२४ एप्रिल, २०२४

गुप्तहेर सत्यवीर आणि कुटीरोवांचं शस्त्र - काळी आकृती



5.काळी आकृती

हे सिगरेट विझवल्याचे डाग आहेत तर...खिडकीबाहेरच्या त्या काळसर डागांकडे पाहत सत्यवीर मनातल्या मनात म्हणाला.

कदाचित आशुतोषला सिगरेटचे व्यसन असावे आणि त्यानेच खोलीत सिगरेट पिऊन खिडकीच्या बाहेरच्या भिंतीवर सिगरेट पिऊन विझवली असेल. सत्यवीर स्वतः सिगारेट पीत असल्याने त्यानेदेखील अशाप्रकारे भिंतीवर कित्येकवेळा सिगरेट विझवली होती. त्यामुळे ते डाग कसले असतील हे सत्यवीरच्या लक्षात आले. मगाशी वाड्याच्या खालील भागात जमिनीची तपासणी करताना जे सिगरेटचे थोटूक सापडलं होतं ते आशुतोषनेच वरून खाली टाकलेलं असावं. पहिल्यांदा सत्यवीरला वाटलं होतं कि गेस्टरूममध्ये कोणीतरी सिगरेट पिली असेल आणि सिगरेट विझवून थोटूक बाहेर फेकलं असेल. गेस्टरूमच्या अगदी वरच आशुतोषची रूम होती. आशुतोषच्या खिडकीबाहेरील काळसर डागांवरून त्यानेच सिगारेट विझवून राहिलेले थोटूक बाहेर फेकले असल्याचं स्पष्ट होत होतं.

हळुवारपणे खिडकी लावून सत्यवीरने आशुतोषकडे पाहिलं. आशुतोष अजूनही कपाळावर आठ्यांच जाळ ठेवून बसला होता. चेहऱ्यावर कंटाळवाणे भाव आणल्याच नाटक करत आणि आपणास काहीही मिळालं नाही अशा अविर्भावात सत्यवीर दरवाजाजवळ आला. अजून काही बघण्यासारखे उरलेले नसल्याने सत्यवीर आशुतोषच्या रूममधून बाहेर पडला आणि जिना उतरून खालच्या भागात आला. वाड्यात अजूनही कोणीच आलेलं न्हवत. नंदिनी स्वयंपाकघरात भांडी घासत असल्याचं बाहेरून दिसलं. स्वयंपाकघराजवळ सत्यवीरने नंदिनीला सांगितलं कि मी आता निघतोय. नंदिनीने परत एकदा चहा घेण्याविषयी सुचवलं पण त्या आग्रहाला नम्रपणे नकार देऊन सत्यवीर वाड्याबाहेर आला. आपल्या दुचाकीजवळ जात तो विचार करू लागला.

देशमुखांशी सकाळी बोलल्याप्रमाणे वाड्याच्या परिसरात खुनाच हत्यार पुरून ठेवल्याच्या खुणा दिसल्या न्हवत्या. पण काही गोष्टी नक्कीच लक्षात घेण्याजोग्या होत्या.

वाड्याच्या डावीकडचा भाग जिथे आबांच्या आणि मालतीताईंच्या खोलीबाहेरील खिडकी होती. तिथे त्या खिडकीमार्गे कोणीही हळूच आतमध्ये जाऊ शकत होतं कारण खिडकीला गज न्हवतेच. न जाणो खुन्याने त्याचं मार्गाने आत जाऊन मालतीबाईवर हल्ला केला असेल. पण तसं असेल तर मालतीताईंनी आरडाओरडा का नाही केला? खून करणारी व्यक्ती मालतीताईंच्या जवळची ओळखीची होती का? मालतीताईंशी बोलताबोलता खिडकीतून त्या व्यक्तीने काहीतरी टोचवलं असेल आणि मागच्या मागे पलायन करून मुख्यदरवाजातून हळूच कोणाला चाहूल न लागता निसटली असेल. वाड्याच दार असंही रात्र होइपर्यंत उघडंच असायचं. तिथूनच एकमेव रस्ता आहे जिथून पलायन करता येईल. आजूबाजूला राहणाऱ्या लोकांनी नक्की त्या व्यक्तीला गुपचुप पळून जाताना पाहिलं असेल. तसं असल्यास आजूबाजूला काही अंतरावर असणाऱ्या घरामध्ये चौकशी करण गरजेचं आहे न जाणो काहीतरी धागा मिळेल आणि खुन्याच्या जवळ जाण्यास उपयुक्त माहिती मिळेल.

अजून एक गोष्ट सत्यवीरला खात होती ती आशुतोषच्या खोलीत त्याच्या कपाटाच्या खालच्या भागात कपड्यांमध्ये ठेवलेला दोरखंड ज्याला मधेच गाठी मारलेल्या होत्या. कशाकरिता तो दोरखंड त्याने कपाटात ठेवलेला असेल आणि तो लपवण्याची कोणतीही तसदी त्याने घेतलेली न्हवती. पण तूर्तास त्या दोरखंडाचा विचार बाजूला ठेवून सत्यवीरने आसपासच्या घरांमध्ये चौकशी करण्याचं ठरवलं ज्यामुळे खुन्याविषयी काही धागादोरा हाती लागेल.

सत्यवीरने दुचाकी चालू केली देसाई वाड्याच्या बाजूला काही अंतरावर जे कोणी लोकं राहत होते तिथे जाऊन लोकांकडे जाऊन त्यांनी खून झालेल्या दिवशी काही पाहिलं का याची चौकशी चालू केली. आसपास राहणारे लोक आपल्या कामाशी काम ठेवणारे होते काही घरे हि वयोवृद्ध जोडप्यांची होती ज्यांची दृष्टी वयोमानानुसार अंधुक झालेली होती त्यामुळे खून झाला त्या दिवशी आसपास कोणाला संशयास्पद हालचाली जाणवल्या नाहीत कि कोणी व्यक्ती दिसली नाही. आपल्या म्हातारपणाचे दिवस घालवत ती लोकं आरामात राहत होती. तिथल्या आसपासच्या सगळ्या भागातल्या घरांमध्ये जाऊन त्याने चौकशी केली या सगळ्यात संध्याकाळ उलटून गेली आणि रात्र पडू लागली. आसपासच्या सगळ्या लोकांकडे चौकशी करून झाल्यामुळे आणी हाती काहीही न लागल्याने सत्यवीरने परतीचा रस्ता धरला. दुचाकीवरून परतत असताना काही ठिकाणी थांबून त्याने आसपासच्या दुकानांमध्ये सुद्धा विचारपूस केली पण कोणाला काहीच सांगता आले नाही. आता चांगलाच अंधार पडला होता. रस्त्यावर जास्त वर्दळ न्हवती.

दुचाकीवरून पुढे आल्यावर अचानक सत्यवीरला आठवलं कि इथेच जवळ डॉक्टर पाटील याचं घर आहे. एकदा घरी जाऊन त्यांच्याशी बोलावं असं त्याला वाटलं. त्यामुळे थोडं पुढे जाऊन सत्यवीरने डॉक्टर पाटलांच्या घराजवळ आपली दुचाकी थांबवली. आसपास अंधार पसरला होता आणि रस्त्यावरचे दिवे खराब असल्यामुळे लागलेले न्हवते. डॉक्टर पाटलांच घर हे एक बैठे घर होतं. त्या बैठ्या घराला चीटकुनच बाजूला पाटील डॉक्टरांचा दवाखाना होता. सत्यवीर दुचाकीवरून खाली उतरला. पाटलांच्या घरातले दिवे बंद होते फक्त मागच्या खोलीत एक दिवा लागलेला दिसत होता. सत्यवीर चालत चालत पाटलांच्या मुख्य दरवाजाजवळ आला.

सत्यवीरने दारावर टकटक केली. आतून काहीच प्रतिसाद आला नाही. सत्यवीर थोडावेळ शांत उभा राहिला आणि आतमधला कानोसा घेऊ लागला पण त्याला कसलाही आवाज ऐकू आला नाही. आजूबाजूला चांगलाच अंधार पडलेला होता रातकिड्यांची किरकिर ऐकू येत होती. सत्यवीरने परत एकदा जोरात दारावर टकटक केलं. थोड्या वेळाने.. कोण आहे...? असा डॉक्टरांचा कातर आवाज आला.

डॉक्टर, मी गुप्तहेर सत्यवीर.. दरवाजा उघडासत्यवीरने उत्तरं दिलं. त्यावर आतून कसलाही प्रतिसाद आला नाही. सत्यवीरला जरा आश्चर्य वाटलं कि डॉक्टर पाटील दरवाजा उघडायला वेळ का लावत आहेत. सत्यवीर तसाच उभा राहिला. काही वेळाने आतून डॉक्टर पाटलांनी दरवाजा अर्धवट उघडत बाहेर डोकावून पाहिलं. त्यांच्या कपाळावर घामाचे बिंदु जमा झालेले होते.

अ..गुप्तहेर..र..सत्यवीर.. एवढ्या रात्री इथे एवढचं कसबस ते बोलले.

त्यांचाकडे एक जळजळीत कटाक्ष टाकत सत्यवीर म्हणालाहो गुप्तहेर आहे म्हणूनच एवढ्या रात्री आलोयत्याच्या या वाक्यावर डॉक्टर पाटलांनी काहीही न बोलता आवंढा गिळला.

आता मला आतमध्ये येऊ देणार आहात कि इथे उभ राहूनच बोलणार आहातसत्यवीर शक्य तितकं शांत आवाज ठेवून म्हणाला.

अ..क..काय.. डॉक्टर पाटील सत्यवीरच म्हणण काहीच न समजल्यासारख बोलले. पाटलांच्या अशा वागण्यावर मात्र सत्यवीर संतापला आणि त्याने हातानेच दरवाजावर जोर देऊन पाटलांना बऱ्यापैकी ढकलतच दरवाजा उघडला आणी घरात प्रवेश केला.

अहो.. अहो.. क..काय करताय असं का आतमध्ये घुसतायपाटील डॉक्टर पडता पडता स्वतःला सावरत म्हणाले आणि दरवाजापासून जरा दूर फेकले गेले. पण त्यांच्या या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत सत्यवीरने आतमध्ये प्रवेश मिळवला आणि घराच्या आतल्या भागाचं निरीक्षण करू लागला. हॉलमध्ये सत्यवीर उभा होता. तिथे बसायला सोफा, टेबल, खुर्च्या असं सगळं साहित्य होतं. डाव्या भिंतीजवळ एक छोटंसं शेल्फ होतं ज्याला काचेचं दार होतं. त्यामध्ये वर्तमानपत्र आणि काही वैद्यकीय क्षेत्रातील मासिकं होती. डॉक्टर पाटलांच्या घराकडे पाहून ते एक सधन व्यक्ती असल्याचं जाणवत होतं आणि तसंही डॉक्टर असल्याकारणाने तेवढी सुबत्ता असणं साहजिकच होतं.

दार उघडायला एवढा उशीर का केलात डॉक्टर” आजूबाजूला निरीक्षण करणारी आपली नजर न हटवता सत्यवीरने पाटलांना प्रश्न केला.

ते...मी.. झोपलो होतो....पाटील थोडंस चाचरत म्हणाले. त्यांची मान खाली होती आणी सत्यवीरकडे पाहण्याचं धाडस देखील त्यांना होतं न्हवत.

अच्छा.. घरात तुम्ही एकटेच राहता वाटतसत्यवीर जवळच्या शेल्फ जवळ जात म्हणाला.

अ..हो.. मी एकटाच राहतोपाटील उत्तरले. अजूनही त्यांच्या आवाजात म्हणावा तसा जोर न्हवता.

लग्न केलं नाहीये तुम्ही... म्हणजे वय पाहता तुम्हाला एव्हाना मुलं असायला हवी होतीअसं विचारत सत्यवीरने काचेच शेल्फच दार हळूच सरकवल आणि आतील मासिक बाहेर काढून एका पाठोपाठ एक मासिक चाळू लागला.

नाही.. लग्नासाठी कधी वेळच नाही मिळाला आणि तसही मला एकट राहायला आवडतपाटील सत्यवीर काय पाहतोय तिकडे पाहत म्हणाले. सत्यवीर त्याच्या हातातली एक एक मासिक चाळत होता. त्यातील एक मासिक त्याने व्यवस्थित आतमध्ये उघडून पहिले. नामांकित डॉक्टर लोकांचे विविध विषयावरचे लेख आणि प्रबंध त्यामध्ये होते. त्यातले काही प्रबंध आणि लेखांवर सत्यवीरने सहज नजर फिरवली.

अरे वाह.. खूपच छान माहिती आहे हिसत्यवीरने मुद्दाम वातावरण हलक करण्याचा प्रयत्न केला.

हो.. माझ्या कामासाठी महत्वाचे आहे ते... पण मला एक सांगा एवढ्या रात्री तुम्ही मला भेटायला कशासाठी आलातअसं म्हणत पाटील सत्यवीरच्या चेहऱ्याकडे उतावळ्या नजरेने पाहू लागले.

असंच.. सहज वाटलं तुम्हला भेटावं.. तुमचं घर पाहिलं नाही न कधीहातातली मासिकं बाजूला ठेवत सत्यवीर पाटलांकडे रोखत म्हणाला. सत्यवीरच्या नजरेला नजर देण्याचं धाडस पाटलांमध्ये न्हवत.

बाजूला वळत सोफ्याजवळ जात डॉक्टर पाटील म्हणाले म्हणजे काही विशेष कारण आहे का.. खुन्यासंदर्भात काही धागादोरा हाती लागलाय का तुमच्या?”

तूर्तास तरी काही नाही. काही कळत नाहीये हो डॉक्टर... कसं शोधावं आणि कुठे शोधावं. तो वाडा एकतर एवढ्या लांब. आसपास कोणी काही पाहिलं असल्याचं सांगत नाही कि कसला सुगावा नाही” मुद्दाम त्रागा करत सत्यवीर वैताग आल्यासारखी अक्टिंग करत म्हणाला.

ओह्ह..एवढ बोलून पाटील जमिनीकडे पाहत म्हणाले.

मला पाणी द्याल का?” सत्यवीरने डॉक्टर पाटील यांना विचारलं.

अ..हो.. आत्ता आणतो” असं म्हणत डॉक्टर पाटील आतमध्ये स्वयंपाक घरात वळले.

सत्यवीर सोफ्याजवळच्या टेबलाजवळ असणाऱ्या खुर्चीत येऊन बसला. जरा मागे टेकून बसणार तेवढ्यात त्याला टेबलाच्या पृष्ठभागावर पाण्याचं एक वर्तुळ दिसलं. जणू काही कोणीतरी ग्लास ठेवला असावा. ते पाण्याचं वर्तुळ एकदम ताज असल्यासारखं होतं. त्या पाण्याच्या वर्तुळाला बोटाने स्पर्श करत सत्यवीरने ते नक्कीच पाणी आहे कि आणखी कोणता द्रव पदार्थ हे पाहण्यासाठी त्याचा नाकाने वास घेतला. पण ते पाणीच होतं. कोणासाठी पाणी ठेवलं असेल इथे. कि स्वतःच पाटील डॉक्टरांनी पाणी पिऊन ग्लास इथे ठेवला असेल. पण पाटील तर म्हणाले कि मी झोपलो होतो म्हणून म्हणजे मग ते मागे बेडरूममध्ये असतील. मग इथे पाण्यचा ग्लास कोणी ठेवला असेल? सत्यवीर विचार करतच होता तेवढ्यात पाटील हातात काचेचा पाण्याचा ग्लास घेऊन आले. त्यांच्या हातातून पाण्याचा ग्लास घेऊन सत्यवीरने थोडसं पाणी पिलं आणि टेबलावर तो ग्लास ठेवून दिला. पाटील समोर हात बांधून उभे होते.

तुमचं घर तसं बरंच मोठं आहे पाटीलसत्यवीर म्हणाला.

हो, खूप आधी बांधलं होतं आणि माझं क्लिनिक सुद्धा बाजूला असल्याने जवळच घर असलेलं बऱ पडते.पाटील हातांचा चाळा करत उत्तरले.

क्लिनिक घराला लागुनच आहे का तुमचं? तिथे जाण्यासाठी दरवाजा घरातूनच आहे का? सत्यवीरने विचारलं.

नाही.. क्लिनिकमध्ये येण्यासाठी पेशंट लोकांसाठी दुसरा दरवाजा आहे बाहेरचा... एक दरवाजा घरात आहे जो क्लिनिकमध्ये जातो. तो मी वापरतोपाटलांनी माहिती दिली आणि खाली पाहू लागले.

आपण घरात आल्यापासून पाटील डॉक्टर असं विचित्र वर्तन करत असल्याचं पाहून सत्यवीरचा त्यांच्यावरचा संशय नक्कीच बळावला होता. पण आपल्या चेहऱ्यावर तसं न दाखवता सत्यवीर शांतपणे बसून होता. टेबलावर त्याने मगाशी अर्धा पिऊन ठेवलेला ग्लास परत उचलला आणि राहिलेलं पाणी पिऊन टाकलं. टेबलावर त्याच्या ग्लास ठेवण्यामुळे टेबलावर अगदी तसचं ठळक पाण्याचं वर्तुळ तयार झालेलं होतं. जसं त्याने थोड्या वेळापूर्वी टेबलावर दुसऱ्या बाजूला पाहिलं होतं. ते पाहून त्याच्या चेहऱ्यावर हलकंच स्मित झळकलं.

खरतरं तुमचं सगळं घर पाहण्याचा विचार आहे.सत्यवीर खुर्चीवर उठत म्हणाला.

आत्ता.. एवढ्या रात्री... सकाळी या न.. सकाळी पहा....कपाळावरचा घाम पुसत पाटील अजीजीने म्हणाले.

आत्ता काय अडचण आहे” सत्यवीरला माहित होतंच कि पाटील नकार देणार तरी नकली आश्चर्य व्यक्त करत त्याने विचारलं.

आत्ता मला झोपं लागलीय आणि उद्या मला लवकर उठायचय. पेशंट येणारेत उद्या बरेचपाटील आळस देण्याचं नाटक करत म्हणाले.

त्यांची हि नाटकं पाहता पाहता सत्यवीरच्या एक गोष्ट मात्र लक्षात आलेली होती. डॉक्टर पाटील नक्कीच काहीतरी लपवत आहेत. पाटलांना नक्कीच कोणीतरी भेटायला येणार आहे असं दिसतंय किंवा कोणीतरी पाटील डॉक्टर यांना नुकतंच भेटून गेलंय. त्यामुळेच पाटलांनी त्या व्यक्तीला पाण्याचा ग्लास देऊ केला असेल त्या व्यक्तीने पाणी पिऊन ग्लास टेबलावर ठेवल्याने पाण्याचा ग्लासच्या खुणा उमटल्या होत्या. सत्यवीरने शांतपणे आपल्या हनुवटीवर बोट ठेवून काहीतरी विचार केला आणि थोड्या वेळात तो म्हणाला ठीक आहे डॉक्टर आता उशीर झालाय नंतर कधीतरी येईन भेटायलाअसं म्हणून तो झटकन दरवाजाजवळ जाऊ लागला. पाटील लगोलग त्याचा पाठोपाठ आले. बाहेर पडून सत्यवीरने पाटलांना निरोप दिला तेव्हा पाटील दरवाजातच उभे होते आणि सत्यवीर कधी एकदा जातोय याची वाट पाहत दरवाजा लावण्याचा तयारीत होते.

सत्यवीर आपल्या दुचाकीजवळ जात मिश्कील हसत होता. बाहेर खूपच अंधार पडलेला होता. रातकिड्यांची किरकिर पण खूप वाढलेली होती. सत्यवीरने दुचाकी चालू केली आणि पाटलांच्या घराकडे नजर टाकली. तेव्हा पाटलांनी नुकतंच दार लावून घेतलेलं त्याला दिसलं. गाडी चालू करून सत्यवीरने थोडी पुढे आणली आणि एका गल्लीच्या पुढे आडोशाला उभी केली. सत्यवीरला दाट संशय होता कि डॉक्टर पाटील हे काहीतरी लपवतायत त्यामुळे घरातून बाहेर पडून थोडं पुढे येऊन सत्यवीरने दुचाकी आडोशाला लावली होती आणि परत पायी डॉक्टर पाटलांच्या घराकडे पाळत ठेवायला चालला होता. पाटील यांना भेटायला नक्कीच कोणीतरी आलेले असावे असं त्याला वाटून गेलं. त्यामुळेच त्यांच्या घरावर पाळत ठेवावी असं त्याला वाटून गेलं. थोड्या वेळातच पाटील डॉक्टरांच्या घरासमोर एका बंद दुकानाच्या बाजूंला असलेल्या झाडींमध्ये सत्यवीर उभा राहिला. इथून डॉक्टर पाटलांच घर आणि बाजूचं क्लिनिक स्पष्ट दिसतं होतं. डॉक्टर पाटलांच्या घरात त्याने सहजच भेट दिलेली होती तेव्हा त्याला माहित न्हवत कि कोणीतरी आधीच डॉक्टर पाटलांना भेटायला आलेलं आहे. त्यामुळेच डॉक्टर पाटलांनी लवकर दरवाजा उघडला नाही कारण जी कोणी व्यक्ती आत आलेली होती त्या व्यक्तीला आतमध्ये लपवायला त्यांना वेळ लागला.

डॉक्टर पाटलांचा घाबरा झालेला चेहरा आणि सत्यवीर आल्यामुळे उडालेली त्यांची तारांबळ, टेबलावरच्या पाण्याच्या ग्लासच्या ताजा खुणा. जे पाणी पाटलांनी भेटायला आलेल्या व्यक्तीला दिलं असेल त्यामुळे सत्यवीरचा डॉक्टर पाटलांवर संशय जास्तच दृढ झाला. आपला संशय खरा आहे कि नाही हे बघण्यासाठीच झाडीमध्ये आपल्याला व्यवस्थित लपवून सत्यवीर डोळे उघडे ठेवून पाटलांच्या घराकडे नजर देऊन उभा होता.

सत्यवीर पाटलांच्या घरातून निघून जाताच काही वेळाने ती व्यक्ती बाहेर पडेल कारण लगेचच बाहेर जाण्याचा धोका ती व्यक्ती घेणार नाही थोडी जास्त काळोखी रात्र होण्याची वाट पाहिलं असा सत्यवीरचा कयास होता. हाताची घडी घालून सत्यवीर पाटलांच्या घराकडे पापणी सुद्धा न लवता पाहत होता. कारण ती व्यक्ती कोण आहे हे कळणे खूप गरजेचे होते. अशा प्रकारे गुपचूप येऊन पाटलांना भेटायचे कारण काय असावे? मुख्य म्हणजे मालतीताईंच्या खुनाशी त्या व्यक्तीचा काही संबंध असावा का? या सारख्या प्रश्नाची उत्तरं देखील त्याला मिळणार होती. रात्र अजूनच गडद झालेली होती. रस्त्यावर चिटपाखरूदेखील न्हवत. रातकिड्यांची किरकिर जास्तच वाढलेली होती. दूरवर काही कुत्री जोरजोरात भुंकत होती. डॉक्टर पाटलांच्या घराजवळ अंधार असल्याने जास्त स्पष्ट दिसत न्हवते त्यामुळे घराजवळ जाऊन तिथे उभं राहिल्याने स्पष्ट दिसणार होतं. पण पाटलांच्या घराजवळ लपून पाहता येईल अशी आडोशाची जागा अथवा झाडी न्हवती. तसही लांबून पाटलांचं घर आणि क्लिनिक यांची दोन्ही प्रवेशद्वार इथून दिसतं होती. त्यामुळे इथूनच पाहण्याचा निर्णय सत्यवीरने घेतला होता. वाट पाहता पाहता जवळपास अर्ध्या तासाचा काळ लोटला. अजूनही त्या व्यक्तीचा काही पत्ता न्हवता. खरंच ती व्यक्ती आत असेल ना? कि आपला तर्क चुकला आहे असे विचार सत्यवीरच्या मनात घोळू लागले. हातावर हात चोळत सत्यवीर उभा होता.

एवढ्यात.. त्याची नजर समोर डॉक्टर पाटलांच्या क्लिनिकच्या दरवाजावर गेली. दरवाजातून एक व्यक्ती हळूच बाहेर पडलेली सत्यवीरने पहिली. तसं सत्यवीर जरासा खाली वाकला म्हणजे आपला तर्क बरोबर होता तर. इतका वेळ ती व्यक्ती पाटलांच्या घरातच क्लिनिकमध्ये लपून बसलेली असावी. सत्यवीर झाडीमध्ये लपून श्वास रोखून पाहू लागला. क्लिनिकचा दरवाजा बंद झाला. त्या व्यक्तीने आपल्या अंगाभोवती भोवती मोठी चादर किंवा शाल लपेटलेली होती त्यामुळे त्या व्यक्तीचा चेहरा स्पष्ट दिसतं न्हवता आणि लांबून ती व्यक्ती कोण असावी याबाबत अंदाज देखील येत न्हवता. क्लिनिकचा दरवाजा बंद झाल्याक्षणी झटक्यात त्या व्यक्तीने क्लिनिकच्या बाजूने वळून पाटलांच्या घराला वळसा घातला आणि घरच्या मागच्या बाजूला गेली जिथे काळोख होता. ती व्यक्ती तिकडे वळल्याक्षणी सत्यवीर चपळाईने पण सावधगिरीने झाडीतून बाहेर आला आणि आडमार्गाने त्या व्यक्तीच्या मागे झपाट्याने जाऊ लागला. इकडे तिकडे पाहत झपाझप पावले टाकत ती व्यक्ती पाटलांच्या घरामागे जाऊन मागच्या रस्त्याने अंधाऱ्या गल्लीतून जाऊ लागली. सत्यवीर देखील हळूहळू त्या व्यक्तीचा माग घेत पाठलाग करत पुढे जाऊ लागला. आजूबाजूला पूर्ण शांतता होती. पुढे जाऊन एका मोक्याच्या क्षणी झडप घालून त्या व्यक्तीला पकडायचा डाव सत्यवीरने आखला.

गल्ली संपून आडमार्गाने जाणाऱ्या रस्त्यावर ती व्यक्ती आली. तो रस्ता त्या व्यक्तीचा सवयीचा असल्याप्रमाणे ती व्यक्ती झपाझप पावले टाकत पुढे जात होती. सत्यवीर मात्र दगडधोंड्यांवर आदळत आडमार्गावरील काटेरी झुडूपांमध्ये अडकत कसाबसा वेग राखून चालला होता. पटकन धावत पुढे जाऊन त्या व्यक्तीला जमिनीवर आडवे पडायचा विचार सत्यवीरने केला आणि त्या नादातच घात झाला. वेगात पाठलाग करण्याचा नादात एका काटेरी झाडीमध्ये सत्यवीरची पँट अडकली. काटेरी झाडांनी त्याची पँट ओढली गेली आणि त्याचा तोल गेला. तोल जाऊन सत्यवीर बाजूला एका दगडांच्या राशीवर जाऊन पडणारच होता पण तरी सावध असल्याने दगड चुकवत दोन्ही हात दगडांच्या राशीवर टेकवत हुलकावणी देऊन बाजूला रस्त्याच्या एका उतरंडीला जाऊन पाठीवर आडवा पडला. दगडांवर आपटून होणारा कपाळमोक्ष सत्यवीरने चुकवला होता पण त्या नादात दगडांची राशी कलंडली आणी त्यावरचे २ गोलाकार दगड रस्त्याच्या उताराकडे गडगडत गेले. त्याचा आवाज झाला आणि पुढे जाणाऱ्या त्या गूढ व्यक्तीला तो आवाज आला. त्या व्यक्तीने मागे वळून पहिले तर दोन दगड रस्त्यावर गडगडत चाललेले दिसले. सत्यवीर रस्त्याच्या बाजूला उताराला जिथे थोडीफार झाडी होती तिथे आडवा पडल्याने आणि अंधार असल्यामुळे त्या व्यक्तीचा नजरेस सत्यवीर काही दिसला नाही. पण कोणीतरी आजूबाजूला असणार या भीतीने त्या गूढ व्यक्तीने पळत जाण्यास सुरुवात केली. सत्यवीरची पाठ चांगलीच शेकली होती. त्याला पटकन उठता येईना. थोड्यावेळाने कसबस उठत कपडे झटकत त्याने आजूबाजूला पहिले. ती व्यक्ती अंधाराचा फायदा घेऊन पसार झालेली होती.

शीट.. हातचं सावज असं निसटून गेल्याने त्याला प्रचंड राग आला होता.हाताने पाठ चोळत सामोर पहिले. पुढे दूरवर २-३ लुकलुकते दिवे घरे असलेली त्याला दिसली. त्या भागाकडेच ती व्यक्ती गेल्याचं त्याच्या ध्यानात आलं. लुकलुकणारे ते दिवे हे देसाई वाडा आणि त्याच्या पुढची काही घरे इथले दिसत होते. आता परत पाठलाग करण्यात किंवा पुढे जाण्यात काही अर्थच उरलेला न्हवता. त्यामुळे आपली दुखरी पाठ चोळतच सत्यवीर आपल्या दुचाकी लावलेल्या जागेकडे जाण्यासाठी वळला.

क्रमशः



२१ एप्रिल, २०२४

गुप्तहेर सत्यवीर आणि कुटीरोवांचं शस्त्र - झडती



4.झडती

दुपारचे बारा वाजत आले होते. इन्स्पेक्टर देशमुख तणतणच सत्यवीरच्या घराजवळ आले. त्यांच्या चेहऱ्यावर ताण आणि राग दोन्ही गोष्टी स्पष्ट दिसत होत्या. देसाई खून प्रकरण लवकरात लवकर सोडवावं असं त्यांना वाटत होतं. तसे त्यांना वरिष्ठांकडून स्पष्ट आदेशसुद्धा होते. पण त्यांच्या हाती काही लागतं न्हवत. खुनाच हत्यार पण अजून त्यांच्या हाती लागलेलं न्हवत. तपासाची पुढची दिशा निश्चित होत न्हवती त्यामुळे एका वेगळ्याच तणावाखाली ते होते आणि अशाच अविर्भावात ते सत्यवीरच्या घराच्या दरवाजाजवळ येऊन जोरजोराने दरवाजा ठोठावू लागले. दरवाजा उघडायला काही वेळ लागला पण नंतर आतून सत्यवीरने दरवाजा उघडला.

अरे काय सत्यवीर.. किती वेळ लावलास दरवाजा उघडायलादेशमुख त्रासिक सुरात बोलले. सत्यवीरच्या उत्तराची वाटही न पाहता समोरच्या टेबलावर आपली डोक्यावरची पोलिसी टोपी आपटली आणि शेजारच्या खुर्चीत स्वतःला झोकून दिलं. देशमुखांचं हे वर्तन पाहता देशमुख वैतागलेल्या अवस्थेत आहेत हे कळायला सत्यवीरला गुप्त्हेरीतल्या कौशल्याची गरज न्हवती.

थोडी झोप घेत होतो देशमुखसाहेब, त्यामुळे दरवाजा उघडायला उशीर झाला.” देशमुखांच्या समोरील रिकाम्या खुर्चीत विसावत सत्यवीरने टेबलावरचा लायटर घेतला आणि जवळील सिगारेट काढून शिलगावली.

अरे, हि काय वेळ आहे झोपायची. १२ वाजत आलेत. आपण सध्या किती गुंतागुंतीच प्रकरण सोडवत आहोत त्यावर काम करायचं सोडून तुला झोप कशी लागून शकतेमनगटावरील घड्याळाकडे पाहत अजूनच त्रासिक सुरात देशमुख बोलेल.

काल रात्री कमलाबाईकडे जाण झालं. तिथून माघारी आलो तेव्हा विचार करता करता झोप लागली नाही. मनामध्ये काही दुवे जुळवता जुळवता झोप उशिरा आली म्हणूनच उशिरा जाग आली. पण तुम्ही आज एवढे वैतागलेल का आहातशांतपणे सिगारेटच्या धुराची वलये हवेत सोडत सत्यवीर म्हणाला.

सत्यवीर एवढे दिवस झाले मालतीताईंच्या खून प्रकरणाला, आपल्या हाती अजून काहीच कसं लागत नाहीये. ना कोणी संशयित ना खुनाच हत्यारदेशमुख त्रासिक सुरात म्हणाले.

काही प्रकरणात धीराने काम करावं लागतं देशमुखसाहेब हे कोणत्याही मुरलेल्या गुन्हेगाराचे काम नाहीये. ज्याची गुन्हेगारी पद्धत गुन्हेगारी विश्वातील लोकांशी मिळतीजुळती असेल. इथे आपली गाठ एका हुशार व्यक्तीशी आहे जिने धीर धरून बरोबर संधी साधून मालतीताईंचा काटा काढलाय. त्यामुळे गुन्हेगाराचा हाच शिरस्ता अवलंबून आपल्याला धीराने काम घ्यावं लागेल. सरतेशेवटी तो आपल्या हाती लागेलच हे नक्की.सत्यवीरने सिगरेटची राख टेबलावरील रिकम्या डब्यात झटकत सांगितलं.

बऱ, मला सांग काही नवीन माहिती हाती लागली तुला कमलाबाईच्या घरीदेशमुख शांत होत म्हणाले.

हम्म.. काहीशी नवीन माहिती हाती लागली म्हणू शकता, पण ठोस काही नाही.” सत्यवीर हवेत एक झुरका सोडत म्हणाला.

म्हणजे नक्की काय? आणि तुला कोणावर संशय आहे का? कमलाबाईंनी विशेष काय सांगितलं? देशमुख एका मागोमाग एक प्रश्न विचारत गेले.

देशमुख तुम्हाला तुमच्या चौकशीत हे समजलं का कि मालतीताई या आबांच्या दुसऱ्या पत्नी होत्या आणि अविनाश हा आबांचा पहिल्या पत्नीपासून झालेला मुलगा होता? तो लहान असताना त्याचं संगोपन नीट व्हावं म्हणून आबांनी दुसरं लग्न मालतीताईंशी केलं आणि नंतर मालतीताईंपासुन त्यांना आशुतोष हा दुसरा मुलगा झालासत्यवीर शांतपणे म्हणाला.

काय सांगतोस काय आम्हाला हि माहिती न्हवती. चौकशीत कुठे असे प्रश्न विचारलेच गेले नाहीत.देशमुख अतिशय आश्चर्यचकित होऊन म्हणाले.

या माहितीचा आपल्याला कितपत उपयोग होईल माहित नाही पण पोलिसांनी कमलाबाईंची योग्य चौकशी करण आवश्यक होतं. घरात खून घडला असेल तर अशा प्रकरणात घरातल्या नोकरांना घरातल्या माणसांची आणि त्यांच्या स्वभावाची इत्यंभूत माहिती असते. म्हणूनच ती माहिती वेगळ्या पद्धतीने घेणे गरजेचे असते हे तुम्हाला माहिती असेलचसत्यवीर सिगारेटची राख झटकत म्हणाला.

हम्म.. कमलाबाईंना आम्ही वाड्यातच प्रश्न विचारले होते. तेव्हा तिने घटनेसंदर्भात माहिती दिली कि ती त्या दिवशी वाड्याच्या मागे असलेल्या विहिरीवर नंदिनिसोबत कपडे धुवत बसली होती. कळशी विहिरीत पडली म्हणून कमलाबाई वाड्याच्या आतमध्ये आल्या. तेव्हा मालतीताई जमिनीवर कोसळलेल्या दिसल्या अशी माहिती त्यांनी दिली त्याची खातरजमा पण करून घेतली, कारण इतर सगळ्यांच्या स्टेटमेंटमध्ये एकवाक्यता वाटत होती. मला वाटलं तेवढं पुरेसं आहेदेशमुख हनुवटी खाजवत बोलले.

तेवढ पुरेसं होतंच, पण वाड्यात तुम्ही कमलाबाईंना वेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जरी असते तरी तिला उत्तर द्यायला प्रशस्त वाटलं नसतं. म्हणूनच प्रत्यक्ष तिच्या घरी जाऊन भेट घेऊन चौकशी करणे भाग होतं आणि त्यासाठीच मी तिच्या घरी जाऊन आलोएवढं बोलून सत्यवीरने सिगरेटचा शेवटचा झुरका घेऊन सिगरेट विझवून डोकं वर करून खुर्चीत बसला.

अच्छा... आम्ही सध्या बाहेर चौकशी करत आहोत, कि मालतीताईंना कोणी राजकीय शत्रू वगैरे होते का जे असे कृत्य करू शकतात.देशमुख सांगू लागले.

पण त्यांना पुढे काही बोलू न देताच सत्यवीर डोकं वर करत मधेच म्हणाला

“काही वेळा शत्रू फक्त बाहेरचेच असतात असं नाही ते घराच्या आतमध्ये देखील असू शकतात.

सत्यवीरच्या या वक्तव्यावर देशमुख विचारात पडले कि सत्यवीर नक्की कोणाबद्दल बोलत असावा.

देशमुखसाहेब मालतीताईंचा सख्खा मुलगा आशुतोषबद्दल काय माहिती काढलीत तुम्हीसत्यवीर आता खुर्चीवर ताठ बसत म्हणाला.

आशुतोष हा परदेशात शिक्षणाला जाण्याची तयार करत होता. मालतीताईंचीच तशी इच्छा होती म्हणून मागील वर्षीच त्याने त्यासाठीची तयारी करण्यासाठी शहरातल्या मुख्य भागात क्लास देखील लावला आहे. मालतीताईंचा मृत्यू झाला तेव्हा तेव्हा तो क्लासमध्येच होता. त्याची खातरजमा पण केली.देशमुखांनी माहिती पुरवली.

ओह्ह.. अस्सं आहे तर... परदेशी शिक्षण म्हणजे पैसे पण जास्तच लागत असतील अर्थात देसाई कुटुंबियांना पैशाची चणचण तशी नाहीये पण तरीही एक गोष्ट विशेष आहे. अविनाशच शिक्षण पदवीपर्यंत देखील झालेलं नाहीये पण धाकट्या मुलाला आशुतोष मात्र परदेशात जायला मुभा मिळालीय. इथे एक प्रकारचा भेदभावच झालेला दिसून येत नाही का तुम्हाला.सत्यवीरने प्रश्नार्थक मुद्रा करत देशमुखांना विचारलं.

कदाचित अविनाशला शिक्षणात रस नसेल आणि तसंही त्याची फळझाडांची नर्सरी आहे. त्यामुळे धंद्यामध्ये त्याला रस असेल म्हणून त्याने शिक्षण पूर्ण केलं नसेल.देशमुखांनी आपलं मत मांडले.

कि मुद्दाम अविनाशला छोटा मोठा उद्योग काढून दिला आहे आणि धाकट्या मुलाला आशुतोषला उच्चशिक्षण घ्यायला लावलंय. कदाचित कोणतातरी वेगळाच बेत असेल त्यामागे. कदाचित अविनाशला आयुष्यात काहीतरी मोठं करायचं असेल पण मालतीताईंनी त्याला ते करू दिलं नाही उलट नर्सरी काढून दिली. त्यामुळे अविनाशला आपल्या स्वप्नांना तिलांजली द्यावी लागल्याचा राग असेलसत्यवीरने आपला संशय व्यक्त केला.

तुला नक्की काय म्हणायचंय सत्यवीर?” देशमुख गंभीर होत म्हणाले.

दोन्ही भावांना घरात समान वागणूक मिळत होती कि नाही? दोघांमधले संबंध कसे होते? आपल्याला सगळ्या शक्यतांचा विचार करावा लागेलसत्यवीर आपले दोन्ही हात डोक्यामागे ठेवत म्हणाला.

तसं बघायला गेलं तर कमलाबाईवर तरी किती विश्वास ठेवायला हवा. कारण मालतीताईंना पहिल्यांदा जमिनीवर पडलेलं त्यांनीच पाहिलं होतं कदाचित कळशी न्यायला वाड्यात आल्यावर त्यांचीच कसल्या तरी हत्याराने मालतीबाई यांचा काटा काढला असेलदेशमुखांनी आपली शंका व्यक्त केली.

कमलाबाई सुद्धा संशयाच्या बाहेर नाहीयेत. पण तुम्ही दिलेल्या या तर्कानुसार डॉक्टर पाटील सुद्धा हि गोष्ट करू शकतात. मालतीताईं यांच्यावरचा त्यांचा राग त्यांनी बागेत जेव्हा त्यांची मी म्हाताऱ्याच्या रुपात भेट घेतली तेव्हाच व्यक्त केला होता. वाड्याच दार हे नेहमीच उघड असतं. संध्याकाळी आबांची तब्बेत तपासण्याच्या बहाण्याने ते आंत आले असतील आणि वाड्यात कोणी नाही हे पाहून मालतीताईंच्या खोलीबाहेर आले. नुकत्याच अंघोळ करून आलेल्या मालतीताई पाटलांना दिसल्या असतील. मग संधीचा फायदा घेऊन बेसावध मालतीताईंना मागून इंजेक्शनला वेगळीच कोणतीतरी विषारी सुई लावून टोचली असेल मग लपून छपून आपल्या क्लिनिकमध्ये पळून गेले असतील. डॉक्टरी पेशात असल्याने विष आणि विश्सदृश पदार्थांबद्दल त्यांना नक्कीच ज्ञान असावे. नंतर लोकांनी बोलावल्यावर तपासण्याच्या बहाण्याने साळसुदपणे वाड्यात आले असतील.सत्यवीर आपला तर्क मांडला.

हम्म.. हा तर्क पण चपखल बसतोय. विषसदृश पदार्थ मिळवणे डॉक्टरांना सहज शक्य आहेदेशमुखांनी पुस्ती जोडली.

या तर्कात नक्की कोण बसतंय हे पाहण्याआधी आपल्याला खुनात कोणतं हत्यार वापरलं गेलंय त्या हत्यारबद्दल माहिती मिळणं आवश्यक आहे. उगाचच कोणावरही संशय घेऊन त्या बाजूने तपास करण्यापेक्षा एकदा का खुनाच हत्यार मिळालं कि ते कोण वापरू शकत याचा शोध घेऊन त्या दिशेने तपास करता येईल.सत्यवीरने विश्वासाने सांगितलं.

पण हत्यार मिळणार कसे. घटनास्थळी असं कोणतही हत्यार किंवा काही संशयास्पद आढळलं नाही. पोलिसांनी वाड्यातील सगळ्यांच्या खोल्या तपासल्या तरीसुद्धा काहीही सापडलं नाही.देशमुख हताश होत म्हणाले.

सगळीकडे शोधलं असं मला वाटत नाही देशमुखसत्यवीर देशमुखांकडे घारीसारखी नजर रोखून म्हणाला.

म्हणजे तुला म्हणायचं काय सत्यवीर? पोलिसांनी कुठे शोधायचं राहिलंय आतादेशमुखांनी साशंकतेन विचारलं.

पोलिसांनी वाड्याच्या आसपास पाहिलं का? वाड्याचं कंपाऊंड जिथं आहे तिथून आतपर्यंत ३-४ मीटर रिकामी जागा वाड्याच्या सगळ्या बाजूंनी आहे. कदाचित तिथे आसपास कुठेतरी ते हत्यार पुरून ठेवलेलं असू शकत. जमिनीवर खणलेल्या तशा प्रकारच्या खुणा असू शकतीलसत्यवीर बारीक डोळे करत म्हणाला.

ओह्ह्ह... तू म्हणतोस त्या जागा खरंतर तितक्या व्यवस्थितपणे पहिल्या गेल्या नाहीयेत. अगदीच वरवरची पाहणी झाली.देशमुख विचार करत म्हणाले.

तसं असेल तर आजचं वाड्यात जाऊन मी पाहून येतो, बघू हाती काही लागतंय. कारण तिथे आसपास काहीतरी मिळेल असं मला वाटतंयसत्यवीर खुर्चीवरून उठत म्हणाला. अंगावरचे कपडे झाडत तो आरशात स्वतःला निरखू लागला.

ठीक आहे सत्यवीर, तु तुझ्या पद्धतीने बघ काही मिळतंय का? काही मदत लागली तर सांगदेशमुखसुद्धा खुर्चीवरून उठत म्हणाले.

तुम्ही एक काम कराल का?” भिंतीवरच्या आरशांत हातानेच केसांचा भांग पाडत सत्यवीर देशमुखांना म्हणला.

जरूर.. सांग काय हवंय तेदेशमुख म्हणाले.

तुमचा एक खास माणूस आशुतोषच्या मागावर ठेवा. आशुतोषचा क्लास कुठे आहे? क्लास व्यतिरिक्त तो कुठे जातो? त्याचे मित्र कोण आहेत. या सगळ्या गोष्टींची माहिती मिळवासत्यवीर म्हणला.

खरंतर आशुतोषच्या मागावर माणूस का ठेवायचा. सत्यवीरला त्याच्यावर एवढा संशय का वाटतोय याचा उलगडा देशमुखांना होईना.

जरूर..पण असं करण्यामागे काही विशेष कारण” देशमुखांनी अखेर विचारलेच.

तरुण मुलांचा खरा स्वभाव हा घरातल्या माणसांपेक्षा घरातल्या बाहेरच्यांना जास्त माहित असतो. तेव्हा त्याचाबद्दलची खरी माहिती आपणाला बाहेरूनच मिळू शकतेसत्यवीर वळून देशमुखांकडे पाहत म्हणाला.

ते कारण देशमुखांना पटलं. त्यांनी मनगटावरील घड्याळाकडे पाहिलं तशी देशमुखांना ड्यूटीवर जाण्याची आठवण झाली. सत्यवीर लगेचच आवरून देसाई वाड्यावर जाणार होता. त्यामुळे देशमुखांनी सत्यवीरची रजा घेतली आणि काही महत्वाचं कळल्यास तातडीने फोन करण्यास सांगून देशमुख सत्यवीरच्या घरातून पोलीस स्टेशनला निघून गेले. देशमुख गेल्यावर सत्यवीर अंघोळ वगैरे करून तयार झाला आणि आपल्या दुचाकीवर बसून देसाई वाड्याकडे जाण्यास निघाला.

देसाई वाड्यावर पोहोचल्यावर त्याने आपली दुचाकी वाड्याच्या बाहेरचं एका झाडाखाली लावली. वाड्याच दार उघडच होतं त्यामुळे सत्यवीर आतमध्ये आला. वाड्यात शुकशुकाट जाणवत होता. आतमध्ये तुळशी वृन्दावनाजवळ येऊन सत्यवीर सगळीकडे नजर फिरवत असतानाच त्याला जिन्याच्या बाजूला पाठमोरी ऊभी असलेली नंदिनी दिसली. नुकतंच विहिरीवर धुणं धुवून ती आली होती आणि बादलीतले कपडे पिळत व्हरंड्यातल्या दोरीवर कपडे सुकायला टाकत होती. तिला पाहताच सत्यवीर जागीच उभा राहिला. नंदिनीला मागे सत्यवीर आल्याचं कळाल नाही. ती आपल्याच कामात गर्क होती. सत्यवीरला आपल्या उपस्थितीची कल्पना तिला कशी द्यावी कळेना. नंदिनीची पाठमोरी मूर्ती न्याहाळत सत्यवीर तसाच उभा होता. नंदिनीने आपला पदर कमरेला खोचला होता त्यामुळे तिचा कमनीय देह दिसून येत होता. ओले कपडे झटकताना शरीराच्या हालचालींमुळे तिच्या केसांच्या बटा अलगदपणे तिच्या गालावर रेंगाळत होत्या त्यामुळे ती अजूनच सुंदर दिसत होती. सत्यवीर तसं तिला मागून नुस्त पाहत बसणं प्रशस्त वाटेना त्यामुळे तो जरासा खाकरला.

त्यासरशी नंदिनीची मान झटकन मागे वळली. सत्यवीरकडे पाहताच ती कावरीबावरी झाली. कारण सत्यवीर मागे उभा होता याची तिला कल्पनाच न्हवती. हातातली कपड्याची वळकटी तिने खाली ठेवली आणि कमरेचा पदर सोडून तिने तो डोक्यावर कसाबसा धरला. चेहऱ्यावरच्या बटा हाताने कानामागे खोचल्या. नंदिनीने कपळावर लावलेली एक नाजुकशी टिकली तिच्या सौंदर्यात जास्तच भर टाकत होती.

क..कधी आलात तुम्ही.. माफ करा मला समजलंच नाही तुम्ही आलेलं” नजर खाली करत कावऱ्याबावऱ्या अवस्थेत नंदिनी बोलली. तिचा आवाज खूपच नाजूक आणि गोड होता.

मी आत्ताच आलो...वाड्याच दार उघड होतं म्हणून सरळ आत आलो...माफ करा माझ्या अचानक येण्याने तुम्ही दचकलातसत्यवीर सुद्धा मधाळ आवाजात बोलला.

नाही माझंच लक्ष न्हवत आणि वाड्याच दार पण उघडच असत. त्यामुळे आवाज दिल्याशिवाय कोण आलंय हे कळत नाहीनजर जमिनीकडे ठेवूनच नंदिनी म्हणाली.

काही नाही त्या दिवशी मी रात्री अवेळी वाड्यात आलो होतो त्यामुळे वाडा नीट पाहता आला नाही. त्यामुळे म्हटलं दिवसाउजेडी वाडा नीट पाहावाइकडे तिकडे नजर फिरवत सत्यवीर म्हणाला.

अच्छा..थांबा मी पाणी आणते आणि चहा टाकते तुमचासाठीलगबगीने स्वयंपाकघराकडे वळत नंदिनी म्हणाली.

नाही नाही.. त्याची काहीही आवश्यकता नाहीये.. मी फक्त वाडा पाहायला आलोय तुम्ही उगाच तसदी घेऊ नका. तुम्ही तुमची कामं करा माझ्यामुळे व्यत्यय नको त्यातपुढे जाणाऱ्या नंदिनीला रोखत सत्यवीर म्हणाला.

अहो व्यत्यय कसला.. घरात आलेल्यांना चहा पाणी करण या घराची पद्धतच आहेनंदिनी म्हणाली.

नाही नको... अशा औपचारिकतेची गरज नाहीये आणि तसही माझं चहापाणी झालंय. त्यामुळे खरंच तसदी घेऊ नकासत्यवीर अतिशय सौम्य शब्दात म्हणाला. सत्यवीरचा ठाम नकार ऐकून मग नंदिनीने जास्त आग्रह केला नाही.

बंर वाड्यात कोणकोण आहे आत्तासत्यवीरने विचारलं.

मी आणि आशुतोष भावोजी आहेत. बाकी कोणी नाहीनंदिनीने माहिती पुरवली.

ओके, अविनाश आणि आबा कुठे आहेत. कमलाबाई आलेल्या नाहीत का आज कामालासत्यवीरने प्रश्न केला.

आबांना घेऊन आमचे हे नर्सरीवर गेले आहेत्त. तिथे कामं पण आहेत आणि आबांना पण सहज बदल म्हणून नेलंय. कमलाबाई जरा उशिरा येतीलनंदिनी म्हणाली.

आबांची तुम्ही दोघं खूप काळजी घेता खरोखरंच असा मुलगा आणि सून मिळाल्याने ते स्वतःला भाग्यवानच समजत असतीलसत्यवीर स्मित करत म्हणाला.

अहो ते तर कर्तव्यच आहे आमचं. आमच्या ह्यांचे वडील ते माझेच वडील असं मानून त्यांची काळजी आम्ही नेहमीच आनंदाने घेतो. आबांची स्मृती जाण्याआधी आबा आमच्या दोघांनाहि खूप जीव लावायचे. खूप मजा मस्ती करायचे आम्हा दोघांसोबत. मला कधीही ते माझे सासरे आहेत असं वाटलं नाही. मला तर पोटच्या मुलीप्रमाणे सांभाळायचे. त्यांना वाचनाची आणि भटकंतीची खूप आवड होती बऱ्याच ठिकाणी ते फिरून आले होते. वाचनाची आवड मला त्यांच्यामुळेच लागली. पण जसा त्यांचा अपघात झाला तसं ते सगळ्या गोष्टी विसरले. आम्हाला देखील ओळखेनासे झालेनंदिनीचे डोळे पाणावले आणि निराश होतं जमिनीकडे पाहून अश्रू ढाळू लागली.

नंदिनीला निराश झालेलं पाहून तिला जास्त काही विचारायला नको असं सत्यवीरला वाटलं.

ठीक आहे मी जरा वाड्यातील खोल्या पाहतो तुमच्या कामात अजून व्यत्यय आणत नाही” असं म्हणत सत्यवीरने विषय बदलला.

नंदिनी देखील काही लागल्यास ती स्वयंपाकघरात आहे असं साश्रुनयनांनी सांगून निघून गेली. नंदिनी निघून गेल्यावर सत्यवीरने एकवार खालच्या सगळ्या खोल्यांकडे नजर फिरवली आणि त्याची नजर मालतीताईंच्या खोलीकडे गेली. मागच्या वेळी ती खोली पहिल्याने सत्यवीरला आता परत तिथे जाण्याची जास्त आवश्यकता वाटली नाही. त्यामुळे त्याच्या शेजारील आबांच्या खोलीकडे त्याने मोर्चा वळवला. पुढे जात दरवाजा उघडून सत्यवीरने आबांच्या खोलीत प्रवेश केला. आबांचा बेड व्यवस्थित लावलेला होता. आजूबाजूला जास्त समान न्हवत. समोरच्या भिंतीवर एक खिडकी होती. ती सत्यवीरने जवळ जाऊन उघडली. खिडकीला गज न्हवतेच. बाहेर चांगलंच कडक ऊन पडलेलं होतं.

सत्यवीरने खिडकीच्या बाहेरच्या बाजूला जमिनीवर नजर फिरवली. आसपास खुरटी गवत आणि सदाफुलीची झाडं उगवलेली होती. जमिनीवर जास्त माती दिसत न्हवती. उलट जमीन जास्तच टणक दिसत होती. जरावेळ आसपास नजर फिरवून सत्यवीरने खिडकी लावून टाकली. आबांच्या खाटेच्या बाजूला एक कपाट होतं ते जवळ जाऊन सत्यवीरने उघडलं. आतमध्ये आबांचे ३-४ सदरे, पायजमे आणि काही चादरी सोडल्यास इतर काहीही गोष्टी न्हवत्या म्हणून सत्यवीरने कपाट लावून टाकलं. बेडच्या खाली पाहावं म्हणून सत्यवीर जमिनीवर ओणवा झाला आणि बेडच्या खाली पाहू लागला बेडच्या आतमध्ये त्याला आबांच्या बुटाचा एक राखीव जोड दिसला. तो बूट त्याने बाहेर काढला. बूट तसा जुनाट वाटत होता आणि पुढच्या भागात चौड्याकडे तो जरासा घासला गेला होता. नेहमीच्या वापरात असावा अशी चिन्हं त्यावर होती. बूट परत तसाच ठेवून सत्यवीर मागे असलेल्या टेबलाकडे वळला.

खिडकीच्या बाजूला असलेल्या टेबलावर आबांच्या गोळ्या आणि औषधं होती. मागच्या वेळी आलो तेव्हा इथे पुस्तकं ठेवलेली होती असं त्याला आठवलं. त्या टेबलाच्या खाली एक बंद कप्पा होता. सत्यवीरने तो कप्पा उघडला तिथे आतमध्ये १०-१२ पुस्तकांचा ढीग रचलेला होता. आबांना पुस्तकं वाचायची आवड होती त्यामुळे एवढी पुस्तकं त्यांच्या खोलीत असणं साहजिक होतं. पुस्तके बाहेर काढून त्यांच्या शीर्षकावरून तो नजर फिरवू लागला. काही कथा कादंबऱ्या होत्या तर काही पुस्तकं हि प्रवासवर्णनांवर आधारित होती. डोंगर दऱ्यामधील भटकंती आणि जंगल प्रवासातील सुरस अनुभव यावर आधारलेली ती पुस्तकं होती. त्यातली काही पुस्तकं सत्यवीरने आपल्या हातात घेतली आणि ती घेऊन जाण्याचा विचार त्याने केला. पुस्तके कशी न्यावी असा विचार करत असतानाच त्याला टेबलाजवळ काही कापडी पिशव्या पडलेल्या दिसल्या. त्यातल्याच एका रिकाम्या पिशवीत त्याने ती पुस्तके टाकली आणि तो खोलीबाहेर आला. नंदिनी स्वयंपाक घरातच होती. तिच्या नजरेत न येता सत्यवीर हळूच वाड्याच्या दरवाजाजवळ आला आणि ती पुस्तकांची पिशवी गाडीच्या हँडलला लावली. ही पुस्तके त्याला गुपचूप न्यायची होती. पिशवी अडकवून तो परत वाड्याच्या आतमध्ये आला.

पण वाड्याच्या दरवाजातून आतमध्ये न जाता त्याने आता दरवाजाच्या डाव्या बाजूने आतुन कंपाउंडजवळून चालायला सुरुवात केली. डावीकडे कंपाऊंडची भिंत आणि उजवीकडे वाड्याच्या खोल्यांचा भिंती यांच्या मधल्या भागातून तो हळुवार चालत होता. जमीनीच व्यवस्थित निरीक्षण करत कुठे काही सुगावा लागतोय का हे पाहतच तो चालला होता. पुढचा स्वयंपाकघरच्या बाहेरचा भाग ओलांडून तो वाड्याच्या डाव्या भागाकडे आला. हा भाग आबांच्या आणि मालतीताईंच्या खोलीबाहेरचा होता. चालत चालत तो मगाशी आबांच्या खोलीची खिडकी उघडी होती त्या खिडकी खाली आला. बारकाईने तो तिथल्या अजुबाजुच्या परिसराच निरीक्षण करून लागला.

खिडकी सत्यवीरच्या हाताला लागेल एवढ्याच उंचीवर होती. खिडकीच्या खाली भिंतीवर जरा व्यवस्थित पाहिल्यावर दिसलं कि तिथला भिंतीवरचा रंग काहीतरी घासल्यामुळे उडालेला होता. खिडकीच्या खाली जमिनीवर खाली उगवलेल्या खुरट्या गवतांच तो बारकाईने निरीक्षण करू लागला. तिथली जमीन हि टणक स्वरुपाची होती त्यामुळे तिथे कसल्याही खणल्याचा किंवा इतर खुणा न्हव्त्या. पण जमिनीपासून एका फुटावर भिंतीवर मातीचे डाग पडलेले होते ते पाहून सत्यवीर थोडासा विचारात पडला, नंतर आजूबाजूला ३-४ सदाफुलीच्या झाडांच्या गर्दीमध्ये त्याने हात टाकून तिथली जमीन पण व्यवस्थित तपासली. न जाणो तिथे काहीतरी असेल म्हणून, पण काहीच संशयास्पद आढळलं नाही. ओठावर ओठ दाबून तो काहीतरी विचार करत तो पुढे चालू लागला. आता सत्यवीर मालतीताईंच्या खोलीबाहेरील खिडकीजवळ आला तिथे आसपास जास्त झाडी न्हवती. नाही म्हणायला वाळलेली खुरटी गवत होती. हि खिडकी सुद्धा हाताला येईल एवढ्या उंचीवर होती. पण खिडकीखालचा भिंतीवरचा रंग मात्र जसा आहे तसाच होता. तिथे कसल्याही खाणाखुणा न्हव्त्या. खालची जमीन सुद्धा टणक होती आणि कसल्याही खुणा न्हवत्या. सत्यवीरने खिशातून आपली डायरी बाहेर काढली आणि सगळ्या गोष्टींच्या पटापट नोंदी घेऊ लागला. तिथून पुढे चालत सत्यवीर आता वाड्याच्या मागील बाजूस आला.

वाड्याच्या मागील भागात २ मोठी प्राजक्ताची झाडे होती आणि एका कोपऱ्यात रहाट असलेली विहीर. वाड्याच्या मागून विहिरीपासून जवळच वाड्याच्या आतल्या भागात जाण्यासाठी एक चिंचोळा रस्ता होता त्याचं मार्गाने कमलाबाई त्या दिवशी विहिरीत रहाटाला लावलेली कळशी पडल्यावर दुसरी कळशी आणायला आत गेली होती. प्राजक्ताच्या झाडाखाली प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडलेला होता. तिथे जाऊन सत्यवीरने पायानेच जमीन चापचून पहिली. आजूबाजूला झाडाचा पालापाचोळा सुद्धा बराच पडलेला होता. जवळ जाऊन पाने बाजूला करत त्याने तिथला भाग न्याहाळला. जमीन थोडीशी नरम आणि ओलसर होती. कदाचित वाड्यातील मंडळी पाण्याने इथे प्राजक्ताच्या झाडाच्या आसपास सडा मारत असावेत. मग तिथून तो पुढे समोरच्या विहिरीजवळ आला. विहिरीत त्याने डोकावून पाहिलं तर विहिरीला चांगलंच पाणी होतं तसच पाणी इतकं स्वच्छ दिसतं होतं कि विहिरीचा तळसुद्धा स्पष्ट दिसतं होता. सत्यवीरने विहिरीत डोकावून पहिले आणि जरा डोळे बारीक करून निरीक्षण केल्यावर तळाशी एक पितळेची कळशी दिसली. कमलाबाई आणि नंदिनी कपडे धुत असताना ती कळशी पडलेली हे कमलाबाईने सांगितल्याच सत्यवीरला आठवलं. मालतीताईंच्या मृत्यू प्रकरणानंतर ती कळशी बाहेर काढायचं कोणाच्या लक्षात आलं नसेल. विहीर पाहून झाल्यानंतर सत्यवीर आता वाड्याच्या उजवीकडच्या भागात आला जिथे अडगळीच सामन ठेवायच्या खोल्या होत्या. पुढे आल्यावर गेस्टरूमची बाहेरची खिडकी होती. या भागात बरीच छोटी छोटी झुडुपे होती. सत्यवीर तिथल्या भिंतीच्या जवळची जमीन चापचू लागला.

तेवढ्यात.. गेस्ट रुमच्या खिडकीखालील जमीन न्याहाळताना त्याला एक छोट्या गवताच्या झुडुपात अडकलेलं सिगारेटच थोटूक दिसलं. सत्यवीरने ते थोटूक हातात घेतलं आणि नाकाने जळालेल्या भागाचा वास घेतला. जळलेल्या त्या थोटकाच्या वासावरून एक गोष्ट त्याला समजली कि हि सिगारेट १-२ दिवस जुनी आहे कारण आतील तंबाखुचा दर्प तितका कडक वाटत न्हवता आणि थोटूक सुद्धा कमी सादाळलेलं होतं. कदाचित गेस्टरूममध्ये कोणीतरी आलेलं असावं ज्याने सिगारेट पिऊन थोटूक बाहेर फेकलं असेल असं वाटून त्याने त्याने थोटूक बाजूला फेकून दिलं. तिथून पुढची आसपासची जागा व्यवस्थित पाहत सत्यवीर वाड्याच्या पुढच्या भागाकडे आला. त्याने संपूर्ण वाड्याला प्रदक्षिणा मारली होती या उद्देशाने कि वाड्याच्या आसपास काहीतरी पुरावा आढळेल, कुठेतरी काहीतरी लपवलं असेल.

पण तसं काहीच आढळलं नाही. वाड्याच्या मुख्यदाराजवळ येऊन त्याने तिथली जमीन सुद्धा नीट पहिली पण संशयास्पद असं काहीच आढळलं नाही. काहीच हाताशी आला न्हवत त्यामुळे सत्यवीर तिथेच विचारात उभा होता. नंतर त्याच्या लक्षात आलं कि नंदिनीने मगाशी सांगितलं होतं कि आशुतोष वाड्यातच आहे आणि आता वाड्यात आलोच आहोत तर त्याचीपण भेट घ्यावी असं त्याला वाटलं. सत्यवीर खालच्या जिन्यावरून वरच्या मजल्यावर आला जिथे आशुतोषची खोली होती.

जिन्याच्या विरुद्ध बाजूला अविनाशच्या नर्सरीच्या सामान ठेवण्याच्या आणि अडगळीच्या खोल्या होत्या. ज्या त्याने आधीच पाहिलेल्या होत्या. जिन्याच्या पुढे अविनाश आणि नंदिनीची झोपायची खोली होती. तिथे एक धावता कटाक्ष टाकून मग पुढे असलेल्या आशुतोषच्या खोलीकडे जावं असा विचार करत त्याने अविनाश आणि नंदिनीच्या झोपायच्या खोलीची कडी उघडून आत प्रवेश केला. या दाम्पत्याची खोली छान सजवल्यासारखी दिसत होती. भिंतीवर विविध प्रकारची निसर्गचित्रांच्या पेंटीग्स, टेबलावर छानसा टेबलक्लॉथ आणि त्यावर फ्लावरपॉट. मध्यभागी मोठा बेड आणि त्याच्या बाजूला एक मोठं कपाट. सत्यवीरने कपाट आणि खोलीचे कोपरे व्यवस्थित चेक केले. काही विशेष सापडलं नाही. सगळं काही नॉर्मल दिसतं होतं. त्यामुळे सत्यवीर त्या खोलीतून बाहेर पडला आणि दरवाजाला कडी लावून पुढे आला. अडगळीच समान ठेवलेली खोली ओलांडून तो आशुतोषच्या खोलीजवळ आला. दरवाजापुढे उभं राहून थोडं थांबून त्याने दारावर टकटक केली.

वहिनी मला भूक नाहीये तुम्ही जेवून घ्याआतून आशुतोषचा आवाज आला. नंदिनी जेवायला बोलवत असेल असं वाटून त्याने आतून आवाज दिला होता म्हणून थोडंसं थांबून सत्यवीर बोलला

आशुतोष मी सत्यवीर.. दरवाजा उघडशील का..? तुझाशी थोडं बोलायचं होतं

सत्यवीरने आवाज दिल्यावर आतून कसलाही प्रतिसाद आला नाही. थोड्या वेळाने सत्यवीरने परत हाक मारली.

आशुतोष दरवाजा उघडशील का?

काही क्षण शांततेत गेले आणि थोड्या वेळाने दरवाजा अर्धवट उघडला गेला. आतून चष्मा घातलेल आणि कपाळावर आठ्यांच जाळ असलेलं आशुतोषच डोकं दिसलं.

काय हवंय तुम्हालाआशुतोषने आतूनच तसाच अर्धवट दरवाजा ठेवून विचारलं.

मला आत येऊ देशील का? तुझ्या आईच्या खुनासंदर्भातच तपास करायला मी आलोय. तेव्हा दरवाजा उघड आणि मला आत येऊ देतसत्यवीर जरा कडक आवाजात म्हणाला. सत्यवीरचा तसा कडक स्वर ऐकून आशुतोष थोडासा टरकला आणि त्याने दरवाजा उघडून सत्यवीरला आतमध्ये घेतलं. आत आल्यासरशी सत्यवीरची नजर घारीसारखी सगळ्या रूमभर फिरू लागली. आशुतोषच्या खोलीत सामान बरेच होते आणि खोली अजगळासारखी अस्तव्यस्त होती.

कपड्याचे जोड जमिनीवर पडलेले, कॉलेजची सॅक कोपऱ्यात अर्धवट उघडी पडलेली, भिंतीवर कोणत्यातरी म्युसिकल बँडचे पोस्टर, एका कोपऱ्यात कागदांची रद्दी आणि त्यांना बांधायचा सुतळ्या, जवळच अभ्यासाला लागतात तसे प्रश्नसंचाचे गठ्ठे पडलेले होते. चहूकडे पाहत हाताची घडी मागे बांधून सत्यवीर पाहत होता.

अरेरे.. काय रे तुझ्या खोलीची अवस्था कमलाबाई तुझी खोली झाडत नाही कि काय? आजूबाजूला पाहत सत्यवीर समोरच्या खिडकीजवळ आला.

नाही.. तसं नाही काही.. मीच माझ्या रुममध्ये कोणाला येऊ देत नाहीआशुतोष मान खाली घालून खालच्या सुरात म्हनाला.

ओह्ह... असं काय दडवुन ठेवलयस तू इथे कि कोणाला आतमध्ये येऊ देत नाहीससत्यवीर इकडे तिकडे पाहत बोलला.

त..तसं काही नाही..मला एकट राहायला आवडत. फक्त कधी मधी मी दादा आणि वहिनींसोबत गप्पा मारत असतो ते पण खाली जाऊनआशुतोष शांत स्वरात म्हणाला.

दादा आणि वहिनींसोबत जास्त जमत वाटत तुझं.. असो सध्या काय करत असतोस तु.. म्हणजे काय शिकतोस? सत्यवीरने विचारलं.

मी सध्या परदेशात शिकायला जाण्याची तयारी करतोयआशुतोषने सावकाशपणे उत्तरं दिलं.

हम्म...काय वाटत तुला आशुतोष. तुझ्या आईची अशी हत्या कोणी केली असेलमुद्दाम त्याला राग येईल अशा भाषेत सत्यवीर म्हणाला.

म..मला नाही माहितखाली मान घालून बाजूच्या खुर्चीवर बसत कोऱ्या चेहऱ्याने आशुतोष म्हणाला.

आशुतोषच्या खोलीला एकच खिडकी होती. गज नसलेली ती खिडकी सत्यवीरने उघड्ली आणि तिथेच उभा राहिला.

अच्छा.. तुझा दादा सोबत कशी वागायची तुझी आई. कारण अविनाश तुझा सावत्र भाऊ आहे नाखिडकीच्या चौकटीवर हात ठेवून अगदीच स्पष्ट बोलत आणि नजरेच्या कोपऱ्यातून आशुतोषचे हावभाव पारखत सत्यवीर म्हणाला.

या वाक्यावर आशुतोषने जरा चळवळ केली. काहीही न बोलता हाताची बोट एकमेकांवर घासत तो जमिनीकडे पाहू लागला.

त्रास द्यायची का तुझी आई अविनाशलासत्यवीर अजूनच स्पष्ट बोलला.

माझी आई खूप कडक स्वभावाची होती. सगळ्यांशीच ती कडकपणे वागायची.आशुतोषने सांगितलं.

तुझ्यासोबत पण असंच कडकपणे वागायची का तुझी आईसत्यवीर थोडंसं पुढे झुकत म्हणाला.

नाही.. तितकं नाही आशुतोष चाचरत म्हणाला आणि त्याने आपली नजर दुसरीकडे वळवली.

यापुढे सत्यवीरने आशुतोषला काही प्रश्न विचारले नाही. खोलीमधल्या कपाटाजवळ जात सत्यवीरने कपाटाचा दरवाजा उघडला. आतमधले कपडे खोलीमधल्या कपड्यासारखेच असत्याव्यस्त पडलेले होते. २-३ कप्पे होते आणि काही बॉक्सेस होते ज्यात औषधं आणि बँडेज होतं. कपाटाच्या तळातल्या कप्प्यात सत्यवीरला एक दोरखंड दिसला. त्याला मधेच गाठीगाठी बांधलेल्या होत्या. सत्यवीरने काहीही न बोलता उभा राहुनच तो दोरखंड न्याहाळला. दोरखंड थोडासा जाड असून लांब होता. आतील कपडे इकडे तिकडे करत सत्यवीरने तो दोरखंड नीट न्याहाळला पण आशुतोषला याबद्दल काही विचारलं नाही. आशुतोष सत्यवीरच्या हालचाली बघत तसाच खुर्चीवर कपाळावर आठ्या पाडून बसला होता. सत्यवीरने आपल्या डायरीत काही नोंदी घेतल्या आणि कपाटाच दार लावून खोलीच्या खिडकीजवळ आला. त्याने खिडकीच्या बाहेर वरून खाली पाहिलं. या खिडकीपासून खालची जमीन बऱ्यापैकी उंचावर होती. खिडकीच्या चौकटीला पाहत सत्यवीरने थोडंस बाहेरच्या बाजूला झुकत बाहेरच्या भिंतींवर नजर टाकली. खिडकीच्या बाहेरच्या बाजूला भिंतीच्या एका भागावर काळसर डाग पडलेले त्याला दिसले.

सत्यवीरने आपलं डोकं अजून थोडसं बाहेर काढलं आणि ते डाग बघण्याचा प्रयत्न करू लागला अर्थात हे आशुतोषच्या लक्षात न येता. कशाचे काळसर डाग असावेत ते असं वाटून सत्यवीरने पुढे झुकत जरा बारकाईने पाहिल्यावर अचानक सत्यवीरची ट्यूब पेटली.

ओहो.. असं आहे तर... ते काळसर डाग कशाचे असावेत याचा अंदाज सत्यवीरला आला होता.

क्रमशः


१९ एप्रिल, २०२४

गुप्तहेर सत्यवीर आणि कुटीरोवांचं शस्त्र - कमलाबाई




3.कमलाबाई

दुपारचं ऊन सरून संध्याकाळ होत आलेली होती. दत्तनगरजवळील वस्तीमध्ये आतल्या गल्ल्यांमध्ये माणसांची जरा वर्दळच होती. उन कमी झाल्याने लहान मुले गल्ल्यांमध्ये खेळत होती. वयोवृद्ध लोकं घराच्या बाहेर उभी राहून शेजारच्यांशी चकाट्या पिटत उभी होती. घरातल्या कर्त्या पुरुषाची कामावरून येण्याची वेळ झाल्याने त्यांच्या बायका स्वयंपाकाची तयारी करण्यात गुंतल्या होत्या. दत्तनगरच्या आसपासच संध्याकाळच्या सुमारासच हे नेहमीचच वातावरण होतं. वस्तीमध्ये बरीच छोटी मोठी घरे होती. आता म्हणायला वस्ती असली तरी तेथील घरे हि पक्क्या स्वरूपाचीच होती. तिथली लोकं पोटापुरत कमावत होती आणि दोन खोल्यांच्या घरात निवांत राहत होती. गल्ल्यांच्या पुढे मुख्य रस्त्याला चिटकून काही दुकाने आणि छोट्याश्या टपऱ्या पण होत्या. त्यातल्याच एका टपरीजवळ उभं राहून सत्यवीर शांतपणे सिगारेट ओढत टपरीवाल्याशी गप्पा मारत उभा होता. आत्ताच टपरीवाल्याला त्याचे हात ओले करून त्याने माहिती मिळवली होती कि कमलाबाई ह्या आतमधल्या गल्ल्यांच्या रांगेत शेवटच्या दोन खोल्यांमध्ये आपल्या नवरा आणि लहान मुलीसोबत राहतात. नवरा एका छोट्या कंपनीच्या गेटवर वॉचमन म्हणून रात्रपाळीत काम करत होता आणि छोटी मुलगी शाळेत शिकत होती. काही वेळातच कमलाबाई देसाई वाड्यावरची कामं आटोपून घरी येतील असा सत्यवीरचा कयास होता आणि त्यांचीच वाट पाहत मुख्य रस्त्याकडे नजर ठेवून तो उभा होता.

मालतीताईंचा मृत्यू झाला तेव्हा कमलाबाई वाड्यामध्येच होत्या एवढचं न्हवे तर मालतीताई जमिनीवर पडल्या हे कमलाबाई यांनीच आधी पाहिलं होतं. वाड्यावर कमलाबाईची चौकशी करण सत्यवीरला रास्त वाटलं नाही कारण कदाचित अविनाशसमोर त्यांना जास्त बोलता आला नसतं. त्यामुळेच कमलाबाई यांची चौकशी त्यांच्याच घरात जाऊनच करणे सत्यवीरला क्रमप्राप्त वाटत होतं. संध्याकाळी कमलाबाई यांचा नवरा घरात नसतो. कमलाबाई आणि त्यांची मुलगीच असते. त्यामुळे घरात जाऊन चौकशी केल्याने कमलाबाई कोणतेही दडपण न घेता सगळ्या गोष्टी इत्यंभूत सांगतील असा सत्यवीरचा अंदाज होता. वाड्यावर कमलाबाईनी सत्यवीरला पाहिलं असल्याने त्या लगेचच ओळखतील असा विश्वास सत्यवीरला वाटत होता. सत्यवीर आपल्याच विचारांमध्ये मग्न होऊन सिगारेट ओढत शांतपणे उभा असतानाच त्याचं लक्ष मुख्य रस्त्याकडे गेलं.

हातातली कापडी पिशवी सांभाळत डोक्यावर पदर घेऊन काष्टा घातलेली कमलाबाई लगबगीने मुख्य रस्ता ओलांडून आतमधल्या गल्ल्यांमध्ये प्रवेश करत होती. तिला असं येताना पाहताच सत्यवीर जरा टपरीच्या आडोशाला सरकला आणि कमलाबाई गल्लीतून पुढे जाण्याची वाट पाहू लागला. काही वेळातच कमलाबाई लगबगीने टपरीपुढून समोरच्या गल्लीत निघून गेली. ती लगबगीने घरी जात असल्याने तिने सत्यवीरला पाहण्याचा प्रश्नच न्हवता. कमलाबाई पुढे गेली आहे याची खातरजमा करून सत्यवीरने हातातली सिगारेट खाली टाकून विझवली आणि ठराविक अंतर ठेवून कमलाबाईच्या मागोमाग जाऊ लागला. असा प्रसंग येणार हे सत्यवीरला ठावूक होतं म्हणूनच सत्यवीरने आज त्याची मोटारसायकल न आणता चालतच तो या ठिकाणी आला होता. जेणेकरून कोणाचही लक्ष त्याच्याकडेन न जाता त्याला सावकाशपणे कमलाबाईच्या मागे जाता यावं. काही वेळातच कमलाबाई आपल्या दोन खोल्यांच्या घरापाशी येऊन ठेपली आणि दरवाजा लोटून आतमध्ये निघून गेली. सत्यवीर अगदी शांतपणे चालत येत होता. काही वेळातच तोही कमलाबाईच्या घराजवळ येऊन पोहोचला. थोडा थांबून त्याने दारावर टकटक केली. तसा आतून आवाज आला- कोन हाये

मी गुप्तहेर सत्यवीर, आपण देसाईच्या वाड्यावर भेटलो होतो. तुमच्याशी थोडं बोलायचं होतं.” सत्यवीरने बाहेरूनच आवाज दिला. यावर आतून काहीच प्रतिसाद आला नाही. पण थोड्या वेळातच दरवाजा उघडला गेला आणि डोक्यावर पदर घेऊन कमलाबाई दरवाजा उघडून उभी राहिली.

नमस्कार मला ओळखलंत ना तुम्ही सत्यवीर हात जोडून थोडसं स्मित करत म्हणाला.

कमलाबाई काहीशी भांबावलेल्या स्थितीत उभी होती. कारण अचानक सत्यवीर आपल्या घरापाशी येऊन उभा ठाकेल असं तिला वाटलं न्हवत आणि तसंही आपल्याकडे सत्यवीरचं काय काम असेल या विचाराने ती गोंधळली होती. तिच्या चेहऱ्यावरचे हे सगळे भाव सत्यवीरने भराभर टिपले आणि कमलाबाईला विश्वासात घेत म्हणाला.

कमलाबाई काळजी करू नका. वाड्यामधल्या नुकत्याच घडलेल्या प्रकरणाबद्दल मला थोडीशी माहिती हवी होती. तुम्ही अजिबात काळजी करू नका मी तुमच्या मालकीणबाईना न्याय मिळवून देण्यासाठीच पोलिसांच्या सांगण्यावरूनच तपास करतोय.सत्यवीर मनमोकळ हास्य करत म्हणाला.

सत्यवीरचा हसरा चेहरा पाहून कमलाबाई जरा निश्चिंत झाल्या. कारण नाही म्हटलं तरी पोलिसांच्या प्रकरणात नसती ब्याद ओढवून घेण्यात त्यांना काहीही स्वारस्य न्हवत. बाहेर जरा अंधार पडू लागला होता. कमलाबाईनी सत्यवीरला आत बोलावून घेतल. सत्यवीर घरात आला आणि दाराजवळच्याच लाकडी खुर्चीवर विसावला. कमलाबाई आत स्वयंपाक घरात गेली. समोरच लोखंडी कॉटवर कमलाबाईची मुलगी अभ्यास करत बसली होती. सत्यवीर आत येताच ती किलकिल्या डोळ्यांनी सत्यवीरकडे पाहू लागली. सत्यवीरने तिच्याकडे पाहून हलकेच स्मितहास्य केलं आणि घराचं निरीक्षण करू लागला. ते दोन खोल्यांचं पक्क घर होत. पुढे एक खोली आणि मागे स्वयंपाकघर. पुढच्या खोलीत एकाच दिवा होता त्याचा मिणमिणता प्रकाश सगळीकडे पसरला होता. एका कोपऱ्यात कपडे ढीग करून ठेवले होते आणि त्याच्या बाजुलाच २ लोखंडी ट्रंका एकावर एक ठेवलेल्या होत्या.

चाह घेणार न..कमलाबाईने आतून डोकावून विचारलं. तसं सत्यवीरने होकारार्थी मान डोलावली.

काही वेळातच चहा घेऊन कमलाबाई सत्यवीरच्या पुढे आली आणि पुढच्या लोखंडी कॉटवर विसावली. पदराने घाम पुसत आता सत्यवीर काय विचारणार याचाच विचार करत चेहऱ्यावर दडपणाचे भाव घेऊन बसली होती. सत्यवीरला ते कमलाबाईकडे न पाहताच समजलं होतं. त्यामुळे एकदम प्रश्नांची सरबत्ती न करता खेळीमेळीच्या वातावरणातूनच कमलाबाईची चौकशी करावी लागणार हे सत्यवीरने ताडलं. तसंही समोरची व्यक्ती पाहून त्याच्याकडून माहिती कशी काढून घ्यावी हे सत्यवीरला चांगलंच समजत होतं. चहाचा एक घोट घेऊन आणि कमलाबाईकडे न पाहताच सत्यवीर स्मितहास्य करत म्हणाला वाहः चहा फक्कड झालाय कमलाबाई

यावर कमलाबाई कसनुस हसल्या.

तुमच्या हाताला चांगलीच चव आहे कमलाबाईकमलाबाईकडे पाहत तृप्तीचे भाव आणत सत्यवीर म्हणाला.

या स्तुतीने कमलाबाई नुसताच हा हा असं म्हणल्या पण त्यांच्या मनावर आलेला ताण थोडा हलका झाला हे सत्यवीरने टिपले आणि काहीही न बोलता चहा पिऊ लागला. काही वेळ असाच शांततेत गेला.

कमलाबाई वाड्यावर जे काही झालं ते खूप दुर्दैवी होतं. असं कोणाच्याही बाबतीत घडू नये. पण आता काय करणार, आम्हाला कर्तव्यापोटी सगळ्यांचीच चौकशी करावी लागते. आमचं कामच आहे ते. त्याशिवाय आमचं पोट कस चालणार.. नाही का” चेहऱ्यावर हसरे भाव आणत आणि शक्य तितके वातावरण खेळीमेळीचे ठेवत सत्यवीर म्हणाला. कमलाबाई सत्यवीरच्या या गोड बोलण्याने आता बऱ्यापैकी तणावरहित होऊ लागली होती आणि जरा आरामात कॉटवर बसली होती.

कमलाबाई तुम्ही आम्हाला तपास कामात मदत करणार का? म्हणजे देसाई वाड्यावरचे लोक स्वभावाने कसे आहेत. तुमच्याशी नीट वागतात का? पगारपाणी वेळेवर देतात का? वगैरे वगैरे माहिती हवी होतीचहाचा घोट घेत सत्यवीर म्हणाला. आपला संशय हा तिच्यावर नसून तिला वाड्यावर कशी वागणूक मिळते हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत असं सत्यवीर भासवत होता.

कमलाबाई सुद्धा आता जरा एक पाय वर घेऊन निवांत बसली आणि सांगू लागली– “मानस लय चांगली हायती बगा. माजी आन माज्या घरातल्या माणसांची खूप काळजी घेत्यात

अस्स.. ते कस काय” सत्यवीर उगाचच चहाचा कप हातात घेत प्रश्नार्थक मुद्रेने पाहू लागला.

मला पगार देत्यात येळेवर, माज्या पोरीची चौकशीबी करत्यात. माज्या मालकाला समजावून सांगत्यात सगळंकमलाबाई बोलून गेल्या.

मालकाला काय समजून सांगत असतातन समजून सत्यवीर म्हनला. कमलाबाईच्या नवऱ्याला देसाई कुटुंबीय कशाबाबतीत समजावून सांगत असावेत याचा त्याला प्रश्न पडला.

तसं थोडंस खाली पाहत कमलाबाई म्हणाल्या “आता काय सांगू साहेब तुम्हास्नी, आमचे मालक चांगल्या कंपनीत कामास्नी होते पण मित्रांच्या नादाला लागून दारूच्या येसनाला लागले. आन त्या येसनापायी लयं भिकेकंगाल झाले होते. हातातली चांगली कंपनीतील नोकरी होती ती पण सोडून दिली. आन मलाबी घरात तरास देऊ लागले. म्या देसाई वाड्यावर काम करायचे तवा आणि अजून २-३ घरात धुनी भांडी बी करायचे. हि पोरगी शाळत शिकाय होती. तिच्या फी ला बी पैसा हातात गावत न्हवता. हे अविनास साहेबास्नी कळल तेव्हा तेनी हित येऊन आमच्या मालकाची समजूत घातली आणि मोठ्या बाईसाहेबांच्या ओळखीन एका ठिकाणी आमच्या मालकाला वाचमनची नौकरी देऊ केली.

ओह्ह.. म्हणजे अविनाश यांनी मालतीताईंच्या ओळखीने तुमच्या मालकांना नोकरी देऊ केली होती तर” सत्यवीर चहाचा घोट घेत बोलला.

हा ते तर हायेच, पन दर दिवाळीला आम्हा सगळ्यासनी कापड बी घेऊन दित्यात आन वर बोनस बी. मला अविनास साहेबांनी फक्त आमच्या इथे कामाला या चांगला पगार देऊ असं सांगितलं. त्यांना वाडा सांभाळणारा कोणी बाईमाणूस पण पाहिजे हुतं. मोठ्या बाईसाहेबांकडे माणसांची लयं रीघ लागायची. आन वाहिनीसाहेबांना पण घरकामात मदतीला कोणीतरी हवंच होतं. आता ती मानस एवढं आमच्यासाठी करत्यात अजून काय पाईजे म्हनून मीबी हा म्हटलं.कमलाबाईने एका दमात सगळं सांगून टाकलं.

एवढी माहिती कळताच आता मूळ मुद्द्याला हात घालायला हवा असं सत्यवीरला वाटून गेल. हातातला चहा संपला असल्याची जाणीव त्याला झाली.

वाहः असा फक्कड चहा बऱ्याच दिवसात पिला बघा. अजून मिळेल का?” चेहऱ्यावर तेच समाधान मिळाल्याचे भाव आणत सत्यवीर म्हणाला.

हाये कि अजून आनते हा. असं म्हणत कमलाबाई उठली आणि पटकन स्वयंपाक घरात जाऊन तिने अजून एक चहाचा कप सत्यवीरच्या हातात ठेवला.

आहाह.. कमलाबाई तुमच्या हातचा चहा पिऊन अगदीच पोट भरल्यासारख वाटतय बघासत्यवीर अतिशय मंदपणे स्मितहास्य करत चहाचा घुटका घेत म्हणाला.

आयो एवढा आवडला वय चाह तुम्हास्नीकमलाबाई हलक्याच लाजत बोलल्या. त्या आता आरामात बसून बोलू लागल्या होत्या. याचाच फायदा घेत सत्यवीरने पुढचा प्रश्न केला.

बऱ मला एक सांगा कमलाबाई तुमच्या मोठ्या मालकीणबाई म्हणजेच मालतीताई स्वभावाने कशा होत्या” सत्यवीर मान खालुन चहा पीत उत्तराची वाट पाहू लागल्या. मालतीताईंविषयी बोलायचं म्हटल्यावर कमलाबाईचा चेहरा जरा सुकल्यासारखा झाला. तरीही त्या पुढे बोलू लागल्या – “मोठ्या बाईसाहेब स्वभावाला लयं कडक होत्या बगा. कामात जराबी कुचराई झालेली अजिबात खपत न्हवती त्यासनी. जरा सुदिक चूक झाली कि वसकन कावायचा. मला तर लय भीती वाटायची बगा त्यांची.

अच्छा घरातल्या सगळ्यांशीच तसं वागायच्या कि फक्त तुमचाबरोबरचसत्यवीर हलकं हसत म्हणाला.

सगळ्याशीच ओ.. कोणाला सुदिक सोडत नसायच्या.. आबासाहेब बरे होते तेव्हा ते सांभाळून घ्यायचे समद, पर आबासाहेबांचा डोक्याचा अपघात झाल्यापासन ते खाटेवर पडून होते मगतर बाईसाहेबांना कोणीबी आवरणार न्हवत.मान खाली घालत कमलाबाई बोलली.

त्यांची दोन्ही मुलं आणि सून त्यांच्याशी सुद्धा असंच कडकपणे वागणं होतं का?” प्रश्नार्थक मुद्रा करत चहाचा कप धरून सत्यवीर म्हणाला.

अर्रर..ते तर इचारुच नका तुम्ही...कपाळावर हात ठेवत कमलाबाई म्हणाली. तसा सत्यवीर जरा खुर्चीत नीट बसला आणि म्हणाला

“का हो काय झाला एवढ कपाळावर हात मारण्यासारख?” सत्यवीरच्या या प्रश्नासरशी कमलाबाई सुद्धा सावरून बसत थोडं पुढे झुकत बोलू लागली.

अवो अविनास साहेबास्नी आन वाहिनीसाहेबास्नी तर लयच कावायच्या. कुटबी चूक झाली तर लय झापायचा दोघांना. आन बिचारी दोघबी निमुटपनी ऐकायचे सगळं. आबासाहेबांना सांभाळायला दवाखान्यातून नर्स ठिवली होती तर तिलाबी काडून टाकली आन या दोघास्नीच आबासाहेबांच सगळं बागाय लावलंकमलाबाई दुखी स्वरात म्हणाल्या.

त्यांचा दुसरा मुलगा आशुतोष त्याला काही बोलायचा कि नाहीसत्यवीरने विचारलं

हम्म..” असं म्हणत ओठ मुडपत नाराजीचा स्वर काढत कमलाबाई म्हणाली.. तर तर.. तेला कशाला काही बोलतील बाबा. लाडाचा गोळा न तेंचा तो. आपल्या पोटच्या पोराला कशाला काय बोलतील त्या

आपल्या पोटच्या पोराला म्हणजे...न समजून सत्यवीरने विचारलं

अवो आशुतोष तेंचा स्वतःचा पोरगा ना.. अविनास साहेब हे आबासाहेबांच्या पहिल्या बायकोचे पोर होते. सावत्र मुलगा.. मोठ्या बाईसाहेबांचा.कमलाबाईने एका दमात सांगून टाकलं.

काय सांगताय काय..” हातातला चहाचा कप तसाच ठेवून कमलाबाईकडे आश्चर्याने पाहत सत्यवीर बोलला.

हो, आबासाहेबांची दोन लग्न झाली हायेत. पहिली बायकू आजारात मेली तिचा पोरगा म्हणजे अविनास साहेब. ते लहान असतानाच तेंची आई गेली. मग लहान पोराची खाण्यापिण्याची आबाळ होऊ नये म्हनून आबांनी दुसरं लगीन केलं ते मोठ्या बाईसाहेबासंग, तेंना जो पोरगा झाला त्यो आशुतोसकमलाबाईने अगदी मोलाची माहिती पुरवली होती. सत्यवीरला हि माहिती नवीन असल्याने तो विचारात पडला कि देशमुखांनी त्याला हि माहिती कशी काय सांगितली नाही कि त्यांनाच या बाबत काही माहिती नाहीये. खुनाच्या प्रकरणात सर्व प्रकारची सर्व अंगाने माहिती घेणे गरजेचे असताना देशमुखांन हि माहिती कशी नसावी. सत्यवीरला भराभर प्रश्न पडत गेले. कदाचित पोलिसांच्या चौकशीत पोलिसांनी या अनुषंगाने चौकशी केली नसावी. वाड्यावर सगळ्यांची चौकशी होत असताना हि माहिती देण्यासारखं महत्व वाड्यावरील कोणत्याच सदस्याला वाटलं नसेल. असो आता आपल्याला हि माहिती मिळाली हे महत्वाचं आहे. एकंदरीत कमलाबाईला घरी भेटण्याचा निर्णय आपल्याला चांगलाच फळाला आला.

चाह देऊ का अजून साहेबसत्यवीरची विचारांची तंद्री भंग करत कमलाबाईने विचारलं

न..नाही नको एवढा पुरे आहे...” एवढं बोलून सत्यवीरने आता थोडसं गंभीरपणे प्रश्न विचारायला सुरुवात केली-

अविनाश सोबत मालतीताई यांचं वागण कस असायचंसत्यवीरने विचारलं.

अवो काय सांगू लयच हाड्तुड करत वागणूक द्यायचा तेस्नी. आन वहिनिसाहेबास्नी पण अशीच वागणूक देयाच्या. बिचारी दोग मात्र शांतपणे त्यांची सगळी कामा निमुटपणे करायची. कवा कवा वहिनिसाहेबास्नी अविनास साहेब इचारायला पण येयाचे कि काही मदत करू का कामात म्हणून, पण वहिनीसाहेब नाई नाको म्हणून सगळी कामा एकटी करायचा. तरीबी येळ मिळेल तसं अविनास साहेब घरकामात वाहिनिसाहेबांना मदत करू लागायचे. दोघांचा एकमेकांवर लाय जीव बगा. कवा कवा मला वाटायचं माझीच दृष्ट नको लागाय या जोडप्याला.कमलाबाई हलकेच हसत वर पाहत म्हणाल्या.

कमलाबाई त्या दिवशी जेव्हा मालतीताईं जमिनीवर कोसळल्या तेव्हा नक्की काय झालं होतं मला सविस्तर सांगाल का? सत्यवीर गंभीर चेहरा करत म्हणाला.

हो सांगती कि असं म्हणत कमलाबाईनी पदर कमरेला खोचला दोन्ही पाय खाटेवर घेतले आणि सांगायला सुरुवात केली- त्या दिशी बगा वाड्यावर मला खूप कामं होती. सकाळपासून मी आणि वहिनीसाहेब कामातच हुतो. सगळी जुनी भांडी काढून धुवून पुसून ठिवली. समदा वाडा झाडून पुसून साफ केला. संध्याकाळी झाल्यावर मी आन वहिनीसाहेब गप्पा मारत स्वयंपाकघरात भाज्या निवडत बसलो हुतो. अचानक मोठ्या बाईसाहेब तनतनत स्वयंपाकघरात आल्या. आन मोठ्या बाईसाहेबांनी ४-५ साड्या आन २-३ चादरी आमच्यासमोर आणून टाकल्या. आन म्हणाल्या हि कापड का धुतली न्हाईत. अमी दोगी त्यांच्या तोंडाकड बघतच राहिलो. घटकाभराने वहिनिसाहेबांनी सांगितलं कि मागच्याच हप्त्यात धुतली हायती हि. तवा बाईसाहेब म्हणाल्या या साड्या खराब झाल्यात. चादरींवर कळकट डाग पडलेत परत आताच्या आत्ता धुवा हि कापड, मला अंघोळीला जायचंय. असं म्हणून त्या अंघोळीला निघून गेल्या आम्ही दोगी आदीच दिवसभराच्या कामाने थकून गेलू होतु. परत हे कपडे धुवाचे म्हटल्यावर मला तर लय आंग मोडून आल्यावानी झालं. पर बोलणार काई, माझी तर घरी जायची येळ झाली हुती माजी पोरगी घरी एकटी असते सांच्याला. कारण माझं मालक रात्रपाळीला जातो. मला लगबग घरी याचं हुतं. वहिनीसाहेबांस्नी हे माहित हुत म्हनून त्या म्हणाल्या कमलाबाई तुमी जावा मी समदी कापड धुते.” वाहिनीसाहेबांना एकट्याला एवढ कपडं धुवायला लावायला लावून घरी जायचं, मला लय वंगाळ वाटलं बगा. बिचाऱ्या वाहिनीसा मोठ्या बाईसाहेबांचा शब्द कधी खाली पडू दिला नाही तेनी. त्यांना असं एकट्याला कामा कराया सोडून जावा वाटना. तवा मी पन थांबले आन म्हनले मी पन थांबते दोगीबी मिळून कापड धु. आन आम्ही दोगी वाड्याच्या मागच्या बाजूला हिरीवर कापड घेऊन गेलू. वहिनिसाहेबांनी रहाटाला कळशी लावली आन पानी उपसून काडाय लागल्या. मंग मी आन वहिनीसाहेब कपडे धुवाय लागलो. काही वेळात पानी संपल आन वहिनिसाहेबांनी परत पानी उपसायला कळशी हिरीत टाकली आन पानी उपसणार एवढ्यात दोर तुटला आन कळशी हिरीतच पडली. आत सांच्याला हिरीत उतरून कळशी काढायची म्हटल्यावर आम्हा दोघींना जमणार न्हवत. मंग मीच म्हणाले वहिनीसाहेब आता कळशी राहूदेत आत हिरीतच. साहेबास्नी सांगून परत काढू. तुमी कापड धुवा तवर म्या आत जाऊन दुसरी कळशी आणते. असं म्हणून मी मागच्या रस्त्याने आतमध्ये परत वाड्यात आले. आन जिन्याने वरच्या मजल्यावर गेले कारण वरल्या मजल्यावर सामानाच्या खुलीत जुन्या सामानांच्या पसाऱ्यात लय समान हुत. तीत कळश्या, बादल्या आन लय कायकाय सामान असतया. तीत इकडतिकड पाहिल्याव मला कोपऱ्यात एक कळशी दिसली ती घेतली आन खाली आली. तवा खाली येताना म्या पाहिलं कि मोठ्या बाईसाहेबांच्या खोलीचा दरवाजा उघडाच हुता. त्या अंघोळ करून खोलीत आल्यावर खोली अशी उघडी ठेवत नसायच्या. म्हणून म्हन्ल आत बगाव आन माझी नजर आतमध्ये गेली. तवा मला लांबून दिसलं कि मोठ्या बाईसाहेबांचे पाय जमिनीवर पालथ दिसल. जणू की उताण्या पडल्यात तसं म्या म्हटलं अशा का पडल्याती जरा जवळून जाऊन बगाव असं म्हनून खोलीच्या समोर आले. तर मोठ्या बाईसाहेब जमिनीवर उताण्या पडलेल्या दिसल्या मी तर घाबरलेच. पहिलं वाटलं चक्कर बिक्कर येऊन पडल्या कि काय म्हणून हाका मारल्या. तर हु नाही कि चू नाही माजी काय त्यस्नी हात लावायची हिम्मत झाली. आवाज देऊन बी त्या उठानात आन कसली हालचाल बी करानात मंग मात्र मी घाबरले. पळत वाड्याच्या मागी गेले, आन मी मोठ्याने वाहिनिसाहेबास्नी हाका मारल्या तवा त्या घाबरून पळत आल्या. त्यांनीबि हाक मारल्या, जवळ जाऊन हलवलं तरीबी उठानात. शेजारच्या खोलीत आबा खाटेवर आजारी असल्यागत पडलेलं असायचं तवा त्यांना उठवून बी काय फायदा न्हवता कारण आबांना सौताचीच सूद नसायची. मंग मीच वाड्याच्या बाहेर गेले आन बाहेर जाऊन २ लोक बोलावून आणली आन त्यांनी डाक्तरास्नी बोलावून आनल. डाक्टारने तपासून सांगितलं कि हास्पिटलात हलवा. एवढ बोलून कमलाबाई शांत बसली

सत्यवीर शांतपणे हाताची बोटे एकमेकात गुंफवून शांतपणे ऐकत होता. कमलाबाईच्या घराबाहेर आता रात्र पडली होती. आजूबाजूला चांगलीच शांतता पसरली होती. घरात कोणी काहीच बोलत न्हवत. कमलाबाईची पोरगी सुदा आमच्याकडे आम्ही काय बोलत आहोत ते ऐकत शांतपणे पाहत बसलेली होती. सत्यवीर खुर्चीत जरा मागे टेकून बसला आणि म्हणाला. कमालाबाई तुम्ही जेव्हा कळशी आणायला परत आत वाड्यात गेला तेव्हा वाड्यात बाहेरून कोणी आल्याचा तुम्हाला जाणवलं का? किंवा बाहेरून कोणी आतमध्ये येऊन मालतीताईंची हत्या केली असेल असं तुम्हाला वाटत का?” सत्यवीर शांतपणे कमलाबाईकडे पाहत म्हणाला. त्यावर कमलाबाई विचार करत म्हणाल्या

नाई वो असं नाई वाटत मला. कारण अमी धून धुवाय गेलो तवा कोनी न्हवत वाड्यात. तसंबी वाड्याच पुढच दार दिवसभर उघडंच असतंय रातच्याला अविनाससाहेब आले कि लावून टाकायचे. हा आता अचानक कोन बाहेरून आलं आसन तर आम्ही मागे धून धूत असल्यामुळ आमाला माहित नाईकमलाबाई ने चेहरा बारीक करत सांगितलं.

हम्म..डॉक्टर पाटील हे कसे होते स्वभावाने” सत्यवीरने हनुवटीवर हात ठेवत विचारले.

त्यो तर लय डोमकावळ्यावाणी होता बगा... नजर चांगली न्हवती मेल्याचीतोंड वाकड करत कमलाबाई म्हणाल्या.

अच्छा... अजून काही विशेष त्यांच्याबद्दल म्हणजे कामाव्यतिरिक्त कधी येणं जाणं त्याचं वाड्यावर” सत्यवीरने विचारलं.

आबास्नी बगायला येयाचा तेवढच.. पन आला कि आपलं इकडे बघ तिकडे बघ करायचा लुथभरयासारखं... हलकट मेला” दात विचकत कमलाबाई म्हणाला.

हम्म...असा उद्गार काढून सत्यवीर शांत बसला. आता अजून जास्त काही विचारण्यात काही अर्थ न्हवता कारण महत्वाच्या गोष्टी त्याला समजल्या होत्या. कमलाबाईनी बरीच माहिती दिली होती. आता इथे जास्त वेळ बसण्यात काही अर्थ न्हवता.

त्यामुळे सत्यवीर खुर्चीतून उठला आणि म्हणाला चला कमलाबाई निघतो मी आता खूप वेळ घेतला तुमचा. मस्त चहा पाजलात तुम्ही, तुमची खूप मदत झाली मला.

कमलाबाईने सुद्धा हसत हसत सत्यवीरला निरोप दिला. कमलाबाईच्या घरातून बाहेर पडल्यावर रस्त्यावरून सत्यवीर खूप शांतपणे चालत चालला होता. रस्त्यावर जास्त वर्दळ न्हवती. बहुतेक घरात निजानीज करण्याची तयारी चालू होती. आज त्याला बरीच महत्वाची माहिती मिळाली होती आणि तपासकार्यात त्याची खूप मदत होणार होती त्यानुसारच तपासाची पुढची दिशा ठरणार होती. सत्यवीरची विचारचक्र वेगाने फिरत होती. कमलाबाईने दिलेल्या माहितीनुसार वाड्यात कोणाच्याही अपरोक्ष वाड्यात येऊन घातपाताच कृत्य करता येऊ शकत होत असंच दिसतं होतं पण नक्की कोण असं करू शकेल? आणि केलंच तर त्याने कोणत्या हत्याराच्या सहाय्याने हे कृत्य घडवून आणलं? मालतीताईंना अशा विचित्र पद्धतीने मृत्यू देण्यामागे गुन्हेगाराचा काय हेतू असू शकत होता? असे एक न अनेक प्रश्न सत्यवीरच्या मनात पिंगा घालत होते. जोपर्यंत गुन्ह्यात वापरलेलं हत्यार आणि गुन्हा करण्यामागचा हेतू कळणार नाही तोपर्यंत हे कोडं उलगडणार नाही हे सत्यवीर जाणून होता. त्यामुळे लवकरात लवकर पाऊले उचलण्याची गरज होती. तसही गुन्हेगार जो कोणी असेल तो आत्तापर्यंत सावध झालेला असू शकतो. त्यामुळे अतिशय सावधपणे पाऊले टाकणं क्रमप्राप्त होतं. त्यामुळे उद्या काय काय कामं केली पाहिजे याचा एक विशेष आराखडा सत्यवीरच्या मनात तयार होऊ लागला होता.

क्रमशः

खोली क्रमांक ४

                                   "अरे नुसता बसलायस काय आतमधे. जरा बाहेर येऊन धक्का मार" अजय वैतागत म्हणाला. "काय..."...