१२ मे, २०२४

गुप्तहेर रॉबिन आणी कुटीरोवांचं शस्त्र भाग - शेवटच्या सुया

 

शेवटच्या सुया

आपल्या घराच्या बाहेर कट्ट्यावर रॉबिन आरामात सिगरेट पीत विचार करत बसला होता. आबांच्या नाटकाचे बिंग बाहेर काढल्यानंतर खरंतर त्याला समाधान वाटायला हवे होते. कारण त्याने खुनात वापरलेल्या हत्याराचा शोध लावलेला होता आणि या प्रकरणात प्रगती केली होती. पण त्याला म्हणावं तसं समाधान लाभलेलं न्हवत. आबांनी त्यांचा नाटकी खेळ हा फक्त मालतीताईंचे खरं स्वरूप बघणे यासाठी चालवलेला होता. अर्थात मालतीताईंचे लोकांसोबतचे चुकीचे वागणे आणि बाहेरील बेकायदेशीर प्रकरणं वाढली असती तर आबांनी मालतीताईंचा जीव घ्यायला सुद्धा मागेपुढे पहिले नसते. तसं आबांनी स्वतः बोलून दाखवलं होतं. पण आबांनी काही करायच्या आतच दुसऱ्या कोणीतरी मालतीताईंचा काटा काढलेला होता. कुटीरोवांच्या हत्यारानेच मालतीबाईचा बळी गेला असल्याची रॉबिनला पक्की खात्री होती. आबांच्या खोलीत मिळालेल्या आबांच्या मित्राच्या पुस्तकात त्याला त्या शस्त्राविषयी माहिती मिळाली होती. ओल्डोमा वनस्पतीच्या खोडापासून एक वितभर लांब पोकळ नळी बनवली जाते. ज्यामध्ये इंच-दोन इंचाच्या टोकदार सुया ज्या ओल्डोमा वनस्पतीपासूनच बनवल्या जात. त्या सुयांच्या अग्रभागी ओल्डोमाच्या जहरी पानांपासून काढलेला घट्ट रस लावून ती सुई अलगदपणे लांब नळीत ठेवायची आणि नळी एका उघड्या बाजूने तोंडात धरून जोरात फुंकायची. वाऱ्याच्या वेगाने सुई निश्चित लक्ष्यामधे घुसून काही मिनिटातच काम तमाम करायची. हत्यार तर समजल होतं पण दुर्दैवाने सापडलेलं न्हवत. त्यामुळे रॉबिन काहीसा चिंताक्रांत होता. तरीहि एक प्रश्न त्याला भेडसावत होताच तो असा कि त्या हत्याराचा वापर कोणी केला असेल आणि का?.

सिगरेटच्या धुराची वलय हवेत सोडतच रॉबिनने सुस्कारा सोडला.

सिगरेट संपवून रॉबिन आपल्या खोलीत आला. खुर्चीवर बसून त्याने आपले दोन्ही पाय टेबलावर ठेवले आणि विचारात गढून गेला तेवढ्यात टेबलावरचा फोन खणाणला...

विचारांच्या तंद्रीतच रॉबिनने फोन उचलला.

हॅलो रॉबिन..” समोरून इन्स्पेक्टर देशमुख यांचा आवाज आला.

हॅलो.. देशमुख बोला” आपल्या विचारांची तंद्री भंग न करताच रॉबिन बोलला.

रॉबिन माझं ऐक मी आबांना आणि पाटील डॉक्टरांना चांगलं रिमांडमधे घेऊन चौकशी करतो. नक्कीच ते काहीतरी लपवत आहेतदेशमुख घाईघाईत म्हणाले.

देशमुखांना अजूनही आबांवर आणि पाटील डॉक्टरांवर संशय होता. पण रॉबिनने याही वेळी देशमुखांना दाद दिली नाही.

आपल्याला काहीतरी मिळाले आहे हे वरिष्ठांना सांगण्यासाठी का तुम्हाला त्या दोघांना रिमांड मध्ये घ्यायचं आहे.” रॉबिन देशमुखांची नस पकड शांतपणे म्हणाला.

हे बघ रॉबिन मला तर वाटतंय कि आपण एकदा त्यांची व्यवस्थित चौकशी करायलाच हवी नक्कीच काहीतरी मिळेलदेशमुख त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत आत्मविश्वासाने म्हणाले.

देशमुख, ते दोघेही गुन्हा करण्याइतपत सक्षम नाहीयेत. पाटील डॉक्टर म्हणजे शेळपट शेळी आहे. आबांचं म्हणालं तर ते मालतीताईंना मारण्याच्या तयारीत होते. पण त्यांची ती मनीषा पूर्ण झाली नाही आणि जरी त्यांची ती इच्छा पूर्ण झाली असती तरी त्यांनी स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केलं असतं. आबा तितके स्वाभिमानी आहेत असं मला तरी वाटतंरॉबिन खुर्चीत रेलत म्हणाला.

कदाचित त्या ओल्डोमा नावाच्या वनस्पतीच्या बिया कुठे आहेत हे त्यांना माहित असेल त्यामुळे जरा कडकपणे चौकशी केली तर त्या बिया कुठे आहेत याचा थांग आपल्याला त्यांच्याकडूनच नक्की मिळेल. डॉक्टर पाटलांना जरा फैलावर घेतल्यावर पोपटासारखे बोलतील बघ तेदेशमुख आग्रह करत बोलले.

अहो देशमुख त्या बिया काय आत्तापर्यंत तशाच असणार आहेत का? ज्याने त्या घेतल्या असतील त्याने त्यांचं रोप तयार....” एवढ बोलून रॉबिन बोलायचा थांबला... आणि फोन तसाच कानाला लावून विचारात गढला.

इकडे देशमुखांना वाटलं रॉबिनने फोन ठेवला कि काय..

“हॅलो.. हॅलो..” असं देशमुख एकसारखं म्हणू लागले.

ओह्ह शीट.. हे मला आधी का नाही सुचले....रॉबिन मनातच म्हणाला.

देशमुख मला एक अत्यंत महत्वाच काम आठवलय मी नंतर बोलतो” असं म्हणत देशमुख काय बोलतायत हे न ऐकताच रॉबिनने फोन ठेवून दिला आणि त्वरेने हालचाल करत पटकन आपल्या घराच्या खाली लावलेल्या दुचाकीपाशी आला. घाईघाईतच त्याने आपली दुचाकी चालू केली आणि शहराच्या बाहेर निघाला.

दुचाकी चालवत असतना तो एका गुढ विचारात असल्यासारखा दिसतं होता. काही वेळाने दुचाकी चालवल्यानंतर तो शहराबाहेर एका कच्च्या रस्त्यालगत असलेल्या नर्सरीजवळ आला. आजूबाजूला लोकांची शेती दिसत होती. जास्त कोणती वर्दळ किंवा दुकाने वगैरे न्हवती. फक्त काही अंतरावर एक छोटंसं टपरीवजा हॉटेल दिसतं होतं. समोरच नर्सरीच छोटसं गेट होतं. रॉबिनने गेटमधून प्रवेश केला.

आत येताक्षणी त्याला विविध प्रकारची रोपं आजूबाजूला दिसली. प्लास्टिकच्या पिशवीमध्ये माती टाकून गुलाब, मोगरा, प्राजक्त अशा प्रकारची फुलझाड होती. जरा पुढे गेल्यावर बाजूलाच विविध फळझाड असलेली रोपं लावलेली होती. कलमी रोपं आणि औषधी झाडांची रोपंसुद्धा व्यवस्थित ओळीत ठेवलेली दिसत होती. आतमधे येण्यासाठी आजूबाजूला असलेल्या रोपांच्या गर्दीतून रॉबिनला पुढे यावं लागलं. पुढे आल्यावर आतमध्ये रिकाम्या जागेत एक पस्तिशीचा एक माणूस खाली बसून माती वेगळी करण्याचं काम करत होता.

या नर्सरीचे मालक कोण आहेतरॉबिनने मुद्दाम नवख्या माणसासारखं त्या इसमाला विचारलं.

त्या माणसाने मागे वळून पाहिलं.

अविनाशसाहेब देसाई आहेत मालक.. तुम्ही कोण आहात?मातीतून हात बाहेर करत डोळे रोखून त्या इसमाने विचारलं.

मला त्यांना भेटायचं होतं. काही रोपं घ्यायची होती. कधी येतील ते?रॉबिनने इकडे तिकडे पाहत विचारलं.

येतील थोड्या वेळात...तुम्ही बसा तोवर” एवढ बोलून त्या माणसाने आपले हात परत मातीत घातले आणि काम करू लागला.

तुम्ही इथे काम करता का?” रॉबिनने विचारलं.

हो इथे कामाला आहे मी” मान वर न करता त्या इसमाने उत्तरं दिलं.

ठीक आहे मी तोवर नर्सरीमधे जरा फेरफटका मारतो” रॉबिनने असं म्हणाल्यावर त्या माणसाने फक्त मान डोलावली आणि आपल्या कामात गढून गेला.

रॉबिन मग तिथून पुढे आतमधे नर्सरीच्या मागच्या बाजूला जिथे एक छोटं शेड होतं तिथे गेला. नाही म्हटलं तरी नर्सरीची जागा मोठी होती तसच खूप वेगवेगळ्या प्रकारची रोपं तिथे उपलब्ध होती. शेडजवळ पोहोचल्यावर रॉबिनला दिसलं कि वर पारदर्शक प्लास्टिकचं छत केलेलं होतं त्यामुळे आतमध्ये उजेड येत होता. शेडमध्ये शेतीसाठी उपयुक्त झाडे ठेवलेली दिसत होती. बाजूलाच एक फावडे आणि छोटीशी कुदळ होती. शेडच्या कोपऱ्यात थोडीशी माती वर आलेली दिसत होती. जणु जमीन खणल्यासारखी दिसतं होती. रॉबिनने पुढे जाऊन पाहिलं तर कोणतं तरी झाडं उपटून टाकल्यासारखं वाटत होतं. इतर रोपाप्रमाणे ते प्लास्टिकमधे मातीत नसणार तर जमिनीमध्ये लावलेलं असणार असं दिसतं होतं. जमीन कुदळीच्या सहाय्याने खणुन काढल्यासारखी दिसतं होती. रॉबिन तिथे खाली झुकून पाहू लागला.

रोप मुळासकट उपटून टाकल्यामुळे तिथे इतर कोणताच मागमूस राहिलेला न्हवता. रॉबिन आजूबाजूला पाहू लागला. जमिनीवर इतर काही खुणा आहेत का ते त्याला पहायचं होतं. पण तसं काहीच आढळलं नाही. शेडच्या एक बाजूला छोटासा दरवाजा होता त्याच्यामागे मातीचा ढिग होता. रोपांसाठी मातीची व्यवस्था तिथून केली जायची. शेडच्या कोपऱ्याकोपऱ्यात बांबू उभे केले होते जेणेकरून शेडला आधार देता येईल. शेडची उंची जास्त उंच न्हवती. रॉबिनने हात वर केले असते तरी त्याचे हात शेडच्या छताला टेकले असते. रॉबिन कोपऱ्यांमध्ये उभ्या केलेल्या बांबूकडे गेला आणि त्या बांबूच निरीक्षण करू लागला. जिथे जमीन खणली गेली होती त्याच्या जवळच्या बांबूवर काहीतरी टोचल्याप्रमाणे बारीक बारीक होल दिसत होत्या. रॉबिनने जवळ जाऊन निरीक्षण केलं आणि हाताची घडी घालून विचार करू लागला. लांबून काहीतरी टोकदार वस्तू फेकून मारल्याच्या खुणा वाटत होत्या. रॉबिनने बारकाईने त्या खुणांना न्याहाळल तेव्हा त्याला त्या खुणा नजरेस पडल्या. तिथलं निरीक्षण करून रॉबिन लगेच अचानक तिथून बाहेर पडला आणि बाहेर काम करत बसलेल्या त्या इसमाजवळ आला.

साहेब आले नाहीत का अजून” रॉबिनने विचारलं.

नाही आले अजून....खरंतर एव्हाना यायला हवे होते.कपाळावर आठ्यांच जाळ आणत तो इसम बोलला.

इथे नर्सरीत तुमचे मालक एकटेच येतात का कि अजून कोणी येत असत त्यांच्यासोबत?रॉबिनने विचारलं. तसं विचित्र चेहरा करून त्या इसमाने रॉबिनकडे पाहिलं. त्याला मुळात प्रश्नच कळला नाही.

म्हणजे..अस म्हणत आपला चेहरा तिरकस ठेवत तो म्हणाला.

म्हणजे नर्सरी खूप मोठी आहे आणि छान ठेवलीय. कोणी मदतीला येतं का तुमच्या मालकांच्या कि तू एकटाच असतो इथेरॉबिन सहजपणे म्हणाला.

मीच असतो इथे देखभालीला. पण साहेबांच्या पत्नी म्हणजे छोट्या बाईसाहेब पण येतात इथे केव्हा केव्हाएवढ बोलून तो इसम आपलं काम करू लागला.

त्याला इसमाला अजून जास्त काहीही न विचारता रॉबिन तडक तिथून बाहेर पडला आणि बाहेर लावलेल्या आपल्या दुचाकीजवळ आला. आसपास कुठे फोनबुथ आहे का ते त्याला पहायचं होतं. पण इथे जवळपास हॉटेल किंवा फोन असल्याचं काहीच लक्षण दिसत न्हवत. रॉबिन दुचाकीवर बसला आणि समोर काही अंतरावर टपरीसारखं काहीतरी दिसतं होतं तिथे निघाला. त्या टपरीजवळ पोहोचताच त्याला दिसलं कि आतमधे छोटेखानी हॉटेल आहे जिथे नाश्ता, चहा अशा गोष्टी मिळतात. तिथे समोरचं गल्ल्यावर एक इसम बसलेला होता. त्याच्याकडे चौकशी केल्यावर रॉबिनला समजलं कि आतमधे फोन आहे. आतमधे गेल्यावर एका कोपऱ्यात ठेवलेला टेलिफोन त्याला दिसला आणि रॉबिन तिथे गेला.

रिसीवर हातात घेऊन त्याने नंबर फिरवून देशमुखांना फोन लावला. पहिल्या दोन रिंगमधेच देशमुखांनी फोन उचलला.

हा.. इन्स्पेक्टर देशमुख बोलतोयदेशमुखांचा भारदस्त आवाज आला.

देशमुख, मी रॉबिन बोलतोय.” फोनवर रॉबिन आहे कळताच त्याला पुढे काहीही बोलू न देता देशमुख म्हणाले

अरे रॉबिन कुठे होतास. किती वेळ झालं तुझ्या घरी फोन करत होतो. तू फोन उचलला नाहीस

देशमुख मी अविनाशच्या नर्सरीमध्ये छाननी करण्यासाठी आलोय” रॉबिन म्हणाला.

त्याची काही एक आवश्यकता नाहीये आता रॉबिन. आपल्याला गुन्हेगार मिळालायदेशमुख पुढे काही बोलणार इतक्यात रॉबिन आश्चर्याने म्हणाला “काय...कोण आहे गुन्हेगार

आत्ताच काही वेळापूर्वी अविनाश पोलीस स्टेशनमधे आला होता आणि त्याने कबुल केलंय कि खून त्यानेच केलाय म्हणूनदेशमुख म्हणाले.

काय.. असं म्हणाला तोरॉबिन जवळपास ओरडतच म्हणाला.

होय त्यानेच कबुलीजबाब दिलाय कि त्या संध्याकाळी त्यानेच गुपचूप हॉस्पिटलमधून येऊन मालतीताईंना बेसावध क्षणी गाठून संपवलं. घरी त्याला आणि त्याच्या बायकोला दिलेल्या त्रासाला कंटाळून त्याने हे पाउल उचललं होतं. त्यामुळे मला वाटतंय कि आता खुनी सापडलाय. तुला हेच सांगायला मी फोन करत होतो पण तू घरात न्हवतासदेशमुखांनी एका दमात सांगून टाकलं.

खून जर अविनाशने केलाय असं त्याचं म्हणण आहे तर मग कुटीरोवांच्या शस्त्राबद्दल त्याने काय सांगितलंरॉबिनने प्रश्न केला.

अ..ते त्याने नष्ट केलंय असं त्याचं म्हणण आहे. पण कोर्टात तो हे सगळं सांगणार आहेदेशमुखांनी माहिती पुरवली आणि तू सुद्धा ताबडतोब पोलीस स्टेशनला ये असं सांगून देशमुखांनी फोन ठेवला.

यावर काहीही न बोलता फोन ठेवून रॉबिन तेथून विचार करत बाहेर पडला. आपल्या दुचाकीजवळ येऊन तो थांबला. त्याला दोन मिनिट विश्वासच बसत न्हवता कि अविनाशने खुनाची कबुली दिलेली आहे आणि स्वतः पोलिसांच्या स्वाधीन झालाय.

रॉबिनने मनाशी काहीतरी ठरवलं आणि आपल्या दुचाकीवर बसला.

नर्सरीमध्ये शेडच्या आत जमीन खणल्याच्या खुणा आणि बांबूवरची टोकदार होल कशाची आहेत हे त्याला समजून चुकलं होतं. आपली दुचाकी चालवत तो शहराकडे निघाला. काही वेळानंतर त्याची गाडी देसाई वाड्याजवळ येऊन थांबली. संध्याकाळ होऊ लागलेली होती. अंधुकसा प्रकाश वाड्याभोवती पसरलेला होता.

वाड्याच दार उघडंच होतं त्यामुळे रॉबिनने आतमध्ये प्रवेश केला. अंगणात येऊन पाहिलं तर त्याला कोणीच दिसलं नाही. रॉबिनने मग आपला मोर्चा स्वयंपाक घराकडे वळवला. स्वयंपाकघरच्या दाराशी आल्यावर त्याला आतमध्ये नंदिनी काम करताना दिसली. ती पाठमोरी उभी होती. रॉबिनने यावेळी लक्ष विचलित न होऊ देता दरवाजावर टकटक करून आपल्या उपस्थितीची जाणीव करून दिली. नंदिनीने मागे वळून पाहिलं. रॉबिनला पाहून ती काहीच बोलली नाही तशीच मान खाली घालून उभी राहिली.

मला असं समजलंय कि अविनाशने गुन्हा कबुल केलाय आणि तो स्वतः पोलीसस्टेशन गेलायरॉबिन धारधार नजरेने नंदिनीकडे पाहत म्हणाला.

हो..” एवढचं बोलून नंदिनी खाली पाहत ओट्यावरच्या भांड्यांशी चाळा करू लागली.

मी नर्सरीवर जाऊन आलोय मगाशीएवढ बोलून रॉबिन नंदिनीच्या हालचालींच निरीक्षण करू लागला.

त्यावर काहीही न बोलता नंदिनी मागे वळली आणि ओट्यावरच्या भांड्यांची आवराआवर करू लागली. तिची अशी शांतता रॉबिनला रुचली नाही.

काही बोलणार नाहीस का यावर तू...रॉबिन नंदिनीचा एकेरी उल्लेख करत स्पष्टपणे नंदिनीला म्हणाला.

रॉबिनच्या या एकेरी उल्लेखावर कोणतीही प्रतिक्रिया न देता नंदिनीने आपलं काम चालूच ठेवलं. तिने शेगडीवर भांड ठेवून गॅस पेटवला. काही क्षण शांततेत गेले. नंतर त्या शांततेचा भंग करत नंदिनीच म्हणाली

तुम्ही एक दिवस माझ्यापर्यंत येणार याबाबत मला खात्री होती. पण एवढ्या लवकर याल असं वाटलं न्हवतएवढ बोलून नंदिनी मागे वळली. बाजूच्या लाकडी फळीवरील एक डबा बाहेर काढून ओट्यावर ठेवला

तुम्ही चहा घेणार ना?” अतिशय स्पष्ट आणि शांत शब्दात नंदिनी म्हणाली.

तिच्या या थंड आणि आत्मविश्वासु वागण्याने रॉबिन खरंतर अवाकच झालेला होता. पण तरीही तसं चेहऱ्यावर न दाखवता तो स्पष्टच म्हणाला.

नर्सरीमध्ये कुटीरोवांकडून मिळालेल्या त्या बियां तुचं पेरल्यास. नंतर त्याचं रोप उगवलं. तुझं काम पूर्ण झाल्यावर नंतर तूच ते रोपट उपटून टाकलेस.. मानलं तुला.

ते शस्त्र किंवा त्याबद्दलचा कोणताही मागमूस तुला ठेवायचा न्हवता. पण दुर्दैव तुझं या रॉबिनच्या नजरेतून गोष्टी सहजासहजी गोष्टी सुटत नाही याची तुला कल्पना नसावीरॉबिन घारीसारखी नजर रोखत नंदिनीला पाहत म्हणाला.

जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा वाड्यात आलेलं पाहिलं तेव्हाच तुम्ही खूप आत्मविश्वासू आहात हे कळलेलं होतं. तुमची चौकशी करण्याची पद्धत, वाड्याच्या आसपास तुम्ही केलेली निरीक्षणे, मुख्य म्हणजे आबांचं नाटक तुम्ही ज्या पद्धतीने बाहेर काढलंत तेव्हाच कळाले होते कि तुमच्या नजरेतून गोष्टी सहजासहजी सुटत नाहीत. खरंच तुमच्या हुशारीची दाद द्यावी वाटते. तुमच्यामुळे खरंतर आम्हाला आबा परत मिळाले असं म्हणायला हरकत नाहीनंदिनी शांतपणे पण खंबीर आवाजात म्हणाली

तुला एवढं समजलं असेल माझ्याबद्दल तर हे पण सांग कि तू मालतीताईंचा खून केलेला असताना अविनाशने स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन का केलंय. अर्थात पोलिसांना अविनाशला अटक करून काहीही मिळणार नाहीये हे मला माहितीये. कारण खुनाच शस्त्रच त्यांना मिळालेलं नाहीये. त्याच्या नुसत्या कोरड्या कबुलीजबाबावर खटला उभारू शकत नाही आणि राहिलाच तर तो टिकूच शकत नाहीहाताची घडी घालत नंदिनीकडे पाहत रॉबिन म्हणाला.

नंदिनीच्या चेहऱ्यावर या वाक्यांचा काहीही परिणाम झाला नाही जणू काही तिला माहित होतंच कि रॉबिन हेच बोलणार आहे.

म्हणूनच तर ते पोलिसांना स्वाधीन झालेत ना पुन्हा शांतपणे बोलत नंदिनीने फळीवरून काढलेल्या डब्याच झाकण उघडले. तिच्या हावभावातला शालीनपणा जाऊन आता एक कणखरपणा दिसू लागलेला होता. तिने मागे वळून गॅसवरच भांड खाली ठेवलं. फळीवरच्या उघडलेल्या डब्यातून काहीतरी बाहेर काढलं आणि रॉबिनला दाखवत म्हणाली

या शेवटच्या दोनच सुया राहिल्यात” असं म्हणत तिने त्या ओल्डोमा वनस्पतीच्या खोडापासून बनवलेल्या सुया शेगडीच्या धगधगत्या आगीवर धरल्या. रॉबिनला काही कळणार इतक्यात त्या जाळून खाक झाल्या होत्या.

तुम्ही आमच्या आबांना आमच्यात परत आमच्यात आणलत. त्याच्या बदल्यात कमीत कमीत तुम्ही त्या शस्त्राची हलकीशी झलक बघायचे हकदार नक्कीच आहात म्हणून तुमच्याचसाठी आत्तापर्यंत ठेवलेल्या होत्याएवढ बोलून नंदिनीने तो डबा बाजूला ठेवून दिला. कुटीरोवांच्या शस्त्राचे अस्तित्व सांगणारे पुरावे रॉबिनच्या देखत जाळून खाक झालेले होते.

किती विचित्र खेळ खेळतेयस ना तू...आपल्या सासूला त्याच शस्त्रांनी जिवनिशी मारून तुला जराही खंत वाटत नाहीये. नक्कीच दगड मनाची आहेस तूरॉबिन आवेशात म्हणाला.

तसं नंदिनीने स्वयंपाकघराच्या खिडकीबाहेर पाहिलं. संध्याकाळच कोवळ उन खिडकीतून तिच्या अंगावर पडलेलं होतं. तिच्या नजरेत आता एक प्रकारचा दुःखाचा डोंब दिसून आला. मगाचा चेहऱ्यावरचा कणखरपणा जाऊन तिथं आता एक स्त्रीचा नाजुकपणा आलेला होता. तिला तसं पाहताच रॉबिनचा आवेश जरासा ओसरला.

एका आईच आईपण हिरावून नेल्यानंतर ती कोमल मनाची राहत नाही रॉबिनपहिल्यांदाच नंदिनीने रॉबिनचं नाव आपल्या तोंडून घेतलेलं होतं.

तिच्या नेत्रातून दोन अश्रूबिंदू तरळले. ती पुढे बोलू लागली. तुम्हाला हे समजलंच आहे कि माझ्या सासूबाईंचा खून मी केलाय. पण असं करायला मी कशी धजावले हे सुद्धा मला तुम्हाला सांगावं लागेल. कदाचित त्यानंतरच तुम्ही समजू शकाल कि इतकी दगड मनाची मी का झाले.”

क्षणभर डोळ्यातले तरळणारे अश्रू नंदिनीने पदराने पुसले आणी बोलू लागली -

मी एक अनाथ मुलगी होते. लग्नानंतर या घरात आल्यापासून मला माझ्या नवऱ्याने आणि माझ्या सासऱ्यांनी आबांनी कधीच अनाथ असल्याची जाणीव होऊ दिली नाही. नेहमीच माझ्याशी प्रेमाने वागत आले. आशुतोषसुद्धा वहिनी वहिनी करत माझ्याशी मैत्रीपूर्ण बोलायचे. आपलं घर काय असत याची जाणीव मला या लोकांनी करून दिली. पण सासूबाई अगदी त्या उलट होत्या. मला सारखं टोचून बोलायच्या. मला सुद्धा माहित नसलेल्या माझ्या आईबाबांचा उद्धार करायच्या. पण मी कधी तक्रार केली नाही ना कोणाजवळ काही बोलले. माझ्या इतर प्रेमळ माणसांमध्ये मी असले कि या सगळ्या गोष्टी मी विसरून जायचे.

असेच दिवस पुढे जात होते काही दिवसांनी मला समजले कि मला दिवस गेले आहेत. मी खूप आनंदी झाले आणि हि गोड बातमी मी फक्त अविनाश यांना सांगितली. त्यांचा सुद्धा आनंद गगनात मावेना. पण हि बातमी काही दिवसांनी वाड्यातील सगळ्यांना सांगावी असं आमचं ठरलं. एके दिवशी माझ्या सासूबाईनी मला खूप काम सांगितली. त्यांचे कपडे धुवायचे होते आणि काही कपड्यांना इस्त्री करून द्यायची होती कारण त्यांना बाहेर जायचे होते. मला दिवसभर कामं करून थकायला झालं होतं. म्हणून मी व्हरंड्यातल्या जिन्याच्या पायरीवर बसले होते. तेवढ्यात सासूबाई आल्या आणि मला बसलेलं पाहून खूप शिव्या देऊ लागल्या. काम करायची सोडून बसते काय नुसती म्हणत त्यांनी आरडाओरडा केला. लगेचच कपड्यांना इस्त्री कर म्हणून मागे लागल्या. मी त्यांना सांगितलं कि मी थकलेय जरा बसते मग नंतर करून देते. मी काहीतरी उगाच कारण सांगून काम टाळायला बघतेय असं त्यांना वाटलं. म्हणून त्यांना जास्तच राग आला. माझं काहीही न ऐकता मला दंडाला धरून त्यांनी तिथून उठवलं आणि मला मारू लागल्या. आता मात्र माझा नाईलाज झाला मी त्यांनी सांगितलं कि आई मला दिवस गेले आहेत. मी थोडं आराम करून नंतर कपड्यांना इस्त्री करते. पण मी काहीतरी खोटं बोलतेय असं वाटून त्यांनी मला रागाने लांब ढकलून दिलं त्यांचा जोर इतका होता कि व्हरंड्यातल्या बाजूच्या खांबावर जाऊन मी आदळले आणि माझ्या पोटाला मार लागला. मला असह्य कळ जाणवली आणि आई ग.. म्हणून मी कळवळले. तरीही माझ्या या अवस्थेकडे दुर्लक्ष करून त्या निघून गेल्या. मला जमिनीवरून उठवल देखील नाही. बराच वेळ मी तशीच कण्हत पडून होते थोड्या वेळाने कमलाबाई आल्या त्यांनी पटकन मला तिथून उचलून नेलं. त्यांना वाटलं मला चक्कर आली होती. मी सुद्धा त्यांना घडलेला प्रकार सांगितला नाही.

रात्री अविनाशना मी घडलेला प्रकार सांगितलं. माझ्या पोटात कळ येतेय हे समजताच लागलीच त्यांनी मला एका हॉस्पीटलला नेलं. तिथे गेल्यावर समजल कि माझ्या पोटाला मार बसल्याने आतमध्ये बाळाला धक्का बसलेला आहे आणि बाळ त्यातच दगावल. हे ऐकून आमच्या तर पायाखालची जमीनच सरकली. डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करायला सांगितली. त्यामुळे माझ्यासुद्धा जीवाला धोका होता तो टळला. पण आमचं बाळ दगावल्याने आम्ही खूप दुखीः झालो. यांनी माझी समजूत घातली कि आपण बाळासाठी परत प्रयत्न करू. पण नंतर प्रयत्न करून देखील मला दिवस राहिना म्हणून परत हॉस्पीटला जाऊन चेकउप करून पाहिलं तर त्यात कळल कि पहिला गर्भपात झाल्याने गर्भाच्या पिशवीला इजा झालीय आणि मला परत आई होता येणार नाही.

एवढ बोलून नंदिनी ओक्साबोक्स्शी रडू लागली. नंदिनीवर ओढवलेल्या या दुर्दैवी प्रसंगाचं रॉबिनला सुद्धा खूप वाईट वाटलं. तो फक्त मान खाली घालू उभा राहिला. हे भयंकर दुखः झेलणाऱ्या नंदिनीच सांत्वन कसं करावं हे देखील त्याला समजेना आणि अशा प्रसंगी कोणते सांत्वनपर शब्द वापरावेत हे देखील त्याला समजले नाही. त्यामुळे रॉबिन तसाच दुःखी मानाने उभा होता. थोड्या वेळाने नंदिनीने स्वतःला सावरलं आणि ती पुढे सांगू लागली.

आमच्या दोघांवर दुःखाचा डोंगर कोसळल्यासारखे झाले होते. अविनाश खूप गप्प गप्प राहायचे. रात्रभर मी उशीत तोंड खुपसून रडत दिवस काढले. पण एके दिवशी ठरवलं कि बस्स आता यापुढे सहन करायचं नाही. मी स्वतःवर येणारी कोणतीही वेळ निभावून नेली असती पण माझ्या बाळाला या जगात येऊन श्वास घेण्याआधीच या जगाचा निरोप घ्यायला लावणाऱ्या माझ्या क्रूर सासूचा जीव घ्यायचा. मी हे ठरवलेले कोणालाच सांगितलं नाही आणि कशाप्रकारे सासूबाईना मारता येईल त्याचा विचार करू लागले. दरम्यान आबा फिरायला म्हणून डोंगरदऱ्या आणि धबधबे पाहायला गेले होते. तिथून ते मला पत्र पाठवायचे कि ती ठिकाणं कशी आहेत. तुला आणि अविनाशला मी इथे एकदा तरी फिरायला आणणार अशा अर्थाची पत्र असायची. त्यांनी मला पत्रातून तिथे त्यांना भेटलेल्या कुटीरोवा जमातीबाद्द्द्ल आणि त्यांच्या शिकार करण्याच्या पद्धतीबद्दल सांगितलं होतं. कुटीरोवा शस्त्राबद्दलची माहिती घरात फक्त मला आणी आबांनाच होती

दुर्दैवाने तिथून येताना आबांना अपघात झाला आणि त्यांना हॉस्पिटलला नेलं. त्याचं समान मात्रं घरी आणल होतं. तेव्हा त्याचं सामान त्यांच्या खोलीत लावत असताना मला एक लोखंडी पेटी सापडली. त्या पेटीत मला त्या ओल्डोमा वनस्पतीच्या काही बिया दिसल्या. तेव्हा माझ्या मनात एक कल्पना आली. अनायसे अविनाश यांची नर्सरी होतीच तेव्हा या बिया तिथे पेरुयात असं मी ठरवलं. एका मोक्याच्या क्षणी मी त्या वनस्पतीपासून कुटीरोवांच हत्यार बनवणार होते. नर्सरीत काम करणाऱ्या कामगाराला मी या रोपाला हात न लावण्याविषयी सुचवलं होतं. एक छोटं कुंपण त्या रोपाच्या बाजूला बनवलं आणि त्या वनस्पतीची काळजी घेऊ लागले. माझी मेहनत फळाला आली आणि ते रोप उगवून आलं. त्याची एक छोटी फांदी काळजीपूर्वक तोडून त्यापासून पोकळ नळी आणि सुया बनवल्या. मी दर आठवड्याला तिथे जाऊन पाने तोडून त्याचा रस बनवून ठेवायचे आणि तिथल्या बांबूवर एक कागद लावून लांबूनच नळी तोंडाजवळ धरून नळीच्या तोंडाशी फुंकून सुया बरोबर त्या कागदावर मारायचा सराव करायचे. कारण मला हे शस्त्र वापरण्याची संधी जेव्हा कधी मिळेल तेव्हा लगेचच ते चालवावं लागणार होतं. सुदैवाने पानांचा रस जास्तकाळ टिकून राहत असे. सासूबाई कधीकधी संध्याकाळी अंघोळ करून बाहेर जातात हे मला माहित असायचं. त्याचं वेळी सासूबाईंचा काटा काढायचं ठरवलं. अपेक्षितपणे कमला आणि मी स्वयंपाक घरात असताना मला त्यांनी काही कपडे धुवायला दिले आणि आताच्या आत्ता धुवा असं सांगून त्या अंघोळीला निघून गेल्या. मी या संधीचा फायदा घ्यायचं ठरवलं.

माझ्या डोक्यात योजना तयार होती. कमलाबाई त्या दिवशी माझ्यासोबत कपडे धुवू लागल्या त्याचा खरंतर फायदा झाला कारण त्या सोबत असल्यावर माझ्यावर संशय येणार न्हवता. कमलाबाईंच्या नकळत स्वयंपाकघरातून चाकू घेतला आणि एका कपड्यात बांधून धुण्याच्या बादलीतल्या कपड्यात तो टाकला. कमलाबाई पुढे गेल्या तेव्हा ओट्याच्या खाली कोपऱ्यात ठेवलेली ओल्डोमाच्या रसांची डबी बादलीत वर ठेवली. नळी आणि सुया साडीला कमरेच्या काच्यात गाठ मारून ठेवल्या. पटकन मागे विहीरिवर गेले. कमलाबाईंना दुसऱ्या बादलीतील कपडे धुवायला दिले.

माझ्या जवळची बादली मी बाजूला ठेवली. सासूबाईंची अंघोळ करायला किती वेळ घेतात हे माहित असल्याने तेवढा वेळ जाऊ दिला. रहाटाने पाणी काढून थोडे कपडे धुतले. नंतर कपड्यात गुंडाळलेला चाकू गुपचूप हातात घेतला. कमलाबाई गप्पा मारत कपडे धूत होत्या. मी रहाटाचा दोर घेऊन कळशी घट्ट करण्याच्या बहाण्याने चाकूने निम्म्याहून अधिक उसवला मग कळशी लावली आणि विहिरीत कळशी सोडली. कळशी भरून वर खेचताना काही झटके दिले त्यामुळे उसवलेला दोर तुटला आणि भरलेली कळशी खाली निसटून विहिरीच्या तळाशी गेली. कमलाबाई दुसरी कळशी आणायला वाड्याच्या अडगळीच्या खोलीत गेल्या. जिथे एका कोपऱ्यात मी जादाच्या कळश्या ठेवलेल्या होत्या पण त्या बादल्या आणि इतर भांड्यांच्या आड होत्या. जेणेकरून कमलाबाईंना कळशी सापडायला वेळ लागणार होता. कमलाबाई कळशी आणायला गेल्यावर मी त्वरेने कमरेला लावलेल्या ओल्डोमा वनस्पतीच्या सुया बाहेर काढल्या आणि बादलीतल्या डबीच झाकण काढून त्याची टोकं बुडवली.

नळीमध्ये सुया घालून पळतच वाड्याच्या मागच्या दारातून वाड्यात आले. वाड्यात कोणीही आलेलं न्हवत. सासूबाईंची अंघोळ झालेली होती आणि त्यांना त्यांच्या खोलीत जाताना मी पाहिलं. माझं नशीब बलवत्तर होतं. कमलाबाईंना दुसरी कळशी अजून सापडलेली न्हवती कारण वरच्या मजल्यावरून भांड्यांचा आवाज येत होता त्यावरून समजत होते कि त्या अजून कळशी शोधत होत्या. मी आजूबाजूला कोणी नाही हे पाहून पटकन सासूबाईंच्या खोलीबाहेर आले. सासूबाई समोर आरशात पाहून केस विंचरत होत्या त्यामुळे त्यांना समजलं नाही कि मी मागे आहे. त्यांनी त्यांचे एका बाजूचे केस बाजूला केले होते. मी क्षणाचाही विलंब न लावता हातातल्या नळीला तोंडाजवळ नेले आणि नळी जोरात फुंकली त्यासरशी वेगाने आतील सुया बाहेर पडल्या आणि बरोबर सासूबाईंच्या कानाच्या खाली घुसल्या. त्या घुसताक्षणी सासूबाई तोंडातून हलकासा अस्फुट आवाज करत जमिनीवर कोसळल्या. त्यांचं शरीर पूर्ण आखडल होतं आणि त्यांना कसलीही हालचाल करता येत न्हवती. मी पुढे जाऊन त्यांच्या मानेमागच्या घुसलेल्या सुया पटकन बाहेर काढल्या. पण त्या नादात त्या ओढल्या गेल्या आणि थोडंसं रक्त बाहेर आलं पण मला जास्त विचार करायला वेळ न्हवता. कमलाबाई कधीही खाली आल्या असत्या. मी त्या सुया काढल्या आणि पटकन पळत मागच्या दरवाजाने विहिरीजवळ आले. बादलीतल्या ओल्या कपड्यात नळी आणी सुया एका कापडात बांधून ठेवून दिल्या आणि कपडे धुवायचं नाटक करत कमलाबाईंची वाट पाहत बसले.

थोड्या वेळाने मला कमलाबाईंचा आरडाओरड ऐकू आला. मला समजलं कि कमलाबाईंना सासूबाई त्यांच्या खोलीत आडव्या पडलेल्या दिसल्या असणार. मी पळत आतमध्ये गेले आणि मग पुढे काय झालं हे तुम्हाला माहित आहेच

एवढ बोलून नंदिनी मान खाली घालून शांत बसली. खिडकीबाहेर बाहेर आता अंधार पडू लागलेला दिसत होता. रॉबिन शांतपणे हातावर हनुवटीवर टेकून उभा होता.

खरंतर मला सुरुवातीला डॉक्टर पाटलांवर संशय होता. पण नंतर त्यांच्या घरी आबा गुपचूप येजा करतात. हे समजल्यावर आबांवर संशय बळावला. पण मालतीताई कोसळल्या तेव्हा आबा घरात न्हव्तेच आणि त्यांच्याकडे ओल्डोमाच्या बिया सुद्धा सापडल्या नाहीत म्हटल्यावर मला माझी तपासाची दिशा बदलावी लागली. बिया गायब झाल्या म्हणजे नक्की कोणाला तरी त्या पेरून त्याचं रोप बनवायचं असणार हे मला समजलं होतंच. त्यामुळे साहजिकच अविनाशवर संशय आला. कारण रोपे लावायला नर्सरीपेक्षा सुरक्षित जागा दुसरी असणार न्हवती. आबांना हॉस्पिटलला घेऊन जाऊन तिथून गुपचूप माघारी येऊन त्यानेच मालतीबाईंचा काटा काढला असणार असं वाटत होतं. नर्सरीला भेट दिल्यावर नक्की रोप सापडणार असं वाटून मी तिथे गेलो पण तू आधीच रोपाची विल्हेवाट लावलेली होतीस.

खिडकीबाहेर पाहणाऱ्या नंदिनीकडे पाहत रॉबिन म्हणाला आणी पुढे बोलु लागला

शेडमधे आधाराला उभ्या केलेल्या बांबूवरची बारीक होल पाहून समजलंच कि येथे कोणीतरी येऊन सुया मारून लक्षभेद करण्याचा सराव केलेला दिसतोय. अविनाश सोडून नर्सरीत राजरोसपणे कोणी येउजाऊ शकत असेल असं वाटलं.

पण नर्सरीतल्या कामगाराने तू तिथे जात असायचीस हे सांगितलं. नंतर देशमुखांनी सांगितलं कि अविनाशने गुन्हा कबुल केलाय तेव्हा खून त्याने केलाय हे खरं वाटलं नाही कारण नक्कीच तो कोणाला तरी वाचवत असणार हे स्पष्ट होतं. विचार करता करता माझ्या लक्षात आलं कि तो नक्की कोणाला वाचवतोय.

मालतीताई वाड्यात कोसळल्या. तेव्हा दोनच व्यक्ती वाड्यात होत्या एक कमलाबाई आणी तू. नर्सरीमध्ये रोप तूच लावलेलं असणार हे मला पक्क समजल. मग मी आबांचा रहस्यभेद केल्यावर तुला वाटलंच असेल कि आज न उद्या मी कुटीरोवांच्या शस्त्रापर्यंत पोहोचणार म्हणून मी तिथे पोहोचायच्या आधीच तू ते रोप नष्ट केलंस.

यावर नंदिनी थोडावेळ शांत बसली. मागे वळून तिने गॅस बंद केला आणि परत रॉबिनकडे वळत ती म्हणाली

मला माहित होतं ज्यावेळी तुम्हाला कुटीरोवांच्या शस्त्राबद्दल माहित होणार त्याचं वेळी तुम्ही त्याच्या मागावर जाणार. आबांच्या खोलीत येऊन ज्यावेळी तुम्ही त्यांचं बिंग बाहेर काढलं त्याचवेळी मला समजलं कि तुम्हाला कुटीरोवांच्या शस्त्राबद्दल समजलंय. त्या रात्री मी अविनाश यांना आमच्या झोपायच्या खोलीत सगळ्या गोष्टी सांगितल्या. मीच सासूबाईना मारलंय यावर त्यांचा विश्वास बसला नाही. तसं करण्यामागच कारण काय होतं हे देखील त्यांना सांगितलं. ते सांगताना मला अश्रू अनावर झाले. पण त्यांनी मला समजून घेतलं. त्यांना सुद्धा वाईट वाटलं. तुमची इच्छा असल्यास मी पोलिसांच्या स्वाधीन होते असं मी म्हणाले पण त्यांनी नकार दिला ते म्हणाले कि असं काही करू नकोस देसाईंच्या सुनेबाबत लोकांनी भलत्यासलत्या गोष्टी बाहेर केलेल्या योग्य होणार नाही. त्याउलट ते म्हणाले कि तुझा ऐवजी मी गुन्हा केलाय असं सांगतो. मी सुरुवातीला ओढेवेढे घेतले पण नंतर आमचं ठरलं कि आधी गुन्हा कबूल करायचा पण कोर्टात गेल्यावर तो नाकारायचा. अशाने कोर्टात केस टिकणार नाही. पण मग कुटीरोवांच शस्त्रसुद्धा नष्ट करावं लागणार होतं. कधीतरी तुम्ही नर्सरीवर ओल्डोमा वनस्पतीच्या शोधार्थ येणार हे समजून म्हणून मीच नर्सरीवर जाऊन ते रोप उकरून काढलं आणी नष्ट केलं.

एवढ बोलून नंदिनी शांत बसली. तिला जेवढं बोलायचं होतं तेवढं बोलून झालं होतं. रॉबिनने खाली मान घालून उसासा टाकला. बाहेर चांगलाच अंधार पडलेला होता. रातकिड्यांचा आवाज वाड्याच्या बाहेरून येत होता. काहीही न बोलता रॉबिन स्वयंपाकघरातून बाहेर पडला.

वाड्याबाहेर येऊन हताश होत त्याने दुचाकी चालू केली आणि घराकडे निघाला. त्याला खुनी सापडला होता पण तो गुन्हा सिध्द करू शकत न्हवता कारण खुनाच हत्यार नष्ट झालेलं होतं आणि खुनाचा हेतू सुद्धा गुप्त राहणार होता. सगळ्या गोष्टी समजून पण रॉबिन हतबल होता. खरंतर असं त्याच्या गुप्तहेरीच्या कार्यकाळात प्रथमच घडत होतं. खरंतर मालतीताई यांना असं मरण येणं अपेक्षितच होतं असं रॉबिनला वाटून गेलं.

आपल्या घरातल्या सुनेला त्यांनी अत्यंत वाईट प्रकारची वागणूक दिलेली होती. नंदिनी हि कोणी गुन्हेगारी प्रवृत्तीची व्यक्ती न्हवती. एका आईने आपल्या बाळाच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यूचा बदला घेतलेला होता. त्यामुळे तिला गुन्हेगार म्हणून साबित करण्याची खटपट सुद्धा रॉबिनला करू वाटली नाही.

यातच काही दिवस निघून गेले. इन्स्पेक्टर देशमुखांनी अविनाशच्या जबानीनुसार त्याच्यावर खटला भरला होता. प्रकरण कोर्टात गेलं. अविनाशने कोर्टात आपला शब्द फिरवून गुन्हा केल्याचं नाकबूल केलं अर्थात हे सगळं त्याने आणि नंदिनीने आधीच ठरवलं होतं. सन्माननीय कोर्टाने देखील पुराव्याअभावी अविनाशला निर्दोष ठरवलं. देशमुखांचा तिळपापड झाला. खून अविनाशनेच केलाय असं त्यांना अजूनही वाटतंय. रॉबिनने देशमुखांना खरा खुनी कोण आहे याबाबत काहीहि सांगितलं नाही आणि सांगून पण काय करणार कारण त्याच्याकडे पुरावेच न्हवते. होते ते फक्त तर्क. तसंही रॉबिनला नंदिनीने केलेल्या कृत्याबाबत काहीही गैर वाटत न्हवते. वाटत होती ती फक्त एक सहानुभूती. भविष्यात कधीतरी योग्य वेळ आली कि देशमुखांना या प्रकरणाचा खरा खुनी कोण होता हे सांगायचं रॉबिनने ठरवलं होतं.

संध्याकाळ होत आलेली होती रॉबिन आपल्याच खोलीत खुर्चीत स्वस्थपणे बसून होता. हातची बोट एकमेकांत गुंफवून आत्तापर्यंत घडलेला सगळ्या घटनांचा क्रम मनाशी घोळवत शांत बसला होता.

तेवढ्यात दारामधून घराच्या समोर काम करणारा पोरगा आतमध्ये आला.

दादा हे पार्सल आलंय तुझा नावानेहातामध्ये खाकी पार्सल नाचवत तो पोरगा रॉबिनजवळ आला.

मला पार्सल कोणी पाठवलं असेल? हा विचार करतच रॉबिनने ते पार्सल त्या पोराकडून घेतलं आणि खुर्चीतून उठून बाजूच्या खिडकीजवळ गेला. पार्सल जास्त जड न्हवते. समोर काम करणारा पोरगा तिथेच उभा राहून रॉबिनकडे आशाळभूतपणे पाहत होता. रॉबिनने काळजीपूर्वक पार्सलचे सील काढले. आतमध्ये पैशाच्या काही नोटा होत्या आणि एक चिठ्ठी. रॉबिनने नोटा आतमध्ये तशाच ठेवल्या आणि फक्त चिठ्ठी बाहेर काढून तो वाचू लागला –

मला लिहायला जास्त जमत नाही. पण तरीही प्रयत्न करावा असं वाटलं. तुम्ही खूप कष्टाने आणि प्रामाणिकपणे तपासकाम केलंत. तुम्ही आमची दुखः आणि आमच्यावर आलेली कठीण वेळ समजून घेतली. त्यामुळे आम्ही जे काही केलं ते तुम्हाला समजून पण त्यावर पुढे कोणताही हस्तक्षेप तुमच्याकडून झाला नाही त्याबद्दल तुमचे खरंच आभार. तुमच्या कामामुळे खरंतर आमच्या घराला परत घरपण मिळालं. घरातले सगळे मिळून मिसळून राहू लागलोय. कोणालाच कोणता त्रास नाहीये आणि याचं सगळं श्रेय तुम्हालाच जाते. पण एक खंत वाटत होती ती म्हणजे तुम्हाला मात्र यातून काहीही मिळालं नाही. तुम्ही उदरनिर्वाहासाठी हे काम करता मात्र आमच्या प्रकरणात तुम्हाला काही लाभलं नाही. तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांची आणि कष्टाची परतफेड म्हणून छोटीशी भेट स्वीकाराल हि अपेक्षा आहे म्हणूनच हे पार्सल पत्रासोबत पाठवण्याचा खटाटोप करत आहे. पत्राच्या शेवटी माझं नाव लिहित नाही पण तुम्हाला समजलं असेलच कारण तुमच्या नजरेतून गोष्टी सहजासहजी सुटत नाहीत.

परत एकदा तुमचे आभार

पत्रातील मजकूर पूर्ण वाचून रॉबिन शांतपणे खिडकीबाहेर पाहू लागला. पत्र नंदिनीने लिहिलंय हे समजायला त्याला वेळ लागला नाही. पत्रातील मायना लिहिताना सुद्धा तो पुरावा म्हणून वापरता येऊ नये याची काळजी घेऊन तिने लिहिलेला होता. या गोष्टीचं रॉबिनला खरंच कौतुक वाटलं.

खिडकीबाहेर अस्ताला जाणाऱ्या सूर्याकडे पाहत रॉबिन उभा होता. पत्र वाचून त्याने हात कमरेच्या मागे बांधले आणि त्या नादात रॉबिनच्या हातातून पार्सल निसटून खाली जमिनीवर पडलं तसं आतल्या नोटा पार्सलच्या बाहेर आल्या. बाजूलाच उभ्या असलेल्या पोराने त्या नोटा पहिल्या आणि तो पोरगा आनंदाने नाचू लागला.

 हुर्रे..दादाकडे पैसे आले. आता दादा नवीन बुध्दीबळ घेऊन मला शिकवणार.. हुर्रे... दादा आता चहाच्या उधारीचे पैसे चहावाल्याच्या तोंडावर फेकून मारणार...हुर्रेअसं म्हणत मोठमोठ्याने गाण म्हणत तो पोरगा उड्या मारत नाचू लागला.

पण रॉबिनच मात्र त्याच्याकडे लक्षच न्हवत. समोर अस्ताला जाणाऱ्या सूर्याकडे आणि त्या सूर्यकिरणांच्या लालसर पिवळ्या रंगानी फुललेल्या आभाळाकडे पाहत पाणावलेल्या नेत्रांनी पण तरीही हलकस स्मित करत तो खिडकीबाहेर बघत तसाच उभा होता...

 

समाप्त...

७ मे, २०२४

गुप्तहेर रॉबिन आणी कुटीरोवांचं शस्त्र - नाटकावर पडदा


नाटकावर पडदा

रॉबिन वाड्यात आल्यावर त्याने चहूबाजूला नजर फिरवली. संध्याकाळची वेळ असल्याने तुळशीवृंदावनापाशी उदबत्ती लावलेली होती. त्याचा सुवास सगळीकडे दरवळत होता. आता या वेळी वाड्यात सगळे असतील हा अंदाज बांधूनच रॉबिनने या वेळी वाड्यात येण्याचं ठरवलं होतं. आत आलेल्या हवालदाराला गेस्टरूमच्या बाजूला उभं राहायला सांगून रॉबिन पुढे जाऊन आबांच्या खोलीकडे जाऊ लागला.

देशमुख मी इथे उभा आहे. तुम्ही वाड्यातल्या इतर सगळ्यांना बोलावून आणा.रॉबिन पुढे जात म्हणाला.

रॉबिनच्या म्हणण्यासरशी देशमुखांनी सगळ्यांना आवाज दयायला सुरुवात केली. कमलाबाई आणि नंदिनी जवळच स्वयंपाक घरात असल्यामुळे त्या लगेचच बाहेर आल्या आणि काय झालंय म्हणून बावरलेल्या नजरेने आबांच्या खोलीबाहेर उभं असलेल्या रॉबिनकडे पाहू लागल्या. वरच्या मजल्यावरून अविनाश खाली आला आणि त्याने काय झालं? का हाका मारून बोलावत आहात? अशा अर्थाने देशमुखांना विचारणा केली तेव्हा देशमुखांनी त्याला सांगितलं कि रॉबिनने सगळ्यांना बोलावलंय. सगळ्यात शेवटी वरच्या मजल्यावरून हळूहळू खाली बघत चष्मा सावरत आशुतोष खाली आला. सगळेजण रॉबिनच्या समोर जमा झाले. आबांच्या खोलीबाहेर हाताची घडी घालून रॉबिन गंभीर चेहरा करून उभा होता. सगळे आल्यावर रॉबिन अविनाशकडे पाहत म्हणाला

अविनाश तुम्हाला आबांना घेऊन बाहेर फिरायला जायचं असेल ना?

हो.. थोड्याच वेळात निघणार होतो मी त्यांना घेऊन ..चेहऱ्यावर आश्चर्य दाखवत अविनाशने उत्तर दिलं.

ठीक आहे, पण आज तुम्हाला बाहेर जाता येणार नाही कारण मला तुमच्या सगळ्यांशी खूप महत्वाचं बोलायचं आहे, चला इथे आतमध्येअसं म्हणून रॉबिन मागे वळाला आणि आबांच्या खोलीची बाहेरील कडी काढून आतमध्ये प्रविष्ट झाला. आतमध्ये आबा बेडवर एका अंगावर झोपलेले होते. समोरच्या भिंतीवर असलेली खिडकी रॉबिनने पुढे जाऊन उघडली तशी वाऱ्याची मंद झुळूक आतमध्ये आली, बाजूलाच उभी असलेली एक लाकडी खुर्ची त्याने खिडकीजवळ ओढली आणि पायावर पाय ठेवून त्या खुर्चीत रॉबिन आरामात बसला.

रॉबिनच्या मागोमाग सगळेजण आतमध्ये आले. आबांची खोली बऱ्यापैकी मोठी होती. आतमध्ये आल्यावर आबांच्या बेडवर अविनाश बसला. दाराजवळ कमलाबाई आणि तिच्या मागे नंदिनी उभी होती. त्यांच्यापुढे आशुतोष उभा होता. देशमुख दरवाजातच उभे राहून पुढे काय होणार हे कुतुहूलतेने पाहत उभे होते.

आतमध्ये आल्यावर सगळ्यांनाच हा प्रश्न पडलेला होता कि रॉबिनला नक्की काय बोलायचंय आणि त्याने सगळ्यांना आबांच्या खोलीत का बोलावलंय. सगळ्यांचे प्रश्नार्थक चेहरे पाहून रॉबिन गंभीर चेहरा सोडून जरा हसरा चेहरा करत म्हणाला.

तुम्हा सगळ्यांनाच हा प्रश्न पडलेला असेल कि मी असा अचानक या वाड्यात येऊन सगळ्यांना इथे का बोलावलं असेल.रॉबिनच्या या वाक्यावर कोणीच काहीही बोललं नाही.

तुमच्यापैकी कोणी नाटकं पाहिलं आहे का”? रॉबिनच्या या पुढच्या प्रश्नावर सगळे अजूनच बुचकळ्यात पडले.

इन्स्पेक्टर देशमुखांना सुद्धा कळल नाही रॉबिन नाटकाविषयी का विचारतोय.

अविनाश तुम्ही सांगा तुम्ही नाटक पाहिलं आहे का कधी?अविनाशकडे पाहत रॉबिनने स्मित करत विचारलं.

अ...हो..पाहिलं आहेअविनाश काहीसा बावरत आणि प्रश्नार्थक मुद्रा करत म्हणाला.

नाटक संपल्यावर पडदा पडतो आणि काही नाटकवेडे प्रेक्षक स्टेजच्या मागील खोलीत नाटकात काम केलेल्या कलाकाराचं अभिनंदन करायला किंवा त्यांच्या कामाचं कौतुक करायला त्यांची भेट घेतात. काहीजण तर त्यांची सही सुद्धा घेतात. हो ना अविनाश?” परत अविनाशकडे हसरा चेहरा करत रॉबिनने प्रश्न विचारला.

यावर अविनाशने होकारार्थी मान हलवली खरी पण रॉबिनला नक्की म्हणायचं काय हे कोणालाच समजत न्हवत.

सगळेचजण प्रश्नार्थक नजरेने रॉबिनकडे पाहत होते. सगळ्यांचे असे चेहरे पाहून रॉबिनने विषय जास्त न ताणता मुद्द्याला हात घालायला सुरुवात केली.

मी सुद्धा आज इथे अशाच एका कलाकालाराला भेटायला आलोय. ज्याने नाटकातील कलाकाराप्रमाणेच अतिशय उत्तम अभिनयाचा नमुना दाखवत नाटकं छान चालवलं आहे. खरंतर अशा कलाकाराला नाट्य क्षेत्रातील मोठा पुरस्कारच द्यायला हवा. पण दुर्दैवाने त्या नाटकावर पडदा पडायची वेळ आलेली आहे आणि ते सौभाग्य मी स्वतःकडे घेत आहेरॉबिन नाटकीय पद्धतीने म्हणाला.

रॉबिन आम्हाला खरंच कळत नाहीये तूम्ही काय बोलताय. तेव्हा कृपा करून आता स्पष्टपणे सांगा तुम्हाला काय म्हणायचंअधीर होत पण चेहऱ्यावर नाराजीचे भाव आणत अविनाश म्हणाला. आता सगळ्यांच्याच धीराची परीक्षा होत आहे हे ओळखून रॉबिन जागेवरून उठत पुढे म्हणाला.

या बेडवर झोपलेले आबा देसाई हेच त्या नाटकाचे कलाकार आहेत. म्हणजेच मागचे काही दिवस स्मृतिभ्रंशाचं नाटकं करतं बेडवर पडलेले आहेत.” 

त्याचं ते वाक्य बॉम्ब पाडाव तसं खोलीत घुमलं. कोणीच काही बोललं नाही. कारण कोणालाच ते वाक्य पचले नाही. रॉबिनला पुढे बोलला.

२ महिन्यापूर्वीच आबा स्मृतिभ्रंशाच्या व्याधीतून बरे झालेत आणि तरीसुद्धा कोणाला कळू न देता आपण अजूनही बरे झालेलो नाही. आपणास काही आठवत नाही अशा अविर्भावात ते वावरत आहेत.” रॉबिन म्हणाला.

कमलाबाईने तोंडावर पदर ठेवला. नंदिनी आणि अविनाश अविश्वासाने रॉबिनकडे पाहत होते. बाजूला उभ्या आशुतोषला याचं काहीही देणंघेणं नसल्यासारखा तो मान खाली घालून उभा होता. दरवाजात उभ्या असलेल्या देशमुखांना पण चांगलाच हादरा बसला होता आणि ते अविश्वासाने आतमध्ये पाहत होते. आबा अजूनही बेडवर एका कुशीवर झोपूनच होते. पण आता अविनाशचा संयम सुटला आणि तो मोठ्याने बोलला.

रॉबिन काय वाट्टेल ते बोलत आहात तुम्ही. कशावरून तुम्ही असे आरोप करताय. आबांना असं करायची गरजचं काय आहे.

गरज काय आहे ते आबा स्वतःच सांगतील. पहिल्यांदा जेव्हा आबांच्या या खोलीत आलो होतो तेव्हा फक्त टेबलावरील पुस्तकं पडल्याच्या आवाजाने त्यांना जाग आली होती. पण आज आपण एवढ मोठ्याने बोलतोय तरीही त्यांची झोपमोड होत नाहीये. बघा कसं झोपेचं सोंग करत पडलेतरॉबिन जरा घुश्यातच म्हणाला.

रॉबिन तुम्ही माझ्या वडिलांना पुराव्याशिवाय काहीही बोलू शकत नाही अविनाश आपल्या जागेवरून उठत तावातावात म्हणाला.

पुरावा हवाय तुम्हाला? देशमुख... बाहेर बघत मोठ्याने रॉबिन म्हणाला.

त्या पाटील डॉक्टरला आतमध्ये आणा ज्याने चौकशीत आपल्याला सांगितलं कि आबा हे चोरून रात्री अपरात्री त्यांना भेटायला येतात आणि तशी साक्ष पण तो कोर्टात देणार आहे.रॉबिनने बिनदिक्कतपणे खडा मारला होता.

रॉबिनच्या वाक्यासरशी देशमुखांनी अंगणातील हवालदाराला इशारा केला. तो हवालदार पळतच बाहेर गेला आणि काही वेळातच हवालदार म्हस्के बाहेरून पाटील डॉक्टरांना हाताला धरून आबांच्या खोलीबाहेर आला. सगळ्यांच्या तोंडचं पाणीच पळाल होतं आणि कोणाला काय बोलावं ते समजत न्हवत. डॉक्टर पाटलांना आपणाला इथं का आणलंय तेच समजत न्हवतं. ते प्रचंड घाबरलेले होते. पाटील डॉक्टरांना घेऊन देशमुख आत आले.

रॉबिन आबांकडे पाहत म्हणाला हे बघा आबा तुम्ही रंगवलेल्या नाटकातील तुमचे सहकारी पाटील डॉक्टर आतमध्ये आलेले आहेत आणि...थोडसं थांबून हलकसं हसत पुढे जाऊन आबांच्या जवळ जात त्यांच्या कानात हळूच म्हणाला कुटीरोवांच्या शस्त्राबद्दल पण माहिती मिळालीय आम्हाला

तेवढ्यात पटकन अंगावरची चादर बाजूला फेकत आबा ताडकन बेडवर उठून बसले आणी कडाडले.

मूर्ख माणसा थोडे दिवस थांब असं म्हणलो होतो ना. लगेचच घाबरलास आणि सगळं सांगून बसलास पोलिसांना. असला कसला शेळपट डॉक्टर आहेस रे तू

असं म्हणून आबा रागारागाने डॉक्टर पाटलांना मारायला धावले.

रॉबिनने त्या दोघांमध्ये पडत आबांना धरले आणि बेडवर बसवले. डॉक्टर पाटलांना घाबरून काय होतंय तेच समजत न्हवत आणि त्यामुळे त्यांच्या तोंडून एक शब्दही फुटला नाही. कसायला दिलेल्या बकरीसारखी त्यांची अवस्था झालेली होती.

आबांच्या त्या ताडकन उठण्याने सगळेच आवक झाले त्याहूनही ते जे स्पष्टपणे बोलले त्याने तर इन्स्पेक्टर देशमुखांसोबत घरातील सगळ्यांनाच धक्का बसला. नंदिनी तर रडवेल्या चेहऱ्याने मटकन खालीच बसली. कमलाबाईने मोठ्याने आ वासला. अविनाश डोळे मोठे करून विश्वास न बसल्यासारखा आबांकडे पाहत बेडवर खिळून होता. आशुतोषसुद्धा कपाळावर आठ्या आणत आश्चर्याने पाहत होता.

आबांना पाणी द्या प्यायलाअविनाशला निर्देश करत रॉबिन खुर्चीत बसत म्हणाला.

रॉबिनच्या वाक्यासरशी अविनाश भानावर आला आणि आबांना मिठी मारून ओक्साबोक्शी रडू लागला. आबांनी सुद्धा पाणावलेल्या नेत्रांनी त्याला छातीशी धरलं. नंदिनीसुद्धा स्फुंदून स्फुंदून रडू लागली. कमलाबाईचे डोळे सुद्धा पाणावले.

थोड्या वेळ त्यांना एकमेकांना सावरायला लागला त्यामुळे रॉबिन शांतपणे खुर्चीत बसून सगळ्यांना न्याहाळत उभा होता. अविनाशला आबांनी मिठीतून सोडवलं आणि डॉक्टर पाटलांकडे पाहत म्हणाले डॉक्टर तू या पोलिसांना आणि या गुप्तहेराला सगळंच सांगायची गरज न्हवती. काही दिवस थांब असं म्हणलो होतो मी

अहो आबा मी यांना काहीही सांगितलेलं नाहीये. यांनीच मुद्दाम तुम्हाला तुमचं बिंग बाहेर पडावे म्हणून खोट सांगितलंय सगळंडोक्यावर हात ठेवत रडवेल्या सुरात डॉक्टर पाटील म्हणाले. पाटलांच्या या वाक्यासरशी आबा चमकून रॉबिनकडे पाहू लागले. रॉबिन मात्र गालातल्या गालात हसत खुर्चीत आरामात रेलून बसलेला होता.

पण तुम्हाला कुटीरोवांच्या शस्त्राबद्दल कसं माहिती ते एक दुर्मिळ वनस्पतींपासून बनलेल हत्यार आहे ज्याची माहिती कोणालाच नाहीयेआबा शांतपणे रॉबिनकडे पाहत म्हणाले.

त्या आधी तुम्ही मला सांगा तुम्हाला हे नाटक करायची काय आवश्यकता होती ते पण आजूबाजूला प्रेम करणारी मुलं आणि सुन असताना. तुमची एवढी काळजी घेत हे लोक घेत असताना त्यांना असं अंधारात ठेवायला तुम्हाला जराही वेदना झाल्या नाहीत” रॉबिन मुद्दाम भावनिक शब्दात म्हणाला. यावर आबांची नजर खाली गेली.

वेदना.. वेदना झाल्या. खूप झाल्या... पण काय करणार...एवढ बोलून आबा शांतपणे जमिनीकडे पाहू लागले.

मग आता हे सगळं का आणि कशासाठी केलं ते सविस्तर सांगा अगदी कुटीरोवांच्या माहितीसकटरॉबिन खुर्चीवर रेलत म्हणला.

सांगतो.. सगळं सांगतोअसं म्हणून आबा दोन्ही हात बेडच्या काठावर ठेवून सांगू लागले

मला पहिल्यापासूनच फिरायची खूप आवड होती. नोकरीत असतानादेखील मी माझी हि आवड जोपासायचो. कामाच्या ठिकाणी असताना माझे दोन मित्र होते गजानन सुरवसे आणि प्रमोद टेके या नावाचे. त्यांना सुद्धा फिरायचा खूप नाद होता. कामावर असताना एकदा गजानन म्हणाला कि दक्षिण भागात जिथे खूप दाट जंगलं आहेत तिथे खूप रम्य धबधबे आणि वेगवेगळ्या प्रकारचे पक्षि पाहायला मिळतात. आपण तिथे फिरायला जाऊयात. तो तसा म्हणाला खरा पण योग काही आलाच नाही. घरात पण मालतीची चिडचिड जास्तच वाढली होती. येऊन जाऊन ती सगळ्यांवर डाफरत असायची. मी घरात असलो कि सांभाळून घ्यायचो. पण माझ्या मागे तिला आवरण इतरांना अशक्य होऊन जायचं. मागच्या वर्षाखाली एकदा गजाननचा फोन आला कि जिथे आमचं फिरायला जायचं ठरलं होतं तिथं जाण्यासाठीची तिकीट त्याने बुक केलेली होती आणि मला तिकडे चलण्यासाठी तो गळ घालत होता. सोबत प्रमोद पण येणार होता. मला नाही म्हणवल नाही आणि दुसरीकडे निसर्ग सुद्धा खुणावत होताच. घरच्या कीटकीटीतून जरा विरंगुळा सुद्धा होणार होणार होता. मी होकार दिला आणि आम्ही फिरायला निघालो. अतिशय रम्य अशा अशा ठिकाणी फिरता फिरता वेगवेगळे पक्षी पहिले. धबधबे आणि उंचच उंच कडे कपारी पहिल्या. खूप मस्त वाटलं.

गजाननच्या म्हणण्यानुसार इथे ठराविक प्रकारच्या आदिवासी जमाती राहत असतं. पण त्या सहसा कोणाला दिसायच्या नाहीत. तिथे मला नंदिनीची माझ्या सुनेची जास्तच आठवण आली तिला अशा ठिकाणी फिरायला फार आवडते. इथल्या वातावरणाबद्दल सांगायला मी काही पत्र पण लिहून घरी पाठवली होती.

पुढच्या वेळी अविनाश आणि नंदिनीला नक्की या ठिकाणी पाठवायचं असा निर्धार मी केला. तिथे एके ठिकाणी उंच सुळक्या जवळ मी फिरत होतो, त्या दिवशी गजाननला जरा बऱ वाटत न्हवते म्हणून प्रमोद आणि तो दोघे आम्ही ज्या ठिकाणी मुक्काम केला होता तिथेच थांबले होते. मी मात्र जरा पाय मोकळे करायला म्हणून बाहेर पडलो. एका उंच कड्याच्या टोकाजवळ मी उभा होतो. तिथून खालचा ओढा वाहत असतांनाच दृश्य खूप छान दिसतं होतं. अजून थोडं खाली एक वेगळ्याच प्रकारची रानटी फुलं पाहण्याच्या नादात मी जरा कड्याच्या खाली उतरलो. फुलं बघण्याच्या नादात हे विसरलो कि वर परत जायला रस्ता नाहीये. कडा उतरून खाली जाऊन एक फेरी मारून मग दुसऱ्या बाजूंला जाणे हा एकंच मार्ग होता. डोक्यावर हात मारून मी कडा हळूहळू उतरलो आणि खाली कच्च्या रस्त्याला लागलो.

अंधार पडू लागल्याने पटापट चालत होतो. आजूबाजूला जंगलाचा भाग भितीप्रद वाटत होता. लवकर मुक्कामी पोहोचावं म्हणून झपझप पावलं टाकत असतानाच एका खड्यात माझा पाय अडकला आणि तोल जाऊन पडलो. पाय मुरगळल्याने मला उठता येईना आजूबाजूला कोणीच माणूस दिसत न्हवता. बराच वेळ तिथे कण्हत नशिबाला दोष देत बसून होतो. एवढ्यात मागून २ आदिवासी बायका येत होत्या. त्यांना मी जमिनीवर बसलेला दिसलो. त्या इथे झाडपाला गोळा करायला आल्या होत्या. मला त्यांची भाषा समजत न्हवती पण त्यांना माझी भाषा थोडीशी समजत होती. त्यांनी माझी मोडक्या तोडक्या भाषेत विचारपूस केली. मी माझा पाय मुरगळल्याच सांगितलं. तसं त्या दोघींनी मला आधार देत उचललं आणि जवळच आपल्या पालावर नेऊन जायला लागल्या. गजाननने सांगितल्याप्रमाणे इथे खरंच आदिवासी जमाती वास्तव्यास होत्या हे खर होतं. जंगलात आतमध्ये एके ठिकाणी त्यांनी मला नेलं, माझ्या पायाला खूप वेदना होत होत्या. काही वेळातच आम्ही त्यांच्या पालावर पोचलो. आजूबाजूला ४-५ लहान झोपड्या आणि मध्ये छोटी शेकोटी केलेली होती. तिथे ३-४ लहान मुले आणि काही वृद्ध मंडळी बसली होती. आम्ही येताच सगळ्यांनी आमच्याभोवती कोंडाळ केलं. पालावरचे इतर आदिवासी त्या बायकांना माझ्याबद्दल विचारू लागले. तेव्हा आदिवासी भाषेत त्या बायकांनी त्यांना काहीतरी सांगितलं आणि मला बाजूच्या झोपडीत घेऊन गेले.

तिथे नंतर त्यांच्यातील एक वृद्ध आदिवासी माझ्याजवळ आला कदाचित त्यांचा वैद्य असावा. त्याने माझा पाय पाहिला आणि त्या मुरगळलेल्या पायावर २-३ लहान काठ्या वेलाच्या सहाय्याने बांधल्या. नंतर कसल्यातरी पानाचा लेप लावला. जवळच्याच भांड्यात एक पदार्थ टाकून त्याला आग लावून धूर केला. त्याने तो धूर माझ्या नाकाजवळ आणला आणि क्षणार्धात मला झोप लागली.

दुसऱ्या दिवशी उठलो तेव्हा सकाळ झाली होती. उठून बसलो तर मी कालच्याच झोपडीत एकटा होतो. पायाला वेदना अजिबात होत न्हवत्या. पाय हलवून पाहिलं तर तो अगदी ठणठणीत बरा झालेला पाहून आश्चर्य आणि आनंद दोन्ही भावना मनात उमटल्या. मग मी झोपडीच्या बाहेर आलो तर काही आदिवासी मंडळी बाहेरचं उभी होती. मी आल्यावर आनंदाने ती माझ्याजवळ येऊन उभी राहिली. त्यांनी मला बाजूला एका दगडावर बसवलं. मोडक्या तोडक्या भाषेत ती लोकं माझी विचारपूस करू लागली. खूप प्रेमळ स्वभावाची अशी ती लोकं होती. त्यांनी मला खाण्यास काही फळे दिली. नंतर दिवसभर मी त्यांच्या सोबतच घालवला. आजूबाजूला खूप वेगवेगळ्या प्रकारची फुलं आणि वनस्पती असल्याचं मला त्यांच्याकडून कळल. मुख्यत्वे हि लोकं फुलं आणि झाडावरचा मध गोळा करून आसपासच्या गावात विकून आपली गुजराण करत असत. तेवढाच काय तो त्यांचा बाहेरच्या जगाशी संबंध. बाहेरील लोक सुद्धा त्यांच्याशी तेवढाच संबंध ठेवायचे. मला त्यांच्या सोबत दिवस काढायला मिळाल्याने मी खुश होतो. जंगलात असणाऱ्या विविध प्राण्यांची मुख्यत्वे ससे किंवा हरीण यांची ती लोक शिकार करायची.

जंगली श्वापदांपासून संरक्षण करण्यासाठी ते लोक विशेष अशी विषारी हत्यारे वापरात असत. तिथल्या एका वृद्ध अदिवास्याने मला सांगितलं कि त्यांच्या जमातीला कुटीरोवा असं म्हणतात. त्याने तिथली विविध प्रकारची औषधी झाडे मला दाखवली. त्यात ओल्डोमा नावाची अत्यंत दुर्मिळ वनस्पती देखील होती. ओल्डोमा वनस्पतीच्या पानांच्या रसाचा वापर करून तो हत्याराच्या टोकाला लावत असत. विशेष म्हणजे त्या वनस्पतीची खोडं जरा काटक होती आणि खोडं वापरून त्यांच्यामध्ये पोखरून मधोमध त्याचं खोडांपासून बनवलेल्या टोकदार सुया शिकारीला वापरत. त्या सुयांच्या टोकाला लावलेल्या त्याचं वनस्पतीच्या पाल्याच्या विषाने सावज जागीच ठार व्हायचं एवढ जालीम विष होतं ते. मला त्या वृद्ध माणसाने त्या वनस्पतीच्या खोडापासून ते हत्यार कसं तयार करायचं आणि पानांचा रस काढून विष कसं लावायचं हे दाखवलं होतं. मला त्यांची ती पद्धत खूप आवडली. पण अखेर निरोप घ्यायची वेळ झाली. माझा पाय बरा केल्याने मी त्या आदिवासींचे मनापासून आभार मानले. त्यांना भरुन आलं होतं. जाताना मला त्यांनी ओल्डोमा वनस्पतीच्या काही बिया आठवण म्हणून दिल्या.

जड अंतकरणाने मी त्या प्रेमळ लोकांचा निरोप घेतला. जंगल तुडवत कच्च्या रस्त्याला आलो आणि चालत चालत मुक्कामाच्या स्थळी पोहोचलो. गजानन आणि प्रमोद यांना मला बघून जीवात जीव आला. दोघे रात्रभर मलाच शोधत होते. त्यांना मी पाय मुरगळून पडल्याचं आणि कुटीरोवा या आदिवासी जमातीच्या पाल्याला भेट दिल्याच सविस्तर वर्णन सांगितलं.

कुटिरोवांनी दिलेल्या ओल्डोमा वनस्पतीच्या बियासुद्धा त्यांना दाखवल्या. तिथला प्रवास उरकून आम्ही भाड्याने केलेल्या एक चारचाकी गाडीने परतत होतो. पण दुर्दैव माझं. रस्त्यात एका अपघाती वळणावर आमच्या गाडीला अपघात झाला. मी गाडीतून बाहेर फेकला गेलो आणि माझ्या डोक्याच्या मागे मार लागला तशी माझी शुद्धच हरपली. जाग आली तेव्हा कुठल्यातरी हॉस्पिटलमध्ये असल्याचं जाणवलं. बोलायला बघितलं तर तोंडातून शब्द फुटत न्हवते. थोड्या वेळाने परत शुद्ध हरपली अशामधे किती दिवस गेले कोण जाणे. एकदा परत जाग आली तेव्हा याचं खोलीत होतो. रात्र झाली होती उठता येत न्हवते आणि जीभ पण जड झाली होती. हळूहळू जाणीवा होऊ लागल्या होत्या. काही दिवसांनी उठता बसता येऊ लागलं. वाड्यातल्या लोकांना सुरुवातीला ओळखता येत नसायचं म्हणून गप्पच असायचो पण नंतर नंतर सगळं आठवू लागलो. बायका मुलं सुना सगळ्यांचे चेहरे ओळखीचे वाटू लागले. पण बोलत नसायचो. हळू हळू समजायला लागलं कि अविनाश माझी ट्रीटमेंट करण्यासाठी एका पटवर्धन नावाच्या डॉक्टरकडे नेत होता. त्या डॉक्टरकडे गेल्यावर आणि त्याची औषधं घेतल्याने मला बऱ वाटू लागलं होतं. अविनाश रोज बाहेर फिरायला घेऊन जायचा त्याने जास्तच बऱ वाटायचं. हळूहळू माझी स्मृती पण माघारी येऊ लागली होती आणि जीभ थोडीशी जडत्व रहित झालेली होती. पण तरीही बोलत नसायचो.

एके दुपारी अचानक झोप मोडली ती कसल्याशा आवाजाने..

मी जागीच उठून बसलो. बाहेर मालती तावातावाने कोणाशी तरी बोलत होती. बेडवरून उठत बाहेर जायला बघितलं तर माझ्या खोलीच्या दाराला बाहेरून कडी होती. मग आतूनच कान देऊन ऐकू लागलो. मालती माझ्या सुनेला नंदिनीला मोठमोठ्याने शिव्यांची लाखोली वाहत होती आणि माझी गरीब बिचारी सून रडत गयावया करत उभी होती. मला आतून काहीच करता येईना. बोलता सुद्धा येत न्हवते कि दार उघडा म्हणून. मग तसाच आतमध्ये बसून राहिलो.

नंतर एकदा हा डॉक्टर पाटील रात्री तपासायला आला होता. खोलीबाहेर त्याचं आणि अविनाशचं बोलणं कानावर पडलं. तेव्हा समजलं कि मालती नंदिनीला कशी त्रास देते. अविनाशला कशा प्रकारे वागवते. बाहेर सुद्धा तिने लोकांना त्रास देऊन कसे पैशाचे गैरव्यवहार केलेले होते. ते ऐकून माझं पित्तच खवळल. अविनाश लहान होता म्हणून अविनाशच्या संगोपनासाठी मालतीला घरात आणले होते पण तिची हि थेरं ऐकून मस्तकच फिरलं. क्षणभर विश्वासच बसला नाही. डॉक्टर पटवर्धनांच्या उपचारांचा चांगलाच असर माझ्यावर होत होता. पण मला सगळ आठवत असल्याचं मी कोणालाच सांगितलं नाही कारण माझे मागे मालती काय काय प्रताप करते हे मला पहायचे होते.

रोज दुपारी अविनाश नसताना मालती नंदिनीवर ओरडत असताना मी ऐकायचो. संध्याकाळी अविनाश आला कि त्याचावर खेकसायची. माझ्या डोक्याचा पारा चढत चालला होता. एके रात्री मी ठरवलं कि डॉक्टर पाटलांना कल्पना द्यायची कि मी बरा झालोय. माझ्या खोलीच्या खिडकीतून अंगावर शाल पांघरून हळूच बाहेर पडलो. मुख्यदरवाजा रात्री बंद असल्याने मी कंपाऊंडची भिंत उडी मारून कशीबशी ओलांडली आणि आडमार्गाने डॉक्टरच्या घराकडे निघालो. पाटलांची मला पाहताच बोबडीच वळली. पण मी डॉक्टरला विश्वासात घेऊन सांगितलं कि मी बरा झाल्याचं कोणाला सांगायचं नाही. कारण माझ्यामागे मालतीची काय थेरं चालतात मला पहायचं होतं. डॉक्टरांकडून मला समजलं कि बाहेर सुद्धा अनेक गैरव्यवहारामध्ये मालती गुंतलेली होती. डॉक्टरांचे पाटलांचे उपचाराचे पैसे सुद्धा दिलेलं न्हवते. पाटील एकदा पैसे मागायला आले तेव्हा भर लोकात त्यांचा अपमान केला होता. मुलांना एक चांगली आई मिळेल या उद्देशाने मी दुसरं लग्न केलं होतं. पण ती बाई अशी निघाली. वेळ मिळेल तसं मी रात्री डॉक्टरांच्या घरी जायचो आणि त्यांच्याशी बोलायचो. ते माझं म्हणणं ऐकून घ्यायचे.

त्यात एके दिवशी संध्याकाळी पोलीस घरी आलेले पाहिलं. मला कळेना पोलीस का आलेत. मला काहीच समजेना. मी आणि अविनाश बाहेरू फिरून आलो होतो. वाड्यात मालातीचा खून झाल्याचं समजलं. मला वाईट वाटलं नाही. नक्कीच मालतीने कोणाच तरी वाटोळ केलं असणार आणि त्यामुळेच असं घडलं. काही दिवसांनी रात्री पुन्हा डॉक्टर पाटलाकडे गेलो. पाटलांनी सांगितलं कि त्यांनीच पोलिसांना बोलावून घ्या असं सांगितलं होतं. खरतरं बाहेरच्या माणसाच हे काम असावं म्हणून पाटलांनी अविनाशला तसं सांगितलं. पण मीच पाटलाला ओरडलो कि अरे सुंठेवाचून खोकला गेलेला असताना तू कशाला शहाणपणा करून पोलिसांना बोलावून घेतलंस. आपण सांगितलं असत लोकांना हृदयविकाराच्या झटक्याने गेली ती. खरतर पाटलांच्या शहाणपणामुळेच पोलिसांचा संबंध इथे आला. परत पाटलांना वाटू लागलं कि मीच मालतीला मारलंय. पण मी म्हणालो खरतरं खुन्याने माझ्या हातून हि संधी नेली. कारण खरंतर मलाच माझ्या हाताने तिचा गळा आवळायचा होता. पण माझ्या नशिबात ते न्हवते. एवढ बोलून आबा शांत बसले.

खोलीत निरव शांतात होती. सगळेजण गुपचूपपणे ऐकत होते.

पण मग तुम्हाला कसं कळल कि आबा माझ्याकडे येतात ते? डॉक्टर पाटील रॉबिनकडे पाहत जमिनीवर बसून बोलले.

त्या रात्री तुमच्या घरी भेट दिली तेव्हाचं समजल कि तुम्हाला भेटायला कोणीतरी आलंय आणि तुम्ही त्याला घरात लपवताय. टेबलावर तुम्ही त्यांना प्यायला दिलेला पाण्याच्या ग्लासच पाण्याचं वर्तुळ त्याची साक्ष देत होतं. म्हणून तुमच्या घरातून निघाल्याचं नाटक करत मी बाहेरचं तुमच्या घरासमोरच्या झाडीत बसून पाळत ठेवत होतो कि नक्की तुम्ही कोणाला लपवत होतात.रॉबिन खुचीत बसूनच बोलला.

हो त्या दिवशी तुम्ही वाड्यावर आला होतात तेव्हा नंदिनी अविनाशला सांगत होती कि रॉबिन वाड्यावर पाहणी करायला आला होता. त्या रात्री मी डॉक्टरकडे गेलो होतो हेच सांगायला कि या प्रकरणात आता एक हुशार गुप्तहेरसुद्धा सामील आहे. तेव्हा आज ना उद्या हा गुप्तहेर माझं बिंग बाहेर काढायच्या आत मी बरा झाल्याचं दाखवतो नाहीतर विनाकारण आपल्यावर संशय यायचा. कारण डॉक्टरसुद्धा घाबरला होता कि मी रात्री असे त्याला त्याच्या घरात जाऊन भेटतो.

त्या रात्री अचानक दार वाजलं तेव्हा मी जाम घाबरलो. आमचं बोलणं थांबवून आबांना माझ्या घरातल्या दरवाजा मधून क्लिनिकमध्ये लपवलं. कोण आहे ते पाहून बाहेरच्या बाहेर त्या व्यक्तीला कटवायच हा विचार करत दार उघडलं. तर समोर गुप्तहेर रॉबिन. माझी तर वाचाच बसली होती. कसबस करून मला झोप येतेय असं तुम्हाला सांगून आणी उद्या घर पहा असं सांगून घरातून घालवलं. नंतर तुम्ही गेल्यावर आबा माझ्याशी बोलून खूप वेळाने निघाले. कारण रात्र काळोख्या रात्रीत कोणी त्यांना पाहिलं पण नसतडॉक्टर म्हणाले.

मग मी त्यांचा पाठलाग केलाहलकंस हसत रॉबिन बोलू लागला. आबांनी मस्त शाल वगैरे पांघरून आपली ओळख लपवायचा प्रयत्न केला होता. पण डॉक्टर पाटलांच्या क्लिनिकबाहेर पडत असताना मला अचनाक त्यांच्या पायातला बूट दिसला. जो मी वाड्यात त्यांच्या बेडखाली पहिला होता. आत्तासुद्धा तो बेडखाली असेल पहा आणि त्याचा पुढचा भाग घासल्याने तो जरासा खरवडला गेलाय. त्यामुळे माझा संशय आबांवर बळावला. पाठलाग करत असताना आबा पुढे निसटून गेले तेव्हा रात्रीच्या त्या अंधारात लांबवर लुकलुकणारे दिवे वाड्याच्या आसपास असावेत असं दिसतं होतं. त्यामुळे हि व्यक्ती वाड्यातीलच असणार असं वाटून गेलं. त्याआधी दिवसा एकदा वाड्याची पाहणी करायला आलेलो असतना आबांच्या खोलीबाहेर जरा पाहणी केली त्यात आबांच्या खिडकीबाहेर असलेल्या भिंतीवरचा रंग काहीतरी घासल्यामुळे उडालेला होता. तोच रंग काहीसा आबांच्या बुटाला पुढच्या भागाला लागलाय. तेव्हाच मला संशय आला होता कि कोणीतरी या खिडकीमधून भिंतीवर पाय देऊन आतबाहेर करत आहे. भिंतीवर खालच्या बाजूला असलेल मातीचे डाग याला अजूनच बळकटी देत होते. प्रथम आबांच्या खोलीचा वापर करून कोणीतरी दुसराच हे काम करतोय असं मला वाटलं कारण आबांना स्मृतीभ्रंश असल्याने त्यांना या गोष्टी जमणार न्हवत्या. पण डॉक्टर सचित पटवर्धन यांचाकडे जाऊन जेव्हा मी या गोष्टीची माहिती मिळाली कि तुमच्याकडे येण्याऱ्या पेशंटच बरे होण्याच प्रमाण काय? तेव्हा समजले कि त्यांच्या माहितीनुसार त्यांची उपचार पद्धती खूपच गुणकारी होती. मला जरा शंका वाटू लागली कि आबा हे बरे झालेत आणि नाटक करतायत. अर्थात पटवर्धन डॉक्टरांकडे जायची कल्पना पाटील डॉक्टरांमुळेच मिळाली म्हणा

माझ्यामुळे... ते कसं कायडॉक्टर पाटील आश्चर्याने म्हणाले.

यावर रॉबिन म्हणालातुम्हाला आठवतंय का डॉक्टर त्या रात्री तुमच्या घरी आल्यावर मी तुमच्या शेल्फ मधली वैद्यकीय मासिक पाहत होते

अ..हो...तुम्ही तिथली माझी मासिक पाहत होतातचष्मा सावरत पाटील म्हणाले.

येस.. मग त्या मासिकातच डॉक्टर पटवर्धन डॉक्टरांच नाव आणि त्यांचा लेख नजरेस पडला. त्यातल्या काही महत्वाच्या गोष्टी पटापट वाचल्या. त्यामुळे त्यांना जाऊन एकदा भेटणं महत्वाचं वाटलं. त्यांच्या बोलण्यावरून एक समजलं कि त्यांच्या नवीन उपचार पद्धतीने बरेच पेशंट बरे होतात तर त्याला आपले आबा अपवाद कसे काय. मग मी माझा संशयाचा भवरा आबांकडे वळवल्यावर गोष्टी मला समजत गेल्या. आबा हे बरे आहेत अगदी ठणठणीत आहेत. आपल्या खोलीच्या बाहेर ते खिडकीतून बाहेर पडतात ते बुटाच्या खरवडलेल्या आणि भिंतीच्या रंग उडालेल्या परिस्थितीवरून सिद्ध होतं. मगाशी मी त्यांच्या कानामध्ये कुटीरोवांच्या जमातीबद्दल माहिती असल्याचं सांगितलं ज्याने मला शंभर टक्के खात्री होती कि आबा आपलं सोंग टाकून देतीलचरॉबिन हाताची बोट एकमेकांवर ठेवत म्हणाला.

पण रॉबिन तुला कुटीरोवाजमातीबद्दल आणि त्यांच्या विशिष्ट शस्त्रांबद्दल कस समजलं” इतका वेळ ऐकत बसलेले इन्स्पेक्टर देशमुख म्हणाले.

आबांच्या खोलीत काही प्रवासवर्णनावर आधारित पुस्तकं होती. जी मी हळूच इथून घेऊन गेलो आणि माझ्या घरी जाऊन रात्रभर वाचून काढली. त्यामध्ये आबांचे मित्र गजानन सुरवसे यांनी लिहिलेलं एक पुस्तक होतं त्यातच त्यांनी आणि आबांनी दक्षिणेत प्रवास केल्या गोष्टिंची वर्णनं केली होती. त्यात त्यांनी कुटीरोवाजमातीबद्दल केलेला उल्लेख मी वाचला आणि राहून राहून मला वाटू लागलं कि नक्कीच या शस्त्राचा वापर मालातीताईच्या हत्येत झालाय.रॉबिन खुर्चीतून उठत म्हणाला.

अरे हो.. गजाननने पुस्तक लिहून झाल्यावर एक प्रत मला पाठवली होती. पण तेव्हा मी शुद्धीत न्हवतो नंतर अविनाश आणि नंदिनीच्या बोलण्यातून कळाल कि आमच्या केलेल्या प्रवासावर गजाननने पुस्तक लिहिलंयआबा केसांवरून हात फिरवत म्हणाले.

सगळ्या गोष्टी ऐकून झाल्या होत्या देशमुख पुढे होऊन आबांना चौकशीसाठी ताब्यात घेण्याच्या तयारीत होते.

चला आबा आता इतर गोष्टी आपण पोलीस स्टेशनला जाऊनच करूयातदेशमुख पुढे होत बोलले.

तुम्ही असं करू शकत नाहीत इन्स्पेक्टर. आत्ताच आबा म्हणाले ना कि त्यांनी काही केलेलं नाहीये. त्यांनी फक्त ते बर झाल्याचं लपवलं हा गुन्हा असू शकत नाहीअविनाश कातर आवाजात म्हणाला.

त्याचं उत्तरं आबाच देतील. ते पण पोलीस स्टेशनमध्ये देशमुख पुढे होत कडक आवाजात म्हणाले. जणू काही देशमुख आबांना अटक करायला पुढे जात होते.

मी कशालाही घाबरत नाही. मी कुठेही यायला तयार आहे देशमुखसाहेब. कारण मी काहीही केलेलं नाहीयेशांत स्वरात आबा म्हणाले.

नंदिनी आणि कमलाबाई तर पुरत्या हबकल्याच होत्या. आशुतोष काहीही समजत नसल्यासारखा उभा होता.

एक मिनिट देशमुख...रॉबिन खुर्चीवरून उठत म्हणाला. त्याच्या आवाजासरशी सगळेच शांत होऊन रॉबिनकडे पाहू लागले.

रॉबिन पुढे होऊन आबांना म्हणाला “त्या ओल्डोमा वनस्पतीच्या बियांचं काय झालं ज्या तुम्हाला कुटीरोवांनी भेट म्हणून दिल्या होत्या

त्या माझ्याजवळ नाहीयेत आता” आबा म्हणाले.

काय... नाहीत म्हणजेजवळजवळ ओरडतच रॉबिन म्हणाला.

तसं आबांनी आपल्या बेडवरील गादीखाली एका कोपऱ्यात हात घातला आणि एक छोटीशी कंपासपेटी सारखी दिसणारी एक पेटी बाहेर काढली.

कुटीरोवांनी दिलेल्या बिया मी प्रवासावरून परतत असतानाच या पेटीत ठेवल्या होत्या हे मला आठवतंय. घरात आल्यावर नीट बऱ झाल्यावर मी त्या बिया शोधण्यासाठी माझी खोली पूर्ण तपासली तेव्हा बेडखाली हि पेटी सापडली. मी पेटी उघडली पण त्यात एकही बि न्हवतीआबांनी पेटी उघडून दाखवली.

रॉबिनने पेटी तपासून पहिली आतमध्ये काहीही न्हवत. रॉबिनची पुरती निराशा झालेली होती.

या वनस्पतीच्या विषानेच मालतीताई यांचा मृत्यू झालाय आबा. नक्की तुम्ही बिया यामध्येच ठेवल्या होत्या.रॉबिनने आबांना विचारलं.

हो नक्की आठवतंय.. म्हणजे मालतीचा मृत्यू नक्की ओल्डोमाच्या या बियामुळेच झाला असल्याचं मला माहित न्हवत. अपघातानंतर माझं प्रवासी समान घरातच होतं. मला जेव्हा शुद्ध न्हवती तेव्हा त्या बिया कुठे होत्या माहित नाही. शुद्धीत आल्यावर मी खोलीत शोधाशोध केल्यावर मला बेडखाली पेटी सापडली पण ती रिकामी होतीआबा कपाळावर आठ्यांच जाळ आणत म्हणाले.

रिकामी पेटी हातात घेऊन रॉबिन खुर्चीवर जाऊन बसला आणि काहीतरी विचार करू लागला. इकडे देशमुखांनी बाहेरच्या हवालदाराला हाक मारली आणि आबांना घेऊन जाण्याची तयारी करू लागले. पेटीत बिया नाहीत हे आबांना माहित नाही यावर देशमुखांचा विश्वास बसला न्हवता. त्यांना वाटत होतं पोलिसी खाक्या दाखवल्यावर आबा कबुल करतील कि खून त्यांचीच केला आहे किंवा पाटलांना करायला सांगितला आहे. अविनाश आणि नंदिनी त्यांना विरोध करत होते. रॉबिन जागेवरून उठला आणि विचार करताच बाहेर व्हरंड्यात आला.

काही वेळाने बाहेरूनच त्याने देशमुखांना हाक मारली. त्याचा आवाज ऐकून देशमुख कपाळाला आठी पाडतच बाहेर आले.

काय झालं रॉबिन.. आबांना आपण पोलीस स्टेशनला न्यायला हवंय. ते अजून काही लपवत आहेत का हे पाहायला हवंदेशमुख रॉबिनला मनवत म्हणाले.

त्याची काही एक गरज नाहीये देशमुख. खुनात हत्यार कोणतं वापरलं गेलंय हे समजलंय आपल्याला.रॉबिन पुढे जात विचार करत म्हणाला.

हत्यार समजलंय पण सापडलं नाहीये अजून. खूप महत्वाची माहिती त्यांनी लपवली आहे पोलिसांपासूनदेशमुख अजीजीने म्हणाले.

बोलत बोलत देशमुख आणि रॉबिन वाड्याच्या मुख्यदरवाजाजवळ आले.

सुरुवातीला मलासुद्धा असचं वाटलं होतं कि या सगळ्यामागे आबांचंच षड्यंत्र असावं. पण आत्ता मला वाटतंय आबांनी काही केलेलं नाहीये. त्यांची जर काही चूक केली असेलच तर ती आजारी असल्याचं दिर्घकाळ केलेलं नाटक एवढीच. बाकी काही नाही. आपलं आजचं काम झालंय इथलं. तेव्हा आपण निघुयात इथूनएवढ बोलून रॉबिन दरवाजाबाहेर पडला.

रॉबिनच्या या पवित्र्यापुढे देशमुखांचा नाईलाज झाला आणि ते सुद्धा त्यांच्या पोलिसी ताफ्याला घेऊन वाड्याच्या बाहेर पडले.

क्रमशः


"द हार्टफुलनेस वे"

"द हार्टफुलनेस वे" या सुरेख पुस्तकाचा लाभ सगळ्यांनी करावा एवढं सुंदर पुस्तकं आहे ते, कमलेश डी. पटेल (दाजी) हे या पुस्तकाचे लेखक आध...