकाम केलंत. तुम्ही आमची दुखः आणि आमच्यावर आलेली कठीण वेळ समजून घेतली. त्यामुळे आम्ही जे काही केलं ते तुम्हाला समजून पण त्यावर पुढे कोणताही हस्तक्षेप तुमच्याकडून झाला नाही त्याबद्दल तुमचे खरंच आभार. तुमच्या कामामुळे खरंतर आमच्या घराला परत घरपण मिळालं. घरातले सगळे मिळून मिसळून राहू लागलोय. कोणालाच कोणता त्रास नाहीये आणि याचं सगळं श्रेय तुम्हालाच जाते. पण एक खंत वाटत होती ती म्हणजे तुम्हाला मात्र यातून काहीही मिळालं नाही. तुम्ही उदरनिर्वाहासाठी हे काम करता मात्र आमच्या प्रकरणात तुम्हाला काही लाभलं नाही. तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांची आणि कष्टाची परतफेड म्हणून छोटीशी भेट स्वीकाराल हि अपेक्षा आहे म्हणूनच हे पार्सल पत्रासोबत पाठवण्याचा खटाटोप करत आहे. पत्राच्या शेवटी माझं नाव लिहित नाही पण तुम्हाला समजलं असेलच कारण तुमच्या नजरेतून गोष्टी सहजासहजी सुटत नाहीत.

परत एकदा तुमचे आभार

पत्रातील मजकूर पूर्ण वाचून सत्यवीर शांतपणे खिडकीबाहेर पाहू लागला. पत्र नंदिनीने लिहिलंय हे समजायला त्याला वेळ लागला नाही. पत्रातील मायना लिहिताना सुद्धा तो पुरावा म्हणून वापरता येऊ नये याची काळजी घेऊन तिने लिहिलेला होता. या गोष्टीचं सत्यवीरला खरंच कौतुक वाटलं.

खिडकीबाहेर अस्ताला जाणाऱ्या सूर्याकडे पाहत सत्यवीर उभा होता. पत्र वाचून त्याने हात कमरेच्या मागे बांधले आणि त्या नादात सत्यवीरच्या हातातून पार्सल निसटून खाली जमिनीवर पडलं तसं आतल्या नोटा पार्सलच्या बाहेर आल्या. बाजूलाच उभ्या असलेल्या पोराने त्या नोटा पहिल्या आणि तो पोरगा आनंदाने नाचू लागला.

हुर्रे..दादाकडे पैसे आले. आता दादा नवीन बुध्दीबळ घेऊन मला शिकवणार.. हुर्रे... दादा आता चहाच्या उधारीचे पैसे चहावाल्याच्या तोंडावर फेकून मारणार...हुर्रेअसं म्हणत मोठमोठ्याने गाण म्हणत तो पोरगा उड्या मारत नाचू लागला.

पण सत्यवीरच मात्र त्याच्याकडे लक्षच न्हवत. समोर अस्ताला जाणाऱ्या सूर्याकडे आणि त्या सूर्यकिरणांच्या लालसर पिवळ्या रंगानी फुललेल्या आभाळाकडे पाहत पाणावलेल्या नेत्रांनी पण तरीही हलकस स्मित करत तो खिडकीबाहेर बघत तसाच उभा होता...

समाप्त....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Fell free to share your Feedbacks

चाहूल

  दरवाजाच्या फ़टीतून डोळे लावून ती बाहेर पाहत होती. अंधार पडायला सुरुवात झालेली होती. जसजसा अंधार वाढत होता . तशी तिच्या जीवाची घालमेल देखील...